विस्तृत विसापूर (२८ नोव्हेंबर २००४) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, November 28, 2004

विस्तृत विसापूर (२८ नोव्हेंबर २००४)

लोहगड, हरिश्चंद्रगड, माहुली,... एका मागोमाग एक ट्रेक्सची साखळी आमच्या उत्साहामध्ये वाढ करत होती. सगळ्यांना एकाच विचारानं पछाडलं होतं – ‘पुढचा ट्रेक कोणता?’. माहुलीप्रमाणेच याहीवेळी योगेश परांजपेकडून पुढल्या ट्रेकची खबर आली - लोहगडाला लागून असलेला किल्ले विसापूर. लोहगड मनात ताजा होता. मळवलीचा परिसरही ओळखीचा झाला होता. दोघांमध्ये गायमुख खिंडीचेच अंतर – खिंडीच्या उजवीकडे लोहगड तर डावीकडे विसापूर. ठरलं तर! २७ नोव्हेंबर २००४ रोजी रात्री विसापूरचा ट्रेक पक्का झाला. नेहमीप्रमाणे सगळया मित्रांना ‘कॉल’ गेले.

माहुलीच्या ट्रेकचे, मी, योगेश परांजपे आणि दिलीप मिसाळ होतोच; यावेळेला योगेश गोथाड आमच्यात सामील झाला. लोहगड ट्रेकदरम्यान आलेल्या एस.टी.च्या अनुभवामुळे आम्ही या खेपेला ट्रेन ‘प्रीफर’ केली. २७ तारखेला रात्री १० वाजताच्या सुमारास मी, योगेश गोथाड आणि दिलीप, विले-पार्ले रेल्वेस्टेशनवर योगेश परांजपेची वाट पाहत होतो. ठरल्या वेळेवर योगेश परांजपे यांचे आगमन झाले; आणि वेळेतच सी.एस.टी.ला जाणारी ट्रेन पकडण्यात आली. सी.एस.टी.ला चेन्नई मेल उभी होती, ती गाठली. रात्रीचे जेवण घरूनच करून आल्याने डोळे पेंगत आले होते. गाडीत शिरताच, मिळेल त्या जागेवर बसून झोप काढायचा आमचा विचार, गाडीतल्या ‘जनरल’ डब्यातल्या गर्दीने उधळून लावला. गाडीत तर धड उभं राहायलाही जागा नव्हती; त्यासाठीही कसरत करावी लागत होती. रात्रीचे साधारण १२ वाजले होते, सी.एस.टी.हून लोणावळा, म्हणजे दोन - सव्वा दोन तास गाडीत काढायचे होते. एवढा प्रवास उभ्याने करायचाय या विचारानेच कंटाळा आला होता. आम्ही जागा शोधण्यासाठी पुढल्या डब्यांकडे निघालो. प्रत्येक बर्थवर चार-चार जण गर्दी करून बसले होते, मिडल आणि अप्पर बर्थही ‘फुल’ होते. अचानक एक ओळखीची हाक ऐकू आली. आवाजाचा वेध घेतला. मागच्या डब्यात संभाजी चोपडेकर त्याच्या मित्रांसह अप्पर बर्थवर दाटी करून बसला होता. “कुठे?” संभाने विचारलं. “विसापूर”, मी उत्तरलो. त्यानेही, ते सगळे तिकोना किल्ल्यावर जात आहेत असं सांगितलं. एकमेकांना ‘बेस्ट ऑफ लक’ दिलं आणि आम्ही जागेसाठी पुढे निघालो. शेवटी एके ठिकाणी दाटीवाटी करून आम्ही ‘चौथ्या’ सीट्स पकडल्याच. दोन-सव्वा दोन तासांत आम्ही लोणावळ्याला पोहोचलो. मध्यरात्र सुरु होती; थंडीही कडक होती. लोणावळा स्टेशनच्या तिकीटघराजवळ, कोपऱ्यात, चांगली जागा पाहून आम्ही जुन्या वर्तमानपत्रांचे कागद अंथरले आणि त्यावर आडवे झालो.


दोन-अडीच तासांनी जाग आली तेव्हा थंडी बरीच वाढली होती. कागद, जॅकेट्स गार झाले होते. हात-पाय थंड पडले होते. शरीर कुडकुडत होतं. मी बाकी मंडळींना उठवलं आणि ‘फ्रेश’ होण्यासाठी निघालो. स्टेशनवरचा ‘पब्लिक’ नळ गाठला. तोंड धुण्यासाठी नळाच्या पाण्याखाली हात धरले आणि क्षणार्धात हात गळून गेल्यासारखं वाटलं. बर्फालाही मागे टाकेल एवढं ते पाणी थंड होतं. पण इलाज नव्हता; त्याच पाण्याने हात-पाय आणि इतर सगळं धुऊन ‘फ्रेश’ झालो. तोपर्यंत इतरजणही तेथे आले आणि फ्रेश झाले. मग सगळ्यांनी स्टेशनच्या टपरीवर चहा घेतला; पण थंडी जाणवतच होती. स्टेशनबाहेर आलो; तिथे शेकोटी पेटवली होती. तिच्या बाजूला वर्तुळ करून लोक अंगातली थंडी पळवून लावत होते. तेथेच संभा आणि त्याचे मित्र बसले होते. आम्हीही त्या वर्तुळात शिरलो आणि चटके लागेपर्यंत शेक घेऊ लागलो. तिथेच विसापूर आणि तिकोनाच्या माहितीची देवाण-घेवाण सुरु झाली. साधारण अर्ध्या तासाने पुणे लोकल ट्रेक पकडून आम्ही सगळे पुढल्या प्रवासाला निघालो. लोणावळ्या पुढलं ‘मळवली’ स्टेशन आल्यावर, आम्ही ‘विसापूरवाले’ ‘तिकोनावाल्यांना’ निरोप देऊन उतरलो. स्टेशनवरूनच लोहगड-विसापूर जोडगोळी लक्ष वेधून घेत होती. लोहगडाकडे लक्ष जाताच, आमच्या लोहगडाच्या ट्रेकच्या आठवणी मनात तरळून गेल्या. योगेश परांजपे एकदम उत्साहात होता; “किती फ्रेश वाटतंय ना??” असं बोलून तो उत्साह दाखवण्यासाठी उगाच मळवलीच्या पुलावरून धावत पुढे गेला आणि धावतच पुन्हा मागे आला. त्यावरून, या ट्रेकला, ग्रुपमध्ये पहिला थकणारा गडी कोण असेल याची खात्री आम्हा सगळ्यांना तेव्हाच झाली.


लोहगड डोळ्यासमोर ठेऊन लोहगडाच्या आठवणी, दिलीप आणि योगेश गोथाडला सांगत आम्ही भाजेगावापर्यंत पोहोचलो. आमची ‘खात्री’ खरी ठरली; योगेश परांजपे इथेच थकला होता. शेतातली पायवाट मागे टाकत गायमुख खिंड जवळ करत होतो. प्रत्येक ठिकाणी लोहगड ट्रेकचे प्रसंग आठवले जात होते. तासाभरात गायमुख खिंडीत आम्ही पोहोचलो. दोन्ही बाजूंना लोहगड-विसापूर किल्ले, मागे मळवली तर समोर पवना धरणाचा परिसर दिसत होता. गायमुख खिंडीतून अनेक ट्रेकर्स लोहगडाकडे वळतात पण खिंडीतून डावीकडे वळत विसापूर किल्ल्याची वाट धरली. खरंतर आमचे पाय विसापुरकडे जात होते आणि मन लोहगडाकडे. गायमुख खिंड मागे पडली होती. डावीकडे विसापूरचा कडा आणि उजवीकडे पवन मावळ दिसत होते. विसापूरकडे जाणारा ‘क्राउड’ कमी असल्याने हा मार्ग तसा दुर्लक्षितच. आम्ही पायवाटेने पुढे चालत होतो; अधून मधून पाचोळ्याच्या आवाजाने झाडावळीतले पक्षी दचकून भुर्रकन उडून जात होते. पंधरा-वीस मिनिटे चालल्यावर डोंगर संपत आला; तसं कळलं की काहीतरी चुकलंय. पण मागे कुठेच किल्ल्यावर जाणारी वाट दिसून आली नव्हती. पाच-दहा मिनिटं तिथेच थांबून अंदाज घेऊ लागलो; थकलोही होतोच सगळे. इतक्यात समोरच्या झाडावळीतून एक माणूस कुऱ्हाड घेऊन बाहेर आला. आम्हाला पुन्हा ‘माहुली’ किल्ल्याचा प्रसंग आठवला; पण आता आम्ही धीट झालो होतो. त्यामुळे तो लाकडं तोडायला आलेला गावकरी आहे हे आम्हाला कळून आलं. त्यालाही, आम्ही विसापुरला आलोय हे कळलं असावं बहुदा.

“काय? विसापुरला का? की लोहगडला?”, गावकरी.


“विसापुरला..”, दिलीप.


“जाम पुढं आलाव तुमी.. मागे घळीतच वाट हाये..”, गावकरी.


उगाच जास्त चालून ‘कष्ट’ केल्याने सगळेच हळहळलो. मागे फिरलो आणि अर्धा रस्ता चालून मागे आल्यावर, (दक्षिण) घळीच्या पायथ्याशी आलो. वर तटबंदी दिसत होती पण घळीची सुरुवात सापडत नव्हती. थोडी शोधाशोध केल्यावर, पायथ्याच्या त्या दाट झाडीत घुसणारी वाट सापडली आणि ‘मार्गी’ लागलो. घळ चढू लागलो तसा चढ तीव्र होऊ लागला. कड्यावरून तुटून आलेले मोठ-मोठे खडक घळीत पसरले होते. पाण्याने त्यातून तयार केलेला मार्ग दिसत होता. चढ खडा असला तरीही झाडीमुळे ऊन लागत नव्हतं. धापा टाकत आम्ही चढत होतो. घरंगळणाऱ्या दगडांसोबत घरंगळतही होतो. अधून-मधून काही खडक चढून जावं लागत होतं. शेवटच्या टप्प्यात खूप घसारा होता आणि सावलीसाठी झाडीही नव्हती. साधारण एक-दीड तासांत आम्ही ती घळ चढून वर आलो आणि फुटक्या तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश केला.



 

समोरच दोन कोरीव गुहा दिसल्या पण सूर्य डोक्यावर आला होता. डोकी जाम तापली होती आणि सावली शोधत होती. उजवीकडे एका झाडाच्या सावलीत शिरलो आणि पथारी पसरली. पटापट सगळ्यांनी बॅगा उघडल्या आणि भूकलाडू ‘शेअरिंग’ सुरु झाली. नेहमीच्याच, ब्रेड-बटर, जॅम-ब्रेड, चकली, ठेपले या मंडळींनी पोटाची आग ‘शांत’ केली. पाण्याची बाटली तोंडाला लावली आणि तोंड ‘कडवट’ झालं. उन्हामुळे बाटलीतलं पाणी ‘कोमट’ झालं होतं. पण पर्याय नव्हता; ते कोमट पाणी पिऊन सावलीत जरा लवंडलो. ‘कसली चढण होती’, ‘मी कसला सरकलो होतो’, इत्यादी ओळखीची चर्चा सुरु झाली. ‘क्षणभर विश्रांती’ झाल्यावर पुन्हा बॅगा खांद्यांवर चढल्या आणि गडदर्शन सुरु झालं. किल्ल्याच्या मध्यभागी टेकडी आहे आणि त्यावर पाहण्यासारखं फार काही नाही हे वाचून माहित असल्याने, तटबंदीच्या बाजूने, ‘अँटीक्लॉकवाईज’ चालायला सुरुवात केली. किल्ल्याच्या पूर्व भागात पाण्याची काही टाकी, ईशान्य भागात एक लहानसा बांधीव तलाव आहे. इथून भातराशी शिखराचा सुंदर देखावा पाहायला मिळतो. ईशान्य टोकावर, लांबूनच माकडे दिसून आली. लोहगडाचा अनुभव ‘गाठीशी’ असल्याने तिथे न जाण्याचं ‘धैर्य’ दाखवून आम्ही आमची यात्रा ‘क्लॉकवाईज’ केली. पुन्हा घळीच्या तोंडाशी येऊन पुढे निघालो. किल्ल्यावर, पश्चिम भागात काही पाण्याची टाकी आणि भग्न अवशेष आहेत. इथून दक्षिणेला तिकोना किल्ला, पवना जलाशय, तर नैऋत्येला लोहगड, तुंग किल्ला असा विस्तृत परिसर दिसून येतो. किल्ल्याच्या या भागात एक मोठे पठार आहे. साधारण मध्यभागी एक मोठा ‘चुन्याचा घाणा’ दिसून येतो. किल्ल्याच्या बांधकामात वापरला गेलेला चुना इथेच तयार केलेला असावा. समोर लोहगड सुरेख दर्शन देत होता. त्यावर, गायमुख खिंडीच्या बाजूला, वणवा पेटला होता आणि त्याच्या धुराचे लोट आकाशात जात होते. योगेश परांजपे तिथूनच, लोहगडावर कुठे काय आहे? ते ‘पॉईंट आउट’ करून दाखवत होता. आम्ही पुढे निघालो. किल्ल्याची तटबंदी आजही एकदम सुस्थितीत आहे. तटबंदीला काढलेल्या खिडक्यांतून बाहेरचा कडा पाहताना मजा येत होती. किल्ल्यावर खूप गाई-गुरे ताजे हिरवे गवत खाण्यात गुंग होती. आम्हाला वर यायला एवढे कष्ट लागले तर ही सर्व गुरे कोठून आली? हा प्रश्न आम्हाला नसता पडला तरच नवल! उत्तर कड्यात, पायथ्याशी एक पाण्याचं टाकं आहे; त्यावर कड्याला चिकटून शेंडीवाल्या मारुतीरायाचे एक पाच-सहा फुटी सुंदर शिल्प कोरले आहे. इथे एक ग्रुप फोटो ‘मस्ट’ होता. कॅमेऱ्याला ‘सेल्फ टायमर’ लाऊन एक झकास ग्रुप फोटो (रामभरोसे) काढला, कारण तो कसा आला आहे हे पाहण्याची सोय, त्यावेळच्या ‘फिल्म कॅमेऱ्या’मध्ये नव्हती.


 

ईशान्येला मळवली आणि भाजे गावाचा परिसर दिसून येत होता. या भागात आणखी काही भग्न अवशेष आणि पाण्याची टाकी आहेत. इथेच एक दारू (धान्य?) कोठार आहे. मराठा बांधणीची एक तोफ पडली आहे.

आम्ही जवळ जवळ संपूर्ण किल्ल्याला फेरी मारली होती. त्यामुळे आता किल्ला उतरायला सुरुवात करायची होती. उत्तरेला ‘पाटण’ गाव आहे; येथून किल्ल्यावर येणारा पूर्वीच्या राजमार्ग होता. दक्षिण घळीतल्या वाटेने वर आलो होतो, त्यामुळे पाटणच्या वाटेने किल्ला उतरायचा असं ठरलं. यामुळे किल्ल्याच्या दोन्ही वाटा पाहता येणार होत्या. आम्ही पाटणच्या दिशेने उतरायला सुरुवात केली. या वाटेवरील दरवाजा भग्न झाला आहेत मात्र पायऱ्या आजही दिसून येतात. ३०-४० पायऱ्या उतरल्यावर डावीकडच्या कड्यात खोदलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्या आणि त्यांच्या बाजूला शेंडीवाल्या मारुतीरायाचे शिल्प आहे. असे शेंडीवाले मारुतीरायाचे शिल्प क्वचितच पहावयास मिळते आणि या किल्ल्यावर अशी दोन शिल्प आहेत, हेच या किल्ल्याचे वैशिष्ट्य. या गुहेजवळ पायऱ्याही संपतात आणि घळीतली वाट सुरु होते. खाली पाटण गाव सतत नजरेत असतं पण हा मार्ग वहीवाटीतला नसल्याने ठळक अशी वाट नव्हती. आम्ही उजव्या बाजूने चालायला सुरुवात केली. बरेच अंतर चालूनही वाट खाली उतरत नव्हती. तासाभराने आम्हाला ‘आम्ही वाट चुकलो आहोत’ हा साक्षात्कार झाला. दिलीपने पुन्हा मागे जाऊन खाली उतरणारी वाट शोधून काढली आणि आम्ही ‘मार्गी’ लागलो. साधारण एका तासांत आम्ही ‘पाटण’ गावात पोहोचलो. गावकरी ओळख दाखवून ‘राम राम’ करत होते. फक्त किल्ल्याच्या भटकंतीसाठी आलोय म्हणून अनोळखी लोकांना आपुलकी दाखवणारे गावकरी फक्त ‘सह्याद्री’तच आढळतात. पाटण गावातून पंधरा-वीस मिनिटांतच आम्ही मळवली पुलाजवळ आलो. प्रत्येकवेळी ट्रेक संपत आल्यावर सगळ्याच गिर्यारोहकांची मनस्थिती सारखीच असते. ट्रेक यशस्वी पूर्ण केल्याचा हर्ष आणि ट्रेक संपत आल्याचे दुःख यामधील कोणती भावना जास्त उचंबळून येतेय हे कळेनासे होते. किल्ल्यावरून खाली आलो होतो पण मन अजूनही किल्ल्यावरच होतं. अशावेळी परती प्रवास, एखाद्या जिवलगाला सोडून जाताना वाटते, तसा जड वाटू लागतो. मळवली स्टेशनवर पोहोचलो, विसापूर किल्ला समोर दिसत होता. घरची ओढ तर लागली होती पण पाय निघत नव्हता. तेवढ्यात ट्रेन आली; किल्ला डोळ्यांवाटे मनात साठवून गाडीत चढलो आणि ट्रेनसोबत आमच्या परतीचा प्रवासही सुरु झाला.



थोडक्यात:
किल्ले विसापूर (मळवली / पाटण , पुणे)
उंची: ३५५६ फुट । श्रेणी: सोपी - ३ । भ्रमंती: उत्तम । ऋतू: सर्व
मळवली ते विसापूर (गायमुख खिंडमार्गे) - ट्रेक - दोन तास 
पाटण ते विसापूर - ट्रेक - दीड तास
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ जास्त लागू शकतो.)


माझ्या 'किल्ले विसापूर भ्रमंती'ची क्षणचित्रे पाहण्यासाठी पुढील लिंकवर टिचकी (क्लिक) मारा.
Visapur (Malawali, Pune) [28-Nov-2004]

No comments:

Post a Comment