सदैव सावध असावे - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 25, 2014

सदैव सावध असावे


दिल्ली पशुसंग्रहालयात गेल्याच महिन्यात झालेली दुर्घटना आपणा सगळ्यांना चांगलीच लक्षात असेल. वन्य प्राण्यांशी संपर्क किती घातक ठरू शकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आपण आजही वन्य पशूंना किती ‘लाईटली’ घेतो हे या प्रसंगातून दिसून येतं. मात्र या दुर्घटनेत पुढे आलेल्या काही ठळक मुद्द्यांवर लक्ष देणे आवश्यक ठरेल. यात कोणाला दोष देण्यात आलेला नाही पण यावर चिंतन होणं गरजेचं आहे.

वाघ सिंहांसारख्या वन्य पशूंच्या पिंजऱ्यांजवळ एकही सुरक्षाकर्मी नसावा ही आश्चर्याची गोष्ट आहे. एखादी व्यक्ती जाळी ओलांडून पलीकडे जाईपर्यंत कोणाचेही लक्ष तिथे जात नाही ही दुसरी चिंताजनक बाब आहे. ‘सब चलता है’ किंवा ‘अपुनको क्या?’ हा स्वभाव जोवर आपण सगळेच सोडत नाही तोवर हे सगळं चालतच राहणार. जाळी ओलांडल्यावरच जर त्या मुलाला हटकलं असतं तर कदाचित आज ही दुर्घटना घडली नसती. एवढं होऊनही आपण आपल्या जगण्यावर काही फरक पडू देत नाही, ह्या स्वभावाला काही जण ‘फायटिंग स्पिरीट’ म्हणतात, हे धादांत असत्य आहे. आपण सगळे स्वार्थी झालो आहोत. ‘मी वाचलो ना? मी सुरक्षित आहे ना? बास!’ ह्या स्वभावाला स्वार्थीपणा म्हणतात, ‘फायटिंग स्पिरीट’ नाही.

आपण आजही वन्य पशूंना किती ‘लाईटली’ घेतो, हे म्हणण्यामागचं कारण म्हणजे पिंजऱ्यात असला की वाघाचं ‘कुत्रं’ होत नसतं. तो वाघच राहतो. (अलीकडल्या बातम्यांवरून आजकाल कुत्रीही धोकादायक होत चालली आहेत म्हणा.. असो..) हे सत्य आपण विसरता कामा नये. तरीही सदर वाघाने या मुलाच्या बाबतीत खूप समजूतदारपणा दाखवला होता हे विडीयोवरून लक्षांत येतं. वाघाला पोटभर अन्न मिळत असेल तर तो मनुष्यावर हल्ला करण्याचे काहीच कारण नसते. किंबहुना तो माणसाकडे केव्हाही भक्ष म्हणून पाहत नाही. त्या मुलासोबत दिसलेला वाघाची वागणूक ही कुतूहलाची होती. तो त्या मुलाला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता हे स्पष्ट दिसून येते. मुलगा त्याच्या पाया पडत होता आणि त्याचे वागणे वाघाला विचित्र वाटत होते, हे विडीयोमध्ये दिसून येते.

वाघाच्या पिंजऱ्यात अडकल्यावर मुलाने स्वतःला वाचविण्यासाठी कोणतीच ठळक हालचाल केल्याचे दिसत नाही. वाघाला पाहून कोणाचीही बोबडी वळेल हे स्वाभाविक आहे. मात्र कोणताही प्राणी मनुष्यप्राण्याला घाबरतोच. तो मुलगा घाबरला आहे, हे वाघाने ताडल्यावरच त्यावर हल्ला केला. खरेतर तो हल्लाही नव्हताच. आजूबाजूच्या ‘बघ्यांच्या’ गोंधळापासून दूर जाण्यासाठी वाघाने त्या मुलाला दूर नेले. वाघाला अंगठा नसल्याने त्याने त्यांच्या नैसर्गिक पद्धतीने मुलाला नेण्याची क्रिया केली आणि त्यात त्या मुलाच्या मानेत वाघाचे दात घुसले आणि तो मग मरण पावला.

वाघ केव्हाही समोरून शिकार करत नाही. तो दबा धरून हल्ला करणारा प्राणी आहे. त्याच्याशी नजरा-नजर झाली तरी नजर हळू हळू खाली घ्या. आपण शरण आलो आहोत असा तो इशारा असतो. वन्य प्राण्याच्या डोळ्यात पाहू नये. हळू हळू मागे जात तिथून निसटण्याचा प्रयत्न करा. वाघाला पाठ दाखवू नये. झाडावर चढण्याचा वगैर प्रयत्नही करू नका; तो निष्फळ ठरेल; कारण वाघ एका उडीतच २५-३० फुट लांब किंवा उंच जाऊ शकतो. या घटनेत मुलाने प्रतिक्रिया दिल्यावर वाघ बाचकून मागे जात होता. म्हणजेच बघ्यांच्या गोंधळासोबत त्या मुलानेही थोडा आरडाओरडा केला असता, हातपाय मारले असते तर कदाचित त्याला वाचवण्यासाठी सुरक्षादल येईपर्यंत वेळ मिळाला असता आणि त्याचे प्राण वाचले असते. परंतु हा शेवटचा पर्याय आहे. वाघांना आरडाओरडा सहन होत नाही. वन्य प्राण्यांचे कान तीक्ष्ण असतात. ते निसर्गानेच तसे बनवलेले असतात, जेणेकरून जवळ येणाऱ्या शिकाऱ्याची, धोक्याची त्यांना चाहूल लागते. अशा वेळेला, अगदी कोणताही पर्याय नसल्यावर, त्यांच्याजवळ आरडाओरडा केल्याने त्यांच्या कानांना त्रास होतो, त्यामुळे ते पळून जाण्याची शक्यताही असते. अश्या आरड्या ओरड्याने रानटी हत्ती देखील पळून गेल्याची उदाहरणे आहेत. वाघ सिंहासारखे प्राण्यांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे ते भक्ष्याला नेहमी गळा पकडून मारतात. हात पाय इत्यादींवर ते पंजे मारत असले तरीही त्यामुळे जीव जाण्यास वेळ जातो, म्हणून अशा परीस्थितीत अडकल्यास शक्यतो प्रयत्न करून मान आणि गळा त्यांना सोपवू नये. आजूबाजूला एखादी काठी किंवा दगड सापडल्यास त्यांनी प्राण्याच्या डोळ्यावर वार करावेत. जेणेकरून त्याला दूर ठेवता येईल. वाघ सिंह त्यांच्या पेक्षा जास्त शक्तीशाली वाटणाऱ्या प्राण्यावर हल्ला करत नाहीत. (वन्यजीव सुरक्षा कायद्या अंतर्गत त्यांना दुखापत केल्यास शिक्षा आहे याची नोंद घ्यावी; मात्र ‘मरता क्या ना करता’ हा नियम पाळावा लागतो.)

या सगळ्यावर सोपा उपाय म्हणजे आपली सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवून अशा प्राण्यांपासून चार हात लांब राहणे; आणि समर्थ रामदासस्वामींच्या उपदेशानुसार ‘सदैव सावध असावे’. कारण इथे तो मुलगा वाघाच्या पिंजऱ्यात पडला होता. प्रसंगी काही कारणात्सव वाघच पिंजऱ्याबाहेर येऊन भीतीपोटी हानी पोहोचवू शकतो.

खेदाची गोष्ट म्हणजे त्या मुलाला वाचवण्यासाठी गर्दीकडून कोणतीही ठोस क्रिया घडली नाही. सुरक्षाकर्मी सुद्धा खूप उशिराने पोहोचलेले दिसतात. एखाद्या दोराच्या साह्याने त्या मुलाला वर घेता आले असते असे वाटते. मात्र अनेकजण नुसते बघतच न राहता मोठे देशकार्य करताना दिसले. तो जीव स्वतःच्या जीवासाठी धडपडत असताना हे लोक त्याचा ‘विडीयो’ मोबाईलवर टिपत होते. एखाद्याचा जीव जातोय आणि आपण प्रसिद्धीसाठी त्याचे चित्रीकरण करतोय. किती ही क्रूरता!! मृत्यूशी मस्करी करू नका कारण असा प्रसंग कोणावर केव्हाही येऊ शकतो. त्यावेळी जर तुम्हाला कोणी मदत करावी अशी अपेक्षा असेल तर तुम्ही आधी इतरांना मदत करा.

No comments:

Post a Comment