महाराष्ट्रच नव्हे तर भारतातल्या अनेक राज्यांत, काही ठराविक शहरे सोडली तर आजही अनेक गावे दुर्गम आहेत. या गावांना जोडणारा रस्ता नावापुरता रस्ता आहे. काही दुर्गम खेड्यातील लोकांना महत्वाचे जिन्नस आणण्यासाठीही कित्येक किलोमीटर दूरवर असणाऱ्या गावात जावे लागते. शाळा, बाजारहाट, औषधोपचार यांसारख्या मुलभूत सुविधांसाठीही खेड्यातील लोकांना कित्येक मैल तुडवावे लागतात. अशा परिस्थितीत पर्यटनासाठीच्या वाहतूक व्यवस्थेचा विचारच नको. मात्र दुर्गमातल्या दुर्गम ठिकाणीही लोकांच्या सोयीसाठी ठराविक वेळांसाठी का होईना परंतु ‘महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळा’च्या बसगाड्या (स्टेट ट्रान्सपोर्ट उर्फ एस.टी.) उपलब्ध आहेत. ‘जिथे रस्ता, तिथे एस.टी.’ हे घोषवाक्य सार्थ करत एस.टी. मार्गक्रमण करत आहे.

सुरुवातीचे साधारण दोन वर्षे एस.टी.ला लोकांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता, हे आज कोणाला सांगितले तर पटणार नाही. त्यानंतर मात्र आजतागायत जवळपास १६००० पेक्षा जास्त बसगाड्या आणि १२००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पालनपोषण करण्याऱ्या एस.टी.ने दररोज प्रवास करणारे राज्यभरात ७० लाखांपेक्षा जास्त प्रवासी आहेत. या आकड्यांवरून गेल्या ६३ वर्षांत एस.टी.ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे हे स्पष्ट होते. काहीही असलं तरीही, कितीही वाईट रस्ता असला तरीही, एस.टी. खरोखर रस्ता जाणाऱ्या प्रत्येक गावापर्यंत आपल्याला पोहोचवते कारण ‘जिथे रस्ता, तिथे एस.टी.’ ह्या बोधवाक्याशी ती प्रामाणिक आहे.
तर आपल्यासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या ह्या वाहतूक सेवेसाठी आपण काय केलं पाहिजे? तर शक्य असेल तेवढं खाजगी वाहतूक टाळून एस.टी.ने प्रवास केला पाहिजे. आज एस.टी. मध्ये अनेक वर्गांच्या प्रवाश्यांसाठी उत्तमोत्तम पर्याय, जसे परिवर्तन (साधी), आरामदायक (सेमी लक्झरी), शिवनेरी (ए.सी.) इत्यादी., उपलब्ध आहेत. यामुळे खाजगी वाहतूक वाहनांमुळे होणारी रहदारी कमी होईलच पण अमुल्य अश्या पेट्रोल आणि डीझेल इत्यादी इंधनांची बचतही होईल. यासोबतच आपली एस.टी.ही नफ्यात येण्यास मदत होईल ज्यामुळे आपल्याला तिच्याकडून अधिक सुविधा उपलब्ध करून घेता येईल. म्हणून चला, आपण सगळेच आज पण करूया की, ‘वाट पाहीन, पण एस.टी.नेच जाईन’..
No comments:
Post a Comment