दगडी पायऱ्यांचा चावंड (१८ डिसेंबर २०१०) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, December 18, 2010

दगडी पायऱ्यांचा चावंड (१८ डिसेंबर २०१०)


नाणेघाटाच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या दुर्गचौकडीतील एक म्हणजे ‘चावंड’ किल्ला. सर्व बाजूंनी निख्खळ कातळकडा आणि घळीत खोदलेल्या पायऱ्या हे या चौकडीचं वैशिष्ठ्य. या किल्ल्याला भेट देण्यासाठी मी, दिलीप, राजेश, काशिनाथ आणि महेश असे ५ जण १८ डिसेंबर २०१० रोजी जुन्नरमार्गे चावंडवाडीत पोहोचलो.

चावंडवाडीतून पुढे जात किल्ल्याचा पायथा गाठला अन् चढायला सुरुवात केली. किल्ल्यावर पोहोचायला जेमतेम अर्धा तास लागतो हे वाचून माहित होतं त्यामुळे सगळेच आरामात चाललो होतो. मी आणि दिलीप वगळता ‘रेग्युलर’ ट्रेकर कोणीही नव्हतं. काशिनाथ आणि महेश नवखे होते. राजेशने जास्त ट्रेकिंग केले नव्हते. किल्ल्याच्या घळीत पोहोचायला ठळक अशी वाट दिसली नाही त्यामुळे आम्ही त्यातल्या त्यात ठळक वाट पाहून पुढे होत होतो. मध्येच एक थोडा कठीण टप्पा लागला जिथे मी आणि काशिनाथ पुढे जाऊ शकलो. इथे एक गुहा होती आणि मार्ग संपला होता. मूळ वाट मागे राहिली हे तत्काळ कळून आले. बाकी तिघे जण गुहेच्याही मागे उभे असल्याने गुंफा पाहून आम्ही पुन्हा मागे फिरायचे आणि मूळ वाटेला लागायचे असे ठरले. काशी गावाला अनेक वर्षे राहून आला होता त्यामुळे तो काटक आणि चपळ होता. तो म्हणाला की; ‘कदाचित येथूनही वर जाण्याची वाट असेल..’ पूर्वानुभवावरून तेथून मार्ग नव्हता हे मला कळून आले होते पण काशीचा पहिलाच ट्रेक असल्याने त्याचे कुतूहल पूर्ण करण्यासाठी इतर मंडळीना तेथेच थांबण्यास सांगून आम्ही दोघे पुढे निघालो.

मार्ग संपला असल्याने जवळचा एक लहानसा कातळ चढून काशी वर गेला. वर चढण्यापूर्वी त्याची सॅक त्याने काढून माझ्याकडे दिली. सॅकचे वजन खूपच वाटले म्हणून त्याला विचारले असता सॅकमध्ये ३ लिटर पाणी घेऊन तो आला आहे असे त्याने सांगितले. आम्ही सगळेच हसायला लागलो. मी माझ्या सॅकमधला दोर काढून त्याची सॅक एका टोकाला बांधली व दुसरे टोक त्याच्याकडे फेकले. त्यानेही ते पकडून सॅक खेचायला सुरुवात केली. मागची मंडळी हा सारा ‘खेळ’ पाहत होती. सॅक वर खेचताना एका दगडाच्या खोबणीत अडकली आणि ताण पडल्याने गाठ सुटून खाली आली. तीन चार टप्प्यात कातळाला आपटून ती सॅक दरीत जाताना पाहून काळजात धस्स झालं. नशिबाने २०-३० फुट खाली जाऊन ती झाडावळीमध्ये अडकून राहिली. सगळे स्तब्ध झालो. मनात विचार आला की सॅकच्या जागी आमच्यापैकीच एखादा असता तर?? डोकं भंडावून गेलं.

काशीला तिथेच उभं राहायला सांगून मी खाली सॅक आणण्यासाठी उतरलो.  झाडावळ खूप असल्याने आणि नीट मार्ग नसल्याने ओबडधोबड वाटेने, ढासळत्या दगडांवर पाय देत खाली उतरलो आणि सॅक घेऊन वर आलो. झाल्या प्रसंगाने बाकीचे सगळे हादरले होते आणि परतण्यासाठी ओरडू लागले. सगळ्यांनी काशीला खाली उतरण्यास सांगितलं पण तो खाली यायला तयार नव्हता. खाली येण्यात खूप रिस्क होती. मलाही त्याला ‘सॅक’सारखं खाली येताना पाहायचं नव्हतं. “मी वरून येतो, तुम्ही खालून या..” काशी म्हणाला. तो काटक असल्याने आणि गावात आधी डोंगर हिंडला असल्यामुळे तो वरून येऊ शकेल हे माहित होतं. त्यानेही तो विश्वास दिला. मन मानत नव्हतं पण वेळ वाया जात असल्याने आणि बाकीच्यांचा खोळंबा झाला असल्यामुळे मी त्याला ‘ओ.के.’ म्हंटलं. काशी वरच्या वर तर आम्ही खालच्या वाटेने घळीतल्या पायऱ्यांकडे निघालो. वाटेत वर पाहून मी काशी ‘असल्याची’ खात्री करून घेत होतो. एक दोन टप्प्यांमध्ये कड्याला पाठ चिटकवत लहानश्या वाटेने तो आडव्या वाटेने घळीकडे सरकत येताना पाहून भीती वाटत होती. अखेरच्या टप्प्यात तर कातळकडा थोडासा बाहेर आलेला असल्याने काशी दिसत नव्हता. सैन्यात किंवा जंगलात वापरल्या जाणाऱ्या ‘हाका’ मारून आम्ही एकमेकाची चौकशी करत होतो. थोड्याच वेळात घळीतल्या पायऱ्या दिसू लागल्या. काशीसुद्धा घळीत सुखरूप पोहोचला होता.

आम्ही चढून वर आलो, पण आता पुढील अडचण येऊन ठाकली. स्वातंत्र्यपूर्व कालात तात्या टोपे आणि काही स्वातंत्र्यसेनानींनी दुर्गम किल्ल्याचा आश्रय घेऊन ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणले होते. त्यावर उपाय म्हणून ब्रिटिशांनी या दुर्गम किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या आणि वाटा सुरुंग लागून उडवून दिल्या. आधीच दुर्गम असलेले किल्ले वाटा मोडल्यामुळे आणखीनच दुर्गम झाले. उध्वस्त वाटांवरून रसद पुरविणे कठीण झाले आणिकिल्ल्यांचे महत्व संपून ते बेवसाऊ झाले. चावंड किल्ल्याची घळीतली दगडी वाटही अशीच उध्वस्त केलेली आहे. आता समोर होती ती कातळकड्याला चिटकून जाणारी कड्यातच खोदलेली जेमतेम २ फुट रुंदीची दगडी पायऱ्यांची वाट. ह्या वाटेकडे पाहिले तर उजव्या बाजूला कडा आणि डाव्या बाजूला दरी असा प्रकार आहे. कोण्या एका गिरीप्रेमी मंडळाने आधारासाठी लावलेल्या लोखंडी सळ्याही उन्हा-पावसामुळे तकलादू होऊन बेभरवश्याचा झाला होता. हा सगळा प्रकार पाहून पहिलाच ट्रेक असलेला महेश घाबरला आणि त्याने वर येण्यास नकार दिला. ते स्वाभाविकच होतं. आम्ही वर येण्यासाठी त्याची समजूत काढू लागलो. पण पठ्ठा काही ऐकेना. तासाभराचे अथक परिश्रम घेऊनही तो नकारावर ठाम होता. आता पंचाईत झाली होती. त्याला एकट्याला सोडून वर जाऊ शकत नव्हतो पण किल्ला तर पहायचा होता. असाच काहीसा प्रकार आमच्या माहुलीच्या ट्रेकदरम्यान झाला होता. तेव्हा एका सदस्याने थकल्यामुळे नकार दर्शवला होता आणि त्याला सोडून जाऊ शकत नसल्यामुळे आम्ही किल्ल्यावर पोहोचून देखील किल्ला न पाहता मागे फिरलो होतो. काशीचा पहिलाच ट्रेक असल्यामुळे त्याला काहीही करून किल्ला पाहायचाच होता. दिलीपने माहुली ट्रेकचा प्रसंग अनुभवलेला असल्याने तोसुद्धा ‘किमान आपण तरी जाऊन येऊया..’ या मताचा चेहरा करून उभा होता. महेशच्या नकाराचा यक्षप्रश्न ‘राजेश’ने चुटकीसरशी सोडवला. त्या ‘खतरनाक’ पायऱ्यांना तोही घाबरला होता, त्यामुळे महेशची सोबत करण्यासाठी तोही थांबत असल्याचे त्याने आम्हाला सांगितले. ‘एक से भले दो’ या न्यायाने दोघांना सावलीत थांबायला सांगून आम्ही तिघे पुढे निघालो.

उत्साही काशी इथेदेखील पहिला होता. ‘फिट अँड फाईन’ असल्याने त्याने तो डगडगता कठडा सांभाळत ‘त्या रिस्की पायऱ्या’ लीलया पार केल्या. त्याच्या मागे मी त्या पायऱ्या चढू लागलो. मधल्या भागात पोहोचल्यावर पायऱ्या जरा जास्तच अरुंद वाटू लागल्या आणि त्यावर तोल सांभाळणे कठीण वाटू लागले. काशी ज्या सहजतेने गेला होता तेवढ्या त्या सोप्या नव्हत्या. तो सडपातळ असल्याने आरामात वर गेला होता. मी वजनाने जड असल्यामुळे कठडाही पकडू शकत नव्हतो. कसाबसा वर पोहोचलो. पायऱ्यांच्या शेवटच्या टप्प्यात एक तोफ दगडांच्या बेचक्यात गाडून ठेवली आहे. चावंड किल्ल्याच्या पायऱ्या जरी उध्वस्त केल्या असल्या तरीही चाऱ्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी पूर्वीच्या गावकऱ्यांनी ही तोफ गाडून त्याला दोर बांधून वर जाण्याची सोय केली असावी. ही तोफ पाहिली की त्या गावकऱ्यांना मनातूनच सलाम ठोकला जातो. ही तोफ म्हणजे पायऱ्यांचा शेवटचा टप्पा. इथून पुढे किल्ला एकदम सोप्पा आहे. दिलीप मागवून पायऱ्या चढून आला आणि आम्ही तिघांनी सवार्नुमते ‘महेश आणि राजेश’ वर यायला तयार झाले नाहीत आणि त्यांनी खाली बसून राहण्याचा निर्णय घेतला म्हणून देवाला नमस्कार केला.

दोन अडीच तास मनसोक्त किल्ला पाहून आम्ही परतलो. दुपारचे दोन वाजले होते. प्रचंड भूकही लागली होती. महेश आणि राजेश ‘ठरल्या’ जागी ‘हवा’ खात बसले होते. त्यांना सोबत घेतलं आणि खाली चावंडवाडीला उतरलो. शाळेच्या कट्ट्यावर थोडावेळ आराम करून ‘टमटम’ पकडून जुन्नरला आलो. बसस्थानकाजवळच्या एका खानावळीत मस्त गावरान कोंबडी मसाला, ज्वारीची भाकरी, सुकं मटण यावर ताव मारला. राजेश आणि दिलीपचा कसलातरी उपवास असल्याने ते ‘वेज’ खात होते. वेज दिवशी नॉनवेज न खाणाऱ्या लोकांसमोर चिडवून चिडवून ‘नॉन वेज’ खाण्याने जेवणाची लज्जत आणखी वाढते असं म्हणतात. तोच परमानंद उपभोगत मी, काशी आणि महेशनी जेवणावर आणखीनच ताव मारला. बस पकडण्यासाठी स्थानकाकडे जात असताना एका खाजगी ‘मारुती ८००’ ची ‘लिफ्ट’ घेऊन आम्ही मुंबईला परतलो.

थोडक्यात:
किल्ले चावंड (जुन्नर, पुणे)
उंची: ३४०० फुट । श्रेणी: सोपी - २ । भ्रमंती: उत्तम । ऋतू: सर्व
जुन्नर ते चावंडवाडी - एस.टी. / स्वतःचे वाहन - अर्धा तास
चावंडवाडी (पायथा) ते किल्ला - ट्रेक - दीड तास 
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला कमी-जास्त वेळ लागू शकतो.)

नोंद: वरील लेख, 'सामना' वृत्तपत्राच्या 'फुलोरा' या करमणूक विशेष पुरवणीमध्ये १८ ऑगस्ट २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचनासाठी पुढील 'थम्बनेल' वर क्लिक करा.





No comments:

Post a Comment