‘मलंगगड’ उर्फ ‘श्री मलंग’ (२२ जानेवारी, २००६) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, January 22, 2006

‘मलंगगड’ उर्फ ‘श्री मलंग’ (२२ जानेवारी, २००६)

वज्रेश्वरी, मुंब्रादेवी आणि टिटवाळा गणेशमंदिराची भेट वगळता, २००५ वर्षात जास्त भ्रमंती करता आली नाही. किल्ला तर एकही केला गेला नाही. त्यात योगेश परांजपेने वकीला अभ्यासक्रम सुरु केल्याने त्याचे ट्रेकला येणं कठीण झालं होतं; पण दिलीप आणि योगेश गोथाड माझे सांगती झाले होते. दोघेही प्रत्येक ट्रेकसाठी उत्सुक होते. विसापूर किल्ल्याचा ट्रेक होऊन जवळपास एक वर्ष उलटले होते. २००६ चा जानेवारी महिना सुरु झाला होता. या खेपेस मात्र एका दिवसात पाहून होईल असा किल्ला आम्ही शोधत होतो. आमचा शोध ‘मलंगगड’ उर्फ ‘श्री मलंग’ गडावर येऊन थांबला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण गावाजवळ असणारा हा किल्ला प्रसिद्ध तर आहेच पण एका दिवसात पाहून होईल असाही आहे. रविवार, २२ जानेवारी, २००६ ही तारीख ‘फिक्स’ झाली आणि ट्रेकची आखणी सुरु झाली.


मलंगगड, त्याच्या माथ्यावर असणाऱ्या हाजी मलंग पीराच्या दर्ग्यामुळे प्रसिद्ध आहे पण तेथे वर किल्ला आहे हे मात्र कोणालाच माहित नाही. खरंतर हे त्या किल्ल्याचे दुर्दैव आहे; परंतु या दर्ग्यामुळेच या ठिकाणी बऱ्याच सोयीसुविधा, अगदी वरपर्यंत उपलब्ध केल्या गेल्या आहेत हेच या किल्ल्याचे सुदैव. या सुविधांमुळे तसेच एका दिवसात पाहून होण्यासारखा किल्ला असल्याने जास्त सामान सोबत न्यायचं नव्हतं, म्हणून पाण्याची बाटली, थोडेसे खाद्यपदार्थ आणि कॅमेरा एवढंच सोबत घेतलं. त्यासाठी कॉलेजची बॅग बाहेर काढली; उगाच मोठी बॅकपॅक नेण्यात अर्थ नव्हता. मी, योगेश आणि दिलीपने पार्ल्याहून तर राजेशने खार रोडहून दादरसाठी ट्रेन पकडायची असं ठरलं.

रविवार उजाडला. ठरल्याप्रमाणे सकाळी ६ वाजता मी, योगेश व दिलीप पार्ल्याहून निघालो. मोबाईलवरून ‘काँटॅक्ट’मध्ये असल्याने राजेशने खार रोडहून, आमचीच ट्रेन पकडली. सगळे दादरला पोहोचलो. कल्याणला पोहोचवणारी ‘नेक्स्ट’ ट्रेन पकडली. रविवार असल्याने ट्रेन खच्चून भरली होती. बसायला जागा मिळाली नाही हे वेगळं सांगायला नको. उभ्या उभ्याच कल्याण गाठले. कल्याण स्थानकावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. स्टेशनबाहेर आलो. एका टपरीवर वडापाव खाल्ले आणि मस्त चहा मारला. टपरीवरच्या चहाची मजा काही औरच असते, एकदम फ्रेश झालो. बसस्थानकावर आलो, चौकशी केली तर कळलं की मलंगगडाची बस ‘जस्ट’ गेली होती. अर्धा तास थांबण्यात काही अर्थ नव्हता. स्थानकाबाहेर मलंगगडच्या पायथ्याशी सोडणाऱ्या टमटम रिक्षा उभ्या होत्या. धडक आत घुसलो. त्या रिक्षामध्ये ड्रायव्हर शिवाय नऊ जण घुसडले, त्यातच आम्ही चौघे होतो. मी आणि राजेशने, गेल्या काही वर्षात चांगले वजन कमावल्याने एक सीट ‘मारली’ होती; कारण त्या रिक्षातल्या तिघांच्या जागेत आम्ही दोघे बसलो होतो. रिक्षा सुरु झाली. डगडग डगडग आवाज करत तिने मार्ग धरला. शहर सोडलं, गावं सुरु झाली. कल्याण स्टेशनपासून साधारण १५ कि.मी. अंतरावर आहे. हळूहळू रीक्षातला एक एक प्रवासी, ‘आपापल्या’ ठिकाणी उतरत होता आणि रिक्षा मोकळी होत होती. आता मलंगगडाचा डोंगर, त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण ‘देवणी’ सुळक्यामुळे दिसू लागला होता. आमची रिक्षा जशी जवळजवळ जात होती, तसतसं तो डोंगर आमच्याशी लपाछपी खेळत होता. अखेर अंदाजे अर्ध्या तासांत आम्ही मलंगगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.

मलंगगडाचा डोंगर समोर उंच उभा होता. हाजी मलंग प्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्याने येथे भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे पायथ्याशी वाहनतळ उभारला आहे. कोणत्याही देवस्थानाला दिसून येणाऱ्या ‘टिपिकल’ दुकानांची गर्दी इथेही होती आणि त्यांची रांग अगदी वाहनतळापासूनच सुरु झाली होती. त्यात रविवार असल्याने भाविकांची गर्दीही दिसून आली. दर्ग्यापर्यंत पायऱ्या बांधल्या होत्या. साधारण साडे नऊ वाजता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. चालताना विसापूर किल्ल्याच्या ट्रेकच्या गमतीजमतींवर चर्चा सुरु झाली. पायऱ्यांच्या आजूबाजूला खोपट्यांतील दुकाने बांधली होती. दुतर्फा झाडे असल्याने सावलीमुळे थकवा कमी जाणवत होता. हार-तुरे, चणे-फुटाणे, लिंबू सरबत, कोकम सरबताच्या दुकानांची सरबत्ती होती. वाटेत कुष्ठरोगी, भिकाऱ्यांची बरीच गर्दी होती. या सर्वांमुळे एकूण परिसर अस्वच्छ झाला होता. आम्ही वाट काढत वर चढत होतो. वाटेत काही ठिकाणी थांबून ‘रेस्ट’ घेत होतो.

दीड तास उलटून गेला होता आणि पायऱ्या चढून कंटाळा आला होता. आम्ही ‘हॉल्ट’ घ्यायचं ठरवलं. उजव्या बाजूला एका लहानशा सपाटीवर आम्ही बसलो. आमच्या चौकडीने चौकट मांडली, मध्ये कागद पसरला. बटर-पाव, बिस्किटे, चकली, चिवडा, बाकरवडी इत्यादी बॅगातून कागदावर आले फटाफट पाकिटे फुटली आणि पदार्थ एक एक करून पोटात जाऊ लागले. सगळ्या पदार्थांचा फडशा पडला. पाणी प्यालो. आणि मग फोटोग्राफी सुरु झाली. राजेशने ‘नेहमीप्रमाणे’ कपड्यांचे जास्त जोड सोबत आणले होते आणि त्याचा फॅशन शो सुरु झाला. माझ्याकडे कोडॅकचा केबी १२ फिल्म कॅमेरा होता. त्यात ३६ चा रोल भरला होता. राजेशच्या फॅशन शोसह किल्ल्याचेही फोटो काढायचे होते. हे ‘दिव्य’ मी पार पाडत होतो. शो व फोटोग्राफीनंतर पुन्हा पुढे निघालो आणि दर्ग्यापर्यंत पोहोचलो. दुकानांची गर्दी वाढली होती आणि त्यातून सूर्यप्रकाशही आत येत नव्हता. अगदी दर्ग्यापर्यंत ही गर्दी अशीच होती. दर्ग्यात जाऊन पीराच्या समाधीचे दर्शन घेतले. दुपारचे साधारण बारा वाजत आले होते. एवढ्या उन्हातही दर्ग्याच्या भिंती थंडगार होत्या. अत्तराच्या आणि धुपाच्या सुवासाने वातावरण प्रसन्न केले होते. दर्ग्यातून बाहेर पडलो आणि पुढे निघालो.


डोंगराचा कडा सुरु झाला होता. घसारा बराच होता. राजेश जास्त घसरत होता. सहज त्याच्या बुटांकडे लक्ष गेलं आणि हसूच आलं. स्पोर्ट शूज सापडले नाहीत म्हणून हा पठठ्या ऑफिस शूज घालून आला होता आणि त्या बुटांना ‘ग्रीप’ नव्हती. एक टप्पा चढल्यावर उजवीकडे जाणारी वाट पकडून आम्ही कड्यातल्या गुहेकडे निघालो. अगदी पाच-सात मिनिटांत आम्ही गुहेपाशी पोहोचलो. येथे एक समाधी आहे. तेथील पुजाऱ्याकडून आख्यायिका ऐकली. त्या गुहेत वाघोबा कसा आणि केव्हा येऊन जातो, हेही त्याने सांगितलं. थोडावेळ तिथे बसून किल्ल्याच्या बाजूचा परिसर पाहिला. समोर देवणीचा सुळका रौद्रभीषण दर्शन देत होता. आता किल्ल्याकडे निघायची वेळ झाली होती.

घसारा चढल्यावर जेथून गुहेसाठी उजवीकडे वळण घेतलं होतं, तेथे पोहोचलो. समोर एक २०-२५ फुटी कातळकडा उभा होता. गुहेकडे जाताना इथून किल्ल्यावर जाणारी वाट असेल असं वाटलं नव्हतं. तो कडा पाहून चौघेही चपापलो. नावाला पायऱ्या असणाऱ्या त्या कातळातल्या खोबणी पाहून विचारात पडलो. अश्या परिस्थितीत त्या कातळाच्या बाजूंना माकडांचे कळप बसले होते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर चवताळून जात होते. ते पाहून लोहगडाचा प्रसंग आठवला. आमच्या खांद्यावर बॅगा होत्या, हातात कॅमेरा होता. “अरे कुछ नही करते वो.. बॅग नीचे दुकानमें रख दो और आरामसे किल्ला देखकर आओ..” एकाने ‘न मागता’ सल्ला दिला. तो मानलाही गेला असता पण तो सरळसोट कडा आणि त्यावर टपून बसलेली माकडे पाहून आमच्यापैकी कोणाचाही वर जायचा धीर झाला नाही. शेवटी संगनमताने किल्ल्याला येथूनच रामराम करून परतायचे आम्ही ठरवले. ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ हे वाक्य मनाशी बाळगून आम्ही परत फिरलो. देवणी सुळका तर दूरच पण किल्ल्याचेही दर्शन घेता आले नाही याची सल मनात ठेवून आम्ही किल्ला उतरत होतो. अगदी माथ्यापर्यंत पोहोचूनसुद्धा पाहू न शकलेलो, माहुलीनंतर, हा दुसरा किल्ला होता. पुन्हा केव्हातरी नक्की भेट द्यायला येऊ असं मनाला पटवत आम्ही मलंगगडाचा निरोप घेतला.

थोडक्यात:
मलंगगड (कल्याण, ठाणे)
उंची: ३२०३ फुट । श्रेणी: मध्यम - १ । भ्रमंती: उत्तम । ऋतू: पावसाळासोडून इतर सर्व महिने
कल्याण ते हाजीमलंग - एस.टी. / स्वतःचे वाहन - अर्धा तास
पायथा ते दर्गा - ट्रेक - दीड तास
दर्गा ते माथा - ट्रेक - पाऊण / एक तास (दर्गा ते माथा हा ट्रेक कठीण श्रेणीचा आहे. रॉक क्लायम्बिंग रोप आणि कॅरॅबिनर्स असल्याशिवाय चढाईला सुरुवात करू नये.)
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ जास्त लागू शकतो.)

नोंद: वरील लेख, 'प्रहार' वृत्तपत्राच्या 'भन्नाट' या करमणूक विशेष पुरवणीमध्ये १९ एप्रिल २०१४ रोजी प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचनासाठी पुढील 'थम्बनेल' वर क्लिक करा.


No comments:

Post a Comment