रामसेज आणि पांडवलेण्यांची सफर - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, August 15, 2019

रामसेज आणि पांडवलेण्यांची सफर

घनगडचा ‘लेटेस्ट’ ट्रेक करून वर्ष होत आलं होतं पण ट्रेकला काही मुहूर्त सापडत नव्हता. त्यात टीममधला खंदा मेंबर, प्रथमेश देशपांडे, नोकरीमुळे बंगलोरला शिफ्ट झाल्याने ट्रेक प्लान होणंच थांबलं होतं. प्रथमेशचा व्हॉट्सअपवर मेसज आला की त्याला १३ - १९ ऑगस्ट (२०१९) तारखांना, मोठ्या सुट्टीमुळे सह्याद्रीतला ट्रेक करायला जमणार आहे, पण त्या तारखांना मी आणि पंकज दोघेही वैयक्तिक कारणांमुळे अडकलो असल्याने केवळ १४-१५ तारखेला ट्रेक करायचे ठरले आणि त्यानुसार तयारी सुरु झाली. पण दोनच दिवस हातात असल्याने आणि त्याला पुन्हा बंगलोरला जायचे असल्याने एका दिवसात होणारा किल्ला ‘शोधायला’ सुरुवात झाली. पंकजने रामसेज किल्ला सुचवला. किल्ल्याची माहिती घेता, तो ‘बराच लहान’ असल्याचे जाणवले. त्यामुळे त्याची थोडी टाळाटाळ झाली. पण आजूबाजूचे बरेचसे किल्ले आमच्या तिकडीने आधीच ‘केले’ असल्यामुळे सरतेशेवटी ‘रामसेज’ फायनल झाला. पटकन ‘होणारा’ किल्ला असल्याने त्यासोबत आणखी एखादा किल्ला किंवा पर्यटनस्थळाला भेट देऊया असे सर्वानुमते ठरले. किल्ला नाशिकमधला असल्याने नाशिकजवळची ‘पांडव लेणी’ पाहता येतील असं ठरलं. १४ ऑगस्ट (२०१९) रोजी रात्री निघून १५ तारखेला किल्ला ‘करायचं’ असा ‘नेहमीचा ठरलेला’ प्लान’ फायनल झाला. त्यानुसार पंकजने पुढले सगळे प्लानिंग सांभाळले. ट्रेकसाठी पंकज, प्रथमेश, मी, दिलीप तयार होतोच; त्यात प्रथमेशकडून प्रतिक सुर्वे आणि ओंकार तर  पंकजकडून पुनीत करमरकर आणि मयूर मुंडले ‘फिक्स’ झाले. प्रतिकने ‘झूमकार’वरून गाडी बुक केली.

ठरल्यानुसार १४ तारखेला रात्री ११ वाजता मला, व्हॉट्सअपवर ठरल्याप्रमाणे, तीन हातनाका येथे पोहोचायचे होते. किल्ला बराच लहान असल्याचे कळल्यामुळे जरा जास्तच ‘कम्फर्टेबल’ होऊन मी जास्त काही साहित्य माझ्या बॅगेत न भरता घरून वेळेत निघालो आणि वेळेत तीन हात नाका येथे माझ्या (या रूटवरच्या ट्रेकसाठी दरवेळी) ‘फिक्स’ असलेल्या जागी बरोबर ११ वाजता पोहोचून गाडीची वाट पाहू लागलो. प्रथमेश, प्रतिक, पंकज, दिलीप आणि ओंकार हे बोरीवलीहून गाडी पकडणार होते तर मी, पुनीत आणि मयूर ‘ठाण्या’ला भेटणार होतो. सहज ‘अपडेट’ म्हणून पंकजला कॉल केला आणि ‘स्टेट्स’ विचारलं. भाईलोकांनी ११ वाजता गाडी बोरीवलीहून सुरु केली होती. ‘नेहमीप्रमाणे’ तीन हात नाक्याला त्या बसस्टॉपवर मच्छरांचे चावे खात मी वाट बघत बसलो; कारण हे दरवेळंच ठरलेलं होतं आणि मला त्याची सवयही झाली होती. फक्त मला उशीर झाला तर ही मंडळी नेमकी लवकर पोहोचून वाट बघत बसलेली असतात आणि मग शिव्या पडतात. अर्ध्या तासात पुनीतचा फोन आला. त्याने मला मी कुठे बसलोय ते विचारलं. मी त्याला मी तीन हात नाका येथे असल्याचं सांगितलं;
“तू तिथे काय करतोयस??” त्याने प्रतीप्रश्न केला. 
“तीन हात नाक्यालाच यायचंय ना?” मी विचारलं.
“नाही रे.. तीन हात नाक्याला कशाला गेलास? आपण नाशिकला जातोय न?” त्याने विचारलं.. दोघांपैकी उत्तर कोणीही देत नव्हतो.. फक्त प्रश्नांवर प्रतिप्रश्न सुरु होते..
“पंकजला विचारून थांबलोय इथे मी.. त्याला सांगितलं होतं ग्रुपवर..” पंकजच्या खांद्यावर ओझं टाकून मी हलकं व्हायचा निष्फळ प्रयत्न केला.
“अरे हो.. असेल कदाचित.. पण नाशिकला जायचंय तर तीन हात नाक्याच्या पुढे थांबायला हवंय ना आपण... माजिवडा नाक्याला ये तू..” त्याने सांगितलं आणि फोन कट केला. माझं रोडच्या बाबतीत हे नेहमीचं आहे. गुगुलला न सापडणाऱ्या गडांच्या आणि इतर ट्रेकच्या वाटा एकवेळ शोधता येतील मला पण गुगल मॅपवर दिसूनसुद्धा मला रोडच्या बाबतीत खूप गोंधळायला होतं. त्यांची गाडी लवकरच नाक्याला पोहोचणार होती त्यामुळे शेवटी रिक्षा पकडून मी माजिवडा नाक्याला पोहोचलो. पुनीत आणि मयूर तिथे वाट बघत होते. व्हॉट्सअप आणि मोबाईलमुळे अनोळखी व्यक्तींनाही अश्या ठिकाणी शोधून भेटणं कठीण जात नाही. तिथे त्यांना भेटल्यावर ‘पंकज’चीच कशी मिस्टेक आहे यावर थोडी चर्चा झाली; मग एकमेकांची चौकशी झाली, ओळख झाली. पंकजला ‘कुठे पोहोचलात?’ साठी कॉल केला तेव्हा ‘जवळच आहोत, पोचतोय थोड्या वेळात..’ असा पेटंट रिप्लाय मिळाला. त्यानुसार लकीली १० मिनिटांत गाडी नाक्याला हजर झाली. गाडीत शिरून जागा करून स्थावर झाल्यावर आणि प्रथमेश, पंकज आणि दिलीपसोबत ‘भरतभेटी’ सदृश्य एक प्रसंग घडवून आणल्यावर गाडीने पुढे प्रस्थान केले.

गाडी आटगावमार्गे जाणार असल्याचे आधीच माहित होते, त्यामुळे आटगाव स्टेशनबाहेर हायवेलगत असणाऱ्या ‘गुरु नानक’ धाब्यावर जेवण करण्याचा प्लान फिक्स होता. प्रथमेश आणि माझ्या आयुष्यात या धाब्यावर अनेक आठवणी जोडल्या गेल्या असल्याने आणि इतर मित्रांना त्यांच्या संमतीने किंवा जबरदस्तीने तिथे नेऊन जेवण करायला लावल्याने, हा धाबा म्हणजे आमच्यासाठी एक ‘स्मृतीस्थान’ झाला आहे. या मार्गावर कोणताही ट्रेक किंवा प्रवास असल्यावर ‘गुरु नानक’ धाब्यावरचे जेवण हा आमचा ‘नित्याचा कार्यक्रम’ असतो. (या धाब्याची माहिती घेण्यासाठी माझा २०१२ सालच्या ‘जीवधन नाणेघाट ट्रेक’वरील लेख नक्की वाचा.) या धाब्यावर जाऊन, कधी नव्हे ते श्रावण पाळल्याने, पहिल्यांदा शाकाहारी जेवणाची ऑर्डर देण्याचा प्रसंगही या ट्रेकला अनुभवता आला. रोटी, पालक पनीर, पनीर मसाला, मटर मसाला, शेवभाजी हे श्रावणी शाकाहारी पदार्थ मागवले. त्यावर ताव मारून झाल्यावर भात आणि दालफ्रायची चवही घेतली. सगळं संपवल्यावर, या धाब्यावर कधीही मीस न केलेलं, थंडगार छास पिऊन आम्ही धाब्याचा निरोप घेतला आणि पुढील प्रवासाला लागलो.

प्रतिक गाडी चालवत होता; त्याच्या बाजूला सोबत द्यायला ओंकार, मागच्या रांगेत मयूर, पुनीत आणि दिलीप तर शेवटच्या सीट्सवर पंकज, प्रथमेश आणि मी बसलो होतो. गाडी चालवणाऱ्यावर आणि त्याच्या बाजूला बसलेल्या माणसावर, गाडी ‘इच्छितस्थळी सुरक्षित’ नेतील असा विश्वास असेल तर ‘मागची’ मंडळी गाडीत छान झोपी जातात; हा अनुभव खोटा पडू नये म्हणून आम्ही ‘मागची मंडळी’ मस्त झोपून गेलो होतो. साधारण सकाळी ५ च्या सुमारास गाडी खडखडू लागली तेव्हा ‘काय कटकट आहे..’ अश्या स्वरुपात मी डोळे किंचितसे उघडून आलबेल असल्याची खात्री करून कूस बदलून पुनःश्च झोपी गेलो. त्यामुळे बाकीजण त्यावेळी काय करत होते ते कळून आलं नाही. सकाळी साधारणपणे ६ वाजता थोडी कुजबुज ऐकू आली तेव्हा तिसरी रांग सोडून बाकी सगळे गाडीबाहेर पडून टाईमपास करत होते. १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन; त्या निमित्ताने जवळच्या गावातील अनेक मंडळी गडाकडे निघालेली दिसली. त्यामुळे ‘आपण सुद्धा निघूया’ असं सर्वानुमते ठरलं. त्यानुसार सकाळचे सोपस्कार आवरून आम्ही गडाकडे निघालो. 

गडाच्या आग्नेयेला असलेल्या वाहनतळापासून गडाच्या टेकडीच्या टोकावर कातळाचा ठोकळा ठेवावा असं वाटणारा कडा समोर दिसतो. त्याला पाहून दुरून दिसणाऱ्या कोथळीगडाची आठवण होते. त्याचबाजूने गडाला वळसा देत गडाची वाट सुरु होते. गडाच्या धारेवरची मूळ पायवाट मोडून तिथे सिमेंटच्या पायऱ्या बनवल्याने लोकांना सोयीचे पडते असा गैरसमज जनमानसात पसरलेला आहे; त्याला हा गडसुद्धा बळी पडलेला दिसतो. अलीकडेच बांधलेल्या पण बरीच पडझड झालेल्या पायऱ्या गडाच्या सुरुवातीला आपलं स्वागत करतात. त्यावरून किल्ला चढायला सुरुवात केली. ऐन पावसाळ्यात गेलो असल्याने वातावरण खूप सुंदर होतं. नाशिक शहर तसं पाहता एक पठारच आहे.. काही टेकड्या अधेमधे डोकावताना दिसतात. गडावर जाताना उजवीकडची टेकडी साथ देत राहते. पावसाळ्यात काही टप्पे सोडता संपूर्ण वाट अतिशय सोपी आहे. अगदी अर्ध्या तासात आपण गडाच्या पदरात असलेल्या राम मंदिरापर्यंत पोहोचतो. मंदिराच्या अगदी अलीकडेच तटबंदीखाली एक गुहा दिसून येते. तिथे पोहोचण्यासाठी मात्र थोडा कठीण टप्पा चढून जावं लागतं. १० बाय १० फुटांच्या आसपास असणाऱ्या या गुहेत साधारणपणे मध्यभागी एक शिवलिंग आणि समोर नंदी दिसून येतो. शिवलिंगाच्या बरोबर वर, छताला लहानसे भगदाड दिसून येते. पावसाळ्यात तिथून पडणाऱ्या पाण्याने शिवलिंगावर वर्षाव होताना दिसत होता.

गुहा पाहून झाल्यावर, उतरताना राममंदिर पाहू असे ठरवून आम्ही गडाच्या माथ्याशी आलो. इथे कमान ढासळलेले प्रवेशद्वार दिसून येते. प्रवेश केल्यावर अगदी समोर एक द्वार दिसते. या द्वाराने एक टप्पा उतरून डावीकडे गेल्यावर समोर गडाच्या दक्षिण कड्यात खोदलेलं आणि अश्या ठिकाणी अजिबात अपेक्षित नसलेलं अत्यंत मोठे खांबटाकं दिसून येतं. खांबटाक्याच्या डाव्याबाजूसदेखील आत असलेला एक कप्पा दिसून येतो, त्यावरून ते बरंच मोठं असल्याची कल्पना येते. पंकजने ह्याला ‘कोरीव टाके’ म्हणतात असं आम्हाला सांगितलं.
खांबटाकं पाहून आम्ही गडाच्या आग्नेय दिशेला असलेल्या सोंडेकडे निघालो. सोंडेच्या टोकाकडे पाण्याची दोन तीन टाकी दिसून येतात. सगळ्या टाक्यांच्या कडांवर चौकोनी खड्डे खणलेले दिसून येतात. त्यांचे नक्की प्रयोजन कळून येत नाही पण त्यात बांबू किंवा वासे टाकून टाक्यावर छत केले जात असावे.

या भागात गावकऱ्यांनी नव्याने एक भलामोठा ध्वजस्तंभ उभारला आहे. आम्ही येथे पोहोचलो तेव्हा आसपासच्या गावांतून आलेली अनेक तरुण मुले आणि मंडळी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणासाठी जमले होते. त्यांचा तो उत्साह पाहून खूप बरं वाटलं. आम्ही तिथे पोहोचलो आणि झेंड्याला वंदन करण्यासाठी थांबलो. अधूनमधून पावसाच्या सरी येत-जात होत्या. तो ध्वजस्तंभच जवळपास ३५-४० फुट उंच होता. त्यावर त्याच्याच तोडीचा झेंडा गुंडाळून ठेवला होता. राष्ट्रगीत झाल्यावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आणि तिरंगा हवेत फडकू लागला. जवळपास २५ बाय १५ फुटाचा वजनी भिजलेला झेंडा त्या स्तंभावर फडकत होता म्हणजे गडावर किती वारा वाहत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यावर आम्ही गडाच्या उत्तर दिशेकडे निघालो; त्यासाठी पुन्हा खांबटाक्याच्या ठिकाणी पोहोचलो. उत्तरेच्या टेकडीच्या उजवीकडे गडाच्या आतल्या बाजूस कातळात कोरलेला एक उत्तम बांधणीचा दरवाजा दिसून येतो. तटबंदीच्या आत लपवलेल्या या दरवाज्यात चोरवाटेसारखा एक भाग दिसतो, तिथे उतरल्यावर त्याला दुसरे टोक नसल्याचे कळून येते; म्हणजे दुसऱ्या टोकाशी खोदकाम अपूर्ण ठेवल्याचे कळते.
मात्र संपूर्ण खाली उतरल्यावर टोकाशी एक भगदाड दिसून येते, ज्यातून खाली पाहिल्यावर आधी उल्लेख केलेल्या गुहेतील शिवलिंग दिसून येते. म्हणजेच हा चोर दरवाजा जर संपूर्ण खोदला गेला असता तर त्याचे दुसरे टोक त्या गुहेत उघडले असते, अशी त्याची रचना आहे. मात्र या सगळ्या खटाटोपाचे प्रयोजन कळून येत नाही.

दरवाजा पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा मागे येऊन टेकडीच्या डावीकडे निघालो. या बाजुने टेकडीवर जाता येते. टेकडीवर जाताना बांध घालून अडवलेल्या पाण्याचा तलाव दिसून आला. पंकजने त्याला ‘बांधीव’ तलाव म्हणतात असं आम्हाला सांगितलं. त्यापुढे पाण्याच्या टाक्यांच्या समूह दिसतो. गडाचा आकार पाहता गडावर पाण्याची मुबलकता खूप राखली असल्याचे जाणवते. टेकडीच्या साधारणपणे मध्यावर भगवती मातेचे देऊळ आहे. ज्याचे नव्याने झालेले बांधकामही मोडकळीस आलेले दिसले. मात्र आत मुख्य देवळात स्थापन केलेली देवी भगवती म्हणजेच श्री महिषासुरमर्दिनीची चतुर्भुज मूर्ती मात्र खूप सुरेख आहे.

यापुढे टेकडीच्या माथ्याला जात असताना आणखी काही पाण्याची ‘खोदीव’ टाकी दिसून येतात. सर्वोच्च माथ्यावर वाड्यांच्या बांधकामाचे भग्न अवशेष दिसतात. गडाच्या वायव्य दिशेला ‘देहेरगड’ दिसून येतो तर दक्षिणेला नाशिक शहराचा सुंदर नजारा दिसून येतो. पावसाळ्यात गडावर खूप आल्हाददायक वातावरण असते. त्यामुळे गडाच्या वायव्य कड्यावर बसून आम्ही बराचवेळ ‘टीपी’ केला. गडावर पश्चिम दिशेला आणखी एक दरवाजा असल्याचे वाचले होते; ते ‘शोधण्यासाठी’ निघालो.
टेकडीचा बराचसा भाग उतरून खाली आल्यावर गडाच्या दक्षिण सोंडेच्या उंचीच्या पातळीला पश्चिम भागात अजीबात दिसून येणार नाही अश्या रीतीने हा दरवाजा तयार केला आहे. त्याचा आकार पाहता हा चोर दरवाजा असल्याचे कळते. अगदी शिताफीने लपवलेले हे द्वार गडाच्या एका घळीच्या तोंडाशी उघडते. आणीबाणीच्या प्रसंगी या घळीतून पलायन करण्यासाठी ह्या दरवाज्याची रचना केल्याचे दिसून येते. रामसेज किल्ल्याच्या भेटीत चुकवू नये असे हे स्थान आहे. कड्याला चिटकून असलेल्या ह्या दरवाज्याच्या बोळातून कड्याला आपटून येणाऱ्या वाऱ्याचा झोत अंगावर घेण्याची मजा घेत इथे बराच वेळ काढला. पंकजने इथे त्याच्या मोबाईलवर विडीयो काढून घेतला. आणि थोडी मजा म्हणून या स्थानाबद्दल प्रत्येकाचे मत त्याने त्या विडीयोमध्ये बंदिस्त केले. बराचवेळ गेल्याने आम्ही घड्याळ पाहिले तर केवळ पावणे दहा वाजले होते. आम्ही सकाळी ७ वाजता ट्रेक सुरु करून फक्त तीन तासांत संपूर्ण किल्ला चढून आणि आरामात बघून झाला होता. किल्ला लहानसा वाटला तरी किल्ल्यावर पाहण्यासारखे खूप काही आहे, फक्त तुम्हाला ती ‘नजर’ पाहिजे. किल्ला उतरताना, ठरल्याप्रमाणे, वाटेतल्या राम मंदिराला भेट दिली. मंदिराखाली सुद्धा पाण्याची टाकी असल्याचे दिसले आणि या टाक्या कदाचित वर दिसलेल्या खांब टाक्याचाच एक भाग असावा असे वाटले. मंदिरामध्ये चौथऱ्यावर प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. उजव्या भागात एक कोनाडा आहे; जिथे आता एक साधू वास्तव्यास आहेत.

किल्ला उतरून खाली आलो तोच गाडीजवळ दोन लहान मुले आणि एक मोठा मुलगा उभे होते. गाडीच्या पार्किंगसाठी ते पैसे मागत होते. लहान मुले जरी मराठी वाटत असली तरी तो मुलगा मराठी दिसत नव्हता. त्याला ‘प्रॉपर रिसीट’ मिळेल का विचारलं. तो एक चिटोरा घेऊन आला. दुसऱ्या कोणत्या तरी पार्किग एरियाच्या रिसीटची ती झेरॉक्स कॉपी होती. थोडी डिबेट केली त्याच्यासोबत झेरॉक्स कॉपीवरून.. पण पार्किंग एरिया चांगला ठेवला असल्याने, पुढल्या वेळेला सगळ्यांना ‘पक्की रिसीट’ द्यायला सांगून आम्ही त्याला तीस रुपये देऊन टाकले आणि तिथून निघालो.

निघे निघेपर्यंत दुपारचे ११ वाजत आल्याने आता एखादे हॉटेल गाठून जेवण करून घ्यायचे ठरले. नाशिकमध्ये पुनीतने ‘चुलीवरची मिसळ’ खाल्ली होती; त्याने आपण सगळे तिथे जाऊया असे सांगितले. ‘चुलीवरची मिसळ’ आमच्यातील अनेक जणांनी खाल्ली नसल्याने तो प्लान फिक्स झाला आणि गाडी तिथे वळली. रामसेज पासून २० किमी तर नाशिक शहरापासून १० किमीवर सातपूर येथे ‘राजेशाही साधना रेस्टॉरंट’ आहे. एखादे लहानसे रिसॉर्ट वाटावे अश्या थाटात बांधलेलं हे हॉटेल एक प्रेक्षणीय स्थळ नक्कीच आहे. १५ ऑगस्ट - स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सफेद ड्रेस घातलेले अनेक लोक इथे दिसत होते. बहुतेक वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदन करून ही मंडळी जेवणासाठी इथे आली होती.
आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा बरीच गर्दी दिसून येत होती. आठ जणांसाठी चांगली जागा पाहून आम्ही खुर्च्या अडवल्या. खरंतर त्या खुर्च्या नव्हत्या; त्या सुंदर बांधलेल्या खाटा होत्या, ज्यावर दोन तीन माणसांसाठी बसण्याची चांगली सोय होती. आम्ही आठही जण दोन-दोन जणांच्या गटाने एकमेकांसमोर जाऊन बसलो. पुनीत, ओंकार, मयूर आणि प्रतिक एका बाजूला आणि मी, प्रथमेश, पंकज आणि दिलीप एका बाजूला असे दोन गट तयार झाले. ‘कॅप्टन’ ऑर्डर घेण्यासाठी आला, तेव्हा कळलं की चुलीवरच्या मिसळीसोबत पाव आणि ज्वारीची भाकरी असे दोन ऑप्शन आहेत. आमच्या गटाने ज्वारीची भाकरी तर दुसऱ्या गटाने पाव मागवले. सोबत ताक आणि जिलेबी मागवली. . गर्दी असल्यामुळे जेवण यायला थोडा उशीर झाला. तोवर आम्ही हॉटेलविषयी ‘मस्त बांधलंय..’, ‘अश्या ठिकाणी जेवायला मजा येते..’, ‘कसले पैसे छापत असेल हा..’ इत्यादी आणि इतर विषयांवर चर्चा केली. भरपूर गरममसाला टाकलेली मिसळ उत्तम रित्या समोर सादर झाली आणि आम्ही ताव मारायला सुरवात केली. मिसळ छान होती, पण ज्वारीच्या भाकरीची साईज बरीच मोठी असल्याने ती काही संपेना. अधूनमधून ताक पीत आणि जिलेबी खात, टेस्ट चेंज करून भाकरी ढकलत होतो. पॉज घेत घेत जेवत होतो.  शेवटचा चौथ उरला आणि जेवण चांगलं असलं तरीही असह्य झालं. दिलीपने वरून पाव मागवले होते; त्याला ते जास्त झाले होते. मला पाव खूप आवडतात म्हणून एक्स्चेंज म्हणून मी त्याला मिसळ दिली आणि पाव मी घेतले. वरून ताक पिऊन सगळं जेवण पोटात मस्त बसवून टाकलं. जिलेबीचे शेवटचे तुकडे खाऊन आम्ही उठलो. हॉटेलच्या प्रांगणात येऊन थोडे बसलो तर समोर ‘चुलीवरचं आईसक्रिम’चा बोर्ड दिसला. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. सगळे तुडुंब जेवले होते. पण ‘टेस्ट तर करून बघूया..’ म्हणून आईसक्रिम ऑर्डर केल्या. दोन आईसक्रिम चौघांनी वाटून खाल्ल्या. आईसक्रिम सुद्धा खूप छान होतं. त्यामुळे आणखी एक आणखी एक करत प्रत्येकाने जवळपास अख्खं अख्खं आईसक्रिम रिचवलं. आता पोट शांत झालं होतं. दीड वाजत आला होता म्हणून पुढे निघायचं ठरवलं आणि गाडी सुरु केली आणि निघालो आमच्या पुढल्या पडावाकडे म्हणजेच ‘पांडवलेण्यां’कडे.

नाशिकपासून साधारणपणे १० किमीवर पांडवलेणी आहेत. ह्या लेण्यांची निर्मिती अंदाजे इसवीसन दुसऱ्या शतकात झाल्याचे कळते. नाशिकहून घोटीला जाणाऱ्या एका डोंगरामध्ये ही लेणी कोरलेली आढळतात. या रस्त्यावरून जाताना अनेक जणांनी त्या पाहिल्या असतील पण बऱ्याच जणांना ते ठिकाण नक्की काय आहे ते माहीत नसेल. लेण्यांच्या पायथ्याला असलेल्या वाहनतळापाशी पोहोचून आम्ही गाडी पार्क केली; आणि पायी लेणी पाहायला निघालो. दुपारचे २ वाजले असल्याने सूर्य डोक्यावर होता. लेण्याच्या टेकडीचा कातळ तापल्यामुळे वातावरण गरम होते. त्यात पायथ्याशी उंच झाडे असल्याने हवा कमी होती आणि त्यामुळे उकाडा जास्त जाणवत होता.
लेण्यांपर्यंत पोहोचायला साधारणपणे २०-२५ मिनिटे लागतात. सुट्टी असल्यामुळे इथेही बरीच गर्दी होती. लेण्याच्या पायऱ्यांच्या अरुंद भागात एक तृतीयपंथी वाट अडवून सगळ्यांकडून पैसे मागत होता. सगळ्यांना अडवून अडवून त्याची दमदाटी सुरु होती. जोडप्यांना त्याचा त्रास जास्त होत होता. आमच्या पुढेच असलेल्या एका जोडप्यातील पुरुषाने त्याच्याशी भांडण सुरु केले आणि त्याने जबरदस्तीने पैसे मागू नयेत असे बजावले. पण तो तृतीयपंथी त्याला शिवीगाळ करू लागला. आम्ही तेवढीच वेळ साधून त्याला कटवून वर पोहोचलो. प्रवेशशुल्काचे पैसे भरून आम्ही आत शिरलो. लेणी माणसांनी भरून गेली होती. जिथे पाहावं तिथे माणसंच माणसं होती. मी पैजेवर सांगू शकतो की त्यातील ६०-७० टक्के लोकांना तर लेणी म्हणजे काय हे देखील माहित नसेल; पण फक्त प्रेक्षणीय स्थळ आहे आणि ‘रिचेबल’ आहे म्हणून ते लोक तिथे आले होते. लेण्यांच्या दरवाज्यांवर, स्तंभांवर, बुद्धांच्या मूर्तीसोबत थोडक्यात सांगायचं तर शक्य होईल तिथे तिथे गॉगल लावून ‘स्टायलीत’ उभे राहून पोज देणाऱ्यांची आणि वाकडे तिकडे होऊन फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर लोकांची तोबा गर्दी तिथे होती. खरंतर एवढी गर्दी पाहूनच माझा ‘मूड’ निघून गेला. पण तरीही २४ पैकी बऱ्याच लेण्यांना भेट देऊन त्या पाहण्यात मी यशस्वी झालो. आमच्या ग्रुपमधली बाकी मंडळी कुठे काय बघत होती तेच माहित पडत नव्हतं. कोणी काय पाहिलं काहीच कळत नव्हतं. पंकज समेळच्या संगतीत राहून लेण्यांची थोडीफार ओळख झाली असल्याने मला लेणी खूप आवडली. पण ती ‘नीट’ पहायची असतील तर ‘पंकज समेळ’ सारखं कोणीतरी सोबत हवं असं खूप वाटलं. तेवढ्यात पंकजचा कॉल आला आणि ‘आम्ही लेण्याच्या गेटवर तुझी वाट पाहतोय.. लवकर ये’.. असा निरोप मिळाला. माझी लेणी पाहून झाली होती, त्यामुळे मी गेटकडे निघालो. वाटेत ग्रुपमधले एक-दोन ‘बीछडे हुए साथी’ भेटले. पुन्हा पायथ्याशी येऊन परतीच्या मार्गाला लागलो.

संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. संपूर्ण ट्रेक आणि स्थलदर्शन अगदी आरामात झाल्याने सगळे थोडे सुस्तावले होते. थोडं फ्रेश वाटावं म्हणून चहा-कॉफी घेण्यासाठी आम्ही एका हॉटेलपाशी थांबलो. हॉटेलमध्ये शिरल्या शिरल्या फ्रेश पावभाजीच्या वासाने भूक चाळवली; ‘आत्ताच थोड्या वेळापूर्वी’ जेवलो असल्याने आता काही नको म्हणून बाकी लोकांनी काही मागवलं नाही. पण मी ‘थोडसं काहीतरी खाऊ’ म्हणून चीज मसाला डोसा मागवला. बराच वेळ गेला आणि मग तो डोसा आला. इतरांनी तो थोडा थोडा चाखला. ‘चांगला आहे रे..’ असं म्हणत मग सगळ्यांसाठीच पेपर डोसा मागवला. पेपरडोश्याची ती तोफ घेऊन आल्यावर आम्ही त्यावर थोडी मस्करी केली. ‘बहुतेक अनाडी दिसतायत’ असं वाटून वेटरने ‘वो पेपर डोसा ऐसेही रेहता है..’ असं सांगून एक्झिट घेतली. सगळ्यांनी कोचून कोचून त्या पेपर डोश्याचाही फडशा पडला. त्यानंतर कॉफी पिऊन आम्ही देखील त्या हॉटेलमधून एक्झिट घेतली आणि ट्रेकच्या सगळ्या सुखद आठवणी गाठीशी बांधून मुंबईच्या दिशेने कूच केले.

थोडक्यात:
रामसेज - पांडवलेणी (रामसेज, नाशिक)
उंची: रामसेज - ३२०० फुट । श्रेणी: सोपी - २ । भ्रमंती: उत्कृष्ठ । ऋतू: सर्व
नाशिक ते रामसेज (१७ किमी) - गाडी - ४५ मिनिटे
पायथा ते रामसेज किल्ला - ट्रेक - पाऊण तास
रामसेज ते पांडवलेणी (३० किमी) - गाडी - एक तास
पायथा ते पांडवलेणी - ट्रेक - अर्धा तास
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ जास्त लागू शकतो.)



No comments:

Post a Comment