जीवनज्योत दिवाळी अंक प्रकाशन सोहळा - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 19, 2019

जीवनज्योत दिवाळी अंक प्रकाशन सोहळा



मुंबईचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विलेपार्ल्यासारख्या नामवंत ठिकाणचे एक नामवंत हॉस्पिटल आणि सेवाभावी संस्था व त्यांनी जोपासलेले ग्रंथालय.. त्या ग्रंथालयाने गेली चौदा वर्षे चालवलेला दिवाळी अंक.. त्यात इतकी वर्षे लेख लिहिणाऱ्या अनेक नामवंत व्यक्ती, ज्यात डॉक्टर, इंजिनीअर, सी.ए., इतिहासअभ्यासक आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले दिग्गज.. प्रत्येकवेळी नवीन ‘थीम’ (विषयसूत्र म्हणालो असतो तर तुम्ही पुढे लेख वाचला असता की नाही ते माहित नाही म्हणून तो शब्द टाळला..) घेऊन लिहिले जाणारे लेख.. अश्या नामवंत ‘जीवन विकास केंद्र ग्रंथसंग्रहालया’चे असा दर्जेदार आणि माहितीपूर्ण असणारा ‘जीवनज्योत’ दिवाळी अंक तुम्हाला त्यात लेख लिहिण्याची संधी देतो तेव्हा तो तुमच्यासाठी नक्कीच भाग्याचा क्षण असतो. 

बालपणापासून वयाची २५ वर्षे विलेपार्ले सारख्या सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ अश्या भागात गेल्याच्या ‘अभिमाना’ची तुलना केवळ ‘पुणेरी अभिमाना’शीच करता येईल. त्यामुळे विलेपार्ले-अंधेरी मध्ये असणाऱ्या अश्या दिग्गज संस्थेच्या दिवाळी अंकाचा भाग होण्याचा हर्ष वेगळाच. काल, १९ ऑक्टोबर २०१९ रोजी ‘जीवनज्योत’ ह्या अंकाचा प्रकाशन सोहळा अंधेरी येथील त्यांच्या ग्रंथसंग्रहालयात पार पडला. त्याचा भाग होता येण्याचे भाग्यही लाभले. ५०-७५ वयाची अनेक तरुण मंडळी तेथे उपस्थित होती आणि त्यांचा उत्साह पाहून आपण योग्य संगतीत असल्याचे जाणवत होते.

अनेक वृत्तवाहिन्यांचे संपादक पद भूषविलेले दिव्यमराठी वृत्तपत्राचे संपादक श्री. संजय आवटे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवलीच आणि त्यांच्या हस्ते ‘जीवनज्योत’चा २०१९ चा दिवाळी अंक स्वीकारताना खूप आनंदही झाला. एवढ्या मोठ्या व्यापाच्या संपादक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या आणि स्वतः नामवंत गायनोलॉजिस्ट डॉक्टर असूनसुद्धा अश्या सत्कार्यात स्वतःला झोकून घेणाऱ्या सौ. रश्मी फडणवीस मॅडम यांचे आणि त्यांच्या संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.. शेवटी अश्या मोठ्या संघटनेशी मला जुळवून घेण्यात मोठा वाटा असलेल्या माझी बालमैत्रीण सौ. सुषमा सावंत हीचे मनःपूर्वक धन्यवाद.. माझा ‘पर्यटन संस्कृती’ या विषयावर आणि इतर थोरा-मोठ्यांचे ‘संस्कृती’ ह्या ‘थीम’वर विविध विषयपर लेख असणारा ज्ञानवर्धक असा हा ‘जीवनज्योत’ दिवाळी अंक नक्कीच वाचा ही आग्रहाची विनंती..




No comments:

Post a Comment