एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.. - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 11, 2019

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ..


खरंतर ह्या विषयावरसुद्धा कधीतरी लेख लिहावा लागेल असं मनातही आलं नव्हतं, पण हल्लीची परिस्थिती पाहून न राहवून शेवटी लिहायला घेतलंच. माझा सगळा व्यवसाय मी जवळपास ऑनलाईनच सांभाळत असल्याने तसं मला बाहेर पडायचा संबंध शक्यतो येत नाही. त्यामुळे माझा बराच वेळ सगळ्या सोशल मिडियावरच जातो. ऑर्कुटपासून माझ्या सोशल मिडिया प्रवासाची सुरुवात झाली असं ठामपणे म्हणता येईल. त्यानंतर २००७ पासून मी फेसबुक वापरायला सुरवात केली आणि २००९ पासून व्हॉट्सअप. २००७ - २००९  पासून फेसबुक आणि व्हॉट्सअप या दोन्ही सोशल मिडियामधल्या ‘बाप’ गोष्टींनी माझा संपूर्ण ताबा घेतला. त्याचं व्यसनच लागलं म्हणाना. कारण ज्यावेळी मी ते वापरायला सुरुवात केली त्यावेळी कित्येक ओळखीचे मित्र जवळचे झाले. अनेक ओळखीचे पण कित्येक वर्षे दुरावलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा संपर्कात आले. त्यातील अनेकांशी भेटीगाठीही झाल्या. कित्येक व्यक्ती नव्याने मित्र-मैत्रिणी झाले. भरपूर माहिती अनेकांच्या पोस्टद्वारे मिळू लागली. अनेकांचे ‘अपडेट्स’ पाहून त्यांची खुशहाली कळू लागली. मेसेंजर, व्हॉट्सअप मुळे त्यांच्याशी थेट संपर्कात राहता येऊ लागले. अगदी छोट्यात छोट्या माहितीची तत्काळ देवाण-घेवाण होऊ लागली. आपल्या आपल्या क्षेत्रात नामवंत आणि कुशल असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येता आलं, भेटीगाठी करता आल्या. माझ्या स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात आणि आयुष्यात महत्वाच्या असणाऱ्या बऱ्याच व्यक्ती मला इथेच सापडल्या. एकूणच पाहता फेसबुक आणि व्हॉट्सअप यांसारख्या सोशल मिडियाच्या गोष्टी मला अत्यंत फायदेशीर ठरल्या. 

तुमच्या मनात आलं असेल की हा ही सगळी रामकहाणी आम्हाला कशाला ऐकवतोय. तर थोडा धीर धरा; वाचता वाचताच ते कळून येईल. वर उल्लेख केलेला माझा अनुभव हा तुम्हाला सुद्धा सारखाच आला असेल याची मला खात्री आहे. त्यामुळेच आपण सगळे या सोशल मिडियाच्या मायाजालात गुरफटून गेलो आहोत. पण गेली २-३ वर्षे याच सोशल मिडीयाला गालबोट लागायला सुरुवात झाली आहे. कदाचित त्याआधीच सुरु झालं असेल पण मला गेली २-३ वर्षे हे जाणवत आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे अगदी मान्य आहे. सोशल मिडियामुळे सकारात्मक गोष्टी जेवढ्या झाल्या तेवढ्याच नकारात्मक गोष्टी सुद्धा घडल्या आहेत हे मान्य आहे. पण हल्ली या सगळ्याचा वापर सरसकट राजकारणासाठी केला जातो आहे ही गोष्ट खूप जाणवत आहे. खरंतर राजकीय पोस्ट्स सुद्धा माझ्या काळजीचे कारण नाहीय, कारण ‘लोकशाही’ आहे. पण ज्यारितीने राजकीय पोस्टवर वादविवाद होत आहेत त्याचेच जास्त वाईट वाटत आहे  आणि हाच माझ्या आजच्या लेखाचा विषय आहे.

मित्रांनो, राजकारण काही नवीन नाही. मला वाटतं जेव्हा आदिमानवाने प्रगत होत जात झुंडीने राहण्याची सुरुवात केली, तेव्हापासून राजकारणाची सुरुवात झाली. फक्त त्यावेळी त्याला काहीतरी ‘वेगळ्या’ नावाने ओळखत असतील. ‘जो अधिक सक्षम किंवा बलवान, त्याच्याकडे नेतृत्व किंवा राज्य’ म्हणजेच सोप्या भाषेत बोलायचं तर ‘बळी तो कान पिळी’ हे राजकारणाचे गणित आहे. मग त्याला नाव काहीही द्या. लोकशाही मध्येही हाच ‘फंडा’ आहे फक्त थोडा ‘सोफिस्टीकेटेड’ आहे एवढंच, कारण तिथेही बहुमत असणारा राज्य करतो. राजकारणावर एवढं प्रवचन पुरे; आता मूळ मुद्द्याकडे वळूया. भारतातच नाही तर जगात राजकारणाला खूप महत्व आहे. राजकारण हा आयुष्याचा एक भागच आहे असंही म्हणता येईल. कारण आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टीत्यावर अवलंबून असतात. ‘यथा राजा, तथा प्रजा’ ही म्हण राजकारणाचे महत्व समजावून सांगते. पण आपल्या वैयक्तिक आयुष्यात राजकारण कसे आणि किती आणावे याची मर्यादा ठरवण्याची वेळ आता आलीय असें म्हणावे लागेल. 

सोशल मिडीया हे मार्केटिंगचे एक तगडे माध्यम आहे हे राजकारणी लोकांना चांगले उमगले आहे आणि त्यांनी त्यांचा पुरेपूर वापर सुरु केला आहे. फेसबुक व्हॉट्सअप यांनी कदाचित अश्या गोष्टींसाठी कमर्शियल सुविधा पुरवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे या गोष्टींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात राजकारण हा कित्येक लोकांचा ‘रोजी-रोटीचा’ विषय आहे. राजकारण हा आज खोऱ्याने पैसा देणारा व्यवसाय झाला आहे. कित्येक राजकारणी लोकांच्या पिढ्यान पिढ्या राजकारणावरच जगत आल्यात आणि त्यामुळे आता परंपरागत राजकारणी घराणी जन्माला आली आहेत.  राजकारणात घुसायचे, मिळालेल्या शक्तीचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करून कोट्यावधींची संपती जमा करायची. पुन्हा त्याच संपतीमधले पैसे वापरून दरवेळी निवडून यायचे आणि आणखी सम्पती जमवत जायचं. म्हातारं होत आल्यावर आपल्या पोराबाळांना त्याचरितीने वर आणून त्यांनाही कोट्याधीश करायचं हा आता ‘ट्रेंड’ झाला आहे. भ्रष्टाचारच एवढा करायचा की जनतेच्या प्रश्नांसाठी, सोयीसुविधांसाठी पैसाच उरवायचा नाही. पुन्हा पुढल्यावेळी धर्म, जात, देश आणि इतर अनेक अनावश्यक पण भावनिकदृष्ट्या आवश्यक अश्या गोष्टी उगाळून लोकांना मूर्ख बनवून मूळ मुद्द्यांपासून दूर न्यायचं आणि पुन्हा निवडून यायचं. हे सगळं जहरी वर्तुळ असंच सुरु राहतं.
आपल्यातील अनेकजण या ना त्या पक्षाशी एकनिष्ठ असाल याची खात्री आहे मला.. अगदी एकनिष्ठ नसलात तरी ‘निगडीत’ तरी असलाच.. आपल्या सख्या किंवा नातेवाईक मंडळींमधील कोणीतरी कोणत्या तरी ‘साहेबाचा’ ‘राईट किंवा लेफ्ट हँड’ असतो.. किंवा किमान ‘खंदा कार्यकर्ता असतो.. तो कोणतीही गोष्ट राजकारणाच्या दृष्टीने बघतो कारण साहेबांनी त्याला ती तशी बघायची सवय लावलेली असते किंवा ‘त्यासाठीच’ त्याला ‘ठेवलेलं’ असतं. हे ‘साहेब’लोक काही हजार रुपये फेकून असे ‘कार्यकर्ते’ उभे करतात. त्यांना इतका ‘सपोर्ट’ देतात की अनेक कार्यकर्ते फक्त ‘दादागिरी, भाईगिरी, दमदाटी’ करतानाच दिसतात. साहेबाचा हात डोक्यावर असल्यावर असल्या गोष्टींतून पोलिसी कारवाई होण्याची शक्यता कमी असते त्यामुळे कार्यकर्त्यांच्या तोंडी ‘तू मला ओळखत नाहीस अजून..’, ‘,मी अमुक अमुक पक्षाचा आहे..’, ‘माझ्याशी पंगा भारी पडेल..’, ‘लायकीत राहायचं..’ अशी वाक्ये हमखास ऐकू येतात. किंवा अशी वाक्ये ऐकू आली की समजून जायचं की जवळपास कोणीतरी ‘कार्यकर्ता’ ‘त्याचं ‘कार्य’ करत आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे कार्यकर्त्यांना वाटू लागतं की ‘अपुनीच भगवान है..’ मग गाड्या भरधाव उडवायच्या, उगाचच कोणाशी तरी पंगे घ्यायचे, वादविवाद करायचे (जमले तर, नाहीतरी मारामारीची वार्ता आहेच..) असले फालतू धंदे करताना हे लोक आढळतात. बरं यापैकी कोणीही आम्ही लोकांसाठी हे केलं हे सांगताना कधीच दिसणार नाही कारण शौचालयं बांधल्यावर त्यावर स्वतःची नावं झळकवणारे हे लोक काय कामं करत असतील हे वेगळं सांगायची गरज नाही. 

मला काळजी आहे ती या कार्यकर्त्यांना पाहून त्यांना आणि त्यांच्या साहेबांना ‘आदर्श’ किंवा ‘देव’ मानु लागलेल्या किंवा लागणाऱ्या लोकांची.. यात कोवळ्या पोरांची सख्या खूप मोठी होत जात आहे आणि हे प्रकर्षाने सोशल मिडीयावर जाणवत आहे.  या लोकांना, प्रामुख्याने मुलांना असं वाटतंय की राजकारण हा ‘पैसे कमावण्याचा शॉर्टकट’ आहे. त्यासोबत ‘पॉवर’ आणि ‘सन्मान(?)’ मिळतो तो वेगळाच. त्यामुळे हे लोक असल्या लोकांकडे आकर्षित होत आहेत. पण एक लक्ष्यात ठेवा भारतात आता घराणेशाहीने चांगलेच मूळ धरले आहे. साहेब थकण्याआधी त्यांच्या मुलाला गादी सोपवून जातात.. मुलगा त्यांच्या मुलाला सोपवून जातो.. आणि मग हे असंच सुरु राहतं. कार्यकर्ते आणि त्यांच्या गुंडांना (हो गुंडच ते.. विचार करणारे लोक असते तर राजकारणात गेलेच नसते..) जरी पैसे पुरवत असले तरी ते त्यांना ‘सेटल’ होऊ देत नाहीत कारण साहेब लोकांना माहित असतं की कार्यकर्ते ‘सेटल’ झाले तर त्यांना साहेबांचं महत्व राहणार नाही.. आणि मग हळू हळू त्यांची सद्दी संपेल. ‘सेटल’ झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या साहेबांना ‘टांग’ दिल्याची उदाहरणे आपल्याला खूप सापडतील. बरं हे साहेब आणि त्यांचे ‘सेटल’ झालेले कार्यकर्ते हे आपापसातच पक्ष बदलत राहतात. लोकांची आणि त्यांच्या सुविधांची खोटी काळजी करत पुन्हा दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवायला तयार असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्यातील अनेक बिनडोक लोक त्यांना ‘एकनिष्ठ’ राहून मतदान करून येतात. हे असले ‘निष्ठावान’ आणि अविचारी लोकच घाणेरड्या राजकारणाला आणि देशाच्या अधोगतीला कारणीभूत असतात. हे असले निष्ठावान’ मला ‘शिवाजी महाराजां’विरुद्ध उभे राहिलेल्या आणि ‘खाल्ल्या मिठाला जागण्याची’ फालतू कारणे देणाऱ्या राजपुतांची आठवण करून देतात.

लोकहो, समजून घ्या की राजकारणी लोकांना  तुम्ही निवडून देताय.. त्यांना त्या जागी तुम्ही बसवताय.. तुम्ही तुमच्या मेहनतीचे कमावून खात आहात.. तुमच्यासाठी कोणीही काहीही करत नाहीय आणि करणारही नाहीय.. तुम्हाला तुमची लढाई स्वतः लढायची आहे.. प्रसंगी मित्र-परिवार कामाला येईल पण हे राजकारणी लोक दुरून पळून जातील.. आणि तुम्ही जर तुमच्या असल्या परिस्थितीचे अवलोकन केलेत तर तुम्हाला कळून येईल की बऱ्याच वेळेस हे राजकारणी लोकच अश्या परिस्थितीला जबाबदार असतात. यात खऱ्या अर्थाने भरडले जातो ते आपण.. सामान्य लोक.. मित्रांनो, लक्षात घ्या की गेली ६०-७० वर्षे झाली आहेत आपल्याला स्वतंत्र होऊन पण इतर देशांच्या तुलनेत आपण खूप मागे आहोत. कोणीही राजकारणी देशासाठी काम करत नाही.. सगळ्यात पहिलं तो स्वतःसाठी काम करणार.. त्यातला त्यात चांगला निघाला तरी बऱ्यापैकी गरिबी असणाऱ्या आणि टॅक्सची चोरी करणाऱ्या श्रीमंत लोकसंख्येतून येणाऱ्या  महसुलातून सगळ्यांच्या समस्या सोडवणं महाकठीण काम आहे. त्यामुळे राजकारणाच्या मागे धावू नका.. घराणेशाही तुम्हाला तिथे जागा देणार नाही आणि जर चांगल्या मनाने लोकांसाठी काम करायला उतरणार असाल तर टिकू देणार नाहीत. आताच शहाणे व्हा.. सगळ्यात पहिलं स्वतःसाठी जगायला सुरुवात करा.. आपला नोकरी धंदा उत्तम सांभाळा.. राजकारणी लोकांना दूर ठेवा.. अगदी तुमचे मित्र असतील तरीही.. जिवलग मित्र असतील तर त्यांना समजावून त्यातून बाहेर काढा आणि काम-धंदा करण्यास प्रवृत्त करा. राजकारणी लोकांचे गोडवे गाऊन थोड्या वेळासाठी तुम्ही कामवाल पण ‘लॉंगटर्म’ साठी ती गोष्ट फायद्याची नाही. मुख्य करून मराठी लोक, अधिक करून मराठी मुले, असल्या गोष्टींमध्ये फसत आहेत त्यांनी यातून बाहेर पडा.. ‘दाम करी काम’ लक्षात ठेवा आणि व्यवसायात उतरा.. आपल्या लोकांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करा. ज्यांना व्यवसाय जमत नाही त्यांना काम द्या. मराठी आणि शिवरायांच्या नावाने राजकारण करून मराठी माणसाची दिशाभूल करून अनेक घराणी गब्बर झाली आहेत, त्यांना वेळीच ओळखा आणि दूर करा. राजकारण म्हंटलं की सगळेच एका माळेचे मणी असतात. ते एकमेकांशी आतून चांगले असतात फक्त आपल्यासमोर एकमेकांना शिव्या घालण्याचा देखावा करत असतात. त्यांचं पोटच त्यावर चालतं त्याला ते लोक तरी काय करणार. एकमेकांना साथ द्या.. व्यवसाय वाढवा.. पैसे कमवा.. भरपूर पैसे कमवा.. बघा हे लोक स्वतः तुमच्या मागे लागतात की नाही ते.. गुजराती मारवाडी युपी बिहारी साऊथ इंडियन लोक आधी स्वतःची कमाई बघतात आणि मग राजकारणात रस घेतात.. राजकारणाचा उपयोग ते स्वतःच्या व्यवसाय वाढीसाठी करून घेतात.. आपले मराठी लोक फक्त नेत्यांना श्रीमंत करण्यात मग्न असतात.. स्वतःच्या कमाईच्या नावाने ठणाणा असतो.. आणि नेतेमंडळींच्या सांगण्याने परप्रांतीय लोकांकडे नोकरीला असून सुद्धा त्यांच्या नावाने ओरडत बसतात.. असे करू नका.. स्वतःचे अस्तित्व तयार करा.. भाषा.. सन्मान सगळे काही टिकवता येईल.. दुहीचा श्राप मोडून काढा.. एक व्हा.. वेळीच सावध व्हा.. मतदान वगैरे करा पण त्यात शिरू नका.. इतरांच्या पोस्टला स्वतःला वाटेल तसा राजकारणी अर्थ काढून भांडत बसू नका.. किंवा राजकारणाचे ज्ञान देत बसू नका.. त्यातून आपल्यातील तेढ वाढत जाईल.. नेतेमंडळी निवडून यायची ती येतील.. त्यांना आपल्या भांडणाने तसूभर फरक पडत नाही किंवा आपण त्यांच्यासाठी भांडलोय म्हणून ते आपल्याला पैसे देणार नाहीत की शाबासकी देणार नाहीत.. त्यामुळे तत्काळ राजकारणाला सामान्य जीवनापासून दूर करा.. मनापासून लोकांसाठी काम करायचे असेल तर पैसे कमावून लोकांसाठी आधी काम करा.. लोक नक्कीच लक्ष्यात ठेवतील आणि तुम्हाला तुमच्या कामावर निवडणुकीसाठी उभे राहता येईल किंवा हवा तो उमेदवार उभा करता येईल..

भावनेच्या भरात बरंच काही लिहून गेलो आहे.. मला स्वतःलाही लिंक लागेल की नाही याची कल्पना नाही पण राजकारणी लोकांच्या नादी लागून पिढी वाया जाताना पाहून खूप तळमळ होत होती म्हणून हा लेखनप्रपंच केला आहे. याबाबतीत कोणत्याही प्रकारची शक्य ती मदत करण्याचा मी प्रयत्न करत आहे, तरी आवश्यक वाटल्यास मला संपर्क करा. जर चळवळीत सामील व्हायचे असेल तरी संपर्क करा.. शेवटी विनंती करीन की आपल्या प्रगतीसाठी एकच ब्रीदवाक्य लक्ष्यात ठेवा.. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.. कळावे.. लोभ असावा..

उत्कर्ष एरंडकर
9930609990
Utkarsh.erandkar@gmail.com



(महाराजांचे ह्या लेखातील चित्र marathizataka.blogspot.com ह्या संकेतस्थळाहून साभार)

2 comments:

  1. फारच छान लेख. डोळ्यात अंजन घालणारा.

    दीपक गुंडये

    ReplyDelete