भ्रमंती माहुली किल्ल्याची (२२ ऑगस्ट २००४) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, August 22, 2004

भ्रमंती माहुली किल्ल्याची (२२ ऑगस्ट २००४)


हरिश्चंद्रगडाचा ट्रेक करून आल्यावर तेथे काढलेले फोटो ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये दाखवले जात होते. एवढ्या दुर्गम ठिकाणी किल्ला असेल याची कल्पना सगळ्यांना आश्चर्यचकित करत होती तर अश्या दुर्गम किल्ल्याला भेट दिल्याबद्दल आमचं कौतुक होत होतं. या कौतुकसमारंभादरम्यान, आमची मात्र पुढील ट्रेकची आखणी सुरु झाली होती. योगेश (परांजपे)चे मामा वाशिंदला राहत होते. तिथेच जवळ ‘माहुली’ किल्ला असल्याचं त्याला मामांकडून कळलं होतं. संभाजीला फोन करून अधिक माहिती घेऊन किल्ला ‘आवाक्यातला’ असल्याची खात्री करून घेतली आणि माहुली ‘फायनल’ झाला. ओळखीतल्या मित्रांना ‘कॉल’ गेले. योगेश परांजपे, मी, दिलीप मिसाळ आणि राजेश लाड अशी चौकडी तयार झाली.


वाशिंद-आसनगाव परिसरात माहुली किल्ला पसरला आहे. मुंबई-पुण्याकडच्या ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध असा हा किल्ला मध्यम श्रेणीचा असल्याने अजूनही तो मनुष्य’प्राण्या’पासून दूर आहे. शनिवार, २१ ऑगस्ट २००४ रोजी रात्री ट्रेकला जायचं असं ठरलं. बोरीवलीहून योगेश विले-पार्ले स्टेशनला पोहोचला. मी आणि दिलीप त्याची वाट पाहत होतो. आतापर्यंत आम्हा सगळ्यांकडे मोबाईल्स असल्याने ‘कम्युनिकेशन’ नीट होत होतं. राजेशला कॉल करून आम्ही सी.एस.टी. ट्रेक पकडल्याचे मोबाईलवरून कळवले आणि ‘इंडिकेटर’खाली उभं राहायला सांगितलं. राजेश खार रोड स्टेशनवर आमची वाट पाहत होता. ट्रेक खारला पोहोचताच, दरवाज्यातून डोकावून पाहीलं तसा राजेश ठरल्या स्पॉटवर उभा आढळला. आम्ही हात हलवून त्याला इशारा केला. ट्रेन थांबताच राजेश डब्यात चढला आणि गाडी सुरु झाली. पाउण-एक तासांत आम्ही सी.एस.टी.ला पोहोचलो. शेवटची कसारा लोकल पकडून आम्ही आसनगावला निघालो. अश्या ठिकाणी रात्री ट्रेनने प्रवास करायची माझी पहिलीच वेळ होती. नुकताच पाऊस पडून गेल्याने गारवा वाढला होता. दोन-एक तासांत आम्ही आसनगाव स्टेशनवर उतरलो होतो. स्टेशनवर तुरळक लोक होते. त्यातील काही आमच्या सारखे ट्रेकिंग बॅग घेऊन होते त्यामुळे ते नक्कीच ट्रेकर्स होते. बाकी हमाल, कँटीनवाले, गर्दुल्ले आणि स्थानिक होते. स्टेशनवर असलेल्या बाकड्यांवर आम्ही झोपण्याचा ‘प्रयत्न’ करत होतो, पण कोणालाही धड झोप लागली नाही हे वेगळं सांगायची गरज इथे भासत नाही. सकाळचे सहा वाजत आले तसा कोण्या एका शाळेचा स्काऊटचा एक मोठा ग्रुप स्टेशनवर उतरला. तेही माहुलीसाठी आले असल्याचे त्यातील एका मुलाकडून कळले. इतर ट्रेकर्समध्ये सुरु झालेली चुळबुळ पाहून आम्हीही हात-पाय-तोंड धुऊन चहा घेतला आणि सामानाची आवराआवर करून प्रस्थान करण्यासाठी सज्ज झालो. अजूनही थोडा अंधार होता, पण इतर मंडळी अंधारातच निघाल्याचे पाहून आम्हीही त्याच्या मागोमाग टॉर्च घेऊन निघालो. रेल्वे ट्रॅकच्या बाजूने चालत दहा मिनिटांमध्य आम्ही जवळच असणाऱ्या फ्लाय-ओव्हर रस्त्यावर आलो आणि रस्ता पार करून रस्त्याच्या उजवीकडची कच्ची वाट पकडली. आता लख्ख उजाडलं होतं. समोर माहुलीचे अजस्त्र कातळकडे धुक्याआड लपले होते. तांबडट-पिवळ्या मातीतली ती वाट आम्हाला हळू हळू माहुलीकडे नेत होती.


दीड-दोन तासांत आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवमंदिराजवळ आलो. इथे बरीचशी मंडळी होती. काही रिक्षाही होत्या. या रिक्षा आसनगाव स्टेशनपासून इथपर्यंत आणून सोडतात हेही (एवढ्या लवकर) कळलं. अनेकजण येथे न्याहारीसाठी बसले, पण स्काऊटचा ग्रुप न थांबता पुढे निघालेला पाहून आम्हीही त्यांच्या मागोमाग निघालो. तेवढ्यात दिलीपला ‘नेचर कॉल’ आल्याने, नाईलाजाने थांबावं लागलं. थेंब थेंब पाऊसही सुरु झाला. पावसातही ट्रेकसारखं आम्ही रेनकोट्स वगैरे घेऊन आलो नव्हतो. दिलीपचं आटोपल्यावर आम्ही पुढे निघालो. ओल्या वाटेवरील बुटांच्या ठश्यांचा मागोवा घेत आम्ही पुढे होत होतो. काही करून स्काऊटच्या ग्रुपला ‘जॉईन’ करणं आवश्यक होतं कारण गडाचा रस्ता आमच्यापैकी कोणालाच माहित नव्हता. आता पावसानेही जोर धरला होता. थोड्याच वेळात आम्ही वाटेत आडव्या आलेल्या एका ओढ्याजवळ आलो. पावसामुळे पाण्याला जोर होता. रिव्हर क्रोसिंग पद्धतीने एकमेकाला मदत करत आम्ही तो पार केला आणि पायथ्याच्या जंगलात शिरलो. आतापर्यत पावसामुळे बुटांचे ठसे नाहीसे झाले होते. आम्ही अंदाजाने वाटेवर पुढे जात होतो. अचानक वाट नाहीशी झाल्याने आम्हाला आम्ही जंगलात हरवल्याचा साक्षात्कार झाला. पुन्हा मागे फिरावे लागले. थोडा वेळ मागे चालल्यावर एका ठिकाणी, पांढऱ्या रंगाने दिशादर्शक बाण काढलेला एक दगड दिसला आणि आम्ही वाटेला लागलो. सगळे आतापर्यंत थकलो होतो. पावसातही घाम ओळखू येत होता. थोड्याच वेळात आम्ही एका पठारावर येऊन पोहोचलो. सगळीकडे वितभर उंच गवत आणि त्यातून जाणारी मातकट वाट ठळक दिसत होती. माझ्या चष्म्यावर पाणी जमल्याने तो सारखा पुसावा लागत होता. श्वासोच्छ्वासामुळे त्यावर वाफही जमत होती. आम्ही वर वर चढत होतो.

साधारण दोन तास झाले असतील, पण सगळे वैतागलो होतो. स्काऊटचा ग्रुप दृष्टीक्षेपातही नव्हता. थकून दगडांवर बसलेलो असताना योगेशला काही लोक हातात कोयते घेऊन येताना दिसले आणि तो पांढरा-फटक पडला. तो घाबराघुबरा होऊन गडबड करू लागला. ‘काय झालं’ असं विचारल्यावर तो म्हणाला की येथील आदिवासी लोक थोड्या पैशांसाठी ठार मारतात असं त्याच्या मामांनी त्याला सांगितलं होतं. त्याचे मामा वाशिंदलाच राहत असल्याने त्यावर विश्वास बसणं स्वाभाविक होतं. ते आमच्या दिशेनेच येत होते. “अरे कदाचित गावकरी असतील, लाकडं तोडायला आले असतील..” दिलीप म्हणाला. आम्हाला ते पटलं पण मन मानत नव्हतं. त्यामुळे हातातील कॅमेरे, मोबाईल इत्यादी ‘वॅल्युएबल्स’ पटापट बॅगांमध्ये गेले आणि मी, दिलीपनी हातात स्विस-नाईफ(?) घेऊन प्रसंगावधान दाखवण्याचा (निष्फळ) प्रयत्न केला. आता कोयत्याच्या हल्ल्यापुढे स्विस-नाईफ काय टिकाव धरणार? आदिवासी जसजसे जवळ येत होते तशी धडधड वाढू लागली. ते चौघे आमच्यासमोर येऊन उभे राहिले. “काय? हितं काय करताय? किल्ल्यावर का?” एकानं विचारलं. आम्ही एकमेकाकडे पाहून होकारार्थी माना हलवल्या. बराय बराय म्हणत ते निघून गेले. आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आणि विनाकारण घाबरल्यामुळे योगेशची खिल्ली उडवली. पाऊसही तोवर थांबला होता. पुढील मार्गक्रमण करताना आम्हाला घडल्या प्रसंगाबद्दल हसू येत होतं आणि योगेशची फिरकी घेत होतो. बऱ्यापैकी उंचीवर पोहोचल्यावर एका झाडाखाली गवतावर आम्ही न्याहारीसाठी बसलो. ओळखीचे पदार्थ, गवतावर अंथरलेल्या वर्तमानपत्राच्या पानांवर येऊ लागले. ब्रेड-बटर, जॅम, चकली, फरसाण, बिस्किटे.. सगळ्यावर ताव मारून बाटल्यांतील पाणी पोटात ओतलं. थोडा आराम केल्यावर फोटो काढण्याची हौस पुरी करण्यात आली. पुढे डोंगरावरील जंगलाच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही शिरलो. चढण तीव्र होती. आम्ही हाफत हाफत पुढे चाललो होतो. मात्र आता योगेश थकला होता; आणि वर येण्यास नकार देत होता. आम्ही त्याला समजावत होतो. तेवढ्यात २-३ जणांचा एक गट आमच्या जवळ आला. विचारपूस केल्यावर ते ठाण्याचे होते असं कळलं. आमच्या मागून ट्रेक सुरु करूनही ते आमच्या आधी किल्ल्यावर जाणार होते त्यामुळे त्यांचा आम्हाला हेवा वाटला. त्यांनीही योगेशला समजावायला सुरुवात केली. “अरे मित्रा, एवढं चढून आलायंस, आता थोड्यासाठी कशाला नकार देतोस. थोडाच वेळ आहे आता किल्ला यायला..” होय-नाय करत योगेश तयार झाला आणि आम्ही त्यांच्या सोबत पुढे निघालो. दोन्ही बाजूला खोल दरी असलेली डोंगरसोंडेची अवघड चढाई पार करून आम्ही शेवटच्या टप्प्यात, लोखंडी शिडीजवळ येऊन पोहोचलो.

योगेश आता खूपच थकला होता. महत् प्रयत्नाने त्याच्याकडून ती शिडी चढून घेण्यात आम्ही यशस्वी झालो खरे पण त्यापुढे येण्यास त्याने विरोध केला. जवळच असलेल्या पाण्याच्या टाक्यापर्यंत जाऊन आम्ही तोंड-हात धुवून फेश झालो. योगेशसुद्धा टाक्यात पाय टाकून बसला, “तुम्ही किल्ला पाहून या; मी बसून राहतो इथेच..” तो म्हणाला. आम्ही चक्रावलो. ठाण्याच्या ग्रुपनेही ‘किल्ला अगदी १० मिनिटांवर आलाय’ असं सांगून पाहिलं; पण व्यर्थ. शेवटी ते पुढे निघून गेले. ‘जायचं तर सगळ्यांनी नाहीतर कोणीही नाही’ या नियमावर मी अडून बसलो असल्याने आम्ही त्याला खूप खूप समजावलं. अर्धा तास त्यात निघून गेल्यावर, आधी पोहोचलेला स्काऊटचा ग्रुप परतताना आम्हाला दिसला. पाऊस पुन्हा तुफान सुरु झाला होता. योगेश अडूनच बसल्याने सर्वानुमते, स्काऊटच्या ग्रुप सोबत खाली उतरण्याचा निर्णय झाला आणि ताबडतोब अमलांत आला. आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली पण किल्ला अपूर्ण राहिल्याची रुखरुख मनात लागून राहिली.


स्काऊटच्या ग्रुपमध्ये एक सर वयस्कर होते. त्यांना उतरायला त्रास होत होता हे त्यांच्या चालण्यावरून कळून आलं. ते अडखळत होते, घसरत होते. योगेशलाही तसाच त्रास होत होता. शेवटी योगेशला मदत करण्यासाठी दिलीप आणि सरांना मदत करण्यासाठी मी सरसावलो. दिलीपने तर योगेशच्या कमरेला दोर बांधून दुसरं टोक स्वतःजवळ ठेवलं. योगेशची केवळ समजूत करण्यासाठीच तिचा खरा उपयोग होता. दगडांवर वाढलेल्या शेवळ्यावर जवळ जवळ सगळेच आळीपाळीने सरकत होते. तशातच सरांना मदत करताना एका सहा-सात फुटी दगडावरून मी घसरून खाली पडलो. फक्त थोडसं खरचटलं होतं. पण धडा मिळाला होता. लहान टप्प्यांवरूनही सांभाळून उतरू लागलो. तीन-साडे तीन तासांत पायथ्याच्या महादेव मंदिराजवळ आम्ही पोहोचलो. मंदिरात थोडावेळ पायांना आराम दिला. मग स्टेशनला जाणाऱ्या रिक्षात जाऊन बसलो. पाय खूप दुखत होते. रिक्षा सुरु होऊन स्टेशनजवळ केव्हा पोहोचलो ते कळूनसुद्धा आलं नाही.

स्टेशनवर पोहोचल्यावर गरम गरम चहा ‘मारून’ आम्ही फ्रेश झालो आणि पुढल्या ट्रेनची वाट पाहत बसलो. पंधरा-वीस मिनिटं गप्पांमध्ये गेल्यावर सी.एस.टी.ला जाणारी ट्रेन आली आणि आम्ही आत जाऊन बसलो. गाडी सुरु झाली आणि माहुली किल्ल्याकडे पाहताना, पुन्हा येण्याचं वचन नकळत दिलं गेलं.

थोडक्यात:
किल्ले माहुली (आसनगाव, ठाणे)
उंची: २८१५ फुट । श्रेणी: मध्यम - १ । भ्रमंती: उत्तम । ऋतू: सर्व
आसनगाव ते माहुली शिवमंदिर - प्रवास १५ मिनिटे - ट्रेक अर्धा तास
माहुली शिवमंदिर ते माहुली - ट्रेक - तीन तास
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ जास्त लागू शकतो.)

नोंद: वरील लेख, 'सामना' वृत्तपत्राच्या 'फुलोरा' या करमणूक विशेष पुरवणीमध्ये २९ सप्टेंबर २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचनासाठी पुढील 'थम्बनेल' वर क्लिक करा.



No comments:

Post a Comment