निसरडा बिरवाडी किल्ला - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, February 27, 2011

निसरडा बिरवाडी किल्ला


बिरवाडी नावाचा कोणता किल्ला आहे, कोणाला सांगूनही पटणार नाही. पण रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील चणेरा गावाजवळ बिरवाडी गावात हा लहानसा किल्ला आहे. कदाचित ह्या गावावरून ह्या किल्ल्याला बिरवाडी हे नाव पडले असावे. समुद्रसपाटीपासून अगदी २३४ मीटर उंच असलेला हा किल्ला आम्ही ‘प्लान’ केल्यापासूनच अगदी ‘लाईटली’ घेतला होता. योगेश, महेश, मनोहर, धनश्री, संदेश इत्यादी रेग्युलर ट्रेकर्स सोबत या ट्रेकला माझ्या ऑफिसच्या लॅबमध्ये काम करणाऱ्या ज्योती मॅडमसुद्धा, ‘ट्रेकींग’ म्हणजे काय हे ‘ट्राय’ करायला त्या आल्या होत्या.

टाटा सुमोगाडी भाड्याने घेऊन आम्ही बिरवाडीला आलो. भवानीदेवीच्या देवळापासून ट्रेक सुरु झाला. फेब्रुवारीत आल्यामुळे सगळीकडे करपलेलं गवत दिसत होतं. त्यातून मार्ग काढत आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. काही पाण्याची टाकी आणि भग्न अवशेष ह्याशिवाय किल्ल्यावर काही न्हवतं. किल्ल्याच्या पूर्व भागात लपलेले त्याचे मुख्य प्रवेशद्वार पाहून आता किल्ल्याच्या माथ्यावर जाण्याची वाट शोधू लागलो. योगेश पुढे होता. मी (नेहमीप्रमाणे) शेवटी होतो. वाट झाडीतून जात होती त्यामुळे ही मूळ वाट नसल्याचे कळले. पण किल्ला लहान असल्याने कुठूनही वर जाता येईल असे वाटून पुढे चालत राहिलो. आणि इथेच आम्ही चुकलो. पुढे एका घसाऱ्यावरून सगळे वर चढले. कारण ह्या वाटेवर झाडीतून किल्ल्यावरील थोडीशी तटबंदी दिसून आली. ही वाट मुळात न्हवतीच पण आता इथवर चढलोय तर इथूनच पुढे तटबंदीतून वर चढू असं ठरलं.

मी रोप बाहेर काढला आणि मी वर चढलो. किल्ल्याच्या ह्या भागात ढासळणारी माती होती. पायाचा थोडासा जोर पडताच ती सरकत होती. मी कसाबसा वर पोहोचलो. तटबंदी अजूनही वर होती. एका झाडाला खाली रोप बांधून दुसरं टोक घेऊन मी ‘आडवा’ चालत गेलो. तिथे झाडाला दुसरं टोक बांधलं. इथे खाली निवडुंगाची झाडी होती. माझ्या पाठोपाठ योगेश वर आला पण वाट अरुंद असल्याने तो एका बाजूला वर गेला. त्यानंतर ज्योती मॅडमना वर यायला सांगितलं. त्यांचा आतापर्यंतचा चालण्याचा वेग उत्तम होता. त्यामुळे त्या आरामात वर येतील असं वाटलं. पण रोप धरून धरून त्या मध्यापर्यंत येताना त्यांचा पाय सरकला आणि त्या दोराला लटकू लागल्या. त्या धडपडीत त्यांनी पायाखालच्या वाटेवरची सगळी माती सरकवून टाकली. आता उभं राहायला देखील धड जागा न्हवती. “मॅडम, दोर सोडू नका.. तो घट्ट पकडून ठेवा.. आणि स्थिर व्हा.. जास्त हालचाल करू नका..” मी ओरडलो. त्यांनीही तसंच केलं. पण असं कितीवेळ लटकत राहणार होत्या त्या? वाट सरकून वाहून गेल्यामुळे परत फिरणंच भाग होतं. मग त्यांना लटकत लटकतच हळू हळू मागे जायला सांगितलं. मागून मनोहर आणि संदेश थोडे पुढे आले. त्यांनी मॅडमला सावरलं. पण त्यांना निवडुंगाचे काटे टोचले होते. थोडसं खरचटलही होतं. मग मी योगेशला खाली उतरायला सांगितलं. पण वाट सरकून गेल्यामुळे आम्हा दोघांचही पलीकडे जाणं आता कठीण होतं. योगेशला सरकत येऊन दोर पकडायला सांगितला आणि लटकत पलीकडे जाण्यास सांगितलं. तो तसा उतरल्यावर आता माझी पंचाईत होणार होती. कारण रोप काढला तर मी हमखास खाली सरकणार होतो. मग रॅपलिंग पद्धतीने तो टप्पा पार करण्याचं मी ठरवलं. माझ्या बाजूची दोराची गाठ सोडवून, त्या झाडाला वेटोळे घालून रोप दुहेरी केला. म्हणजे उतरल्यावर रोप खेचून घेता येणार होता. मग हळू हळू सरकत, पाय जपून टाकत, बाजूच्या दगडाच्या सापडतील त्या खोबणी पकडत मी पलीकडे आलो. सगळ्यांना सगळे सुखरूप असल्याचे हायसे वाटले. मी दोर खेचून घेतला.

ह्या गडबडीत एका तासाच्यावर वेळ गेला होता. ज्योती मॅडमचाही धीर घसरल्यामुळे खचला होता त्यामुळे माथ्यावर न जाता मागे फिरायचा निर्णय घेतला. त्यालाही दीड-एक तास लागणार होताच. मागे फिरलो आणि बिरवाडी गाठलं. सगळ्या प्रकारात जेवण राहिलं होतं. गाडीत बसून रोह्याजवळ एका धाब्यावर मस्त जेवलो. आणि मुंबईकडे रवाना झालो. कधी कधी अगदी सोप्या गोष्टीसुद्धा कठीण होऊन जातात पण आपण त्यातून मार्ग काढणे आवश्यक असते. योग्य तो धीर राखला तर बऱ्याच गोष्टी सुकर होतात.

थोडक्यात:
बिरवाडी (अलिबाग, रायगड)
उंची: १२३० फुट । श्रेणी: सोपी - २ । भ्रमंती: चांगली । ऋतू: सर्व महिने
पायथा ते किल्ला - ट्रेक - एक तास
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ कमी - जास्त लागू शकतो.)

नोंद: वरील लेख, 'सामना' वृत्तपत्राच्या 'फुलोरा' या करमणूक विशेष पुरवणीमध्ये ०३ नोव्हेंबर २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचनासाठी पुढील 'थम्बनेल' वर क्लिक करा.



No comments:

Post a Comment