भीमाशंकर ते सिद्धगड (२८ जून २०१३) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 28, 2013

भीमाशंकर ते सिद्धगड (२८ जून २०१३)


प्रथमेशने केव्हातरी ‘भीमाशंकर ते सिद्धगड’ ट्रेकबद्दल वाचले होते आणि त्या दिवसापासून तो ट्रेक करण्यासाठी तो माझ्यामागे लागला होता. मीसुद्धा त्याविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली होती तरीही भीमाशंकर हे निबिड अभयारण्य असल्यामुळे मी तो ट्रेक पुढे ढकलत होतो. तेथे रानडुकरे, बिबळे, तरस यांच्या डरकाळ्या ऐकू येत असल्याचे मी वाचले होते. हा ट्रेक अंदाजे २० कि.मी. अंतराचा आहे आणि उन्हाळ्यात येथे पाण्याची कमतरता असल्याने, या ट्रेकबद्दल मी एकूणच उदासीन होतो. मात्र शेवटी होय-नाय करत मी, निरंजन आणि क्षितीज असे तिघे प्रथमेशसोबत या ट्रेकला जायला तयार झालो.

गुगल अर्थ वरून ‘रूट’ फिक्स केला; पण रस्ता जंगलातून जाणार असल्याने ‘वाटाड्या’ घेणे आवश्यक होते. २७ जून २०१३ रोजी, रात्री ११.०८ वाजता शिर्डी पॅसेंजर ट्रेन पकडून आम्ही पुण्याला निघालो. ट्रेनच्या तिकीट बुक केल्या असल्याने आम्ही मस्त झोप काढून घेतली. अंदाजे चार तासांनी जाग आली तेव्हा पुण्यातील पिंपरी स्टेशन आलं होतं. खडकीनंतर ‘शिवाजीनगर’ स्टेशनला उतरण्यासाठी आम्ही दरवाज्याजवळ उभे राहिलो. खणकन एक दगड येऊन बाजूच्या खिडकीवर आदळला. आम्ही जरा चक्रावलो. बाहेर पाहिलं तर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला खडींवर दोन-तीन टवाळ पोरं गाडीवर दगड फेकत होती. आम्ही दरवाजा लावून घेतला. थोड्याच वेळात एका अंधाऱ्या प्लॅटफॉर्मवर गाडी थांबली. दगडाच्या गोंधळात दार लावून घेल्याने कोणता स्टेशन आलं आहे कळलं नाही म्हणून स्टेशनवर बाजूच्या डब्यात गाडीत चढणाऱ्या माणसाला विचारलं. तो “हेच ‘शिवाजीनगर’” उत्तरला. पण तोवर ट्रेन सुरु झाली होती. मी सॅक घेऊन उडी मारली आणि इतर सामान बाहेर प्लॅटफॉर्मवर टाकायला सांगितलं. प्रथमेश काही सामान घेऊन बाहेर उडी मारून आला. धडाधड सामान बाहेर फेकून निरंजन आणि क्षितीज प्लॅटफॉर्मवर उतरले. ट्रेन निघून गेली आणि आम्ही सामान पाठीशी घेऊन बसडेपोवर आलो.


सकाळचे चार वाजले होते. भीमाशंकरला जाणारी पहिली बस साडे पाच वाजता निघणार होती. बसच्या थांब्याजवळच आम्ही खेटून बसलो. डेपोत शेकड्याने प्रवासी झोपले होते. आम्हीही डुलक्या काढून घेतल्या आणि गाडीची घोषणा होताच गाडीत जाऊन बसलो. क्षणार्धात गाडी तुडुंब भरली. धाड्कन दरवाजा बंद करून घेत ‘मास्तर बाईंनी’ गाडी भीमाशंकरकडे सोडली आणि आम्ही झोपेची थकबाकी गोळा करू लागलो. इतके ट्रेक्स केल्यानंतर मला चालत्या उडत्या ‘एस.टी.’त उत्तम झोप काढता येऊ लागली आहे. मात्र इतर मंडळींचे मात्र हाल होत होते. दोन अडीच तासात आम्ही, ट्रेकचा आरंभबिंदू असणाऱ्या ‘कोंढावळे’ फाट्यावर पोहोचलो. तेथे उतरणारे आम्ही चौघेच होतो. फाट्यावर दिसून आलेली झाडी पाहून आणि  झाडीतून येणारे बेडकांचे, पक्ष्यांचे चित्र-विचित्र आवाज ऐकून, आम्हाला आमच्या ‘साहसाची’ कल्पना आली. तेव्हा कोंढावळे गावाकडील रस्त्याने, भीमाशंकरकडे जाणारी, एक जीप आली. आम्ही गावात पोहोचण्याविषयी चौकशी करताच ड्रायव्हरने “आम्ही येऊन सोडतो” असं आम्हाला सांगितलं. ‘गावात वाटाड्या मिळेल का?’ ह्या प्रश्नावर गाडीतलाच एक मुलगा तयार झाला आणि गाडीतून पायउतार झाला. आम्ही पैशाची बोलणी करून घेतली आणि जीप भीमाशंकरकडे निघाली. इथून पुढे निघण्यापूर्वी थोडं ‘हलकं’ होण्यासाठी आम्ही एक एक जण जाऊ लागलो. भीमाशंकरचे प्रवासी पोहोचवून जीप पुन्हा फाट्यावर आली. आम्ही आत (आणि प्रथमेश गाडीच्या टपावर) बसलो आणि गाडी कोंढावळे गावाच्या दिशेने धावू लागली. ‘डांबरी रस्त्यावरील कंटाळवाणी चाल’ डावलण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. वेडी-वाकडी वळणं घेत गाडी त्या चिंब रस्त्यावर धावत होती. किरर्र जंगलातून गावाकडे जाताना निसर्गसौंदर्य पाहण्यात सगळेच रमून गेलो होतो. जंगलटप्पा पार करून आल्यावर समोर डोंगरकुशीत लपलेलं ‘कोंढवळे’ दिसून आलं. रस्त्याच्या चहू बाजूंनी भाताची शेती आणि दूरवर पसरलेलं भीमाशंकर पठार नजरेत सामावत नव्हतं. आम्ही गाडीतून (आणि प्रथमेश गाडीवरून) उतरलो.


इथे पक्का रस्ता संपला होता आणि कच्चा सुरु झाला होता. पुन्हा सामान पाठीवर लादून आम्ही वाटाड्यासोबत चालू लागलो. एरव्ही भराभर चालून लवकर ट्रेक ‘कम्प्लीट’ करणारा प्रथमेश या ट्रेकला मागे राहून फोटो काढण्यात गुंग होता. वाटाड्यासोबत बोलताना त्यांचं नाव ‘बाळू कोंढवळे’ आहे असं कळलं. पण आम्ही सगळ्यांनी त्याला कधीच ‘भाऊ’ करून टाकलं होतं. त्याच्या सोबत तो कच्चा रस्ता तुडवत आम्ही त्या रम्य वातावरणातून पुढे जात होतो. थोड्याच वेळात आम्ही कोंढावळेपुढील ‘गावंडेवाडी’ येथे पोहोचलो.


खळाळणारा एक मोठा ओढा, त्यावरील पूलाच्या साह्याने पार करून आम्ही त्या गावात प्रवेशलो. गावंडेवाडीत भाऊचं घर होतं. त्याच्या घरात जाऊन आम्ही गरमागरम कोरा चहा घेतला आणि सोबत आणलेले केक्स आणि चिवडा खाल्ला. गावातली माणसं, राणीच्या बागेत एखादा नवा पाहावा अश्या मुद्रेने आमच्याकडे पाहत होती. पाणी भरून घेतलं आणि पुढे निघालो. आता मात्र पाऊस सुरु झाला होता. भाऊनी इरल्यात तर इतर तिघांनी स्वतःला रेनकोटात कोंबून घेतलं. या सर्व गोष्टींचा काहीच फायदा होत नाही हे माहित असल्यामुळे मी असाच पुढे निघालो. अंगावर पावसाच्या थंड पाण्याचे थेंब झेलण्यातली मजा काही औरच!! कच्च्या रस्त्यावरून आम्ही वळणांवर वळणं घेत जसे जसे पुढे जात होतो तस तसे भीमाशंकर पठाराची भव्यता लक्ष्यात येत होती. मध्येच एका सुंदर धबधब्यावर आम्ही सर्वांनी फोटो काढून घेतले आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. अदमासे दोन तास ते पठार तुडवल्यावर आम्ही ‘भट्टी’च्या रानात पोहोचलो. कच्चा रस्ता मधेच सोडून डावीकडील पायवाटेने या भागात यावे लागते.
इथे प्रचंड जंगल आहे आणि आत शिरल्यावर माणूस हमखास वाट चुकलाच पाहिजे असा चकवा आहे. इथे पोहोचलो असण्याची खुण म्हणजे इथे फॉरेस्ट ऑफिसची लोखंडी मचाण उभी केली आहे. आता ती अत्यंत दयनीय अवस्थेत असली तरीही या ट्रेकला येणाऱ्या मंडळींसाठी ही खुण खूप उपयुक्त आहे. मचाण मागे टाकत आम्ही भाऊच्या मागोमाग, उत्तरेला, किरर्र झाडीत शिरलो. इथे मात्र भाऊला सोबत घेण्याचा निर्णय बरोबर असल्याचे कळून आले. जंगलात पायवाट अशी नव्हतीच. दाट झाडीतून मार्ग काढत, लहान मोठे चढ चढत उतरत आम्ही तो टप्पाही पार केला आणि एका प्रचंड घळीच्या तोंडाशी येऊन पोहोचलो.


गेले चार तास आम्ही चालत होतो. दुपारचा एक वाजून गेला होता आणि पाऊस वेड्यासारखा बरसत होता. यालाच सिद्धगड घाट किंवा गायदरा घाट म्हणतात. घळीतून खाली साखरमाची पठार अधुंक दिसून येत होतं. इथून पुढे जाण्याआधी पोटपूजा करून घ्यावी असा ठराव पास झाला मात्र पाऊस पडत असल्याने उभ्या उभ्याच तिखट शेव, कुरमुऱ्याचा चिवडा खाऊन घेतला आणि घळीत उतरायला सुरुवात केली. एक एक पाउल नीट ठेवत, त्या घळीतल्या निसरड्या दगडांवरून आम्ही खाली उतरत होतो. उजव्या बाजूला अहुप्या तर डाव्या बाजूला दमदम्या डोंगरांचे कडे नजरेत सामावत नव्हते. त्यावरून, कित्येक मीटर खोल दरीत कोसळणारे धबधबे अंगावर काटा आणत होते.
संपूर्ण ट्रेकदरम्यान, जंगलात कोणत्यातरी पक्ष्याची, लांबच लांब आणि अविरत शिळ मात्र सतत सोबत करत होती. चाळीस एक मिनिटे खाली उतरल्यावर, एका धबधब्यातून आडवे जात आम्ही डावीकडे वळलो. पुढील संपूर्ण वाट जंगलातून, डोंगरातून डावीकडे आडवी जात होती. खाली उचले, नारिवली गावे दूरवर दिसून येत होती. हळू हळू सिद्धगडाची लिंगी आणि त्यामागे धुक्यात हरवलेला सिद्धगडाचा उभा डोंगर दिसून आला. सव्वा दोन तासांच्या आसपास आम्ही सिद्धगडाच्या टप्प्यात आलो होतो. दुपारचे सव्वा दोन वाजत आले होते. इथून फक्त १५ मिनिटांवर सिद्धगडचा दरवाजा आहे असं भाऊकडून कळलं आणि दुपार होऊन गेल्याने त्याला परत मागे फिरणं आवश्यक आहे हे ही त्याने सांगितलं. त्याला त्याचं ‘मानधन’ दिलं आणि त्याने आमचा निरोप घेतला.
भराभर मागे फिरत तो पुन्हा जंगलात नाहीसा झाला आणि आम्ही पुढे निघालो. पाऊस बऱ्यापैकी थांबला होता पण धुकं खूप होतं. इथे काळ्या तोंडाच्या वानरांनी आम्हाला पाहिल्यावर गोंगाट सुरु केला मात्र आम्ही झपाझप पावलं टाकत पुढे जात होतो. वानरांना मागे टाकून थोड्याच वेळात आम्ही सिद्धगडच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो.


कोंढावळ्याहून सहा तास चालून, गायदरा घाट उतरून आम्ही सिद्धगडाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. बाजूच्या छोट्या पठारावरील रिकामी घुमटी आणि अवशेष पाहून आम्ही गडात प्रवेश केला. थोडे वर दिसणारे तांदळादेवीचे देऊळ नंतर पहायचे ठरवून आम्ही सिद्धगड वाडीकडे निघालो. १०-१५ मिनिटांमध्ये आम्हाला एक घराची भिंत दिसून आली आणि आम्ही सिद्धगड वाडीत पोहोचलो. सुरुवातीची ती घरासारखी इमारत म्हणजे गावातील शाळा होती; जी बंद असते. शाळेजवळील घरात जाऊन, एका मामांकडे, आम्ही राहण्या-जेवणाची चौकशी केली. त्यांनी आमच्यासाठी चहा आणि रात्रीचं जेवण बनविण्याची तयारी दाखवली, मात्र राहण्यासाठी शाळेची ओसरी वापरण्यास सांगितली. आम्ही आमचं सामान त्यांच्या घरात ठेवून कपडे बदलून घेतले आणि ओले कपडे घराच्या पडवीत सुकत ठेवले. तोवर मामांच्या सुनेने बनवलेला गरमागरम कोरा चहा आला, तो घेतला. चहा सोबत प्रथमेशनी सोबत आणलेल्या ब्रेड-चीज-काकडी आदी साहित्यापासून चीज सँडविच बनवून खाल्लं, मी आणलेली इंस्टंट भेळ, क्षितीजने पराठे तर निरंजनने पोळी आणि मुरंबा आणला होता; तो ही चापला. दुपारी असा मस्त ‘लंच’ करून आम्ही शाळेच्या ओसरीवर आलो आणि गप्पांचा कार्यक्रम सुरु झाला. अचानक समोर लक्ष गेलं आणि गोरखगडाचा सुळका नजरेसमोर आला. सिद्धगड वाडी धुक्याने वेढली गेली असल्यामुळे तो दिसून आला नव्हता. आम्ही कॅमेरे घेऊन त्या दिशेला धावलो आणि सटासट फोटो काढून घेतले. तेवढ्यात पुन्हा एकदा एका धुक्याच्या मोठ्या लोटाने सिद्धगड बालेकिल्ला आणि माचीचा भाग कवेत घेतला आणि आम्ही पुन्हा त्यात हरवून गेलो.

मामांची हाक ऐकू आली तेव्हा कळलं की आमच्या गप्पांमध्ये रात्रीचे साडे सात कधी वाजून गेले होते. जेवण तयार झालं होतं. दुपारीही फराळाचे पदार्थच खाल्ले होते त्यामुळे भूकही दुणावली होती. आम्ही घरात शिरलो. मामांचा, २ वर्षांचा गोंडस नातू, ‘गौरव’ घरात लडिवाळ आवाजात छान बोलत होता. गावात, दिवसातून थोड्या वेळासाठी वीजपुरवठा असतो; त्यावेळात मंडळी ‘सासू-सुनेचे’ कार्यक्रम टी.व्ही.वर पाहण्यात गुंग होती. ताईंनी ताटं मांडली, आम्ही पाटावर जाऊन बसलो. अगदी अगत्याने, गरमागरम वरणभात आणि चवळीची रस्सा भाजी, आमच्या पानात सढळ हस्ते वाढली गेली. बाहेर रिमझिम बरसणाऱ्या थंड पावसात, नाही म्हटलं तरी त्या गरमागरम जेवणाचे काही घास जास्तच गेले हे मात्र नक्की. गावच्या विहिरीचं माठातून ग्लासात आलेलं थंडगार पाणी पिऊन तृप्त झालो. तेवढ्यात वीज गेली आणि घासलेटचे दिवे प्रज्वलित झाले. त्या दिवांच्या प्रकाशात घरातल्या मंडळींसोबत थोड्या गप्पा सुरु झाल्या. गावातील जवळपास सर्वचजण नोकरी-धंद्याच्या शोधात खाली, नारिवली, बोरवाडीत स्थायिक झाली आहेत. केवळ शेती आणि वंशपरंपरेमुळे, ३-४ घरे गावात टिकली होती. त्यापैकीच मामांचं घर होतं. मामांनंतर आता मामांचा मुलगा शेती करतो, बकऱ्या चरायला नेतो. घरातील बायका घरातली कामं करतात. शेतीला मदत करतात. किराणा-भुसार सामान मात्र, खालून, नारिवली-उचल्याहून आणावं लागतं. गावातील विजेचे खांब, लोखंडी सामान, टी.व्ही. इत्यादी गोष्टी त्यांनी डोक्यावर लादून आणल्या होत्या हे कळल्यावर तर आम्ही गारच झालो. साडे आठ वाजत आले तसं आम्ही बॅगांतून स्लीपिंग बॅग्स, मॅट्स आणि टॉर्चस् काढून घेतल्या आणि मामांचे आभार मानत शाळेच्या ओसरीवर पोहोचलो. पण पाऊस जोरात होता म्हणून दरवाजा ढकलून शाळेत शिरलो. गावातील काही मुले इथे रोज झोपायला असतात. गडबड-गोंगाट करणाऱ्या ट्रेकर्सना ती आत झोपू देत नाहीत असं मामांनी सांगितलं होतं पण आम्ही असे नव्हतो; म्हणून आतच माझ्याकडील ६ बाय ८ फुट प्लास्टिकचा मोठा तुकडा अंथरला आणि त्यावर आपापल्या पांघरुणात शिरून मस्त झोपी गेलो.


“ओ, मुंबईकर.. ओ, मुंबईकर..” अश्या मोठमोठ्या हाका ऐकून निरंजन जागा झाला आणि आम्हालाही उठावलं. आम्ही झोपेतच इशाऱ्याने ‘काय झालं?’ असं विचारलं तर ती मुलं म्हणाली, “तुमी आसं मदे झोपाल तर मंग आमी कुठं झोपायचं?’ खरंतर आम्ही एका कोपऱ्यालाच झोपलो होतो पण तरीही उगाच रात्री वाद नको म्हणून थोडे आणखी सरकून परत झोपी गेलो. मस्त साखरझोप पूर्ण करून सकाळी सहा वाजताच्या सुमारास अलार्ममुळे जाग आली. बाहेर दणदणीत पाऊस कोसळत होता. सकाळी पाऊस नसेल तर किल्ला पहायचा अथवा नाही हे आदल्या दिवशी ठरवल्यामुळेच आम्ही सर्वांनीच पुन्हा पांघरुणात स्वतःला कोंबून घेतलं आणि झोपी गेलो. पुन्हा आठ वाजता नीट झोप पूर्ण झाल्यावर सगळेच उठलो आणि आळीपाळीने सकाळचे विधी आटोपून घेतले. मामांच्या घरी कोरा चहा आमची वाट पाहातच होता. गरमागरम चहा पिऊन घेतला. मग आदल्या दिवशीचे सुकत ठेवलेले, पण अजूनही पूर्ण न सुकलेले कपडे पुन्हा अंगावर चढवून, सामान आवरून घेतलं. मामा बाहेर गेले होते त्यामुळे त्यांच्या कुटुंबाकडे ‘मानधन’ देऊन निरोप घेऊन आम्ही गड उतरायला सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे वाटेतील तांदळादेवीचं देऊळ पाहून घेतलं. देवळाच्या आवारात अनेक भग्न मूर्ति आणि विरगळ पडून आहेत. ह्या देवळातही क्वचित १०-१२ जणांच्या राहण्याची सोय होऊ शकते. देऊळ पाहून आम्ही घळीतल्या ओढ्याच्या वाटेने गड उतरू लागलो. ही वाट चांगली मळलेली होती. मात्र प्रत्येक टप्प्यावर त्या गावातील लोकांनी, त्या अवजड वस्तू डोक्यावरून आणताना केलेल्या कष्टांची आठवण होत होती आणि आपण खरंच किती भाग्यवान आहोत याचा प्रत्यय येत होता. तासभर घळीतून उतरल्यावर आम्ही जंगलाच्या टप्प्यात पोहोचलो. ही वाट एकदम सोपी आणि मस्त होती. पाऊस थांबला होता आणि आमचे अंगावरचे कपडेही सुकले होते. मस्त गप्पा मारत आम्ही हा टप्पाही पार केला.


आम्ही आता शेतात उभे होतो, मागे वळून पाहिलं तर डाव्या बाजूला आहुपे आणि उजव्या बाजूला सिद्धगडाचे कडे भेदक दर्शन देत होते. कित्येक शतके ध्यानस्थ मुद्रेत घोर तपश्चर्या लावून बसल्यासारखे ते तटस्थ खडे होते. त्यांचं दर्शन मनात साठवून पुन्हा वाटेला लागलो. शेतातील बांधावरून वाट तुडवत आम्ही पायवाटेवर आलो. पुढे दोन तीन ओढे पार करत आम्ही सिद्धगड पाड्यात पोहोचलो. मात्र ह्या शेवटच्या टप्प्यात जोरदार पाऊस सुरु झाला आणि आम्ही पुन्हा चिंब भिजून गेलो. पाड्यातून अगदी १५-२० मिनिटांमध्ये आम्ही उचल्याला पोहोचलो. दुपारचे अडीच वाजले होते आणि त्या वेळेस देहरीहून मुरबाडला जाणारी एस.टी. आम्ही पकडू शकणार होतो. चिंब भिजल्याने एस.टी.मध्ये बसायची पंचाईत होणार होती पण इलाज नव्हता. इथून जीपची सोयही होते पण सगळ्या जीप देहरीहून भरून येत असल्याने आम्हाला त्यात जागा नव्हती. वेळ असल्याने जवळ असलेल्या एका दुकानावर आम्ही ‘७ अप’ प्यालो आणि थंड झालो. १५-२० मिनिटे होऊनही, जेव्हा ती एस.टी. आली नाही तेव्हा मात्र आम्ही अस्वस्थ होऊ लागलो. तीन वाजून गेले तेव्हा जवळच उभे असलेले एक काका आमच्या दिशेने आले आणि म्हणाले, “बहुतेक एस.टी. आता येणार नाही. पुढली थेट ५ वाजता आहे. त्यापेक्षा नारीवलीला जाउन तिथून एस.टी. पकडू..” दोन दिवस चालण्याने आमच्यापैकी कोणीच या गोष्टीसाठी उस्तुक नव्हतं पण दुसरा पर्याय नव्हता. मी म्हणालो, “इथे बसूनही पुढली एस.टी. तरी नक्की येईल याची खात्री नाही, त्या पेक्षा या काकांबरोबर जाऊन नारिवलीहून पुढे जाऊ.. पाऊसही थांबला आहे; चालत निघालो तर अंगातील गर्मीने कपडेही सुकतील.” सगळे तयार झालो आणि सामान पाठीशी लावून चालू लागलो. काकांसोबत गप्पा मारत रमत गमत आम्ही, २० मिनिटांत नारिवलीला पोहोचलो.


तेवढ्यात एक रिकामी जीप समोर आली आणि ड्रायव्हरने, “कुठे जाणार?” असं विचारलं. आम्ही एकमुखाने ‘मुरबाड’ असं सांगितलं आणि तो तयार झाला. आम्ही गाडीत शिरलो, गाडी सुरु झाली. भूक लागली होती म्हणून बॅगेतून ‘कडबोळी’ काढून आम्ही ती खाऊ लागलो. जीपमध्ये ड्रायव्हर इतर प्रवासीही भरत होता आणि जीप ‘ऑप्टीमम युटीलाईज’ करत होता. एक एक गाव मागे टाकत आम्ही ‘मुरबाड’ला पोहोचलो. तिथून बस पकडून पुढे ‘कल्याण’ गाठलं आणि मग लोकल ट्रेनने मुंबईचा ‘रस्ता’ धरला.


थोडक्यात:
भीमाशंकर - सिद्धगड - नारिवली (कोंढवळ, पुणे / नारिवली, ठाणे)
उंची: भीमाशंकर - ३२७६ फुट, सिद्धगड - ३१९२ फुट । श्रेणी: मध्यम - १ । भ्रमंती: उत्तम । ऋतू: हिवाळा
शिवाजीनगर बसस्थानक ते कोंढावळे फाटा - एस.टी. - २.३० तास
कोंढावळे फाटा ते कोंढावळे - जीप - अर्धा तास / ट्रेक - दीड तास
कोंढावळे ते गायदरा/दमदम्या - ट्रेक - तीन तास
गायदरा ते सिद्धगड - ट्रेक - सव्वा तास
सिद्धगड ते सिद्धगड माची - ट्रेक - १५ मिनिटे
सिद्धगड ते उचले - ट्रेक - दोन तास
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ जास्त लागू शकतो.)

नोंद: वरील लेख, 'प्रहार' वृत्तपत्राच्या 'भन्नाट' या करमणूक विशेष पुरवणीमध्ये २७ जुलै २०१३ रोजी प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचनासाठी पुढील 'थम्बनेल' वर क्लिक करा.


No comments:

Post a Comment