सुधागडचा गडपुरुष - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 8, 2014

सुधागडचा गडपुरुष



भाग दोन:

सुधागडावरचा आणखी एक किस्सा: 'सुधागडचा गडपुरुष'

(अजूनही आपले गड जागृत आहेत.. याचा एक अनुभव)



किल्ल्याच्या सरकार वाड्यात रात्री ७ वाजताच्या सुमारास पोहोचलो तेव्हा 'तरुण' मुला-मुलींचा एक 'ग्रुप' आधीच तिथे येऊन स्थिरावला होता. आम्ही धोपटी टाकून आमची चूल लावू लागलो. त्यांची चूल आधीच पेटली होती आणि त्यावर मसालेभात तयार होत होता. वाड्याचा एक कोपरा त्या १२-१५ जणांच्या ग्रुपने 'कॅप्चर' केला होता आणि त्यांचा 'धिंगाणा' सुरु होता. मोबाईलला स्पीकर लावून 'साजूक तुपातली' गाणी मोठ्या आवाजात सुरु होती; आणि त्यावर 'नागीन डान्स' इत्यादी आचरट प्रकार केले जात होते.

आम्ही स्थिरावलो. सुधागडच्या मामींनी येऊनही समज दिली पण काही फरक पडला नाही. एक-दोन सोडल्यास बाकी मुलं मराठी होती हे गोंधळावरून कळून आलं आणि याच गोष्टीचं जास्त दुःख झालं. आमच्यातल्या एकमेव मुलीने त्यांच्यातील एका 'सुजाण'(?) मुलीला गोंधळ थांबवून गडाचं पावित्र्य राखावं अशी समज देऊन यावी असा ठराव झाला आणि तो अमलात आला. गोंधळ थांबला नाही पण आवाज खूप कमी झाला. त्याक्षणी तेवढंही पुरेसं होतं. मात्र 'टॉटिंग' सुरु झालं. गडबड वाढली की कोणी एक शहाणा 'कमेंट' पास करी की, "हळू आवाज करा रे, गडाचं पावित्र्य राखा.." आम्हाला समजत होतं पण उपाय नव्हता. त्या ग्रुप मध्ये मुली होत्या त्यामुळे आतातायी पणा करता येणार नव्हता..

अगदी रात्री साडे-बारा पर्यंत मनसोक्त 'मजा मारल्या'वर ते टोळकं झोपी गेलं. आमचेही डोळे लागले. रात्री अडीचच्या सुमारास अचानक मोठ्य्याने आरोळी ऐकू आली आणि आमचे डोळे खाड्कन उघडले. लागोपाठ अजून तीन मुले जोर-जोरात ओरडत उठली. सगळा वाडा हादरून गेला. वाड्यात बिबळ्या शिरला की काय ह्या विचाराने आमचीही गाळण उडाली. ५-१० मिनिटे काही कळून आले नाही कारण केवळ चंद्रप्रकाश होता. टॉर्च लागेपर्यंत गोंधळ कमी झाला. आमच्यातील 'श्रेयस' आणि 'विजया'ने त्या ग्रुपजवळ जाऊन विचारपूस केली. आमच्याजवळ ते दोघे आले तेव्हा कळलं की काहीतरी भलताच प्रकार झाला होता. कित्येक शिक्षित लोक ह्यावर विश्वास ठेवणार नाहीत हे जाणूनही तो प्रकार इथे प्रस्तुत करत आहे. त्यातील चारही जणांना 'साक्षात्कार' झाला होता. त्यांच्या छातीवर बसून कोणीतरी त्यांचा गळा, हात-पाय आवळत आहे असं त्यांना जाणवलं होतं आणि त्यामुळे ते ओरडत उठले होते. हे ऐकून आमचा ग्रुप हादरला. कोणा एकाला असं वाटलं असतं तर गोष्ट वेगळी होती, पण चौघांनाही असा भास झाला होता; त्यामुळे ती गोष्ट खरी ठरत होती. मला मजबूत झोप लागली होती आणि मला ह्यातही त्या मुलांनी काही मस्करी केली असेल असं वाटलं त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण मी आणि प्रथमेशने सोडून बाकी सगळा ग्रुप त्यानंतर झोपलाच नाही. आमच्या ग्रुपची ही हालत होती तर त्या ग्रुपमध्ये अजूनही बेकार अवस्था झाली होती. त्या चौघांची स्थिती बघून सगळा ग्रुप येत असेल नसेल तसा रामरक्षा आणि मारुती स्तोत्र म्हणू लागला होता. वाड्यात या दोन्ही ग्रुपची एक प्रकारची कुजबुज सुरु होती. ह्या सगळ्यांत माझी आणि प्रथमेशची मात्र झोपमोड होत होती आणि म्हणून मी आमच्या ग्रुपला दोन-तीनदा झोपेतच दमही दिला; "ए, तुम्हाला झोप येत नसेल तर झोपू नका पण च्यायला माझी झोपमोड करू नका.." आणि कसाबसा झोपत होतो.

सकाळचे सहा-साडे सहा वाजले तशी जाग आली. पाहिलं तर कोणीही झोपलं नव्हतं. म्हणजे फक्त मी आणि पिड्या सोडलं तर सगळेच जागे राहिले होते रात्रभर.. मग त्या प्रकाराचं गांभीर्य लक्षांत आलं. मस्करी एवढी टोकाची करणार नाहीत हेही लक्षांत आलं. 'तो' ग्रुप एकदम थंड पडला होता. आमचाही थोडाफार तसाच होता. चहा-नाश्ता केल्यावर त्या मुलांनी आवरून घेतलं. त्यात एक 'सर' पण होते हे सकाळी कळलं. एवढा झटका बसल्यावर त्यांना अक्कल आली असावी असं वाटलं कारण वाडा सोडताना त्यांनी 'निश्चयाचा महामेरू' श्लोक म्हंटले, महाराजांच्या घोषणा दिल्या.. आम्ही डोक्याला हात लावला.. वाटलं म्हणावं, "अरे गाढवांनो, रात्री ही अक्कल काय शेण खायला गेली होती का?" गिर्यारोहणाचे, मुख्यतः किल्ले-भ्रमंतीचे थोडे नियम पाळले असते तर झोपमोड झाली असती का तुमची? (आणि माझीही?)

असो, पण ह्या अनुभवानंतर आपल्या गडांचे 'राखणदार' अजूनही अदृश्य अवस्थेत कार्यरत आहेत हे कळून आलं आणि नकळत त्यांना मनातून 'मुजरा' झडला'..

'जय शिवराय.. जय सह्याद्री..'

अधिक माहिती व छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा:

No comments:

Post a Comment