बागलाणातील मुल्हेर – मोरा (१४ - १५ नोव्हेंबर २०१३) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 15, 2013

बागलाणातील मुल्हेर – मोरा (१४ - १५ नोव्हेंबर २०१३)

साल्हेर – सालोटा – मुल्हेर – मोरा – हरगड. जर तुम्ही ट्रेकर नसाल तर तुम्हाला ही नावे म्हणजे फक्त ५ शब्द वाटतील; पण जर तुम्ही हाडाचे ट्रेकर असाल तर मात्र तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. कारण सह्याद्रीतील काही जबरदस्त डोंगरयात्रांपैकी ही मोहिम आहे. अनेक दिवस किंबहुना महिने विचारविमर्ष करून ह्या ३ दिवसीय मोहिमेची तयारी सुरु होती. परंतु (नेहमीप्रमाणे) शेवटच्या क्षणी चाळणीत मी, निरंजन आणि प्रथमेश तिघेच उरलो; त्यामुळे डोक्याची चाळण झाली ती वेगळीच. तिघेच उरल्यामुळे भाड्याची गाडी घेणं परवडणार नव्हतं त्यामुळे सार्वजनिक वाहनांनी प्रवास करावा लागणार होता. तरीही शेवटी तिघेच जायचंच असं ठरलं. मी आणि निरंजनने आपापल्या ऑफिसमध्ये सुट्ट्या टाकल्या; प्रथमेश फोर्थ यीअर इंजिनीरिंग परीक्षेसाठी घरीच होता. निरंजनच्या संशोधनात एस.टी.ची ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजना समोर आली होती. त्यामुळे तिचा फायदा होतो की नाही हे ताडून पाहण्यासाठी आम्ही या योजनेचा, ४ दिवसांचा पास काढून घेतला.

प्लाननुसार नोव्हेंबर १४ तारखेला सकाळी ०६:२० वाजता दादर पूर्व बसथांब्याजवळ भेटायचं ठरलं; कारण त्यावेळेत नाशिकला जाणाऱ्या २ – ३ बस होत्या. मी आणि निरंजन वेळेत हजर झालो पण गेल्या २-३ ट्रेकचा नियम न मोडत प्रथमेश भाऊ साडे सहा नंतर प्रवेशले. तोवर नाशिकच्या दोन बस निघून गेल्या होत्या. नाईलाजाने ०६:४५ ची एशियाड बस पकडून आम्ही नाशिकला रवाना झालो. गाडी जवळ जवळ पूर्ण रिकामी होती. त्यामुळे १२-१५ किलोच्या आमच्या बॅगा रॅकमध्ये ठेवण्यात काही त्रास झाला नाही. प्रथमेश एक पिशवी खूप सांभाळत होता; विचारलं तेव्हा कळलं की त्यात त्याने रात्रीच्या जेवणासाठी उकडलेली अंडी आणली होती. आम्ही कोपरापासून हात जोडले. मस्त प्रवास सुरु झाला पण माशी शिंकलीच. गाडीच्या इंजिनमध्ये काही प्रोब्लेम होता की ड्रायव्हरच्या ते माहित नाही पण गाडी खूप हळू चालत होती. ठाण्याला पोहोचायलाच तासभर गेला. त्यात अर्धा-पाऊण तास इगतपुरीजवळ एका धाब्यावर जेवणात गेला. रडत खडत नाशिकला कसेबसे १ वाजता पोहोचलो. त्या बसच्या मागून तासभर उशिरा निघालेली ‘सटाणा’ बसही पुढे निघून गेली होती. नाशिक सीबीएस वरून आम्ही त्या बोजड बॅगा घेऊन ओल्ड नाशिक सीबीएसला धावलो. तिथे ताहराबाद गाडीत जाऊन बसलो. ती बस निघायला अर्धा तास होता. त्यातील प्रवाशांना विचारल्यावर, नाशिक ते ताहराबाद हे अडीच तासांचं अंतर आहे हे कळलं आणि पुढला सगळा प्लान बोंबलण्याच्या मार्गावर असल्याचं जाणवलं. नशिबाने आम्ही अल्टरनेट प्लान रेडी ठेवला होता. त्यानुसार पहिले साल्हेर सालोटा करण्याऐवजी आम्ही मुल्हेर मोरागडला प्रायोरिटी दिली. पण पहिल्याच दिवशी प्रवासात एवढा वेळ गेल्याने आम्ही मुल्हेर माचीवर जाऊन राहायचे ठरवले. त्यानुसार ताहराबादला पोहोचल्यावर पुढली एस.टी. पकडून मुल्हेर गाव गाठले. मुंबईहून इथे पोहोचण्यासाठीच आम्हाला दुपारचे साडे तीन वाजले होते. इथून पुढे वाहनाची काहीच सोय नसल्याने ’११’ नंबरच्या गाडीने डांबरी रस्ता तुडवत आम्ही मुल्हेरमाचीकडे निघालो.

२० मिनिटांचा तो कंटाळवाणा रस्ता पार केल्यावर आम्ही शेतांतून वाट काढत आम्ही मुल्हेरमाचीची वाट धरली. शेतातल्या हातपंपावर पराठे खाऊन घेतले, पाणी भरून घेतलं आणि वाटेला लागलो. समोर मोरागड, मुल्हेर आणि उजव्या हाताला उंच हरगड दिसत होते. त्यांच्या मागे सूर्य हरगडामागे लपत होता. वाटेत एक ग्रुप दिसला. चौकशी केल्यावर कळलं की ते शिवशंभू मंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि किल्ल्यावर संवर्धनाचे काम करत आहेत. पुढे गडाचे दोन भग्न दरवाजे पार करत आम्ही माचीत प्रवेश केला. हातपंपापासून माचीत प्रवेश करायला साधारण पाऊण तास लागला होता. समोरच शेवाळलेलं पाणी साठवून असलेल्या मोठ्या हौदामागे गणेश मंदिर दिसून आले. ते नीट पाहून आम्ही सोमेश्वर मंदिराकडे निघालो. माचीवर खूप झाडी माजली होती. त्यातून सोमेश्वर मंदिर हुडकणे मळलेल्या वाटेमुळे सोपे होते. मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा तेथील जटाधारी साधूने आमच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि मंदिरामागील त्याच्या खोलीत गेला. हा साधू खूप सनकी आणि मुडी असल्याचं इंटरनेट आणि ब्लॉग्सवर वाचलं होतं. देवळात राहण्यास तो मनाई करतो हेही ऐकून होतो, त्यामुळे त्याच्या त्या दुर्लक्षाने आम्ही हिरमुसलो. कारण अंधार झाला होता आणि ह्या जंगलात बिबळे वाघ होते त्यामुळे रात्रीच्या मुक्कामासाठी (त्यातल्या त्यात) एकमेव सुरक्षित स्थान म्हणजे हेच सोमेश्वराचं देऊळ हेच होतं. आम्ही मंदिराच्या ओट्यावर बॅगा टाकल्या आणि अंग मोकळं केलं. तेवढ्यात तो साधू बाहेर आला आणि मला बोटाच्या इशाऱ्याने जवळ बोलावलं. गोंधळून मी विचारलं. “कौन मै?” “हां, आप.. इधर आईये” असं म्हणत त्याने चहाचा पेला मला दिला. सनकी बाबाने चक्क गरमागरम चहा ‘ऑफर’ केलेला पाहून आम्ही सुखावलो, त्यात मला सर्दी झाली होती त्यामुळे तो चहा मला अमृतासमान होता. पेला एकच असल्याने मी इतर दोघांना ‘सीप’ मारणार का विचारलं. त्यांनी नकार देताच मी तो पिऊ लागलो आणि बाबाने आमच्याशी गप्पा सुरु केल्या. रात्रीच्या मुक्कामाची सोय झाल्याची खात्री झाल्याने आम्ही जास्त आनंदात होतो. अंधारासोबत थंडी वाढत होती, साधूबाबाबरोबरच्या माझ्या गप्पा रंगत आल्या होत्या तोवर निरंजन आणि प्रथमेश देवळातील मुक्कामासाठी आणि जेवणासाठी तयारी करू लागले. या वेळेला प्रथमेश जेवण तयार करणार होता. त्यासाठी आम्ही सगळ्यांनीच थोडं थोडं साहित्य आणलं होतं. चांगल्या तासभर गप्पा मारल्यावर साधूची परवानगी घेऊन मीसुद्धा देवळात आलो.


  

हेडलँप आणि टॉर्च घेऊन प्रथमेश जेवणासाठी कांदा, टोमॅटो इ. चिरत होता. निरंजन त्याला मदत करत होता. माझ्याकडे चूल पेटवायचं काम आलं; पण माचीत खूप थंडी असल्याने लाकडांवर दव जमून ती ओली झाली होती. आमची चूल पेटवून जेवण बनवण्याची पहिलीच वेळ असल्याने ते काम कठीण होऊन बसलं होतं. काही वेळ पेट घेऊन काटक्या विझून जात होत्या आणि धूर करत होत्या. त्या झोंबऱ्या धुराने एवढ्या थंडीतही माझी सर्दी पातळ झाली होती. निरंजनची चिडचिड होत होती कारण चुलीशिवाय जेवण शक्य नव्हतं. प्रथमेशही हिरमुसला होता. तासभर त्या चुलीशी मारामारी करून चूल पेटविण्याचा भरपूर अनुभव घेऊन झाल्यावर, शेवटी नाईलाजाने मी माझ्या सर्व्हायवल कीटमधून फ्लेमो क्युब्स बाहेर काढले आणि काटक्यांच्या सरपणाला त्याची जोड दिली. एक दीड इंचाच्या त्या लहान गोळ्यांवर आम्ही जेवण बनवलं. बिर्यानीसारखा भात आणि जाड रस्सा. देवळाच्या बाहेरील कोपऱ्यात हे सगळं बनवून त्यात मुंबईहून सांभाळून आणलेली अंडी घातली आणि मस्ट अंडा करी राईस तयार झाला. प्रथमेशच्या कष्टांचं चीज झालं होतं यात आनंद होताच पण पठ्ठ्यानं खरंच मस्त जेवण बनवलं होतं. पोटपूजा झाल्यावर प्लास्टिकची शीट अंथरून त्यावर सतरंजी घालून अंथरूण तयार केलं. स्लीपिंग बॅगा पसरून आम्ही पुन्हा साधूबाबांची चौकशी करायला देवळामागे गेलो. बाबा बाहेर बसले होते. पुन्हा त्यांच्याशी गप्पा सुरु झाल्या. ते खूप फिरले होते. उत्तर भारत पालथा घालून ते इथे येऊन राहिले होते. ते दुपारचं एकच वेळ जेवण करतात असं त्यांनी सांगितलं. अर्धा तास गप्पा झाल्यावर आम्ही रात्रीच्या सुरक्षेविषयी त्यांना विचारलं. आम्ही जेवण बनवत असताना देवळासमोरून बिबळ्या गेल्याचं ते एकदम सहजपणे बोलून गेले आणि आमची पाचावर धारण बसली. “अर्रे, कुच्छ नही करेगा वो.. आदमीपे थोडीना हल्ला करता है.. सो जाओ आराम से..” असं बोलून त्यांनी आम्हाला शुभरात्रीचा संदेश दिला. पण आमच्या रात्रीची शुभाशुभता आता बिबळ्याच्या हातात, सॉरी पंजात होती. आम्ही स्वतःला आपापल्या स्लीपिंग बॅगेत गुरगुटून घेतलं. आमचे कान आता तीक्ष्ण झाले होते. पाल्या-पाचोळ्यावरील जराशी कुरकुर आमचा मेंदू टिपत होता. प्रवासामुळे थकलो होतो त्यामुळे खूप झोप येत होती पण हा बिबळ्या काही आम्हाला झोप येऊ देत नव्हता. त्यात मी बाहेरील बाजूला झोपलो होतो. सावज आकाराने मोठ्ठं दिसल्याने तरी बिबळ्या हल्ला करणार नाही, हे फालतू लॉजिक त्यामागे आम्ही लावलं होतं. बाहेरील बाजूस असल्यामुळे मी हालचाल कमी करत होतो, पण निरंजन आणि प्रथमेश, अधूनमधून माना वर काढून कानोसा घेत होते. शेवटी १५-२० मिनिटे झाल्यावर डुलकी येऊ लागली. सर्दी झाल्याने मला श्वास नाकातून नाही तर तोंडाने घ्यावा लागत होता, त्यामुळे घोरण्यासारखे आवाज येत होते. इतर दोघांची त्या आवाजाने गाळण उडत होती. मी हळू आवाजात त्यांना तो माझा आवाज आहे हे सांगण्याचा एक दोनदा प्रयत्न केला पण मला हलण्यास मनाई असल्याने मी ते समजावणं सोडून दिलं. अर्ध्या-पाऊण तासांत तिघेही कधी झोपलो ते कळलंच नाही.

सकाळी ०६:३० वाजता माझ्या मोबाईलच्या गजराने जाग आली आणि बिबळ्याने आमच्यावर कृपादृष्टी केल्याचे जाणवले. त्याचे मनोमन आभार मानून मी स्लीपिंग बॅगेतून बाहेर आलो. दोघे तयारी करून नाश्ता करत होते. त्यांच्या मानाने मी खूप ‘स्लो’ झालो होतो. सकाळचे विधी आटोपून मी नाश्त्यासाठी ठेवलेलं अंडं खाऊन घेतलं. बॅगा आणि इतर सामान देवळात एका कोपऱ्यात प्लास्टिकच्या शीटखाली लपवून, आवश्यक तेवढंच सामान एका बॅगेत घेऊन, साधारण ८ वाजताच्या सुमारास, आम्ही मोरागड-मुल्हेर भ्रमंतीसाठी समोरच्या घळीत शिरलो. वातावरण थंड असल्याने आमचा ‘स्पीड’ बरा लागला होता. अर्धा-पाऊण तासांत आम्ही मोरागड-मुल्हेरच्या खिंडीत पोहोचलो. ह्या किल्ल्यांकडे कोणी फिरकत नाही हे तेथील वातावरणावरून कळून येत होतं. मोरागडाचा खडकात खोदलेला दरवाजा पार करून आम्ही वर पोहोचलो. त्यानंतर बालेकिल्ल्याच्या दरवाज्यातून किल्ल्याच्या सर्वोच्च भागात प्रवेश केला. उदंड गुडघाभर गवताने सगळे अवशेष लपवले होते. साप-विंचू इत्यादींची काळजी घेत त्या गवतातून आम्ही किल्लेपणाच्या खुणा शोधत फिरत होतो. दोन खणखणीत दगडी दरवाजे सोडल्यास, पाण्याची सुकी किंवा गढूळ टाकी, भग्नावशेष आणि ईशान्य टोकाकडील पाण्याचा तलाव ह्यांखेरीज गडावर काही नव्हतं. तलावामध्ये एक दोन डुबक्या मारून प्रथमेशने त्याची हौस भागवून घेतल्यावर आम्ही मुल्हेरकडे कूच केलं. खिंडीतून समोरच एका खिडकीसारख्या मोठ्या भग्न दरवाज्यातून आम्ही आत शिरलो. मुल्हेरचा हा दरवाजा दगड कोसळून चीणला गेला होता. त्या दगडांशी झटी घेत तो टप्पा पार करून आम्ही मुल्हेरवर प्रवेशलो. साडे नऊ वाजून गेल्याने बॅगेतून संत्री मोसंबी बाहेर आली होती. चालत चालत ती खाऊन घेतली. आणि १० मिनिटांत भडंगनाथाच्या देवळाजवळ आलो. किल्ल्यावरील देवळे आजमितीस छत्रहीन झाली आहेत. लहानश्या घुमटीमध्ये भडंगनाथाचा मुखवटा होता. आजूबाजूला फरसबंद जमिनीवर इतर देवादिकांच्या भग्न मूर्ति आणि एक शिलालेख आढळले. संपूर्ण किल्ला उजाड दिसत होता म्हणून देवळावरील झाडाच्या सावलीत ब्रेकफास्ट करून घेतला. तिथेच सेल्फ टायमर ग्रुप फोटो काढून आमचा ग्रुप पुढल्या भ्रमंतीसाठी निघाला. मोरागडापेक्षा मुल्हेर किल्ल्यावरील अवशेष थोडे चांगले टिकून होते. देवळाजवळील दोन मोठे सुके बांधीव तलाव व त्यातील स्थंभ, भग्न गणेशमूर्ति, दक्षिण दिशेला असणारा गुप्त दरवाजा व तेथील तटबंदी, राजवाडा आणि बांधकामांचे अवशेष, राजवाड्याचे प्रवेशद्वार, नैऋत्य दिशेला असणारी नऊ-टाकी, इत्यादी पाहून आम्ही पश्चिम दरवाज्यांच्या साखळीच्या वाटेने मुल्हेर किल्ला उतरायला सुरुवात केली. साडे दहा वाजून गेल्याने साल्हेर किल्ला गाठण्याचा ‘टार्गेट’ लक्षात येऊन थोडा स्पीड वाढवला. झपाझप किल्ला उतरत आम्ही तासाभरात किल्ला उतरलो होतो. पावणे बाराच्या सुमारास आम्ही पुन्हा सोमेश्वर देवळात होतो. पॅकिंग आटोपून बॅगा खांद्यांवर आल्या. जाताना साधूबाबांच्या खोलीजवळ गेलो तर दरवाजा बंद आढळला. त्यांना ‘डिस्टर्ब’ न करताच मनोमन त्यांचे आभार मानून आम्ही मुल्हेर माची उतरून पुन्हा त्या कंटाळवाण्या डांबरी रस्त्यावर आलो. सुदैवाने एका ट्रॅक्टरवाल्याने आम्हाला मुल्हेर गावापर्यंत लिफ्ट दिली.


    
मुल्हेर गावात ‘स्प्राईट’ मारून तहान भागवली आणि साल्हेरवाडीसाठी जीप हुडकायच्या कामगिरीला लागलो. दोन वाजून गेले होते; साल्हेरच्या एस.टी.चा काही पत्ता नव्हता. गाडी भरल्याशिवाय जीपवाला जीप नेण्यास तयार नव्हता. आम्ही जेमतेम ५-६ जण साल्हेरवाडीसाठी उभे होतो. गाडीची ‘कॅपॅसिटी’ १५ माणसांची होती. पुढील तासाभरात जीप भरण्याचे काहीच संकेत नव्हते आणि काही केल्या आम्ही साल्हेरवाडीत ३ वाजेपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. कारण साल्हेरवाडीतून साल्हेर किल्ला पहिल्याच वेळी चढायला किमान साडे तीन - चार तास लागणार होते. वाघांब्याहूनही साधारण तेवढाच वेळ लागणार होता. आमचं टेन्शन वाढत होतं कारण नुसतं साल्हेरवाडीत पोहोचून काही फायदा होणार नव्हता. प्रथमेशची परीक्षा असल्याने त्याला रविवारी घरी असणे आवश्यक होते. साल्हेर ते मुंबई प्रवास ध्यानात घेऊन साल्हेर-सालोटा किल्ल्याची भ्रमंती तिसऱ्या दिवशी ढकलण्यात काही अर्थ नव्हता. साल्हेरहूनही जीप किंवा बसची अशी गैरसोय झाली तर आम्ही तिथेच अडकणार होतो आणि हे तिघांच्या गळ्याशी येणार होतं. केवळ पहिल्या दिवशीच्या वेळापत्रकात गडबड झाल्याने एवढा मोठा फटका बसला होता. तासाभराच्या विचार-विमर्शानंतर ट्रेक आटोपता घेऊन मुंबईकडे प्रस्थान करण्याचा निर्णय झाला. आणि तो योग्य होता हे तासभरानंतरही न भरलेल्या जीपने सिद्ध केलं होतं. लागलीच ताहराबादला जाणारी जीप पकडून आम्ही परतीचा प्रवास, खिन्न मनाने सुरु केला. एखादी गाडी भाड्यावर घेऊन हा ट्रेक करण्यात शहाणपणा आहे हे पुन्हा कळून चुकलं. साल्हेर-सालोटा किल्ल्यांना पुढल्या भेटीत नक्की गळाभेट द्यायची असं ठरवून आम्ही मुंबईकडे कूच केलं. ताहराबादला पोहोचल्यावर एस.टी.ने दोन-अडीच तासांत नाशिकला पोहोचलो. संध्याकाळी साडे सहा वाजताची पूर्ण रिकामी एशियाड बस आमचे स्वागत करत होती. आत जाऊन मनासारख्या जागा मिळाल्या. बॅगा वरती खोचून आम्ही सीटांवर झोपी गेलो. इगतपुरी मार्गावर रेल्वेवर गाड्या अडकल्याचं आत शिरणाऱ्या प्रवाश्यांकडून ऐकू येत होतं त्यामुळे पुढल्या बसगाड्यांना हमखास गर्दी होणार होती. पण आम्ही मस्त मजेशीर प्रवास करणार होतो यात आनंद मानत आम्ही झोपी गेलो ते थेट मुंबईपर्यंत.

थोडक्यात:
किल्ले मुल्हेर - मोरागड (ताहराबाद, नाशिक)
उंची: ४२९० फुट । श्रेणी: सोपी - ३ । भ्रमंती: उत्तम । ऋतू: हिवाळा
सटाणा ते ताहराबाद - एस.टी. / स्वतःचे वाहन - अर्धा तास
ताहराबाद ते मुल्हेर - एस.टी. / जीप / स्वतःचे वाहन - २० मिनिटे
मुल्हेर ते मुल्हेरवाडी - ट्रेक - २० मिनिटे
मुल्हेरवाडी ते मुल्हेर माची - ट्रेक - पाउण तास
मुल्हेर माची ते मोरागड - मुल्हेर (घळीच्या वाटेने) - ट्रेक - अर्धा तास
मुल्हेर माची ते मुल्हेरकिल्ला (दरवाज्यांच्या वाटेने) - ट्रेक - एक तास
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा वेग दर्शवितात. चढाईला / उतरण्यासाठी वेळ जास्त लागू शकतो.)

नोंद: वरील लेख, 'प्रहार' वृत्तपत्राच्या 'भन्नाट' या करमणूक विशेष पुरवणीमध्ये ०७ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचनासाठी पुढील 'थम्बनेल' वर क्लिक करा.



1 comment: