उत्तुंग तुंग (०७ जुलै २०१३) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, July 7, 2013

उत्तुंग तुंग (०७ जुलै २०१३)

किल्ले तुंग भ्रमंती ०७ जुलै २०१३ रोजी, ठरल्याप्रमाणे, सकाळी ७ वाजता निरंजन त्याची ‘आय १०’ घेऊन निघाला. अंबरनाथला राहणाऱ्या ‘हर्षला’ने त्याला दादरलाच ‘जॉईन’ केलं होतं. नेहमीप्रमाणे, नेरूळहून मला ‘पिकअप’ केलं आणि पुढे ‘नीलम’ आणि ‘अनु उर्फ बिंदू’ला घेऊन आम्ही ‘एक्स्प्रेस वे’ला लागलो. तुंग किल्ल्याचा ट्रेक मी आधी केला होता, पण नवीन ग्रुप घेऊन पुन्हा जाणं नवीन अनुभव देतं. एक्स्प्रेसवेवरच धुक्याला सुरुवात झाली होती. लोणावळ्याहून भुशी धरणाकडे जाताना आजूबाजूला ‘अतिउत्साही’ मंडळी दिसत होतीच. पण आम्ही त्यातले नसल्याने (त्यांची कीव करत), घुसळखांबकडे निघालो. वाटेत एका ‘टपरी’वर थांबून आम्ही चहा आणि बिस्किटं खाऊन घेतली आणि फ्रेश झालो. कसारा घाटातील प्रसंगाच्या वेळेपासून निरंजन चढावर गाडी नेताना टेन्शनमध्ये येतो हे पुन्हा घुसळखांबच्या रस्त्यावर त्याने सिद्ध केलं. ‘चढ म्हणजे पहिला गियर’ हे सूत्र त्याला अजूनही नीटसं पाठ झालेलं नव्हतं, त्यामुळे दोन ठिकाणी चढावर गाडी थांबवून मागे आणली आणि सूत्र पाठ करून पुढे ढकलण्यात आली. धुक्यात हरवलेल्या, नुकत्याच पावसात न्हाऊन निघालेल्या त्या काळ्या डांबरी रस्त्यावरून आमची गाडी, घुसळखांबला पोहोचली. तिथून डावीकडे जाणाऱ्या नागमोडी डांबरी रस्त्याने आम्ही तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी (तुंग वाडीजवळ) असणाऱ्या हनुमान मंदिराजवळ पोहोचलो.

मंदिराजवळ, झाडांच्या सावलीत, पार्किंगसाठी मस्त सोय केली होती, तिथे आम्ही गाडी लावली आणि आवश्यक सामान घेऊन पायवाट जवळ केली. ट्रेकला सुरुवात झाली आणि आम्ही डोंगरात खोदलेल्या पावट्यांनी चढू लागलो. पाचच मिनिटांमध्ये कड्याच्या दिशेला खोदलेल्या एका कोनाड्यातील मारुतीरायाची मूर्ति दिसून आली. प्रत्येक गडावर हमखास आढळणारी ही देवता, अदृश्य दुष्ट शक्तींना दूर ठेवते. मात्र आजकाल गडांवर मौजमजेसाठी येणाऱ्या ‘दृश्य दुष्ट शक्ती’ दूर ठेवण्यात मात्र ती अपयशी ठरत आहे याचे तिलाही दुःख होत असेल. मारुतीरायाला नमस्कार करून आम्ही पुढली खडी चढण चढायला सुरुवात केली. पावसाची संततधार सुरु होतीच. पायवाटेवरून पाण्याचे ओहोळ उड्या मारू लागले होते. त्या पायवाटेवरून, कड्याला चिकटलेली नागमोडी, अरुंद वळणे घेत, अर्ध्या तासातच, गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो.


केळीच्या लहानुल्या झाडाआड लपलेल्या, शेवाळ्याने हिरवळलेल्या दरवाज्याचा कातळ पावसामुळे छान काळाशार झाला होता. इथूनच फोटो सेशनला सुरुवात झाली. दरवाज्यात लगेच सुरु होणाऱ्या पायऱ्यांनी पुढे दुसऱ्या दरवाज्यात पोहोचवलं. इथे दरवाज्यासमोरील बुरुजावर आतल्या बाजूस एका चिऱ्यावर मारुतीरायाचे एक ओबडधोबड शिल्प कोरले आहे. दरवाज्यात आतल्या बाजूस देवड्या आहेत. सगळं पाहून आम्ही गडाच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचलो. इथून पश्चिमेला, धुक्याच्या जाड दुलईतून आकाशात उंच घुसलेलं तुंग किल्ल्याचं शिखर लक्ष वेधून घेत होतं. पण आम्ही पहिले निघालो, ते पूर्वेचा बुरुज पाहण्यासाठी. या बुरुजावरून मोरगिरीचा प्रचंड डोंगर आणि त्याला तुंग किल्ला जोडणारी डोंगरसोंड दिसत होते. त्यातून आम्हाला किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन येणारा डांबरी रस्ताही छान नागमोडी जात होता. आम्ही पुन्हा मागे फिरून शिखराच्या दिशेने निघालो. वाटेत शिखराच्या पायथ्याशी श्री गणेशाचे छोटेखानी देऊळ आणि त्याच्या बाजूला असणारे पाण्याचे मोठे टाके दिसले. देवळाच्या मागून जाणाऱ्या वाटेत शिखराच्या दक्षिणेला कड्याच्या पोटात पिण्याच्या पाणी असणारे टाके आहे ते पाहून घेतले आणि मग शिखराला भिडलो. डाव्या बाजूला खोल दरीत दिसणारी डौलदार भातशेती, पाय घसरला तर जवळून पाहता येणार होती; म्हणून जपून पावलं टाकत कड्यातल्या त्या पावट्यांवरून चढू लागलो. “जपून चला रे”, “इथे वाट थोडी निसरडी आहे..” अश्या माझ्या सूचना मागच्या मंडळींना जात होत्या. एवढ्यात धुक्याचा एक लोट आला आणि त्यातून वाट काढत आम्ही सर्वोच्च टोकावर पोहोचलो. धुक्याचा लोट निघून गेला आणि सभोवतालच्या त्या परिसराचे रम्य दर्शन डोळ्यांना घडून आले. तुंगाई देवीच्या देवळाजवळ जाऊन दर्शन घेतलं आणि देवळाच्या मागच्या बाजूला जाऊन टोकावरून खाली नजर फेकून ती खोली डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला.


गोंधळ ऐकू आला तसं आमची समाधी भंग पावली आणि कळलं की दुपारचा दीड वाजून गेला होता. जत्रा भरल्यासारखी, कोण्या एका ‘ट्रेकिंग ग्रुप’चे ५० पेक्षा जास्त सदस्य गडबड गोंधळ करत टोकावर आले होते. एक कोपरा पकडून आम्ही त्या रिमझिम पावसातच जेवणासाठी बसलो. निरंजनने आणि बिंदूने पराठे, हर्षलाने खाकरे, वेफर आणले होते. पण ‘नेहमीप्रमाणे’ नीलमने आणलेले पदार्थ ‘हटके’ होते. तिने वाटीतली इडली, सांबार आणि चटणी आणली होती. आम्ही सगळ्यांनी त्यावर ताव मारला. पोटपूजा झाल्यावर जरा बरं वाटलं. ‘जत्रा’ किल्ल्यावरून उतरायला लागली तर आमचा खोळंबा होईल हे ताडून आम्ही आवराआवर करून सामान पाठीशी लावलं आणि किल्ला उतरायला सुरुवात केली. तरीसुद्धा त्यातील काही ‘अतरंग’ मुलांनी आम्ही उतरायला लागलो हे पाहून आमच्या मागोमाग उतरायला सुरुवात केली. आमच्या ग्रुप मध्ये तीन मुली असल्याने आम्ही हळू हळू उतरत होतो मात्र ती मुले आमच्या मागे उगाच आरडाओरड करत ते घाई करू लागली. शेवटी माझ्या डोक्यात ‘आयडियाची कल्पना’ आली आणि बाजूला उभे राहून आम्ही त्यांना आधी उतरण्यासाठी जागा करून दिली. ती ‘आयडिया’ कामाला आली आणि थोडेसे हिरमसून त्यांना पुढे जावे लागले. मागे उरलेल्या त्यांच्या ग्रुपमध्येही मुली असल्याने तो गट खूप मागे होता आणि आम्हाला किल्ला उतरायला तेवढा वेळ पुरेसा झाला. खाली उतरून आम्ही गाडीतळाजवळच्या हनुमान मंदिरात थोडावेळ बसलो. कपडे बदलून घेतले आणि संध्याकाळच्या चार वाजताच्या सुमारास गाडी सुरु केली. तुंगवाडीच्या रस्त्याच्या नाक्यावर रस्त्याच्या अगदी मधोमध त्या ‘महामूर्ख’ जत्रेवाल्या मंडळींनी आपली बस उभी करून ठेवली होती. आम्ही हॉर्न वाजवून इशारा केल्यावर त्यांचा एक ‘अनुभवी’(?) वाटणारा ज्येष्ठ लीडर आमच्या जवळ आला. “गाडीत मुली कपडे बदलत आहेत त्यामुळे त्यांचं होईपर्यंत आम्हाला गाडी हलवता येणार नाही. पाच मिनिटं थांबा” अशी सुचना त्यांनी आम्हाला केली. मुली चेंज करत आहेत आणि त्यांना आवरायला ‘पाच’ मिनिटं नक्कीच लागणार नव्हती हे आम्हाला माहित होतं पण इथेही नाईलाज होता. २० मिनिटांनंतर, आमचा वेळ फालतू खाऊन त्यांनी त्यांची बस हलवली, पण मुद्दाम आमच्या पुढेच ठेवली. “निरंजन, तुला शक्य असेल तर ओव्हरटेक करून गाडी पुढे काढ नाहीतर हे लोक आपल्याला अडकवून ठेवतील त्यांच्या बसमागे..” मी म्हणालो. निरंजनलाही ते पटलं आणि त्या ग्रुपची मंडळी बसमध्ये शिरेपर्यंत त्याने डांबरी रस्त्याबाहेरून गाडी पुढे काढली आणि आम्ही निघालो. घुसळखांब मागे टाकून अगदी भुशी धरणाच्या रस्त्याला लागेपर्यंत ‘लोक एवढे स्वार्थी आणि मूर्ख कसे असू शकतात’ ह्या विषयावर आमच्या गप्पा सुरु झाल्या.

भूशीच्या अलीकडे, जिथे आमची गाडी चढावर थांबली होती, तिथे गाड्यांची गर्दी दिसून आली. ‘काय गडबड आहे?’ ते कळून येत नव्हतं. पण १० मिनिटे तिथे थांबल्यावर कळून आलं की ते ट्रॅफिक ‘भुशी धरण’ पाहायला येणाऱ्या गाड्यांमुळे झालं होतं. मोठ मोठ्या बसेस पासून सगळ्या गाड्या त्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. आम्ही चोरून चोरून गाडी पुढे पुढे नेत होतो पण आता धीर सुटू लागला होता, कारण अक्षरशः १५ मिनिटांच्या रस्त्यासाठी आम्ही गेले दोन तास अडकून पडलो होतो. स्वार्थी पर्यटकांना, सरकारला, वाहतूक पोलिसांना आणि शक्य असेल त्या सगळ्यांना ‘शिव्या’ देत आम्ही गाडीत बसलो होतो. शेवटी ‘सवय’ होऊन आम्ही ‘नॉर्मल’ला आलो आणि गाडी ट्रॅफिकसोबत मुविंग ठेवली. भुशी धरण पार करायला आम्हाला तीन तास लागले होते; जे अंतर आम्ही सकाळी अर्ध्या तासात पार केलं होतं. त्यापुढेही खोळंबा अगदी लोणावळ्यापर्यंत असणार हे जाणून, निरंजनने चलाखीने गाडी फाटकाच्या दिशेने काढली. छोट्या गाडीसाठी तो रस्ता अगदी खराब होता मात्र गाडीची पर्वा न करता त्याने हा निर्णय फक्त मुंबईला लवकर पोहोचण्यासाठी घेतला होता. शेवटी चार तासांचा भरपूर वेळ खाल्ल्यावर आम्ही एक्स्प्रेसवेला लागलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. पाऊसही पुष्कळ होता, त्यामुळे हर्षलाला, अंबरनाथसाठी लोणावळा किंवा खोपोलीला न सोडता वाशीला सोडायचं ठरलं. जेणेकरून ती ट्रेनने खात्रीशीर घरी पोहोचणार होती. गाडी सुस्साट मारून आम्ही तासाभरातच पनवेलला पोहोचलो आणि मोठा हिरमूस झाला. इथेही खूप ट्रॅफिक होतं. आता मात्र वैताग आला होता. पनवेल ओव्हरब्रीज पार करून बिंदू आणि नीलमला खांदेश्वरला सोडलं, पण सानपाडा वाशी मार्गावर पुन्हा निरंजन अडकणार होता म्हणून त्याने गाडी पामबीचमार्गे काढून मला सीवूड्सजवळ सोडलं आणि हर्षलाला वाशीला सोडून तो पुढे वडाळ्याला पोहोचला. नीलम आणि बिंदू साडे दहा, मी अकरा, निरंजन साडे बारा वाजता घरी पोहोचलो. हर्षला सर्वात जास्त उशिरा, म्हणजे एक वाजता पोहोचली होती. ट्रेक वेळेत पूर्ण करूनही ट्रॅफिकमुळे उशीर झाला तर लांब राहणाऱ्या मंडळीचं मला खूप वाईट वाटतं. त्यात ट्रेक जर नेरूळमार्गे असेल तर पहिला उतरणारा मेंबर मी असल्याने असा उशीर झाल्यावर मी जास्तच अस्वस्थ होतो. सगळेजण, उशिरा का होईना पण सुखरूप पोहोचल्याचे कळल्यावर बरं वाटलं. मात्र भुशी धरणाच्या त्या ट्रॅफिकमुळे ‘तुंग नको पण भुशी आवर’ असं वाटू लागलं.

थोडक्यात:
किल्ले तुंग (घुसळखांब, पुणे)
उंची: ३४९४ फुट । श्रेणी: सोपी - ३ । भ्रमंती: उत्तम । ऋतू: सर्व (पावसाळा आल्हाददायक)
लोणावळा ते घुसळखांब - एस.टी. / स्वतःचे वाहन - १ तास
घुसळखांब ते तुंगवाडी - जीप / ट्रेक - अर्धा तास / ट्रेक - दीड तास
तुंगवाडी ते तुंग माथा - ट्रेक - १ तास
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ जास्त लागू शकतो.)

नोंद: वरील लेख, 'प्रहार' वृत्तपत्राच्या 'भन्नाट' या करमणूक विशेष पुरवणीमध्ये ०७ सप्टेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचनासाठी पुढील 'थम्बनेल' वर क्लिक करा.



3 comments:

  1. its is good information about what you have done during the treck . but I dont understand every treck bloger meet some fool and महामूर्ख people only. I never saw any good trecking group meet others . :)

    ReplyDelete
  2. I dont know about other trek (not treck) bloggers, but in my case its not like that. Please read my blog on HarishchandraGad, where we met a helpful uncle who accompanied us till the end of our trek. I would have appreciated if you would have posted this comment with name. Thank you for response.

    ReplyDelete
  3. Thank you Unknown Trecker,
    I will surely keep this in mind henceforth; but will definitely share my all experiences, good or bad, about surroundings or people and everything. As this information, we may feel irrelevant but it surely helps someone sometimes is what I feel. Thank you very much again for your suggestions and will try to follow the same. \m/

    ReplyDelete