वणव्यातला गोरखगड (३० मार्च २०११) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 30, 2011

वणव्यातला गोरखगड (३० मार्च २०११)



माझ्या ऑफिसमधले माझे सहकारी अमिता, मनोहर, धनश्री आणि शलाका यांनी उन्हाळ्यात ट्रेकला जायचे ठरवले. पण आमचा बिरवाडीचा अनुभव काही बरा नव्हता. उन्हाळ्यात घसाऱ्याचे प्रमाण वाढते त्यामुळे ट्रेक कठीण होतो. तरीही मला राजी करण्यात त्यांनी यश मिळवलं आणि ३० मार्च २०११ ला तळगडाचा ट्रेक ‘फिक्स’ झाला. एका मित्राकडून टाटा सुमो गाडी भाड्यावर घ्यायचे ठरले.

सकाळी ठरल्याप्रमाणे बाकीची मंडळी दादरहून सकाळी ७ वाजता गाडीतून निघणार होती आणि मी सीवूड्सला राहत असल्याने नेरूळहून गाडीत बसणार होतो. ८ वाजले तरीही गाडी दादरहून निघाली न्हवती. मी घरूनच मोबाईलवरून मित्राच्या संपर्कात होतो. माझा मित्र म्हणाला की गाडी येऊ शकणार नाही. कारण विचारताच तो म्हणाला, “अरे, ड्राईव्हरला माहित न्हवतं की आज भारत-पाक क्रिकेट मॅच आहे, त्याला मॅच बघायची आहे म्हणून तो नाही येणार”. हे कारण ऐकून माझ्या डोक्याची कडी वाजली. बाकी ग्रुप दादरला उभा होता ह्याचं वाईट वाटत होतं. मित्राला  त्याच्या भाषेत समजतील अश्या ‘चार ज्ञानाच्या गोष्टी’ ऐकवून मी मनोहरला कॉल केला. त्या सगळ्यांना ‘सॉरी’ म्हटलं आणि घरी जायला सांगितलं कारण ९ वाजले होते. संपूर्ण ट्रेक बोंबलला होता. पण ते सगळे म्हणाले की तळगड नसेल जमणार तर दुसरा कोणतातरी जवळचा किल्ला करुया. ९ वाजता सुरु करण्यासारखा मुंबईजवळ कोणताच किल्ला न्हवता. त्यांनी गोरखगड करुया असं सुचवलं. ९ वाजता आणि गोरखगड? शक्य न्हवतं पण त्यांचा सगळाच वेळ वाया गेला असता म्हणून गोरखगड ‘फायनल’ झाला.

सगळे डायरेक्ट कल्याणला भेटणार होतो. पण आता खरी मजा होती. मी नेरूळला आलो आणि तिथून ठाण्याची लोकल पकडली. ती सुटायला १५ मिनिटं वाट पहावी लागली. पाऊण-एक तासात ठाण्याला पोहोचलो. तिथून अंबरनाथ गाडी पकडेपर्यंत इतर मंडळींनी ठाणे ‘क्रॉस’ केलं होतं. मला ट्रेनचा प्रवास कधीच आवडत नाही तो यासाठीच. कल्याणहून, मुद्दाम मला वैताग देण्यासाठी ‘कॉल’ सुरु होते, कारण इतर ट्रेकच्या दरम्यान, नेरूळला चढत-उतरत असल्याने माझी मजा होती आणि इतरांना त्रास. कसाबसा कल्याणला पोहोचलो, तेव्हा ११ वाजले होते, पण प्रवास संपला न्हवता. इथून बसने कल्याण ते मुरबाड आणि पुढे रिक्शाने नारीवली आणि मग धसई असा प्रवास केला. वाटेतच भाजलेले मके घेऊन आम्ही रिक्षातच खाल्ले, कारण खाण्यासाठीसुद्धा वेळ न्हवता. मार्चचा महिना असल्याने प्रवासातच सगळेजण अर्धे भिजलो होतो. शेवटी दुपारी १२ वाजता, अथक परिश्रमाने एकदाचे धसईला पोहोचलो.

धसई हे गोरखगडाचे पायथ्याचे गाव. गावातून समोरच गोरखगड आणि ‘एडजसंट’ मच्छिंद्र सुळका लक्ष्य वेधून घेत होते. सूर्य डोक्यावर होता. कडक ऊन होतं. गोरखनाथ मंदीरामागून ट्रेक सुरु केला. चढाईचा पहिला टप्पा पार करून पठारावर आलो. घामाच्या धारा इथेच सुरु झाल्या होत्या. संपूर्ण पठार काळं ठिक्कर पडलं होतं. नेमका त्याचं दिवशी वणवा लागून आधीच सुकलेलं गवत पेटून राख झालं होतं. लहान झुडूपेही करपली होती. जमीन धुमसत होती. ह्या वातावरणातही त्या काळ्या राखेतून किल्ल्यावर जाणारी मातकट वाट शाबूत होती. वणव्यामुळे आणखीनच गरम होऊ लागलं होतं. पण पुढली वाट ठीक असेल ह्या (खोट्या) आशेवर पुढे चालत राहिलो. 


चढाईचा दुसरा टप्पा सुरु झाला होता. इथे मात्र घसाऱ्यामुळे माती पायाखाली टिकत न्हवती. त्यातून डोकावणारी झाडाची मजबूत मूळं आणि खोडं पकडून आम्ही चढत होतो. शलाका आणि अमिता दोघी दमल्या होत्या पण थांबल्या नाहीत. ह्या चढाईत वाट मधूनच दरीच्या कडेने जाते. ती, घसाऱ्यामुळे धोकादायक झाली होती. उन्हात सूर्य आमचा ‘स्टॅमीना’ ‘टेस्ट’ करत होता. दुसरा टप्पा सर केला होता पण दुपारचे अडीच वाजले होते.
बाकी मंडळीनी त्यांच्याजवळ असलेलं पाणी जवळ जवळ संपलं होतं. माझ्याकडेही फक्त अर्धा लिटरभर पाणीच शिल्लक होतं आणि अजुनही अर्ध्या तासाचा ट्रेक शिल्लक होता त्यामुळे ते अपूरं होतं. उन्हाळ्यामुळे बराच परिसर उजाड झाला होता. इथेच, बरीच पाने झडून गेलेल्या एका झाडाच्या सावलीखाली(?) आम्ही आडवे झालो. एवढ्या उन्हातही पुढे जाण्यास सगळेच उत्स्तुक होतो पण पाणी संपलं होतं हा मोठा पेच होता.

पुन्हा पुढे खाली दरीतून धुराचा एक लोट येताना दिसला. म्हणजे पुढेही वणवा लागलेला होताच. मी पुढे जाऊन वाट सुरक्षित आहे का ते पाहायला गेलो आणि तोवर इतरांना तिथेच आराम करायला सांगितलं. ५-१० मिनिटांत कड्याच्या चढाजवळ मी पोहोचलो पण दरीत वणवा बराच पेटला होता.
मनात विचार आला की समजा किल्ल्यावर कसेबसे पोहोचलो आणि वणवा भडकला तर?? ट्रेक अचानक बदल्याची घरी काहीच माहिती न्हवती त्यामुळे उगाच शौर्य दाखवण्यात काहीच अर्थ न्हवता. लगेच मागे फिरलो आणि इतर मंडळींना गाठलं. तो वर त्यांचाही आराम झाला होताच. निराश मनाने किल्ला उतरायला सुरुवात केली ती त्याला पुन्हा यायचं वचन देऊन..

खाली गावात परत आलो. गावातील ट्रेकर्सचे मित्र समजले जाणारे हमीद पटेल ज्यांच्या दुकानावर मी माझा नेहमीचा फेवरेट सोडा घेतला आणि इतरांनी कोल्डड्रिंक्स. बरं वाटलं तसं रिक्षा पकडून मुरबाडला आलो आणि तिथे थोडसं जेवून मुंबईची परतीची वाट पकडली.

थोडक्यात:
गोरखगड (मुरबाड, ठाणे)
उंची: २१३० फुट । श्रेणी: मध्यम - १ । भ्रमंती: उत्तम । ऋतू: सर्व महिने (पावसाळ्यात माथा सर करण्यासाठी कठीण प्रस्तरारोहण करावे लागते. प्रसंगी ते जीवावर बेतू शकते.)
मुरबाड ते देहरी - प्रवास - पाऊण तास
पायथा ते किल्ला - ट्रेक - दोन - अडीच तास
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ कमी - जास्त लागू शकतो.)


नोंद: वरील लेख, 'सामना' वृत्तपत्राच्या 'फुलोरा' या करमणूक विशेष पुरवणीमध्ये १० नोव्हेंबर २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचनासाठी पुढील 'थम्बनेल' वर क्लिक करा.



No comments:

Post a Comment