सफर राजमाची जोडकिल्ल्याची - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 8, 2011

सफर राजमाची जोडकिल्ल्याची


राजमाची हा तसा एक आडबाजूचा पण सुरेख जोडकिल्ला. किल्ल्याला पोहोचायला दोन वाटा आहेत. लोणावळ्याकडून असणारी वाट सोपी आहे पण ती वेळखाऊ (६ ते 8 तास) आणि कंटाळवाणी आहे. तर दुसरी कर्जतहून पण चढाची (३ तास).. त्यात हा ट्रेक ऑक्टोबर मध्ये ठरवल्याने ह्या ट्रेकला कोणीही यायला तयार झालं नाही. फक्त मी आणि प्रथमेश ‘रेडी’ होतो. शेवटी दोघेच जायचं असं ठरलं. किल्ला कँपिंगसाठी एक उत्तम ठिकाण असल्याने एक रात्र मुक्काम करण्याचं ठरलं आणि ०८ आणि ०९ ऑक्टोबर २०११ असे दोन दिवस ‘फिक्स’ झाले.

प्रथमेश बोरिवलीला राहत असल्याने त्याची एस.टी. तिकीट तिथून बुक केली होती आणि माझी नेहमीप्रमाणे नेरुळहून. पण प्रथमेश गडबडल्याने त्याने लोणावळ्याची ती सात वाजताची एस.टी. चुकवली. तसं त्याने मला मोबईलवरून कळवलं. एक तिकीट वाया गेलं. मग दोघांनी ‘डायरेक्ट’ लोणावळ्यालाच भेटायचं ठरलं. त्याने तिथूनच अर्ध्या तासाने सुटणारी दुसरी गाडी पकडली आणि मी बुकिंग झालेली एस.टी. नेरूळहून नऊ वाजता पकडली. दुपारी ११:३० वाजताच्या सुमारास आम्ही लोणावळ्याला पोहोचलो. एस.टी. कँटीनमध्ये वडापाव आणि चहा घेतला आणि दुपारी बाराच्या आसपास, तुंगार्लीमार्गे राजमाचीचा ट्रेक सुरु केला.

ट्रेक सुरु केल्या केल्या माझ्या डाव्या पायात गोळा आल्यासारखं जाणवलं. ट्रेकच्या सुरुवातीलाच पायात क्रॅम्प,  म्हंटलं, आता ट्रेक बोंबलला. पुढे ६-७ तास चालायचं होतं त्यामुळे प्रथमेशला पण टेन्शन आलं. थोडावेळ बाजूला थांबलो. दोन दिवसांचा ट्रेक असल्याने तेवढ्या सामानाने माझी सॅक बरीच जड झाली होती. टेंटही सोबत घेतला होता. पण थोड्याच वेळात बरं वाटू लागलं. पण पुन्हा त्रास होऊ नये म्हणून टेंट प्रथमेशने त्याच्याजवळ घेतला. लहान मोठे चढ उतार पार करत आम्ही राजमाचीच्या दिशेने चाललो होतो. ऑक्टोबरचं उन जाणवत होतं. धाप लागली होती. थोड्या थोड्या वेळाने तहान लागत होती. कर्जतहून कोंदिवडे मार्गे राजमाचीला येऊन लोणावळ्यावाटे परतीचा प्रवास मी या आधी केला होता. प्रथमेश राजमाचीला पहिल्यांदाच आला होता. उन्हाळ्यात ही वाट पुष्कळ दमछाक करते. मधला जंगलाचा भाग सोडला तर अगदी शेवटपर्यंत सूर्य डोक्यावरच असतो. गेल्या ट्रेकलाही लोणावळ्याच्या वाटेने अर्धा रस्ता चालून पुढे सुमोगाडीची लिफ्ट घेऊन आम्ही पनवेलला पोहोचलो होतो. पण ह्या खेपेला हा ‘पॅच’ चालतच जायचं असा ‘प्लान’ होता. ह्या वाटेची आणखी एक ‘सल’ म्हणजे ह्या वाटेने किल्ल्याला जाताना किल्ला फार जवळ दिसतो. पण मुळात ही वाट किल्ल्याच्या अगदी पुढे जाऊन पुन्हा मागे वळते आणि मग आपण किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात, उधेवाडीत पोहोचतो. प्रथमेशही किल्ला जवळ जवळ येतोय म्हणून खुश होता. आम्ही या वाटेने किल्ल्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो तेव्हा प्रथमेश म्हणाला, “ अरे, पोहोचलो आपण वाटतं.. एवढा काही लांब नाहीय किल्ला..” मी शांत उत्तरलो, “भाई, मध्ये खोल दरी आहे आणि आपल्याला पुढे जाऊन पुन्हा मागे फिरायचं किल्ल्याच्या त्या बाजूने..” ह्या उत्तराने प्रथमेश थोडा नरमला. कारण उन खूप होतं. गेले तीन तास आम्ही चालत होतो.


भूकही खूप लागली होती. जवळच लाकडाच्या काठ्या ठोकून त्यावर प्लास्टिक अंथरून एक शेड इथे उभारली होती. लगेच तिथे जाऊन ‘लंच’ करून घेतला. मी चकली आणि चिवडा आणला होता. प्रथमेशने खाकरे आणले होते. ते खाऊन झाल्यावर पाणी पिऊन थोडं तिथेच ‘पडलो’. अर्ध्या तासाने पुन्हा निघालो. वाटेत एक ओढा वाहत होता. तिथे जाऊन हात पाय धुऊन घेतले, फ्रेश झालो आणि मग पुन्हा चालायला सुरुवात केली. दोघेच असल्याने जास्त बोलणं होत न्हवतं त्यामुळे निसर्ग नीट पाहता येत होता. प्रथमेशसोबत आपली चांगली ‘ट्युनिंग’ जमते हे मला कळून चुकलं होतं.

संपूर्ण वाट दुपारी चालत असल्याने घामाच्या धारा लागल्या होत्या. आता जंगलाच्या टप्प्यात पोहोचलो होतो. राजमाचीला हवेचं वावडं आहे. इथे हवा अगदी कमी वाहते. त्यामुळे खूप उकडतं. जंगलातही फक्त सावली होती म्हणून बरं वाटत होतं एवढंच. हवा मात्र नव्हती त्यामुळे घाम सुकत नव्हता आणि भिजल्यामुळे जास्त वैताग आला होता. एवढ्या जंगलात आम्ही दोघेच होतो. इथे तरस, कोल्हे आणि बिबटे आहेत असं मी ऐकलं होतं. माकडंही जोडीला होतीच. त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती. समजा एखादा वन्यप्राणी आलाच तर?? पळून जाण्याएवढंही बळ आमच्यात शिल्लक नव्हतं. एवढ्यात झाडावर हालचाल झाली. आम्ही थोडं सावरलो आणि वर पाहिलं तर झाडावर शेकरू’ दिसली. शेकरू म्हणजे  मोठ्या आकाराची खार; हा महाराष्ट्राचा राज्यपशु आहे. मी शेकरू पहिल्यांदाच पहात होतो. पण कॅमेरा काढून तिचे फोटो घेणार तोच ती ‘गुल्ल’ झाली. पुन्हा कॅमेरे आत गेले आणि आम्ही चालू लागलो. शेवटी डावीकडे वळसा घालून किल्ल्याला खेटून जाणारी उधेवाडीची वाट आम्ही चालत होतो. संध्याकाळचे साडे पाच वाजून गेले होते. अजून अर्धा-पाऊण तास चालायचं होतं. पण किल्ला जवळ येतोय ह्या आशेवर हे अंतर शुल्लक होतं.


सहा साडे सहा तास चालून, शेवटी एकदाचं आम्ही उधेवाडीत पोहोचलो. गावात पोहोचताच पहिली शाळा गाठली. जवळच बबन सावंत याच्या घरी जाऊन जेवण बनवण्यासाठी सांगितलं. त्यांनीही तयारी सुरु केली. मुक्कामासाठी टेंट आणल्याने ‘तो कुठे लावू’ ह्या प्रश्नावर ‘शाळेच्या मैदानात..’ असं उत्तर बबननी दिलं. लागलीच तिथे टेंट ठोकून घेतला. बॅगा बबनच्या घरी ठेवून आम्ही ‘पंपा’वर हात पाय धुवायला गेलो होतो. फ्रेश झाल्यावर बबनकडे चहा घेतला आणि सोबत आणलेली बिस्किटं खाऊन घेतली.

दोन-अडीच तास टेंटमध्ये आराम करून रात्रीच्या जेवणासाठी बबनकडे परत आलो. त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी तांदळाची भाकरी, उकडलेल्या अंड्याचा रस्सा आणि भात जेवणासाठी तयार केला होता. मस्त झणझणीत जेवण जेवून मजा आली. सकाळच्या नाश्त्याचं सांगून आम्ही टेंटकडे निघालो. थकल्यामुळे टेंटमध्येही मस्त झोप लागली.

सकाळी जाग आली तेव्हा प्रथमेश झोपेत होता. लवकर उठून लवकर ट्रेक करू म्हंटल्यावर तो थोडासा वैतागल्या आवाजात म्हणाला; “अर्रे केवढा घोरतो बे तू.. मला झोपच नाही लागली.” थोडं खजील होऊन मी त्याला आराम करायला सांगितलं. त्याची झोप झाल्यावर सगळं आवरून बबनकडेच चहा आणि कांदापोहे खाल्ले. आणि ८ वाजताच्या सुमारास किल्ला पाहायला गेलो.


किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत; पहिला श्रीवर्धन आणि दूसरा मनरंजन. आधी श्रीवर्धन आणि मग मनरंजन पहायचं असं ठरलं. त्यानुसार भ्रमंतीला सुरवात केली. चढाच्या सुरूवातीला डाव्या हाताला एक लहानसे लेणे आढळते. त्यातील दरवाजावर गणेशपट्टीका दिसून येते. येथे दोन दालने आहेत. ऑक्टोबरची सुरुवात असल्याने आणि पावसाळ्याचा शेवटचा टप्पा असल्याने सगळीकडे हिरवेगार गवत आणि त्यात सोनकीची फुले असे धुंद वातावरण होते. त्या हिरव्यागार गवतातून गडावर जायची वाट मात्र गडद तपकिरी रंगाने खुलून दिसत होती.


पुढे गेल्यावर, दोन्ही बालेकिल्ल्यांच्या खिंडीत भैरोबाचे कौलारू टुमदार देऊळ आपले स्वागत करते. आम्ही पोहोचलो तेव्हा देवळामध्ये एक गावकरी लिंबू सरबत आणि नाश्त्याचे दुकान थाटून बसला होता. त्याच्याकडे लिंबू सरबत प्यालो. देवळाच्या आवारात काही दगडी दीपमाळा आणि एक दगडी घोडा दिसून आले. खिंडीतून उजवीकडे श्रीवर्धन तर डावीकडे मनरंजन अशी किल्ल्याची रचना आहे. देवळाजवळून उजवीकडे निघालो.


दोघांची फोटोग्राफी सुरूच होती. तेव्हाच झाडावरून बाजूला काहीतरी पडल्यासारखा आवाज झाला. प्रथमेश ओरडला, ‘ए, हळू ये, साप आहे, साप..’. जवळ जाऊन पाहिलं तर ४-५ फुटी पोपटी रंगाचा आणि पिवळ्या पोटाचा साप इंग्रजी एस आकाराचे वाटोळे घालून हल्ल्यासाठी तयार होता. मी आजवर खरा साप कधीच पहिला नव्हता. त्यामुळे मी सटासट त्याचे फोटो काढून घेतले. तो सापही जास्त हालचाल करत नव्हता आणि मस्त पोज देत होता.


महाराष्ट्रात फक्त 4 विषारी साप असतात ह्या खोट्या माहितीवर बिनधास्त राहून बर्‍यापैकी जवळ जाऊन त्याचे फोटो काढून घेतले. पण बिनविषारी सापाच्या चाव्याने सुद्धा खूप वाईट इन्फेक्शन होतं हे ऐकून असल्याने सुरक्षित अंतर ठेऊन फोटोग्राफी सुरू होती. (बर्‍याच वर्षांनंतर निखिल मोडक ह्या माझ्या मित्राकडून तो साप चापडा होता आणि तो विषारी असतो ही माहिती मिळाली आणि सुरक्षित अंतर राखल्याचं खूप खूप बरं वाटलं, नाहीतर प्रसंग जीवाशी आला असता.) जास्त ‘मस्ती’ नको म्हणून त्याला त्याच्या अधिवासात तसंच सोडून आम्ही किल्ले पाहायला गेलो.

पदरातील आडव्या वाटांनी वर चढत अगदी 10-12 मिनिटांतच आमि श्रीवर्धनच्या तटबंदीला भिडलो. इथे एका भक्कम बुरूजातून गायमुखी बांधणीचा दरवाजा असे प्रवेशाचे स्वरुप आहे. मात्र आजमितीस फक्त भिंती शिल्लक आहेत. दरवाज्याची कमान ढासळली आहे. आतमध्ये भग्न देवड्या दिसून येतात. आत प्रवेश करताच किल्ल्याचा सर्वोच्च माथा आणि त्याला असलेला बुरूज दिसून येतो. आम्ही त्या दिशेने कूच केले. सुरूवातीला पाण्याची एक-दोन टाकी दिसून आली. त्यापुढे आणखी एक लेणेसदृश्य कोरीव जागा दिसून येते. आधीच्या लेण्याची अगदी कॉपी असावी असेच हे लेणे आहे. पुढे थोडा चढ चढून गेल्यावर दक्षिणेला असणारा बुरूज लोणावळा शहर आणि कातळधार धबधबा यांचे सुरेख दर्शन घडवतो तर उत्तरेकडे ढाकचा किल्ला आणि आजूबाजूचा जंगल प्रदेश रौद्र दर्शन देतो.


वाटेत कोण्या एका संवर्धन संस्थेने परिश्रम घेऊन नव्याने उभारलेले पत्र्याचे देऊळ आणि त्यातील श्री विष्णुची चतुर्भुज मूर्ति नजरेस पडते. सर्वोच्च माथ्यावरून घाट-कोकणचे विहंगम दृश्य मन प्रसन्न करते. पश्चिमेला उंचीने लहान असणारा मनरंजन बालेकिल्ला संपूर्ण दिसून येतो. येथून खाली उतरून उत्तरेकडच्या बुरूजाकडे जाताना वाटेत पाण्याची काही टाकी आणि भग्नावशेष दृष्टीस पडतात. उत्तरेचा बुरूज चिलखती असून त्यातील दोन तटबंदीच्या पोकळीमध्ये जाण्यासाठी दरवाजे आढळतात.


श्रीवर्धन पाहून झाल्यावर आम्ही मनरंजन किल्ल्याकडे जाण्यासाठी पुन्हा भैरोबाच्या देवळापाशी आलो. देवळाच्या मागल्या बाजूने थोडेसे चढून गेल्यावर मनरंजन बालेकिल्ल्याचा सुरेख दरवाजा दिसतो. येथून आत प्रवेश केल्यावर उजवीकडे किल्ल्यात प्रवेश होतो. येथे जवळच एक धान्यकोठार सदृश्य इमारत नजरेस पडते. उत्तरेला एक मोठे बांधीव टाके बरेच पाणी राखून होते. आणखी काही भग्नावशेष गडावर माजलेल्या गवतात दडून बसले होते.


साधारण दोन-अडीच तास, दोन्ही किल्ले डोळे आणि कॅमेरा भरून पाहून झाल्यावर दक्षिणेच्या बुरूजाकडून आम्ही पुन्हा उधेवाडी गावात आलो. बबनकडून दुपारच्या जेवणासाठी अंडापोळी आणि चपाती बांधून घेतली आणि दुपारी १२ वाजता कोंदिवड्याच्या दिशेने निघालो. ह्या संपूर्ण भागात हवा जास्त नसल्याने जंगलातून उतरतानाही कंटाळा येत होता. त्यात प्रथमेशला भूक लागली म्हणून एका ओढ्याजवळ अंडापोळी चपाती खायला बसलो.


थोड्या गप्पा मारत खाऊन झाल्यावर उठलो तेव्हा उतरण्याची वाट कळून येत नव्हती. एका वाटेने पुढे गेलो तर ती झाडीने बंद होती. दोन तीन वाटा अजून चेक करून पहिल्या पण वाट काही सापडत नव्हती. मग आम्हाला ‘मॅन व. वाईल्ड’च्या ‘बेअर ग्रील’चे शब्द आठवले आणि आम्ही ओढ्याच्या कडेने चालायला सुरुवात केली. प्रॉब्लेम्सची कमी होती की काय म्हणून माझ्या उजव्या सँडlलचा सोल उखडला. रस्त्यात सापडलेल्या एका नायलॉन दोरीने तो पायाला नीट बांधून पुढचा ट्रेक सुरु ठेवला. उंच खडक उतरत, पाण्यातून चालत, घसरत, कसेबसे आम्ही कोंडीवड्याच्या दिशेने स्वतःला रेटत होतो. गावातलं पाणी सोबत घेतलं होतं पण ते ‘जड’ असल्याने त्याने तहान भागत नव्हती. घसा कोरडाच वाटत होता.

अखेर अडीच तासांनी खाली गाव दिसून आलं आणि हायसं वाटलं. ट्रेक ‘कम्प्लीट’ झाला होता. भरभर चालत तिथे पोहोचलो. एका घराजवळ हात-पाय तोंड धुवून घेतलं आणि पाणी मागितलं; ‘थंड पाणी आहे का?’ विचारलं तर त्या काकू म्हणाल्या, “थंड पाणी नाही पण ‘कोल्डड्रिंक’ आहे.” ‘कोल्डड्रिंक??’ एवढ्या आतल्या गावात कोलड्रिंक?? शॉक बसला पण लगेच दोन बाटल्या मागवल्या. कोणत्या तरी लोकल ब्रॅंडचे ते कोलड्रिंक ताबडतोब पिऊन घेतलं. आणखी एक एक राऊंड झाला. बरं वाटलं. त्यांचे पैसे देऊन आणि आभार मानून आम्ही कोंदिवड्याच्या रस्त्याला लागलो.

थोडक्यात
राजमाची (लोणावळा, पुणे - कोंदिवडे, रायगड)
उंची: ३६०० फुट । श्रेणी: सोपी -३ । भ्रमंती: उत्कृष्ठ । ऋतू: सर्व
लोणावळा ते उधेवाडी (१५ किमी) - गाडी : दीड तास - ट्रेक : ६ ते ८ तास
पायथा ते श्रीवर्धन किल्ला - ट्रेक - २० मिनिटे
पायथा ते मनरंजन किल्ला - ट्रेक - १५ मिनिटे
उधेवाडी ते कोंदिवडे  - ट्रेक - २.३० ते ३ तास
कोंदिवडे ते कर्जत (१० किमी) - गाडी - अर्धा तास
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ जास्त लागू शकतो.)

No comments:

Post a Comment