हानिकारक ‘नाईट ट्रेक्स’ - सह्य-भ्रमंती

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, January 3, 2014

हानिकारक ‘नाईट ट्रेक्स’

आजकाल बाजारात ‘नाईट ट्रेक्स’ हे एक नवीन वेड आलं आहे. यात नवख्या लोकांना एखाद्या ट्रेकला रात्रीच्या वेळी घेऊन जातात. खरं तर यात आपल्यातील अनेक जण नकळत सामील होतात, पण त्यांना नाईट ट्रेक्सदरम्यान होणाऱ्या परिणामाची जाणीव नसते. त्याचे गांभीर्य जर का ट्रेकर्सना कळले तर कदाचित खरे ‘सह्याद्री मित्र’ कधीच नाईट ट्रेक्स करणार नाहीत. वरील परिणामांचे गांभीर्य लक्षात यावे म्हणून ह्या लेखाचे प्रयोजन:

IMG03050-4c

पाश्चात्य देशांमधील अनेक गोष्टींची आपण नकल करायला जातो आणि आपल्याच पायावर धोंडा मारून घेतो, याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. रात्र भ्रमंती, म्हणजेच ‘नाईट ट्रेक्स’ हा यातीलच एक प्रकार. नाईट ट्रेक्सचे दुहेरी दुष्परिणाम आहेत. याचा मनुष्य व निसर्ग या दोघांनाही धोका आहे.

सगळ्यात आधी आपण निसर्गावर याचे काय परिणाम होतात ते पाहू. हे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी थोडा विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण रात्रीचे का झोपतो? आपली झोप जर पूर्ण झाली नाही तर काय होईल? तर काय होईल? या विचारांपासून आपण सुरुवात करूया! आणि यातून निसर्ग व इतर प्राणी मात्र यांवर होणारे दुष्परिणाम कळून येतील.

माणसांप्रमाणेच इतर अनेक सजीव जसे प्राणी, पक्षी आणि वनस्पती इत्यादी रात्री झोपतात. प्रत्येकाला झोप आवश्यक असते. अनेकदा ट्रेकिंगच्या मार्गावर पशु-पक्ष्यांचा वास असतो. दिवसा ते भक्ष्याचा शोधात जरी तिथे नसले तरी रात्रीच्या वेळी ते आराम करत असतात. नाईट ट्रेक्समध्ये अश्या पशु-पक्ष्यांचा जीवनक्रमाला धक्का पोहोचतो. आपल्यातील अनेक नवखी आणि उत्साही मंडळी, त्यांच्या आरडा-ओरड्याने व गोंधळाने पशु-पक्ष्यांना बिचकावतात. खूप पशु-पक्षी हे त्यांच्या निवासाच्या ठिकाणी रुळलेले असतात; अश्या वेळेला त्यांच्या जीवनात जर वारंवार व्यत्यय येत राहिला, तर त्या अधिवसाला कंटाळून हे पशु-पक्षी स्थलांतर करू लागतात. स्थलांतर करीत असताना कित्येक प्राणी मृत्युमुखी पडलेले आपल्याला बातम्यांतून कळते. अश्याने सजीव सृष्टीला आपण हानी पोहोचवतो.

lookoutsquirRussells+viper++(MCBT+07)+copy-756711

निशाचर जीव (साप, नाग, कोळी इ.), सरपटणारे प्राणी रात्रीच्या वेळी त्यांचे भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडतात. ट्रेकर्सना विषारी-बिनविषारी प्राण्यांचे चांगले(?) ज्ञान असल्यामुळे त्यांना फोटोग्राफीसाठी पकडण्यात येते व त्यांच्यासोबत फोटो काढून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. पण पशु-पक्षी हे मुळात खूप भित्रे असल्यामुळे आपल्या हाताळण्याने किंवा त्यांना घाबरावल्याने या प्राण्यांच्या शरीरात भीतीने Lactic Acid तयार होते. या अॅसिडचे शरीरातील प्रमाण वाढल्यास तो प्राणी दगावू शकतो. मग तुम्हीच विचार करा की एखादा साप किंवा पक्षी तुमच्या हाती लागल्यास आणि तुम्ही सगळे जण जर त्या प्राण्याला हाताळून त्या सोबत फोटो काढत राहिल्यास त्याची काय अवस्था होत असेल.

रात्री ट्रेक करताना तुमच्या पायाखाली किती लहान-सहान जीव मारले जात असतील?, याची त्या अंधारात तुम्हाला कल्पना देखील नसेल. दिवसा किमान पायाखालची वाट दिसत असल्याने अश्या घटना घडत नाहीत.

हे झाले निसर्गावर होणारे दुष्परिणाम. आपण कितीही म्हटलं तरी नाईट ट्रेक्समध्ये आपण निसर्गाला हानी पोहोचावतोच. पण आपण इतके स्वार्थी झालो आहोत की याचे भान आपल्याला राहत नाही. आता नाईट ट्रेक्सचा मनुष्यप्राण्यावर काय परिमाण होतो ते पाहू.

नाईट ट्रेक्समध्ये विचारपूर्वक आखणी करणारे ट्रेकर्स फारच कमी असतात. अगदी ‘डोंगरयात्रा’ या ट्रेकिंग वरील उत्तम पुस्तकात देखील रात्रीच्या आधी मुक्कामस्थळी पोहोचण्याचे आवाहन माननीय लेखक आणि कसलेले गिर्यारोहक आनंद पाळंदे करतात. याचे कारण निसर्गावरील दुष्परिणाम हेच आहे. नाईट ट्रेक्समध्ये सामील होणारी मंडळी साहसाच्या नावाखाली बाहेर पडलेली असतात आणि यामध्ये अपघात होण्याची शक्यता जास्त असते. ट्रेकिंग मधील सोपा नियम म्हणजे, ‘खबरदारी इतकी घ्या की अपघातच होणार नाही’. अपघात घडल्यानंतर त्यात घाई दाखवणे हा शहाणपणा नाही. माणसाची दृष्टी नाईट ट्रेकसाठी बनलेली नाही, कारण माणूस निशाचर प्राणी नाही. रात्रीच्या वेळी झोपेचं खोबरं करून, केवळ वातावरण गार असतं आणि थकवा कमी येतो म्हणून नाईट ट्रेक करणं म्हणजे शुद्ध गाढवपणा. नाईट ट्रेकमध्ये सुरेख आकाशदर्शन होतं, चित्तथरारक अनुभव येतात असं म्हणून ट्रेक करणारेही त्यांच्यापेक्षा काही वेगळे नाहीत. कारण दिवसा ट्रेक करून मुक्कामाच्या ठिकाणीही असे अनुभव, निसर्गाला धक्का न पोहोचवता घेता येतात, ह्या मताशी वरिष्ठ आणि अनुभवी ट्रेकर्स सहमत असतीलच.

रात्रीच्या वेळी धडपडत, ठेचकाळत डोंगर-दऱ्यांतून, प्रामुख्याने घसाऱ्यावर ट्रेक करणे अतिशय धोकादायक आहे. अश्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघात घडल्यास परिस्थितीला सामोरे जाणे महाकठीण कर्म होऊ शकते. एखादा सदस्य दरीत घसरल्यास दिवसा किमान अपघातग्रस्त व्यक्ती जिथे पडली आहे, त्या ठिकाणाचा पत्ता लावणे सोपे जाते. अश्यावेळी मदत करणे खूप कठीण होऊन जाते. एकाद्या ट्रेकरला साप, विंचू तत्सम जनावर चावल्यास, त्याला रात्रीच्या वेळी लवकरात लवकर सुखरूप स्थळी पोहोचवणे जवळपास अशक्य. निशाचर प्राण्यांपासून किमान दिवसा असे हल्ले वाचवता येऊ शकतात. रात्री जंगलटप्प्यांमध्ये मच्छर, कीटकांचा त्रास होऊ शकतो. मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई, चूल पेटवणे, इत्यादी कामे सूर्यप्रकाशात जास्त चांगल्या तऱ्हेने करता येतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या दिनचर्येनुसार, दिवसा ट्रेक केल्याने रात्रीच्या झोपेची वाट लागणार नाही व दिवसा भ्रमंती करून स्थळांना भेटी देणं सोपं होईल. मुक्कामाच्या ठिकाणी जेवण झाल्यावर चांदण्या रात्री आरामात आकाशदर्शनही करता येईलच.

पाहिलंत? एक साधा प्रश्न आपल्याला किती उत्तरं देऊन गेला? एवढे सगळे दुष्परिणाम कळल्यावर मला खात्री आहे की निसर्ग जतनासाठी व किमान स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आपण ‘सह्याद्री मित्र’ नाईट ट्रेक्स करणे थांबवू.. हैप्पी ट्रेकिंग..

(सदर लेख ‘सह्याद्री – कणा महाराष्ट्राच्या’ ह्या ई-मासिकाच्या जानेवारी २०१४ अंकात प्रसिद्ध झाला आहे. http://www.sahyadri.net/1/post/2014/01/6.html)

No comments:

Post a Comment