काल, २७ जुलै २०२५ रोजी कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला येथे आमच्या ‘अॅडव्हेंचर ट्रॅवल क्लब’ची भ्रमंतीचे आयोजन केले होते. २००७ मध्ये मी पहिल्यांदा हा ट्रेक केला होता. त्यानंतर जवळपास १८ वर्षांनी माझे येथे जाणे झाले होते. आम्ही एकूण १० सहभागी होतो. या भ्रमंतीदरम्यान खटकलेल्या काही गोष्टी इथे नमूद करत आहे.
आंबिवली पायथ्याला कर्जतहून भाड्याने आणलेल्या ईकोने आम्ही उतरलो, तर गोपाळ सावंत यांच्या हॉटेलजवळ एक बार सुरू झाला आहे. म्हणजे इथूनच ‘पर्यटकांची’ सोय करण्यात आली आहे. गाडी पार्किंगसाठी शुल्क आकरले जाते. (आता त्यात नवीन काही नाही कारण सगळीकडेच ते आकरले जाते.)
गडावर जाण्यासाठी पूर्वी असलेली पायवाट संपूर्ण हटवून तेथे रस्ता तयार करण्यात आला आहे, जो अजूनची कच्चा आहे. तेथून केवळ बाईक आणि एसयूव्ही सारख्या रग्गड गाड्याच जावू शकतात. पायवाट हटवल्याने तुम्हाला जबरदस्तीने केवळ रस्त्यानेच जावे लागते जे कंटाळवाणे होते. थेट गावात मात्र केवळ गावापुरता कॉँक्रिटचा रस्ता आहे. गावापर्यंत येणारा रस्ताच कच्चा असताना जर गाड्याच वर जाऊ शकणार नसतील तर गावात कॉँक्रिटचा रस्ता कशाला? तर याचे मुख्य कारण म्हणजे कोण्या एका ‘मेहता’ नावाच्या माणसाने आणि ‘शिवशंकर’ नावाच्या कंपनीने किल्ल्याच्या माचीचा पठाराचा जवळपास अर्ध्या पेक्षा जास्त भाग विकत घेतला आहे असे दिसते. त्यांनी पठारावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने कुंपण घालून सगळी जागा अडवून टाकली आहे. त्याच्या भविष्यातील विस्ताराच्या हिशोबाने इथे रस्ता बनतो आहे. आपल्याला किल्ल्यावर जाताना केवळ रस्त्याने जावे लागते. आजूबाजूचे कडे कपाऱ्या पाहता येत नाहीत. मला एक कळत नाही, आपल्याला मराठी असून वनविभागाच्या जमीनी, आदिवासी अखत्यारीत असलेल्या जमिनी खरेदी करायच्या झाल्यास खूप अडचणी असतात, मग हे अमराठी लोक अशा जमिनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशा खरेदी करतात? तिथे एवढी बांधकामे आणि खोदकाम कसे करू शकतात? ह्या वेळी कोथळीगडावरील हा प्रकार पाहून मला लोहगड विसापुर खिंडीत तयार झालेल्या रिसॉर्टची आठवण आली. ह्या रिसॉर्टनेही संपूर्ण परिसराचा देखावा भकास करून टाकला आहे. कोथळीगड सुद्धा त्याच वाटेवर आहे. गडावर मेडिकल, एटीएम सारख्या मूलभूत सुविधा नाहीत पण मजा मस्तीच्या सगळ्या सुविधा तयार केल्या जात आहेत. उद्या थेट पेठ गावापर्यंत बस आल्या तर आश्चर्य वाटणार नाही. उद्या ह्याच रिसॉर्टमध्ये स्थानिक मालक, भूमिपुत्र वॉचमॅन, साफसफाई कामगार म्हणून वावरताना दिसतील.
कर्जत ते आंबिवली रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडे होती, ज्यावर ऋतूमध्ये खूप काजवे दिसत. रस्ता करण्यासाठी ही झाडे तोडली गेली आहेत त्यामुळे काजवे खूप कमी झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आम्ही गेलो त्यादिवशी गुजराती (मुंबई-पुण्याकडील किंवा बाहेरील) लोकांनी भरून ३ बस आल्या होत्या. हे सगळे पर्यटक घरी किंवा जवळपास जाण्यासाठी वापरण्यात येणारी स्लिपर्स घालून ओढे-ओहोळ यांनी घसरड्या झालेल्या दगडांनी युक्त अश्या ह्या ट्रेकला आले होते. बहुदा ते कोण्या एका रिसॉर्टमध्ये काही दिवसांसाठी आले होते; त्यांना ‘कोथळीगड पाहून या’ असे सांगण्यात आले असावे आणि हे लोक टुरला घालतात त्या पेहरावात ट्रेकला आले होते. सगळ्यात हद्द म्हणजे दोन मुली चक्क केवळ ‘स्पोर्ट्स ब्रा’ आणि त्यावर जीन्स घालून आल्या होत्या. कपाळावर हात मारून घ्यायची इच्छा झाली. आमच्या सहभागी लोकांमध्ये एक मुलगी नियमित ट्रेक करत असल्याने तिने त्या दोघींना टोकले; की तुम्हाला पूर्ण कपडे घालून येता आले नाही का? तर त्यावर त्या दोघींनी विचारले की ‘उपर मंदिर है क्या?” आता काय बोलावे? या अमराठी लोकांना सांगून सांगून थकलो आहोत की हे गड-किल्ले म्हणजे आमची देवस्थानेच आहेत. इथे येताना भान ठेऊन या. परिसराला, लोकांना, भूगोल आणि इतिहासाला मान देता येईल असे वर्तन करा. मुळात यामध्ये स्थानिक लोकांचीही चुकी आहे असे म्हणावे लागेल. मान्य आहे की तुमचा रोजगार त्यावर अवलंबून आहे पण म्हणून तुम्ही लोक काहीही चालू देणार आहात का? प्रवेशशुल्क बरोबर आकरता ना? मग त्यांना नियम सांगता येत नाहीत? त्याशिवाय प्रवेश देताच कसे? गडावर सर्रास बियरचे कॅन नेलेच कसे जातात? तोकड्या कपड्यात प्रवेश कसा दिला जातो? की पैसे कमवायच्या नादात ह्या सगळ्याचा विसर तुम्हाला पडला आहे? पैसे कमवायच्या नादात किमान छत्रपती शिवाजी महाराजांनी जपलेल्या ह्या किल्ल्यांची दुरावस्था करू नका. तुम्ही स्थानिक लोकांनीच दुर्लक्ष केले तर उद्या त्याचा फटका तुम्हालाच बसणार आहे.
गडाच्या पायथ्याशी स्थानिक गाड्या असणारे लोक कर्जतहून येणाऱ्या गाड्यांना मज्जाव करतात आणि परतीचे भाडे घेण्यास रोकतात, स्वतः अधिक भाडे लावून गाड्या सोडतात. अशी मनमानी इथे सुरू आहे. आम्ही इथे भ्रमंतीसाठी येतो त्यावर तुमचा रोजगार अवलंबून आहे याचा या लोकांना विसर पडला आहे. लोकच आले नाहीत तर तुम्ही काय कराल? मुळात ऐतिहासिक आणि साहसाने युक्त अश्या ह्या गिर्यारोहण स्थानाचे महत्व निर्बुद्ध पर्यटकांसाठी गमावून बसणे योग्य नाही. ह्या संगळ्यावर स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन समस्या सोडवणे गरजेचे आहे हे नक्की..
टीप: उपरोक्त लेखाने स्थानिक किंवा पर्यटक किंवा गिर्यारोहण संबंधित कोणाला दुःख झाले असेल किंवा त्रास झाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व, परंतु अश्या गोष्टी पाहिल्याने मन विषण्ण होते म्हणून हा लेखनप्रपंच..
No comments:
Post a Comment