वारी हरिश्चंद्रगडाची (११ एप्रिल २००४) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, April 11, 2004

वारी हरिश्चंद्रगडाची (११ एप्रिल २००४)

लोहगडाचा ट्रेक करून मी घरी परतलो. घरची मंडळी रात्रीच्या जेवणात गुंतली होती, माळ्यावर जाऊन थोडी विश्रांती करून जेवणासाठी खाली आलो. माझ्या बहिणींनी, वर्षा आणि प्रियाने, ‘ट्रेक कसा झाला?’ असं विचारलं. मी सुद्धा उत्सुकतेने ट्रेकमधील सर्व गमती-जमती सांगितल्या, माकडांचा किस्सा सोडून.. त्यांनाही ट्रेकिंगबद्दल कुतूहल निर्माण झाले, आणि पुढील ट्रेकला यायची इच्छा दर्शवली. योगेश आणि मी तर त्याही पुढील प्लान सुरु केले होते. एखादा लहानसा ट्रेकिंग ग्रुप तयार करून बाकी मित्रांनाही किल्ल्यांची भेट घडवून आणण्याची योगेशची कल्पना मला आवडली. मी पूर्णपणे त्याच्या तयारीला लागलो. संस्थेच्या नावे एक आवाहन तयार करण्यात आलं. त्याच्या प्रती मित्र-परिवारामध्ये वाटून त्याद्वारे गिर्यारोहकांची संस्थेतील संख्या वाढवावी, असं ठरलं. आमच्या ऑडीट फर्ममध्ये तर आमच्या ट्रेकची माहिती (की महती?) वाऱ्यासारखी पसरली. खुद्द दिलीप परांजपे सर आणि त्यांचा मुलगा अभिजित यांनाही ट्रेकिंगची आवड असल्याने, त्यांनी मला आणि योगेशला ट्रेकमधील आमच्या अनुभवाविषयी विचारलं. परांजपे सरांनी तर मला ‘युथ होस्टेल’ या ट्रेकिंगमधील नामवंत संस्थेच्या सदस्यत्वाचा अर्जदेखील आणून दिला होता. पण आमच्या मनात स्वतःचा ट्रेकिंग ग्रुप तयार करण्याचा विचार सुरु होता. ऑडीट फर्ममधील ‘लक्ष्मण सावंत’ नावाचा एक तरुण, गुंतवणूक विभागात काम करत होता. त्यानेही आमच्यासोबत ट्रेकला येण्याची इच्छा सांगितली.

माझं कॉलेज शिक्षण त्याचवर्षी संपलं होतं, पण कॉलेजचे मित्र संपर्कात होते. योगेश गोथाड हा माझ्या खास मित्रांपैकी एक होता आणि पार्ल्यात राहत असल्याने बराच ‘काँन्टॅक्ट’मध्येही होता. तो सुद्धा ट्रेकला यायला तयार होता. ‘योगेश’ हे एक अबोल, लोकांमध्ये जास्त न मिसळणारे व्यक्तिमत्व. तो ‘पार्ले टिळक विद्यालयाचा’ विद्यार्थी असल्याने आमच्या डहाणूकर कॉलेजमध्ये त्याला ओळखणारे अनेकजण होते पण तो मात्र त्यांच्याशी ‘देखल्या देवा दंडवत’ या नियमाने वागत असे. वर्गातसुद्धा तो अलिप्तच राहणे पसंत करत असे. ओळख नसलेल्या लोकांशी लगेच ‘फ्रेंडली’ न होता येणं हा त्याच्या आणि माझ्यामध्ये साम्य असणाऱ्या गुणांपैकी एक होता. त्यामुळे ज्युनिअर कॉलेजपासून आम्ही एकाच वर्गात असूनदेखील या स्वभावामुळे आमची मैत्री होण्यास डिग्री कॉलेजचं पहिलं वर्ष उजाडावं लागलं. त्याच्या तूळ या राशीप्रमाणेच तो एकदम ‘बॅलेंस्ड’ होता. राग नाही, लोभ नाही, उत्साही नाही, थंड नाही. एकूण प्रक्टिकल पर्सनॅलिटी. त्याचा हाच स्वभाव आमच्या मैत्रीचं मूळ कारण होता आणि त्यामुळेच थोड्याच काळात तो माझ्या जिवलग मित्रांपैकी एक झाला होता. त्यात ट्रेकिंगच्या आवडीमुळे आमच्यातील मैत्री दृढ होत गेली.


स्वतःचा ट्रेकिंग ग्रुप, संस्था स्थापन करायचा ह्या योगेशच्या कल्पनेवर माझं काम जोरदार सुरु झालं होतं. संस्था सुरु करायची म्हणजे तिला, लोकांच्या मनात घर करेल असं एखादं नाव हवं, बोधचिन्ह हवं. मी सुचवलेलं ‘रॉक क्लाईम्बर्स क्लब’ नाव सगळ्यांनाच आवडलं. नंतर संस्थेसाठी बोधचिन्हाची गरज होती. पण ट्रेकिंगशी निगडीत आणि एकदम ‘डॅशिंग’ बोधचिन्ह तयार करायचा माझा अट्टाहास होता. उगाच काहीतरी करायचं म्हणून आम्ही करणार नव्हतो. आमचे ‘प्लान्स’ एकदम ‘लॉंगटर्म’ होते. बरेच दिवस ‘रिसर्च’ केल्यावर एक कल्पना आली. अतिऊंच डोंगरांमध्ये कडे-कपाऱ्या लीलया चढून जाणारा ‘एडका’ मी डिस्कव्हरी चॅनेलवर पाहिला. इंग्रजीमध्ये त्याला ‘बिगहॉर्न रॅम’ असं म्हणतात. त्यावर काही रेखाचित्र मी बोधचिन्हासाठी तयार केली आणि मग त्यातील एक संस्थेचं बोधचिन्ह म्हणून ठरलं. सर्व तयारी झाल्यावर, ०१ जानेवारी २००४ रोजी पार्ल्यातील वीर सावरकर पटांगणात आम्ही काही मंडळी एकत्र येऊन संस्थेचं नाव, बोधचिन्ह घोषित केलं आणि संस्था स्थापन झाली.


त्याचदरम्यान पार्ल्यातील ‘हॉलिडे हायकर्स’ या नामवंत गियारोहण संस्थेची ‘रायगड टकमक टोक रॅपेलिंग मोहिम’ जाणार आहे अशी माहिती मला मिळाली. या मोहिमेत सहभागी होणारी मंडळी शनिवारी रात्री ११:०० वाजता पार्ल्यातील ‘लोकमान्य सेवा संघ’ म्हणजे टिळक मंदीर येथे जमून मग मोहिमेला निघणार होती. माझ्या घरापासून टिळक मंदीर अगदी हाकेच्या अंतरावर होतं. परांजपेसरांचं ऑफिसदेखील त्याच्याच मागील बाजूस होतं. मी रात्री जेवून शतपावलीसाठी जो निघालो तो तडक टिळक मंदीरात आलो. प्रांगणाजवळ लाकडी बेंचवर जाऊन बसलो. बाजूलाच बसलेल्या एका तरुणाशी मी मोहिमेबद्दल बोलू लागलो. ‘मला यायचं होतं परंतु काही कारणामुळे मी सहभागी होवू शकत नाहीये’ असं मी त्याला सांगितलं. आम्हीसुद्धा ट्रेकला जातो असं कळताच त्याने त्याचा फोननंबर मला दिला व ‘मलासुद्धा कळवा’ असं सांगितलं. ‘संभाजी चोपडेकर’ नावाचा हा मुलगा रिसर्चचा विद्यार्थी होता. तो ‘युथ होस्टेल’ सोबत ट्रेकला जात होता. पुढचा ट्रेक कोणता करणार आहेस असं विचारताच त्याने ‘हरिश्चंद्रगड’ असं उत्तर दिलं. तो आधी एकदा या किल्ल्यावर जाऊन आला होता पण त्याला पुन्हा तिथे जायचं होतं. इतर थोड्या गप्पांनंतर माझा फोननंबर देऊन, मोहिमेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आणि निरोप घेतला. संभाजीच्या तोंडून ऐकलेला हरिश्चंद्रगड मात्र माझ्या डोक्यात रात्रभर फिरत राहिला. आपल्या संस्थेचा पुढला ट्रेक ‘हरिश्चंद्रगड’ हे मनात मी पक्कं केलं.


सोमवारी ऑफिसमध्ये जाताच योगेशसोबत त्यावर चर्चा झाली. पण हरिश्चंद्रगडाबद्दल ऐकलं आहे पण त्याची फारशी माहिती नाही असे त्याने मला सांगितलं. तरीही नीट आखणी करू आणि जाऊ, असं ठरलं. मी अनेक किल्लेविषयक पुस्तकांतून हरिश्चंद्रगडाबद्दल माहिती गोळा करू लागलो. मला इंटरनेटचेही थोडेफार ज्ञान त्याकाळी होते, त्याचीही मदत माहिती संकलनासाठी झाली. किल्ला प्राचीन असून, खरोखर राजा हरिश्चंद्राशी नाते जोडणारा आहे हे त्या माहितीतून कळलं. मी किल्ल्याकडे आकर्षिले जाण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावरील ६-७ फुटी ‘शिवलिंग’ आणि ‘कोकणकडा’. या ट्रेकमध्ये उत्सुक सगळ्यांनाच मी ही माहिती दिली.


माझ्या दोन्ही बहिणी, मोठी वर्षा (दीदी) आणि धाकटी प्रिया, त्याकाळी पार्ल्यातील बामनवाडा येथे सत्संगासाठी जात. तेथे राहणारे श्री.वालम (सगळे त्यांना वालममामा असे म्हणत) हे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुयायी असणाऱ्या कचरनाथ स्वामी महाराजांचे भक्त होते व त्यांचा सत्संग व सेवामंडळ ते चालवत होते. या सेवामंडळातर्फे दरवर्षी वेगवेगळ्या तीर्थस्थानांच्या यात्रा ते आयोजित करीत, ज्यातून माझ्या बहिणींनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या होत्या. मी इंटरनेटवरून डाऊनलोड करून घेतलेल्या त्या शिवलिंगाचा फोटो पाहून दोन्ही बहिणींना ते प्रत्यक्षात पाहण्याची तीव्र इच्छा झाली होती. मी, योगेश गोथाड, लक्ष्मण, संभाजी, दीदी, प्रिया इतकेजण ट्रेकसाठी तयार होतो. लक्ष्मणचा मित्र ‘दिलीप मिसाळ’ही ट्रेकला यायला तयार झाला. दिलीप हा मुळचा उस्मानाबादचा. एखाद्याशी कमी वेळात मैत्री करण्यात तो पारंगत होता. आमच्या ऑफिसजवळच त्याचेही ऑफिस असल्याने लक्ष्मणला भेटायला तो येत असे. तेव्हाच माझीही त्याच्याशी थोडीफार ओळख झाली होती. त्यात तो त्याच्या गावी येऊन जाऊन असल्याने गावाकडची बोलीभाषा, त्यातील हेल, शिष्टाचार चांगले माहित होते. सावळा तुकतुकीत वर्ण, सडपातळ काटक बांधा, सरासरी उंची आणि हसतमुख चेहरा, असा दिलीप लोकांत चटकन मिसळून जात असे. स्वताहून ओळख काढण्यात त्याच्या इतका पटाईत असणारा दुसरा इसम माझ्या ओळखीत नव्हता.


हरिश्चंद्रगडाची मोहीम पक्की झाली. शनिवार, दिनांक १० एप्रिल २००४ रोजी, रात्री ११ वाजता पार्ल्याहून निघायचं असं ठरलं. योगेश परांजपेला काही कारणामुळे या ट्रेकला येणं शक्य झालं नाही. पहिल्या ट्रेकचा भिडू दुसऱ्या ट्रेकला नाही याचे दु:ख होते पण एकासाठी इतर सात जणांचे वेळापत्रक बदलणे शक्य नव्हते. या ट्रेकला संभाजी लीड करणार होता. पार्ले – कल्याण – मुरबाड – खुबीफाटा – खिरेश्वर - हरिश्चंद्रगड असा मार्ग होता. आम्ही सातजण असल्याने गाडी भाड्याने घेऊन ट्रेकला जायचं सर्वानुमते ठरलं. कचरनाथ सेवामंडळामध्ये माझ्या बहिणींची ओळख विभव नावाच्या एका मुलाशी झाली होती. त्यांची स्वतःची टाटा सुमो गाडी होती, ती तो भाड्याने देत असे. आम्हालाही ट्रेकसाठी अल्प दरात त्याने गाडी ‘अवेलेबल’ करून दिली, आणि स्वतः ड्राईव्हिंगला यायला तयार झाला. एकूणच तयारी झाली होती. आता सगळे वाट पाहत होतो ती १० एप्रिल २००४ ची.


ट्रेकला जाण्याचा दिवस उजाडला. सकाळीच फोनवरून सगळ्यांना रात्री माझ्या घरी जमण्याची आठवण करून दिली. रात्री एक एक करून सगळे घरी जमलेसुद्धा. एकमेकांची ओळख करून घेण्यात आली. बहिणीचे सगळे सामान मी माझ्याच बॅगेत घेतलं. त्यांना फक्त चालायचं होतं. गाडी आल्याचे कळल्यावर निरोप घेऊन आम्ही निघालो. या वेळेस बहिणी सोबत असल्याने घरच्यांचा विरोध कमी होता पण त्यांची काळजी वाढलेली त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. बाहेर पोहोचलो तेव्हा विभव गाडी घेऊन तयार होता. आम्ही सर्वांनी गाडीमध्ये बॅगा कोंबल्या. मार्ग दाखवायचा होता म्हणून संभाजी विभवच्या बाजूला बसला. माळशेज घाटापासून पुढचा रस्ता तो त्याला दाखवणार होता. मधल्या जागी मी, दीदी आणि प्रिया बसलो. मागे लक्ष्मण, दिलीप आणि योगेश होते. रात्रीचे १२ वाजले होते. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘कचरनाथ महाराजकी जय’ ह्या घोषणा आम्ही दिल्या आणि विभवने गाडी सुरु केली. गाडीत गप्पा सुरु झाल्या. विभव आणि बहिणी, कचरनाथ सेवामंडळातर्फे जाणाऱ्या यात्रेतील गमतीजमती यांवर बोलू लागले. ठाणे सोडलं तशी थंडी जाणवू लागली. तासाभरातच संभाजी आणि विभव सोडून सगळेच पेंगू लागलो. त्यातच प्रियाला गाडी ‘लागते’ हे कळलं. त्यामुळे गाडी अधे-मधे थांबवावी लागत होती. तिच्या ह्या त्रासाबद्दल खबरदारी घेण्यास मी विसरलो होतो. माळशेज घाट सुरु होण्याच्या थोडं अलीकडे विभवने गाडी थांबवली. तो आदल्या दिवशी सकाळपासून गाडी चालवून आला होता. त्याला विश्रांती हवी होती आणि प्रियालाही त्रास होत होता. म्हणून तिथेच थोडा वेळ आराम करून पहाटे निघायचं असं ठरलं.


सकाळी जाग आली तेव्हा ४.३० वाजले होते. घाट चढून खुबीफाट्याहून खिरेश्वर गावातल्या कच्च्या रस्त्यावर गाडी आली होती. त्या खडीच्या रस्त्यावरून जाताना गाडीला धक्के बसत होते. १५-२० मिनिटांच्या त्या रस्त्याने सगळ्यांची हाडं खिळखिळी करून टाकली. गावातील एका धाब्याजवळ, जो हरिश्चंद्रगडाचा ‘स्टार्टींग पॉंईंट’ आहे, तिथे थांबवली. सगळे खाली उतरलो. सकाळच्या विधी आटोपून त्या धाब्यावरच चहा घेतला. लक्ष्य सारखं समोरच्या डोंगराकडे जात होतं. धाब्यावर एका काकांनी, ‘काय? हरिश्चंद्रगडावर का?’ असा प्रश्न केला. आम्ही ‘एव्हरेस्टवर निघालोय’ अश्या अविर्भावात होकारार्थी माना हलवल्या. विभव आराम करण्यासाठी गावातच थांबणार होता. दिवसभर गाडीवर लक्ष्य द्यायचं होतं आणि रात्री पुन्हा गाडी मुंबईपर्यंत हाकायची होती. त्यामुळे त्याला आराम मिळणं आवश्यक होतं. इतर सदस्यांची तयारी लक्ष्यात घेऊन घोषणा दिल्या आणि गडाकडे कूच केलं.


गडाचा पहिला टप्पा म्हणजे ‘टोलारखिंड’. संभाजी आणि मी पुढे व मागून बाकी सर्वजण, असे आम्ही निघालो. समोर दिसणाऱ्या टोलारखिंडीत जाण्यासाठी उजवीकडे दिसणाऱ्या डोंगरावरून जावं लागणार होतं. वीस-पंचवीस मिनिटांमध्ये प्रियाला पुन्हा उलटीचा त्रास सुरु झाला. तिला बाजूला नेऊन आणलं. पाणी प्यायला दिलं. रात्रीपासून ५-६ वेळा तिला उलट्या झाल्या होत्या. पुन्हा मार्गस्थ झालो पण तिच्या पोटात मळमळणं वाढतच होतं. संपूर्ण गटाच्या वेगावर त्याचा परिणाम होत होता. मला काहीच सुचत नव्हतं. उलट त्या वासामुळे मलासुद्धा मळमळायला लागलं होतं. आम्ही टोलारखिंडीत कसेबसे पोहोचलो. येथे काही गावकरी बसले होते. त्यांच्यामध्ये, धाब्यावर दिसलेले ‘काका’ सुद्धा होते. सफेद सदऱ्यासारखा शर्ट, सफेद पँट, डोक्यावर गांधी टोपी असा टिपिकल गावकरी ‘ड्रेस’ त्यांनी केला होता. मात्र त्यांच्या डाव्या खांद्यावरून उजवीकडे कमरेपर्यंत लटकणारी, पूर्वी पत्रकारांकडे असायची तशी कापडी खाकी पिशवी विशेष लक्ष्य वेधून घेत होती. आम्हीसुद्धा एक दहा मिनिटं तिथेच बसलो. टोलारखिंडीमध्ये वाघाचे शिल्प कोरलेला एक दगड बसवला आहे. त्याला शेंदूर फासला होता.




खिंडीतून पलिकडून काही लोक येतेना दिसले तेव्हा पलीकडच्या गावात येण्या-जाण्यासाठी गावकरी खिंडीचा वापर ‘शॉर्ट-कट’ म्हणून करतात असं तिथे कळलं. आम्ही पुढे निघालो. आता काकाही आमच्यासोबत होते. थोड्याच वेळात आम्ही एका ४०-५० फूटी कातळाच्या पायथ्याशी आलो. तो चढून पार करायचा आहे असं संभाजीनं सांगितलं. आधी तो आमची थट्टा करत आहे असं वाटलं. पण काकांनी त्याला दुजोरा दिला. त्या कातळावर थोडक्या खोबणी आणि नव्याने लावूनही डळमळीत झालेल्या लोखंडी सळ्या (रेलीन्ग्स) लावल्या होत्या. मी एकदम तयारीत आलो होतो. २० फूटी दोर बाहेर काढला. काका दोराशिवायच वर गेले. त्या मागोमाग दीदी आणि प्रिया गेले. दोर उगाच बाहेर काढला असं वाटू लागलं पण ‘आयडिया’ सुचली आणि शायनिंगसाठी दोर बांधून आम्ही फोटो काढले. मग सगळेच अगदी सहज वर पोहोचलो. वरून खाली बघताना खोली जास्त जाणवत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक ‘थ्रील’ अनुभवल्याचा आनंद दिसत होता.




तो ‘रॉक पॅच’ चढून गेल्यावर एक किल्लेपणाची खुण दर्शविणारी थोडकी तटबंदी नजरेस पडते. तिचेही फोटो काढण्यात आले आणि मग पुढे निघालो.


ट्रेक सुरु केल्यापासून दीड तास आम्ही चालत होतो. सगळ्यांना खूप थकवा आला होता. एप्रिल सुरु असल्याने फारशी हिरवळ न्हवती. सगळीकडे वाळून सोनेरी झालेलं गवत दिसत होतं. प्रियाच्या उलट्यांमुळे आणि तिला होणाऱ्या त्रासामुळे बरेच ‘हॉल्ट्स’ घ्यावे लागत होते. त्यामुळे आमचा स्पीड खूप स्लो होता. त्यात प्रियाला पुन्हा एकदा उलटी झाली. आता परिस्थिती गंभीर होती. रात्रभर झालेल्या उलट्यांमुळे तिला ‘डी-हायड्रेशन’ची भिती वाढली होती. मला पुष्कळ चिंता वाटत होती. पण एक बरं होतं की गटातल्या कोणालाही ‘काय कटकट आहे’ असं वाटत न्हवतं, हे त्यांच्या मदतीच्या हातावरून कळून येत होतं. काकांनी प्रियाला झालेला पित्ताचा त्रास ओळखला आणि ‘अरे तिला लिंबू वगैरे चाटायला द्या’ असं सांगितलं. मला ओशाळल्यासारखं झालं. कारण सर्व तयारीत मी ह्या महत्वाच्या गोष्टी विसरलो होतो. संभाजीने मीठ-साखरेची पुडी आणली होती पण ती फार कमी होती. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आम्हाला प्रियाला सावलीच्या ठिकाणी नेण्यास सांगितलं, आम्ही तसंच केलं. मग स्वतःची ती ‘पोटली काका की’ उघडून त्यातून लिंबू, साखर, पाण्याची बाटली, लहानसं पातेलं इत्यादी सामान बाहेर काढलं. ते लिंबूपाणी बनवू लागले. ‘अनोळखी व्यक्तीकडून काही खाऊ-पिऊ नये’ हे शाळेत शिकलेलो वाक्य आठवलं. पण ‘मरता, क्या न करता’ म्हणून देवावर भरवसा ठेवून चुपचाप बसलो. इतर सदस्यही तसेच उभे होते. काकांनी प्रियाला लिंबूपाणी प्यायला दिलं आणि पाण्याचे थोडे शिंतोडे तिच्या तोंडावर मारून थोडं पडून राहायला सांगितलं. ५-१० मिनिटांमधेच तिला बरं वाटू लागलं. तिने पुढे जाण्यास तयारी दाखवताच आम्ही पुढे निघालो. दीदी आणि काका प्रियासोबत चालत होते. दिलीप, लक्ष्मण आणि योगेश शेवटी होते आणि मी व संभाजी पुढे होतो. पण ह्या सगळ्यात माझी परिस्थिती वाईट झाली होती. मळमळण्यामुळे आता मला उलटी झाली होती. पण एक गोष्ट चांगली झाली होती की प्रियाचा त्रास कमी झाला होता. फक्त तिला अशक्तपणा आला होता हे तिच्या चालण्यावरून कळून येत होतं. लिंबाचा अर्धा काप प्रियाला देऊन ‘मध्ये मध्ये चाटत रहा’ ह्या काकांच्या सल्ल्यानुसार प्रिया लिंबू चाटत चालत होती. दोन तासांपेक्षा जास्त वेळ होऊन गेला होता. प्रियाला चालवत न्हवतं पण ‘झालं’, ‘अजून १५ मिनिटं’, ‘पोहोचलोच’ असं समजावत तिला काका आणि संभाजी ढकलत होते. तिची ही ‘हालत’ पाहून मला राहवलं नाही आणि मी संभाजीला विचारलं. संभाजी म्हणाला. माझं अवसानच गळून पडलं. खिरेश्वर गावापासून किल्ल्यात पोहोचायला सात टेकड्या पार कराव्या लागतात, त्यासाठी चार एक तास लागतात हे वाचून मलाही माहित होतं. पण खरी परिस्थिती उलट होती. प्रियाला होणाऱ्या त्रासामुळे आतापर्यंत अर्धा तास वाढला होता. गेले दोन तास मला चार तासांप्रमाणे वाटत होते आणि त्यात अजून अडीच तास? गटाच्या एकूण वेग लक्ष्यात घेतला तर अजून तीन तास आम्हाला चालायचं होतं असं सोपं गणित मनात मांडून, प्रियाला हुरूप देणाऱ्यांमध्ये मीही सामील झालो.


काका अधून-मधून आमच्याशी गप्पा मारत होते. त्यांच्यामुळे थोडा आधार वाटत होता. गप्पा सुरु असताना काकांनी आता स्वतःविषयी सांगायला सुरुवात केली होती. ते आले होते पुण्याहून. कुठल्याश्या ‘उत्तुंग’ नावाच्या गिर्यारोहण संस्थेचे ते सदस्य होते. हरिश्चंद्रगडावर येण्याची त्यांची ही ‘बारावी’ वेळ होती. पहिल्याच भेटीत तोंडाला फेस आणणाऱ्या ह्या किल्ल्यावर ते आधी ११ वेळा येऊन गेलेत हे ऐकून माझ्या डोळ्यासमोर दिवसा तारे चमकले. ‘इतक्या वेळेला ह्या किल्ल्यावर का?’ असा प्रश्न केल्यावर त्यांनी हकीकत सांगायला सुरुवात केली. पहिल्या भेटीत त्यांना किल्ल्यावरील शिवलिंग एवढे आवडले की त्यांनी त्यास अभिषेक केला. त्याचवेळी ‘बारा वेळा असा अभिषेक करीन’ असा मनोमन संकल्प त्यांनी केला. गेल्या अकरावेळा त्यांनी तो पूर्णही केला. आणि आज बारावी वेळ होती. इतक्या वेळच्या अभिषेकांची सांगता करण्याची वेळ होती. त्यांचा संकल्प चुकू नये म्हणून ‘तुम्ही व्हा पुढे, तुमचा संकल्प पूर्ण करा. आम्ही येतो हळू हळू..’ असं सांगून आम्ही त्यांना जाण्यास सांगितले. त्यावर ते म्हणाले "अरे, वेडे की खुळे पोरांनो तुमी.. तुमी अश्या आडचणीत असताना, तुमाला सोडून मी संकल्प पूर्ण करायला गेलो तर तो पावल का मला सांगा तुमी? हा? आता गडावर जायचं तर संगाती आणि आभिषेक करायचा तर तो बी संगाती.. काय?.." असं बोलून आमच्या सोबतच गडावर येण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ते अचानक खरंच ‘उत्तुंग’ वाटू लागले. आम्ही पुन्हा पुढे निघालो.


चालून चालून पायात गोळे तर आले होते, पण काका आम्हाला बोलण्यात गुंगवून आमचं लक्ष्य थकव्यापासून दूर नेत होते. प्रिया आता एकदम ठणठणीत झाली होती. सपाटीच्या वाटा, घसारे, झाडीचे टप्पे पार करत आम्ही पुढे मार्गक्रमण करत होतो. मी सुद्धा स्वतःला ढकलत होतो. पण समोरचं दृश्य पाहून मी एकदम ओरडलोच.. "अरे, पोचलो आपण.. तो कळस बघा हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा.." काकांच्या बोलण्यात आम्ही येथे कधी पोहोचलो कळूनच आलं नाही. मंदिर आणि त्यापुढील परिसर थोड्या खालच्या पातळीवर असल्याने तेथे पोहोचेपर्यंत त्या कळसाशिवाय काहीच दिसून येत नाही. आता सगळ्यांचा ‘स्पीड’ वाढला. झपाझप पावलं टाकत आम्ही मंदिराजवळ आलो.


तेथे येताच संपूर्ण परिसर दिसून येतो. सर्वप्रथम डोम्बाची घुमटी नजरेस पडते. त्यामागे हेमाडपंथी बांधणीचे हरिश्चंद्रेश्वर मंदिर, विश्वामित्राची घुमटी आणि सप्ततीर्थ दिसून येतात. मंदिराजवळच मंगळगंगा नदीचा उगम होतो आणि तिचा प्रवाह मंदिरासमोरून वाहतो. तिच्यावरील दगडी पूल पार करून मंदिरात प्रवेश होतो. डावीकडे हरिश्चंद्र बालेकिल्ला आणि तारामती शिखर दिसून येतात. सप्ततीर्थ पुष्करणीला दक्षिण दिशेला २-३ फूटी दगडी पट्टीमध्ये १४ कोनाडे आहेत. प्रत्येक कोनाड्यामध्ये एका देवतेची मूर्ति आहे. या देवता म्हणजे १४ विद्यांच्या देवता आहेत असे मानले जाते. तारामती शिखराच्या पोटात गुहा कोरलेल्या आढळतात. त्यातील एका गुहेत श्री गणेशाची ६ फूटी उंच आसनस्थ कोरीव मूर्ति आहे. बाजूच्या गुहेत काही साधूंनी वास्तव्य केलं आहे. त्याचं गुहेत गडावरील पाण्याचा मुख्य स्त्रोत असणारी पाण्याची टाकी आहेत. फ्रीजलाही लाजवेल असे थंड असणारे ते मधुर पाणी पिऊन आम्ही तृप्त झालो. त्या वातावरणाने आमचा सगळा थकवा नाहीसा केला होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर किल्ला सर केल्याचा आनंद दिसून येत होता. सगळे मंदिराच्या एका कोपऱ्यात जाऊन बसलो.


दुपारचे साधारण १२ वाजले होते. त्या उन्हातही त्या मंदिराचा कातळ मस्त थंडगार लागत होता. एवढा वेळ चालून सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती. सगळ्यांच्या बॅगा उघडल्या गेल्या. त्यातील खाद्यपदार्थ एक एक करून समोरच्या कागदावर अवतरू लागले. ब्रेड-बटर, बटाट्याची भाजी, चपाती, चिवडा, चकली, बिस्किटे यांनी तो कागद भरून गेला. मला उलट्यांमुळे जेवणाची इच्छा न्हवती. याउलट प्रिया ठणठणीत वाटत होती. काही तासांपूर्वी तिला त्रास होत होता हे कोणाला सांगितलं असतं तर ते त्याला पटलं नसतं अशी ती दिसत होती. तरीही काकांनी तिला आम्ही आणलेले पदार्थ खाऊ दिले नाहीत. त्यांनी अजून एक कागद अंथरला. त्यावर पातेलं ठेवून त्यात पाणी ओतलं. सोबत आणलेली दुधाच्या भुकटी त्यात ढवळून दुध तयार केलं आणि ते प्रियाला प्यायला दिलं. आम्हीही त्यात ‘ढवळाढवळ’ केली नाही. प्रिया स्वस्थ होती यातच सगळ्यांना आनंद होता. सगळ्यांनी खाण्यावर यथेच्छ ताव मारला. त्यांना भूकही तशीच लागली होती. मला मात्र जेवण काही गेलं न्हवतं. पण इतर मंडळींच्या समाधानासाठी मी २/३ घास ढकलले होते. पुन्हा टाक्यांतील थंडगार पाणी पिऊन घेतलं आणि बाटल्याही भरून घेतल्या. मंदिराचा थंड कातळ अंगाला सुखावत होता. थोडं ‘आडवं’ व्हावं ह्या विचारानं आम्ही सगळे त्या कातळावर जरा ‘पडलो’.


जाग आली तर चक्क अर्धा तास उलटून गेला होता. साखरझोप काय असते, हे आमच्या सारख्या शहरी बेगडी माणसांना, ह्या अश्या अनगड जागी कळून आलं होतं. आता कडक दुपार झाली होती. ज्या दोन गोष्टींच्या आकर्षणाने इथवर आलो होतो, त्या अजूनही पहायच्या बाकी होत्या. आवराआवर सुरु झाली. आधी ते प्रचंड शिवलिंग म्हणजेच केदारलिंग पहायचं ठरलं. हे शिवलिंग ६-७ फूटी मोठं आहे हे वाचलं होतं, इंटरनेटवर फोटोही पाहिले होते. पण गुहेजवळ येऊन जेव्हा प्रत्यक्ष त्याचे दर्शन झालं तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. एका प्रशस्त गुहेत हिरव्यागार पाण्यात चार दगडी स्थंभांच्या अगदी मधोमध एका दगडी चौकटीवर ते ६-७ फूटी प्रचंड शिवलिंग पाहून थक्क व्हायला झालं. एखाद्या काल्पनिक सिनेमात किंवा गणेशोत्सवाच्या चलचित्र देखाव्यात पाहायला मिळावा असा हा नजारा प्रत्यक्षात पाहून आम्ही भारावून गेलो होतो. एका बाजूला काकांनी पोटलीतून अभिषेकाचं साहित्य काढून घेतलं. झटक्यात कपडे काढून ते कटीवस्त्रावर आले. असं विचारून त्यांनी त्या हिरव्यागार पाण्यात उडी मारलीसुद्धा.. त्या थंडगार पाण्याचे शिंतोडे आमच्यावर उडाले. हाडं गोठवेल इतकं ते पाणी थंड होतं. एवढ्या थंड पाण्यात काकांनी उडी मारली हे पाहूनच आमच्या अंगावर शहारा आला. ते पिंडीजवळ पोहोचले आणि तांब्याने पिंडीस अभिषेक करू लागले. आम्ही बाहेरून ते पाहत होतो. त्यांचा अभिषेक झाला तसं ते म्हणाले, “अरे पोरांनो, कसला विचार करताय? उतरा पाण्यात, अशी संधी वारंवार येत नसते. देवाच्या मनात होतं म्हणून त्यांनी तुम्हाला माझ्यासोबत इथवर तो घेऊन आला. या इथे आणि करून घ्या आभिषेक..” आम्ही मुलांनी एकमेकाकडे पाहून सगळे तयार असल्याची खात्री करून घेतली. ट्रेकमध्ये हा प्लान न्हवता, त्यामुळे पोहण्यासाठी जादा कपडे, अंतर्वस्त्रे घेऊन कोणी आलं न्हवतं. पण बाहेर एवढ ऊन होतं की १५ मिनिटांत आतले कपडेतरी सुकले असते. आम्ही सगळी मुले कटीवस्त्रावर आलो. मी पाण्याला हात लावला, संपूर्ण अंगात शिरशिरी गेली. बर्फाला लाजवेल असं ते पाणी थंड होतं. त्यात त्या पाण्याला वास येत होता. समजा, जरी पाण्याच्या थंडपणाने फरक नाही पडला तरी त्या पाण्यामुळे अंगाला नंतर जो वास येईल तो त्रासदायक होईल, हा विचार माझ्या मनात तेवढ्यात येऊन गेला. माझ्या भुवया उंच झाल्या. काका तिथून हाका मारत होते. “उत्कर्ष, अरे काका सांगतायत तर उतरूया चल..” संभाजी म्हणाला. सगळे पाण्यात उतरले. ‘हाय हुय’ करू लागले. त्यांचे ते थरथरणं पहात त्या पाण्यात सगळ्यात शेवटी उतरणारा माणूस मी होतो. छातीभर उंचीच्या त्या पाण्यात अंग बधीर झालं होतं. आम्ही सरकत सरकत पिंडीपाशी पोहोचलो. काकांनी आणलेल्या तांब्यानेच पिंडीस अभिषेक केला. खूप प्रसन्न वाटलं. खरंच! काही स्थळे, आपल्याला आपण भौतिक सुखाच्या किती अधीन झालो आहोत हे दाखवण्यासाठीच तेथे असतात. केदारलिंग हे असंच एक स्थळ होतं. सगळ्यांनी ह्या पिंडीसोबत, गुहेच्या ‘बॅकग्राउंड’वर फोटो काढून घेतले. बाहेर येऊन कपडे सुकवले आणि पुन्हा घालून पुढल्या प्रवासासाठी तयार झालो.




आता आमचा मोर्चा वळला तो गडाच्या खऱ्या आकर्षणाकडे, कोकणकड्याकडे.. किल्ल्याच्या पूर्व भागात पोहोचताना वादळ सुटल्यासारखा आवाज कानी येऊ लागला. “पोचलो आपण..” काका म्हणाले. कड्याशी पोहोचताना जमिनीवर झोपून कड्यात वाकून बघणारी काही मंडळी मजेशीर वाटत होती. भन्नाट वारा कशाला म्हणतात ते पाहण्यासाठीतरी एकदा इथे यायला हवं. निसर्गासमोर आपण किती शूद्र आहोत याची जाणीव हा कडा आणि इथला निसर्ग करून देतो.




कड्याच्या अगदी जवळ गेलो, वारा पाय ठरू देत न्हवता. ते हलू लागले होते. आपोआप माणसे तिथे बसत होती आणि मग पुढे झोपूनच कडा बघायला जात होती. आतापर्यंत ‘बावळटपणा’ वाटणारा तो प्रकार, ‘धारीष्ट्याचं’ काम झालं होतं. “चला, आता एक एक करून खाली झोपा, मी तुमचे पाय पकडलेयत, सरका कड्याकडे..” कसाबसा एकवटवलेला जीव काकांच्या त्या वाक्याने पुन्हा उधळला गेला.. ‘अरे, सरका कड्याकडे म्हणजे काय?’, एवढं सोपं काम न्हवतं ते.. ‘अरे पण हे काय?’ संभाजी तयार झाला, कोणीतरी सुरुवात करणं आवश्यक होतं. तो झोपला, काकांनी त्याचे पाय पकडले आणि तो कड्याकडे सरकू लागला.. आमचे जीव घश्यातच अडकले होते. संभाजी कड्याच्या टोकाशी पोहोचला, त्याने वाकून कडा पाहिला.. “अजून खाली जा, कड्याची ती वाटीसारखी घळ बघ..” काका ओरडत होते. संभाजी आदेशाप्रमाणे वागत होता. थोड्यावेळाने त्याचा कडा पाहून झाला, आता तो खाली सरकत होता. बऱ्यापैकी खाली आल्यावर काकांनी त्याचे पाय सोडले. तो गरगरतच उभा राहिला.. त्यानंतर दिलीप त्याची अवस्था संभाजीपेक्षा वाईट झाली. कारण संभाजी आधी एकदा कडा बघून गेला होता.. आम्ही सगळेच ‘फर्स्ट टायमर’ होतो. आता कोणी पुढे यायला तयार न्हवतं. काकांनी माझ्याकडे पाहिलं. मी घडवून आणला होता ट्रेक ना, मला जाणं भाग होतं. दुसरा ‘ऑप्शनच’ न्हवता. मी सरसावलो. “अरे बाबू, चष्मा काढून जा..” चष्मा काढणं आवश्यक होतं. कड्याचा वारा इतका प्रचंड होता की कदाचित चष्मा खाली पडला असता. तो दीदीकडे दिला आणि झोपलो. काकांनी पाय घट्ट पकडल्याचं ‘कन्फर्म’ झाल्यावरच पुढे सरकलो. दरीशी नजरानजर झाली. ‘बोबडी वळणे’ या म्हणीचा प्रत्यय तेथे आला. तरीही काकांच्या सांगण्यावरून कड्याचा वाटीसारखा खोलगट भाग पाहून मी खाली आलो. उभा राहिलो. डोकं गरगरत होतं. चष्म्याशिवाय धुरकट दिसणाऱ्या माझी, त्या कड्याच्या फक्त ५-७ सेकंदाच्या भेटीने ही अवस्था होती, चष्मा घालून स्वच्छ दिसलं असतं तर काय झालं असतं? चष्म्याशिवाय मला स्वच्छ दिसत नाही याचा मला तेव्हा हेवा वाटू लागला होता. एक एक करून, कडा पाहून सगळे गरगरून येत होते. या बाबतीत ‘वन्स मोर’ करण्याची कोणाचीही बिशाद न्हवती. त्यानंतर कड्याचा उजव्या भागात जाऊन थोडावेळ बसण्याचं आम्ही ठरवलं. तिथे जात असताना ‘डोक्याचा भुगा’ करणारं दृश्य आम्हाला दिसलं. ज्या कड्याकडे पाहवतही न्हवतं, त्यात दोघेजण पाय सोडून बसले होते.. “काय वेड लागलंय काय ह्या मुलांना?” मी म्हणालो. त्यावर संभाजी म्हणाला “अरे, हे तर काही नाही.. या कड्याच्या प्रेमात पडून एका तरुणाने यात चक्क उडी मारली होती..” आम्ही कड्याच्या किनारी बसलो होतो. वाऱ्यामुळे माझी टोपी उडून कड्यात फेकली गेली. प्रियाने पटकन उठून ती टोपी पकडली. सगळं क्षणार्धात झालं होतं. आम्हा सर्वांना धस्स झालं. आम्ही कड्याजवळ होतो. ती टोपी पकडण्याच्या नादात काहीही घडू शकलं असतं, काहीतरी विचारांच्या पलीकडलं..


आता संध्याकाळचे साधारण ४ वाजले होते. तो रौद्र कोकणकडा मनात साठवून परतीच्या प्रवासाला लागलो. मी अस्वस्थ होतो, मला अपचनाचा त्रास झाला होता. प्रिया आता खरंच ठणठणीत होती. सगळे खिरेश्वरच्या मार्गाला लागलो होतो. काका सोबत होतेच.. आता पुन्हा ४-५ तास चालायचय ह्या विचाराने सगळेच वैतागले होते. पण काका मात्र आता आम्हाला गुरांसारखे पळवत होते. “पोरांनो, चला पटपट.. अंधार पडायच्या आधी खाली पोचायला पायजे.. नायतर आडचण होयील..” असं ते म्हणत होते आणि ते खरंही होतं. तरीसुद्धा खाली उतरण्याआधी अर्ध्याच वाटेल अंधार सुरु झाला. हळू हळू पुढे चालणारा एक एक भिडू दिसेनासा होत होता.. मी टॉर्च देखील आणायला विसरलो होतो. ‘माझ्या एवढ्या मोठ्या बॅगेत मी मग नक्की आणलंय तरी काय?’ हा प्रश्न मी स्वतःला तेव्हा नकळत विचारला.. उत्तर माझ्याकडे न्हावतच.. योगेशने मात्र टॉर्च आणला होता. एक काकांकडेही होता. शेळ्या-मेंढ्या चालाव्यात तसे आम्ही काकांना ‘फॉलो’ करत होतो, ते दिसत न्हावतेच त्या अंधारात.. त्यांचा आवाजाचा कानोसा घेत हे सगळं चाललं होतं. संध्याकाळ टाळून गेली होती. मिट्ट काळोख पडला. पहिल्या आणि शेवटच्या टॉर्चच्या प्रकाशाव्यतिरिक्त काहीच दिसत न्हवतं. एकमेकांचा हात धरून आम्ही चाललो होतो. हरिश्चंद्रगडाचं जंगल बऱ्यापैकी गच्च होतं. त्यात बिबळ्यांपासून सर्व वन्यश्वापदे आहेत हे वाचून माहित होतं. झाडी, किरकिरणारे किटक, मधेच एखादा अनोळखी आवाज सगळ्यांनाच तणावपूर्ण करत होता. साधारण दोन तास धडपडत, चाचपडत, घसरत, घाबरत चालून झाल्यावर दुरवर बल्बचा प्रकाश दिसून आला आणि सगळ्यांना हायसं वाटलं. ताबडतोब पावलांचा वेग वाढला. वाट तर दिसतच न्हवती. काका नेट होते तिथे आम्ही चालत होतो. प्रकाश हळू हळू जवळ येत होता. टोलारखिंड पार करून गवत उतरलो होतो. प्रकाश सकाळी उतरलेल्या धाब्याच्या बल्बचाच होता. लवकरच तिथे पोहोचलो.


विभव आमची वाट पहात होता. त्यानेही सुटकेचा निश्वास सोडल्यासारखं वाटलं. वाटलं म्हणण्याचं कारण म्हणजे मी हे काही कळायच्या स्थितीत न्हवतो. ८-१० तास चालल्यामुळे आता पायातले गोळे जाणवत होते. मी सरळ जाऊन बाजूच्या बाकावर स्वतःला झोकून दिलं. रात्रीचे आठ वाजून गेले होते. बाकीचे सगळे थोडे फ्रेश वगैरे झाले, चहा घेतला. त्यानंतर गाडीत जाऊन बसले. मी सुद्धा मागच्या सीटवर स्वतःला कोंबून घेतलं. आजूबाजूला काय काय चाललंय हे पहायचंही त्राण न्हवतं. गाडी तुफान वेगाने मुंबईकडे निघाली. संभाजी दादरला उतरला व पुढे टॅक्सीने घरी गेला. बाकी आम्ही सगळेच पार्ल्याची मंडळी रात्री १ वाजता घरी पोहोचलो. सामान कोपऱ्यात टाकून आम्ही तीन भावंडे कशीबशी अंथरूण घालून झोपी गेलो.


सकाळी उशिरा उठलो हे वेगळं सांगायची इथे गरज भासत नाही. त्यात एवढे प्रथमच चालल्यामुळे पाय आणि अंग खूप दुखत होतं. त्या दिवशी ऑफिसलाही गेलो नाही. सुरक्षित घरी आलो होतो याचाच मात्र आनंद होता. हरिश्चंद्रगडही मनातल्या मनात सुखावत होता. सगळ्या आठवणींचा ‘फ्लॅशबॅक’ डोक्यात सुरु होता. यात एक गोष्ट मात्र मनाला फार दुखावत होती. ती म्हणजे काळ रात्री निघताना दमल्यामुळे मी त्या बाकावरून स्वतःला गाडीत कोंबताना, ज्या देवमाणसाने आम्हाला इतकी मदत केली होती, त्यांना किमान निरोप द्यायलाही मी विसरलो होतो. त्यावर घरी गप्पा मारताना माझी नजर सहजच कचरनाथ स्वामी महाराजांच्या पुस्तकावर गेली. त्यावर त्यांचा फोटो होता. मी झटक्यात ते पुस्तक उचललं आणि तो इतके दिवस नीट न पाहिलेला फोटो निरखून पाहू लागलो. मला जे जाणवलं ते बहिणींनाही जाणवलं होतं. हरिश्चंद्रगडावर आम्हाला मदत करणारे काका अगदी असेच दिसायला होते. कदाचित अडचणीत आम्हाला मदत करायला स्वामीच आले आणि म्हणूनच काही ओळख आमच्याकडे न ठेवता ते निघून गेले, असं मनात वाटून गेलं. काही गोष्टींचा आपण तर्क लावूच शकत नाही. आणि म्हणून जे घडतं त्यावर अधिक विचार करण्यात काही अर्थ नसतो. काही नवीन धडे मिळाले होते, काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या होत्या. एक गोष्ट मला नक्की सुखावत होती. की हरिश्चंद्रगडासारखा किल्ला आम्ही नवख्या ट्रेकर्सनी अवघ्या एका दिवसात पूर्ण केला होता आणि ट्रेकिंगचा माझा विश्वास त्यामुळे दुणावला होता.


थोडक्यात:

हरिश्चंद्रगड (खुबी, नगर)
उंची: ४७१० फुट । श्रेणी: मध्यम - १ । भ्रमंती: उत्कृष्ठ । ऋतू: सर्व
खिरेश्वर ते हरीश्चंद्रगड (टोलारखिंडमार्गे) - ट्रेक - चार तास 
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला कमी जास्त वेळ लागू शकतो.)

नोंद: वरील लेख, 'वतन कर्नाळा' साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचनासाठी पुढील 'थम्बनेल' वर क्लिक करा.




2 comments: