गिर्यारोहणातील खबरदारी - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 1, 2015

गिर्यारोहणातील खबरदारी

ह्या  ब्लॉगचा मूळ गाभाच ‘गिर्यारोहण’ हा आहे. त्यामुळे गिर्यारोहणाशी निगडीत माहिती ह्या ब्लॉगमधून अधिक प्रसिद्ध केली जाते. याचे कारण गिर्यारोही पर्यटनही उत्तमच करतात. पण गिर्यारोही दुर्गम प्रदेशात जात असल्याने तेथे ‘खबरदारी’ हा आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो. गिर्यारोहणातील खबरदारी म्हणजे नक्की काय? यावरच आजच्या लेखनात आपण विवेचन करणार आहोत. मुळातहा लेखच मुळात उशिरा प्रसिद्द होत आहे याची जाणीव आहे तरीही ‘देर आये, दुरुस्त आये.’

गिर्यारोहण ही एक धाडसी कला आहे. ह्याकलेची आवड असणाऱ्या व्यक्ती ह्या मुळातच धाडसी असतात त्यामुळेच त्या ह्या कलेकडे आकर्षित होतात. गिर्यारोहणामध्ये निर्भेळ आनंद तर मिळतोच पण त्यातून मिळणारा आत्मविश्वास हा अधिक महत्वाचा ठरतो. उत्तम पकड घेणारे ट्रेकिंगचे बूट आणिथोरीफार खबरदारी घेतल्यास हा आनंद टिकवून ठेवता येईल.

घसरणे: गिर्यारोहणादरम्यान सामान्यतः घडणारी एक गोष्ट म्हणजे घसरून पडणे. विशेषतः घसाऱ्यांवर हा प्रकार हमखास घडतो आणि अनेकदा तो जीवघेणा ठरू शकतो. उन्हाळ्यात दगड फुटतो आणि त्याचे खड्यांत, आणि नंतर घसाऱ्यांतरुपांतर होते. कातळटप्प्यांच्या खाली घसारा आढळतो आणि अशा ठिकाणी विशेष खबरदारी घ्यावी लागते. अनेकदाडोंगराच्या पोटातून आडव्या जाणाऱ्या वाटांवरही खूप प्रमाणात घसारा असतो. घसाऱ्यावर बूट टेकवताच त्यातील खडे बॉल बेअरिंग सारखे सरकतात आणि आपला तोल जाऊन आपण घसरतो. घसाऱ्याचे टप्पे दरीच्या बाजूस असल्यासखूप सावध राहावे लागते. अशा वाटेवर मुख्य खडकातून डोकावणारे दगड दिसतात. ते चांगले घट्ट असतात. अशा दगडांवर पाय देत पुढे जात राहावे. घसारा पायाने सरकवून तो बाजूला करण्याच्या भानगडीत पडू नये कारण खालील माती भुसभुशीत निघाल्यास असेल ती पायवाट देखील आपण घालवून बसतो आणि मग कठीण प्रसंग उद्भवू शकतो. डोंगरसोंडेवरील अशा वाटांवर आजूबाजूला खुरटे गवत उगवलेले असते. पायवाट आणि गवत जेथे एकमेकांना मिळतात त्याभागावरही बुटांना उत्तम पकड मिळते. या पैकी काहीही शक्य नसेल तर कोणताही न्यूनगंड न बाळगता सरळ खाली बसावे आणि हात-पाय यांच्या आधाराने तो टप्पा पार करावा. घसाऱ्यावर धावाधावअजिबात करू नये.

तोल जाणे: तोल जाणे ही सुद्धा गिर्यारोहणादरम्यान घडणारी एक सामान्य गोष्ट. यावर एकदम सोपा उपाय म्हणजे एक साधे सूत्र - ‘ज्या बाजूला कडा, त्या बाजूला तोल (वजन)’. म्हणजेच, समजा आपल्या डाव्या बाजूला कडा आणि उजव्या बाजूला दरी असेल तर चालताना डाव्या बाजूला थोडेसे झुकून, पोक काढून हळू हळू पुढे व्हावे.अशा ठिकाणी वाट अरुंद असल्यास लांब पावले न टाकता लहान लहान अंतर कापत जावे. लक्ष्य चुकुनही ढळू देऊ नये. पाठीमागे पाहून बोलू नये. पुढील पायाची पकड पक्की झाल्याशिवाय मागील पायावरील तोल सोडू नये. किमान दोन टोकांवरील (दोन हात दोन पाय) पकड मजबूत झाल्याशिवाय तिसऱ्याची हालचाल करू नये. खडकातील खाचा, खोबण्या इत्यादींचा आधार घेऊन असे टप्पे पार करावेत. प्रसंगी तोल गेल्यास, आपले शरीर कड्याकडे झुकलेले असल्याने, कड्यावर अंग घासून, त्याने निर्माण होणाऱ्या घर्षणाने घसरण्याचा वेग मंदावून त्वरित पर्यायी आधार शोधण्यासाठी वेळ मिळून जीव वाचवता येऊ शकतो. आडव्या वाटा पार करताना, त्या अरुंद ठिकाणी, जिथे केवळ एकच पाऊल मावते, अशा ठिकाणी, एक विशिष्ठ पद्धत वापरता येते. उदा. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे अशा ठिकाणी कडा उजवीकडे असेल आणि दरी डावीकडे असेल, उजव्या हाताने अशा टप्प्याच्या सुरुवातीला असणारा आधार घ्यावा. नंतर डावा पाय पुढे टाकावा आणि डाव्या हाताने पायाच्यावरील भागातील आधार धरावा. त्यानंतर उजवा पाय डाव्या पायाच्या मागे आणावा आणि त्याची पकड घट्ट करावी. नंतर उजव्या हाताने डाव्या हातात असलेला आधार धरावा आणि डावा हाताने पुढील आधार शोधून पकड घ्यावी. मग पुन्हा उजवा पाय पुढे करून क्रिया सुरु ठेवावी. या संपूर्ण क्रियेत किमान तीन टोकांवर पकड घट्ट ठेवावी आणि चौथ्या टोकाने पुढील आधार शोधावा. या पद्धतीमध्ये आपले तोंड कड्याकडे राहते आणि पाठ दरीकडे. ही पद्धत वापरण्याचे कारण गिर्यारोहणादरम्यान आपल्या पाठीवर बॅगा असतात. पाठ कड्याकडे केल्यास बॅग कड्याला आढळून आपण दरीत फेकले जाण्याची शक्यता असते. तसेच उजवा पाय आधी टाकल्यास, आणि चुकून त्याची पकड मजबूत नसल्यास तो पाय घसरून पायांची कैची होईल आणि तोल जाऊन आपण दरीत फेकले जाऊ शकतो. 
 
दगडांवर उड्या टाळाव्यात: काही उत्साही मंडळी दगडावरून चालताना उड्या मारताना आढळतात. सच्चा गिर्यारोहक अशा गोष्टी करताना केव्हाही आढळणार नाही. कारण उड्या मारताना, चुकल्यास, पाय मुरगळणे, तोल जाणे, घसरून पडणे, आपटणे इत्यादी घटना घडतात. याचा मनःस्ताप स्वतःसोबत संपूर्ण तुकडीला होऊ शकतो. उंच खडकांवर अशा गोष्टी जीवघेण्या ठरू शकतात.

कातळटप्पे पार करणे: गिर्यारोहणातकातळटप्पे चढणे उतरणे नित्याचे असते. कोणताही कातळ (खडक) हा सपाट नसतो. त्याला खाचा, खोबणी, खळगे, भेगा, उंचवटे, चिमटे, खड्डे असतातच. खडकाच्या ह्याच वैशिष्ठ्यांचा वापर करून हे टप्पे पार करता येतात. खडक चढताना त्याच्याशी शक्यतो घर्षण वाढेल अशा रीतीने चढाई करावी. आपले शरीर खडकाला लागेपर्यंत खडकाजवळ जावे. हात-पाय ही आपल्या शरीराची चार टोके आहेत. खडक चढताना यातील किमान तीन टोकांवरील पकड मजबूत असणे आवश्यक आहे. तसे असल्यासच चौथ्या टोकाने पुढील आधार चाचपडावा. त्याने आधार घ्यावा आणि मग दुसऱ्या एका टोकावरील पकड सैल करावी. हीच क्रिया पुढे चालू ठेवल्यास सुरक्षित तेने आपण तो टप्पा पार करू शकतो. टप्पा कठीण असल्यास बॅगा काढून खाली ठेवाव्यात आणि असे टप्पे पार करावेत. नंतर दोरीने त्या वर ओढून घ्याव्यात.

खडक उतरतानाही अशीच काळजी घ्यावी. खडकाकडे पाठ करून केव्हाही उतरू नये. कारण अशावेळी तोल गेल्यास खाली फेकले जाण्याची भीती असते. याउलट खडकाकडे तोंड करून खाली उतरावे. पायाने आधार शोधात खाली जात राहावे, त्याच वेळेला दोन्ही हातांनी दगडावर उत्तम पकड ठेवावी. तोल गेल्यास तोंड खडकाकडे असल्याने हात-पाय मारून आधार शोधता येतो म्हणून नेहमी तोंड कड्याकडे (खडकाकडे) करून उतरण्याची सवय लावून घ्यावी. खडक खालच्या बाजूस डोकावणारा असल्यास आणि अंदाज घेता येण्याजोगा नसल्यास तेथून उतरू नये, पर्यायी मार्ग शोधावा.

फाजील आत्मविश्वास बाळगू नये: प्रत्येक गिर्यारोहीने स्वतःच्या मर्यादा ओळखाव्यात. फाजील आत्मविश्वास टाळावा.दुसरा करतो म्हणून मी सुद्धा सहज करू शकेन ही वृत्ती टाळावी. एखादे साहस आवाक्याबाहेरचे असल्याची जाणीव झाल्यास मागे फिरावे. इतर लोक काय बोलतील याची चिंता करू नये. अनुभवी नेता सोबत असल्यास त्याचे ऐकावे आणि त्या रीतीने वागावे. कोणत्याही गोष्टीत अडून राहू नये. वायफळ जागी घाबरा-घाबरी करून इतर मंडळींचा आत्मविश्वास कमी करण्यास कारणीभूत होऊ नये.कठीण टप्प्यात मजा-मस्करी करणे टाळावे. अशा ठिकाणी बोलणे, अधिक काळ उभे राहणे, मोबाईलवर बोलणे, त्याच्याशी चाळा करणे टाळावे. सदैव सावध असावे. इतरांना सावध राखावे. डोंगरांना योग्य तो मान द्यावा. ते आपली योग्य ती काळजी घेतीलच.

चला तर मग.. गिर्यारोहणातील खबरदारी पाळा.. डोंगरातील धोके टाळा..

No comments:

Post a Comment