लोहगड विचूकाट्याची आठवण (२१ डिसेंबर २००३) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, December 21, 2003

लोहगड विचूकाट्याची आठवण (२१ डिसेंबर २००३)

पार्ल्यातील 'परांजपे एंड परांजपे' चार्टर्ड अकाऊंटंट्सकडे सी.ए.ची आर्टिकलशीप सुरु केली तेव्हा ऑडीटसाठी फोर्टला एका शिपिंग कंपनीमध्ये जावं लागलं. माझ्या ऑडीट फर्ममध्येच काम करणारा योगेश परांजपे नावाचा एक मुलगा २-३ दिवस आधीपासूनच तेथे ऑडीटसाठी जात होता आणि त्याने काम सुरु केलं होतं. सरांनी मला तिथे पोहोचल्यावर प्रथम त्याला भेटायला सांगितलं. त्या कंपनीत पोहोचताच मी त्याची चौकशी केली, तेव्हा कळलं कि तो अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये आहे. अकाऊंट्सकडे जाताना नवीन सहकारी कसा असेल याबाबत उत्सुकता वाढत होती.

अकाउंट्समध्ये पोहोचल्यावर 'योगेश परांजपे?' असं विचारताच, खुर्चीत पाठमोरा बसलेला, बाविशीच्या आसपासचा तरुण उभा राहिला आणि वळला. "हॅलो.." असा म्हणत त्याने शेकहेंड केलं. गोरा वर्ण, पिंगट बाहुल्यांचे डोळे, हसरा चेहरा, एका बाजूला मागे वाळवलेले केस आणि एकूणच प्रसन्न आणि कमालीचा आत्मविश्वास दाखवणारं त्याचं व्यक्तिमत्व पाहून आनंद वाटला. थोडं टेन्शनही होतं कारण हा आपल्याला कितपत सांभाळून घेईल? याबद्दल एक शंकाही उगाच मनात येऊन गेली. पुढील २-३ महिने त्याच्यासोबत काम करायचं होतं. त्याच्यासोबत काम करताना लवकरच त्याचा बेधडक, सहकारयांशी हसत खेळत जुळवून घेणारा स्वभाव लक्षात आला.


त्या दिवशीचं काम आटोपून निघायच्या तयारीत असताना कळलं की तो बोरिवलीत राहतो. मी पार्ल्यात राहत असल्याने सहाजिकच चर्चगेट - बोरीवली ट्रेन पकडायची असं ठरलं. चर्चगेट स्टेशनवर ट्रेन येताच धडाधड उड्या मारून आम्ही खिडकीजवळील जागा पकडण्यात यशस्वी झालो; आणि ट्रेनमध्ये आमची एक-मेकाशी खरी ओळख सुरु झाली. त्यानं नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं आणि कार्यालयीन अनुभवासाठी त्याने ही ऑडीट फर्म जॉईन केली होती. ‘मग, सुट्टीत काय केलं?’ असं त्याने मला विचारल्यावर ‘मुंबईतले किल्ले फिरलो..’ असं मी त्याला सांगितलं. किल्ल्यांचा उच्चार करताच त्याचे डोळे चमकले. तो किल्ल्यांविषयी भरभरून बोलू लागला. मला कळून चुकलं की यालाही आपल्यासारखंच किल्ल्यांचा आणि गिर्यारोहणाचा छंद आहे. आम्ही दोघे ‘एकही मंजील के राही’ असल्याने त्याने मला ‘ट्रेकला जावूया का?’ विचारलं. मी सुद्धा होकार दिला. त्याने पुण्याच्या मळवली येथील ‘लोहगड’वर जावूया असे सुचवलं. लोहगडावर जायचं त्याच्या मनात बरेच दिवस होतं असं मला जाणवलं. खरंतर रायगड, वसई आणि अर्नाळा हे किल्ले सोडल्यास मुंबईबाहेरचे ट्रेक्स मी केले नव्हते; आणि हे अचानक ठरलं होतं. ‘घरी विचारून सांगतो..’ असं मी त्याला सांगितलं.


मी एकुलता एक मुलगा असल्याने, ट्रेकसाठी आमच्या घरून मला आधीपासूनच विरोध होता. याही ट्रेकला सुरुवात नकारापासूनच झाली. आईला पर्यटन आवडत असल्याने तिचा अप्रत्यक्ष पाठींबा होता. त्यामुळे इच्छा नसूनही तिने मला परवानगी दिली. ‘माझी परवानगी नाही, पण जे काही करताय ते जीव सांभाळून..’ ह्या ब्रीदवाक्याच्या आधारावर बाबांचा नकारही रद्द झाला होता. झालं!!.. किल्ले लोहगडाच्या मोहिमेची आखणी आणि तयारी सुरु झाली. पण मी थोडा अस्वस्थ होतो कारण आम्ही दोघंच जाणार होतो. आम्ही दोघेही स्वतंत्र ट्रेकसाठी नवखे होतो आणि नुसती आवड आहे म्हणून निघायचं असं ट्रेकसारख्या धाडसी गोष्टीच्या बाबतीत करून चालत नाही. योगेशला जुजबी माहिती होती, थोडीफार माहिती मी सुद्धा इंटरनेट आणि पुस्तकांतून जमवली होती. अखेर २० डिसेंबर २००३ या दिवशी शनिवारी किल्ले लोहगडाची मोहीम नक्की झाली.


२० डिसेंबर २००३ चा दिवस उजाडला. ट्रेकसाठी आदल्या दिवशीच ट्रेकींग बॅग भरून ठेवली होती. गरज नसतानाही उगाच ६० लिटर्सची बॅग मी सोबत वागवणार होतो. काही झालं तरी स्वतंत्र असं पहिलाच ट्रेक होता माझा तो.. त्या दिवशी आपण स्वतंत्र ट्रेक करू शकतो का हे पडताळून पहायचं होतं. शनिवार-रविवार आमचं ऑफिस बंद राहत असल्याने मी घरीच होतो. रात्र होण्याची वाट पाहत होतो पण दिवस जाता जात नव्हता. संध्याकाळ झाली तसं योगेशला फोन करून तो निघत असल्याची खात्री करून घेतली. तो पार्ल्याला येऊन मग आम्ही दोघं पुढे जाणार होतो. रात्री ११.३० वाजताची मुंबई सेंट्रलहून पुण्याला जाणारी एस.टी. बस आम्ही पकडणार होतो. साडे आठ वाजताच मी जेवून घेतलं. आणि निघण्याची तयारी सुरु केली. पिवळा टी-शर्ट, निळ्या रंगाची डेनिम जीन्स, मोठी ट्रेकींग बॅग, डोक्यावर हॅट, पायात स्पोर्ट्स शूज अशा दिमाखात(?) मी घरून निघालो. घराची मंडळी, मी जणूकाही लढाईलाच निघालोय, अशी भावूक झाली होती. कारणही तसंच होतं. अशा तऱ्हेने मी घराबाहेर ट्रेकला निघण्याची माझी पहिली वेळ होती, आणि त्यांचीही.. तो भावूक निरोप समारंभ आटोपून मी रात्री १० वाजता घरून निघालो, आणि विले-पार्ले रेल्वेस्टेशनवर पोहोचलो.


मनात एक वेगळीच उत्सुकता नाचत होती. ट्रेन आली. योगेश उतरला. आनंद द्विगुणीत झाला. तोही माझ्यासारखीच जय्यत तयारी करून आला होता. काळा टी-शर्ट, निळी जीन्स, निळी हिरवी ट्रेकींग एक्स्पेडीशन बॅग, कानटोपी, असा त्याचा पेहराव पाहून, आम्ही लोहगड नव्हे तर माऊंट एव्हरेस्टला निघालोय असं वाटू लागलं. दोघांनी एकमेकांना मोठ्ठ स्मितहास्य देऊन पहिली पायरी यशस्वी झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. पुढचीच ट्रेन पकडून आम्ही मुंबई सेंट्रल येथे पोहोचलो, आणि तेथूनच जवळ असणाऱ्या बस डेपोत पोहोचलो. घरून निघाल्यापासून सर्वजण आपल्याकडेच पाहत आहेत असं उगीचच वाटत होतं म्हणून मी ते खरच पाहतायत का ते चोरून आजूबाजूला पाहत त्याची खातरजमा करत होतो. बसगाडी आल्यावर आम्ही त्यात जाऊन बसलो. आम्हा दोघांनाही बाजूबाजूच्याच जागा मिळाल्याने, आम्ही सोबत काय काय घेतलंय, या विषयाने गप्पा सुरु झाल्या आणि गाडीही.. डिसेंबर असल्याने थंडी होती. गाडीने वेग धरला होता आणि आमच्या गप्पांनीही..


आमच्या गप्पांमध्ये लोणावळा स्टेशन निघून गेलं होतं, मळवलीसाठी आम्ही बॅगा घेवून सरसावलो.. मास्तरांनी हनुवटी उडवत, इशाऱ्यानेच ‘आता या वेळेला कुठं?’ असं विचारलं.. ‘मळवली’ योगेश उत्तरला.. मळवलीसाठी लोणावळ्यालाच उतरावं लागतं, हे मास्तरांनी सांगताच आमच्या दोघांचेही चेहरे खाड्कन उतरले. एक्सप्रेस हायवेवर बसगाडी पुण्याकडे धावत असताना, मळवलीस्टेशन जवळ गाडी थांबविण्यासाठी आम्ही मास्तरांची गयावया करू लागलो. एक्सप्रेस हायवेवर अशी गाडी थांबवता येत नाही असं मास्तर म्हणाले. होय नाही करता, फक्त ५-१० सेकंदांसाठी गाडी ‘स्लो’ करण्यास ते तयार झाले. मळवलीजवळ एका पुलाखाली त्यांनी गाडी हळू केली आणि दरवाजा उघडून आम्ही बाहेर उड्या मारल्या. आम्ही उतरलो(?) होतो.. त्या बसगाडीच्या लाल टेललाईट्स त्या अंधारात हळू हळू दिसेनाश्या झाल्या..


थोडे सावरलो होतोच तर कळलं की गाडीत तरी बरे होतो.. आम्ही उतरलो होतो तिथे किर्र अंधार, झाडी आणि त्या एक्सप्रेस हायवेवरून भरधाव धावणाऱ्या गाड्यांशिवाय काही नव्हतं. रात्रीचे २ वाजत आले होते आणि या निर्जन स्थळी आम्ही दोघेच उभे होतो. धाडस जरा जास्तच झाल्याचे आम्हाला जाणवले. दोघेही धास्तावलो. इतक्यात हायवेच्या पलिकडून टॉर्च घेवून कोणीतरी आमच्याकडे धावत येताना दिसलं. लवकरच तो हायवे पोलीस असल्याचे लक्षात आलं आणि ‘आजचा दिवस (सॉरी रात्रच) खराब आहे’ असं मनात येऊन गेलं. त्या पोलीसाने, आम्ही जणू काही चोरच आहोत, अशा अविर्भावात चौकशी सुरु केली. आम्ही, साठा उत्तराची ती कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ ऐकवल्यावर तो जोरजोरात हसू लागला. मळवली स्टेशन या झाडीच्या मागेच आहे असे त्याने आम्हाला सांगितलं. ‘झाडीतून मार्ग काढून जा..’ हा सल्लाही दिला. रात्रीच्या प्रकाशात(?) ती झाडी इतकी किर्र दिसत होती की त्यात प्रत्यक्ष घुसणं सोडा पण त्याचा विचारही करायचं धाडस आम्हाला झालं नाही. शेवटी त्या हवालदाराने पोलीसचौकीत (कोठडीत नाही) रात्र काढण्याचा दुसरा सल्ला आम्हाला दिला. आम्ही तो लगोलग मान्य केला. चौकी जवळच, झाडीत लपलेली होती. तिथे पोहोचलो. पोहोचेपर्यंत ‘असं धाडस करू नका’, ‘सगळीच माणसं चांगली भेटत नाहीत’ इत्यादी अधिक सल्ले गाठोड्यात जमले होते. चौकीत येताच जुनी वर्तमान(?)पत्रे फरशीवर अंथरून त्यांनी आम्हाला झोपायला सांगितलं. आम्ही ‘पडलो’ खरे पण बल्बवर घोंघावणाऱ्या चिलटांमुळे झोप काही लागली नाही. आनंद याचा होता की रात्रीची सोय झाली होती. सकाळी सहा वाजता उठून बाहेर आलो तर पलीकडेच मळवली रेल्वे स्टेशन दिसून आले. तेथून चक्क ४-५ मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या स्टेशनवर येऊन आम्ही प्रातर्विधी, ब्रश, चहा-नाश्ता इत्यादी आटोपून घेतलं. ट्रेकमध्ये अनेकदा आंघोळीला सुट्टी द्यावी लागते. आम्हीही तेच केलं. ज्या पुलाखाली आम्ही कालच्या ऐतिहासिक रात्री उतरलो होतो तोच पार करून सकाळी सातच्या सुमारास लोहगडाच्या वाटेला लागलो.

 
थंडी खूप होती. स्वेटर सोबत आणला होता, तो टी-शर्टवर चढवला. डावीकडे डोंगर, उजवीकडे हायवे असणाऱ्या एका कच्च्या डांबरी सडकेवरून आम्ही चालत होतो. १५-२० मिनिटांत भाजे गावापर्यंत येऊन पोहोचलो. तेथून पुढील वाट एका गावकऱ्याला विचारली असता, ‘शेतातून समोरच्या डोंगरावर वाट हाय..’ असे त्याने सांगितले. आम्ही लोहगडाकडे कुच केलं. सूर्य जसा जसा डोक्यावर येत होता तसा तसा उकाडा जाणवू लागला. अंगावरच स्वेटर परत बॅगेत गेलं, हॅटची कडा भिजली, धाप लागली. दीड तास आम्ही डोंगर चढत होतो. लोहगडाला लागूनच विसापूर किल्ला आहे. या दोघांमधल्या खिंडीत आम्हाला जायचे होते. झाडीच्या टप्प्यातून जाताना भिती वाटत होती. आम्हा दोघांनाही अशी वाट नवीन होती. वाटेत गुरे, कुत्रांच्या पायाचे ठसेही वाघाच्या पायांच्या ठ्श्यासारखे वाटत होते. अधून मधून चित्रविचित्र आवाज येत होते. साधारण दोन तासांनी आम्ही त्या प्रसिद्ध ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहोचलो होतो. डाव्या बाजूला विसापूर तर उजव्या बाजूला लोहगड दिसत होता. खिंडीतून पलीकडे पवन मावळचा परिसर डोळ्यांना सुखावत होता. कॅमेऱ्यामध्ये ती दृश्ये बंदिस्त करून आम्ही पुढे निघालो, १० मिनीटांत किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या लोहगडवाडीत आम्ही उभे ठाकलो. गावातील ‘मनोहर शेंडे’ यांच्याकडे चहापान करून आम्ही किल्ल्याच्या पायऱ्या जवळ केल्या. मधूनच वाऱ्याची झुळूक पुढे चढण्यासाठी हुरूप देत होती. अंदाजे १५ मिनिटांमध्ये गडाचा पहिला ‘गणेश’ दरवाजा लागला. दरवाज्याच्या कमानीच्या दोन्ही बाजूंना श्री गणेशाच्या प्रतिमा कोरून कमळ फुलांचे नक्षीकाम आहे. पुढे नागमोडी मार्गाने क्रमवार नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा असे आणखी तीन दरवाजे पार करावे लागतात. चारही दरवाजे आजमितीससुद्धा बुलंद आहेत आणि त्यावरूनच गडाच्या त्यावेळच्या संरक्षण व्यवस्थेचा अंदाज बांधता येतो. पैकी महादरवाजा हा गडाचा मुळ दरवाजा होय. इतर दरवाजे नाना फडणविसांनी बांधून काढले आहेत असा उल्लेख गणेश दरवाज्यावर सापडतो. नारायण दरवाजा आणि हनुमान दरवाजा यांमधिल वाटेवर गुहासदृष्य कोठारे आहेत, जी त्याकाळी धान्यकोठ्या(?) म्हणून वापरल्या जात. दरवाजांच्या बुरुजांमध्ये शौचकूप आणि तळघरे आढळतात. लोहगडवाडी ते महादरवाजा हे अंतर जेमतेम अर्ध्या तासाचे आहे. नारायण दरवाजा आजही खणखणीत आहे. त्यातून प्रवेश करताना आपण कोणी सरदार, उमराव आहोत असा भास होऊ लागतो. कानात तुताऱ्यांचे वगैरे आवाज येऊ लागतात. माझी आणि योगेशची नजरानजर झाल्यावर दोघे एक-मेकांकडे पाहून हसलो. बहुदा योगेशलाही ते भास झाले असावेत त्यावेळी.. आम्ही महादरवाज्यातून प्रवेश करताच निशाणाचा झेंडा, भानतोफ, मशीदसदृश्य इमारत (औरंगजेबाच्या मुलीची(?) कबर) इत्यादी परिसर नजरेस पडला. त्यामागे त्रिम्बकेश्वराचे देऊळ, त्यासमोरील नंदी आणि हनुमंताचे देऊळ, पाण्याची काही टाकी आणि एक बांधीव हौद दिसले. हौदात उतरून आम्ही पाण्याला हात लावला. रणरणत्या उन्हातही ते पाणी मस्त थंडगार होतं. हात-पाय-तोंड धुऊन घेतलं आणि शरीराने स्वच्छ झालो. हौदालाच लागून असणाऱ्या त्रिम्बकेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं.

सकाळचे १० वाजले होते. आम्ही आग्नेय टोकाकडे निघालो. किल्ल्याच्या या भागातून डावीकडे तूंग किल्ला तर समोर मोरगिरीचा डोंगर छान दर्शन देतात. मस्त हवा सुटली होती. समोर दिसणारं ते दृश्य पाहून आम्ही काही वेळ तिथेच थबकलो. योगेश तर समोरच दृश्य पाहून भारावून गेला होता. त्या दृश्य निसर्गाने मला नि:शब्द तर योगेशला बोलकं केलं होतं. मी मुळातच उत्तम श्रोता असल्याने त्याचं ते उत्स्फूर्त बोलणं, ऐकणंच मी पसंत केलं. तो भारावून बोलत होता. त्याच्यातला कवी जागा झाला होता. आपण किती भाग्यवान आहोत याचं त्याला कोण कौतुक वाटत होतं, तर शहरातील नेहमीच्या रटाळ, घड्याळाची गुलामी करण्यात समाधान मानणाऱ्या लोकांची त्याला कीव वाटत होती. हेच खरं जीवन आणि याचपासून आपण दूर जात आहोत याची खंत त्याने बोलून दाखवली. त्या निसर्गाविषयी, त्याच्याशी निगडीत स्थानिक लोकांविषयी, किल्ल्यांविषयी, महाराजांविषयी, किल्ल्यांच्या आजच्या अवस्थेविषयी, आपल्या नाकर्तेपणाविषयी, आणि एकंदर सगळ्या विषयी तो भरभरून बोलत होता. मी ऐकत होतो. तो समाधिस्त झाला होता. बोलत असणारी व्यक्ती योगेशच आहे यावर विश्वास बसत नव्हता परंतु त्याचं बोलणं मधेच थांबवून त्याची ती समाधिस्त अवस्था भंग करण्याचा निष्फळ प्रयत्न मी केला नाही. कारण जे बोललं जात होतं ते सत्य होतं आणि सत्य नेहमी सुंदर असतं. योगेशचा असा भावूक स्वभाव माझ्यासमोर पहिल्यांदाच उलगडत होता. जवळ जवळ अर्धा तास आम्ही त्या ठिकाणी होतो.


मुलांच्या किलबिलाटाने अखेर आमची समाधी भंग पावली. कोण्या एका शाळेची सहल किल्ल्यावर भटकंतीसाठी आली होती. ती मुले ओळीने शेखसल्ल्याच्या थडग्याच्या इमारतीकडे चालली होती. त्यांच्या हातात डबे आणि पाण्याच्या बाटल्या दिसून आल्या. भूकतर आम्हालाही लागली होती, आम्हीही तेथे गेलो. सकाळ टाळून गेली होती. सूर्य डोक्यावर आला होता. त्या उन्हातही इमारतीच्या चिरेबंदी भिंती छान थंड लागत होत्या. सावलीतला कोपरा पाहून आम्ही तेथे बसकल मांडली. बसण्यासाठी सोबत आणलेल्या जुन्या वर्तमानपत्रांचा वापर केला. मध्यभागी एक कागद अंथरून त्यावर सोबत आणलेले पदार्थ पसरले. ब्रेड-बटर, चकल्या, चिवडा, वेफर्स, बिस्किटे.. कडाडून लागलेल्या भुकेने एक-एक करून सगळ्याचा फडशा पाडला. बाटल्यातील, आतापर्यंत बरंच गरम झालेलं पाणी पिऊन घेतलं. पिराच्या थडग्याची इमारत असल्याने, पाय पसरून तेथेच ‘ताणून’ देण्याचा विचार आम्ही मनातून काढून टाकला, आणि किल्ल्याच्या पुढील भटकंतीसाठी निघालो.


किल्ल्यावर एक बांधीव तलाव आहे आणि थोडे पुढे किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहेत. परंतु लोहगडावरील सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणजे गडाच्या पश्चिमेस असणारा ‘विंचूकाटा’. विंचूकाटा ही अंदाजे १५०० मीटर लांब आणि ३०-३५ मीटर रुंद अशी कातळाची सोंड म्हणजे एक नैसर्गिक भिंतच आहे. ही संपूर्ण सोंड चिलखती तटबंदी आणि बुरुजांनी युक्त असून तिच्या मध्यावर पाण्याचे एक टाके आहे. तेथे पोहोचत असताना योगेशची रंगेबिरंगी ट्रेकींग बॅग पाहून माकडांच एक टोळकं आमच्या मागावर होतं. विंचूकाट्याची सोंड मूळ डोंगरापेक्षा एक टप्पा खालच्या पातळीवर असल्याने तो टप्पा उतरून त्यावर जावं लागतं. या टप्प्याच्या दोन्ही बाजूस खोल दऱ्या आहेत. दगडातील खोबणी पकडून त्या टप्प्यात उतरून जावं लागतं. त्या टप्प्यावर आम्ही येताच, योगेशच्या ट्रेकींग बॅगेत खाण्याचे पदार्थ असतील या आशेने टोळक्यातील एका मोठ्या माकडाने ट्रेकींग बॅगेवर उडी मारली. हल्ला अनपेक्षित होता आणि अश्या ठिकाणी तो घातक होता. आम्ही दोघेही खूप घाबरलो. इतर माकडेही गोंधळ घालू लागली. योगेशने त्या माकडाची पहिली उडी चुकवली पण ते पुन्हा धावून आले. मी हातातील काठीने इतर माकडांना दूर ठेवत होतो. दुसऱ्या उडीच्या खेपेस योगेशने त्या माकडाच्या कमरेत लाथ घातली. ते सरळ दरीकडे फेकले गेले. क्षणाचाही विचार न करता आम्ही दोघे धावत सुटलो. माकडांनीही पाठलाग केला पण तोवर आम्ही बरेच लांब आलो होतो.. परत शेखसल्ल्याच्या इमारतीत येऊन आम्ही थोडी विश्रांती घेतली. विंचूकाटा न पाहता परत जावे लागत आहे याची खंत होती. पण आनंद हा होता की स्वतंत्रपणे ट्रेक करण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. पुन्हा एकदा लोहगड मनात साठवत परतीच्या प्रवासाला लागलो. दुपारचे २ वाजले होते. परतीचा प्रवास सुरु केला खरा पण आम्ही दोघेही वळून वळून मागे पाहत होतो. लोहगड सोडवत नव्हता. शक्य ती स्थळे पुन्हा भेट देऊन महादरवाज्यातून बाहेर आलो. मन जड झालं आणि पावलंही.. किल्ला शत्रूच्या ताब्यात जात असलेला स्वतःच्या डोळ्याने पाहणाऱ्या किल्लेदाराची अवस्था आम्ही तेव्हा अनुभवली. किती असह्य होती ती.. जड पावलांनी इतर दरवाजे, लोहगडवाडी, गायमुख खिंड, झाडीतली वाट, शेतातली पायवाट, भाजे गाव, हायवेचा पूल पार करत आम्ही मळवली स्टेशन गाठलं.


या संपूर्ण प्रवासात आम्ही दोघे एक-मेकांशी खूप कमी बोललो. स्टेशनवरूनही विंचूकाटा दिसत होता. स्टेशनवर पुन्हा स्वच्छ झालो आणि चहा घेतला. पहिल्याच ट्रेकने अंग दुखत होतं, पण परतीची भावना अधिक असह्य होती. ट्रेक पकडून लोणावळा गाठलं. या ठिकाणी आमचे रस्ते दुभंगणार होते. योगेश जाणार होता पुण्याला, आणि मी मुंबईला.. योगेशच्या गाडीला वेळ होता. त्याने मला मुंबईच्या गाडीत बसवून दिलं. बसायला जागा मिळाल्याने स्थिती थोडी सुसह्य होती. बसगाडी सुरु झाली. योगेशला हात दाखवून निरोप दिला. लोहगड मनातून जात नव्हता. खूप थकवा आला होता, त्यात थंड वाऱ्याने बाहेरची दृश्य पाहताना केव्हा झोप लागली ते कळलंच नाही. गडबड ऐकू आली, जाग आली तेव्हा मुंबईत सेंट्रलला पोहोचलो होतो. अजूनही लोहगडाचा विषय निघाला की त्या माकडांचा विषय हमखास येतो. लोहगड कायमचा मनात घर करून राहिलाय.. काही झालं तरी आमचा स्वतंत्र असा पहिलाच ट्रेक होता तो..

अजूनही लोहगडाचा विषय निघाला की त्या माकडांचा विषय हमखास येतो. लोहगड कायमचा मनात घर करून राहिलाय.. काही झालं तरी आमचा स्वतंत्र असा पहिलाच ट्रेक होता तो..


थोडक्यात:
किल्ले लोहगड (मळवली, पुणे)
उंची: ३४५० फुट । श्रेणी: सोपी - २ । भ्रमंती: उत्तम । ऋतू: सर्व
मळवली ते लोहगड (गायमुख खिंडमार्गे) - ट्रेक - दोन तास
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ जास्त लागू शकतो.)


नोंद: वरील लेख, 'सामना' वृत्तपत्राच्या 'फुलोरा' या करमणूक विशेष पुरवणीमध्ये ०७ जुलै १२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचनासाठी पुढील 'थम्बनेल' वर क्लिक करा.




3 comments:

  1. Replies
    1. धन्यवाद मुंबई हायकर.. आपल्या शुभेच्छा नियमित मिळत असतात.. :)

      Delete
  2. धन्यवाद मुंबई हायकर.. आपल्या शुभेच्छा नियमित मिळत असतात.. :)

    ReplyDelete