अलंग - मदन - कुलंग (AMK) ट्रेक - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 19, 2015

अलंग - मदन - कुलंग (AMK) ट्रेक

मी ट्रेकिंग करतो म्हंटल्यावर अनेक ‘निष्णात’ ट्रेकर्स मला विचारायचे अलंग - मदन - कुलंग (AMK) ट्रेक केलायस का? माझं उत्तर ‘नाही’ असं ऐकल्यावर ते अशा रीतीने पहायचे की याने आत्ताच ट्रेकिंग सुरु केलंय. वैताग आला होता, म्हटलं जाऊन येऊ, काय आहे ते पाहू. प्रथमेशने मुद्दा उचलून धरला आणि ट्रेक ‘फिक्स’ केला. अनेक जणांकडून ऐकलं होतं की हा ट्रेक खूप कठीण आहे. ट्रेकिंग आणि शारीरिक बळाची कसोटी लावतो.. ७-८ तास चालावं लागतं.. ४-५ लिटर पाणी न्यावं लागतं.. डायरेक्ट फॉल आहे.. रिस्की ट्रॅवर्स आहेत.. इत्यादी इत्यादी..
पुस्तके, इंटरनेटवरून माहिती जमविली होती आणि त्यातून हा ट्रेक खूपच कठीण आहे हे जाणवत होतं.
नवीन कंपनी सेट-अप मध्ये बिझी असल्याने प्रथमेशने लीड घेतला होता. आणि सुरुवातीला अनेक मंडळी ट्रेकसाठी जमली (ती शेवटच्या क्षणी आली नाही हे वेगळं सांगायला नको). शेवटी प्रथमेश, मी आणि पंकज दातखीळे तिघेच उरलो तेव्हा मला थोडा विचार पडला की वेडं साहस तर करत नाही आहोत ना आपण?? पण प्रथमेशचा आत्मविश्वास दिसून येत होता. म्हणून जायचंच ठरलं. आमचे क्लायंबिंगचे गुरु कैवल्य वर्मा यांचे मार्गदर्शन घेतले. नंदूभाईकडून इतर आवश्यक साहित्य घेतलं. प्रथमेशने गुरुवारी रात्री गाडी काढली. आम्हाला ठाण्याहून ‘पिक अप’ केलं. पुढे आंबेवाडीला पोहोचलो. गडांची उंची, लोकांनी सांगितल्यापेक्षा कमी भासत होती, म्हणजे आंबेवाडी गाव बऱ्यापैकी उंचीवर असल्याने गडाचा माथा जवळ होता. चढाईला सुरुवात केली. अनावश्यक साहित्य टाळले होते मात्र सुरक्षेचे सर्व साहित्य सोबत घेतले होते. गावातला गाईड न घेता ट्रेक करायचा असा प्रथमेशचा अट्टाहास होता आणि त्या रीतीने तो ट्रेकचा अभ्यास करून आलाही होता. सुरुवातीलाच जंगलटप्प्यात आम्ही भरकटलो. २०-३० मिनिटे वाया गेली. वाटलं इथेच ही हालत आहे, पुढे काय? पण एवढ्या वर्षांच्या अनुभवाने शेवटी मळलेली वाट शोधण्यात आम्हाला यश आलं आणि आम्ही पहिली टेकडी पार केली. अगदी तासाभरात आम्ही ‘ट्रॅवर्स रूट’ला चिकटलो. इथून फक्त चालत राहायचे. अगदी लहान चढ उतार सोडले तर अगदी सपाट चाल आणि तीसुद्धा झाडीतल्या वाटेने. गडाच्या स्थापतीने गड बांधतानाच गडाला येणारा मार्ग असा निवडलाय की इथे दुपारीही सूर्याचे ऊन येत नाही. त्यात नाशिकमध्ये असल्याने थंडगार हवा आपल्याला प्रसन्न करत राहते. अगदी पुढल्या तासांत ‘ट्रॅवर्स’ संपवून आम्ही गुहेची चढाई आरंभिली. तीसुद्धा अगदी अर्ध्या तासांत संपली. म्हणजे गुहेशी पोहोचायला आम्हाला केवळ तीन तास लागले होते, ते सुद्धा अगदी आरामात आणि सावलीतून. शक्तीपरीक्षेचा लोकांचा पहिला मुद्दा बाद ठरला. गुहेशी पोहोचून आम्ही थोडा आराम केला. त्यानंतर एक २५ फुटाचा थोडा कठीण भाग चढून पार केला. आणि अलंगगडाच्या ‘कथित कठीण कड्या’जवळ आलो. हा कडा सरळ अंगावर येतो. आमच्या परीक्षेतला हा पहिला पेपर. इथे थोडावेळ बसून मसलत केली. सगळं शांत रीतीने चाललं होतं. वेळ लागला तरी चालेल पण अवास्तव घाई करायची नाही असं सर्वानुमते ठरलं होतं. मग मी बिलेसाठी आणि प्रथमेशने आरोहणाची तयारी केली. कड्याला, सह्याद्रीला आणि शिवरायांना मनापासून नमन करून चढाईला आरंभ केला. प्रथमेश पहिल्यांदाच मुख्य (लीड) आरोहण करत होता. पण पठ्ठ्या मजबूत आत्मविश्वासाने पाय रोवत होता. मसलतीप्रमाणे सारं काही घडत होतं. समोरून डाव्याबाजूच्या भेगेत जेव्हा तो शिरला तेव्हा आम्हाला हायसं वाटलं, कारण इथून पुढे बऱ्यापैकी सोपी वाट आहे. आवश्यक तिथे कॅरॅबिनर्स लावून आधार घेत प्रथमेश गुहेच पोहोचला आणि आम्ही खूप आनंदलो. कारण पेपर पास झालो होतो. लोकांचा दुसरा मुद्दा बाद ठरला होता. टप्पा कठीण आहे हे नक्की पण नीट सराव, सहकार्य आणि रोप मॅनेजमेंट केलं तर हा टप्पादेखील कठीण नाही. गुहेवरील पायऱ्या नक्कीच जीवघेण्या आहेत. कारण त्या अगदी दरीच्या दिशेला आहेत आणि पाठीवर बॅग असल्यास खूप सांभाळून जावे लागते. पायऱ्या चढून जाताच आपण किल्ल्यावर पोहोचतो. आम्ही वर पोहोचल्यावर खूप आनंदी झालो. अलंगगड सर झाला होता. गुहांमध्ये जाऊन रात्रीचा मुक्काम केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरून घेतलं, अलंगगड भटकून आलो आणि अलंगगड रॅपलिंग करून उतरलो. अगदी १५-२० मिनिटांत ते आटपलं. खालच्या गुहेत धोपटी टाकली आणि फक्त आवश्यक साहित्य घेऊन आम्ही मदगगडाकडे कूच केलं. इथेच ट्रॅवर्स कड्याखाली असल्याने ऊन लागत नाही. चालही जवळपास सरळ आहे. अलंग-मदन खिंडीत अगदी १५ मिनिटांत पोहोचल्यावर मात्र थोडं ऊन जाणवू लागलं कारण मदनचा कडा उन्हाच्या दिशेला येतो. पण १० मिनिटांमध्ये आपण किल्ल्याच्या मागच्या भागात शिरत असल्याने तिथे पुन्हा सावलीच आहे. इथे पायऱ्या चढल्यावर ‘कथित रिस्की ट्रॅवर्स’ दिसून आली आणि हसू आलं. आपल्या नियमित ट्रेकर्स साठी तिथे नाचायला जागा आहे. भरपूर खाचा आणि खोबणी आहेत. पूर्ण पाउल बसेल एवढी जागा आहे. फक्त मागे दिसणारी दरी दुर्लक्षित केली तर हा भागही अजिबात कठीण नाही. थोडे सावध राहिले म्हणजे झालं. दुसरा पेपरही पास झालो होतो. इथून पुढे पायऱ्या चढून आम्ही तिसऱ्या पेपरपाशी आलो. मदनचा हा ‘कथित ४० फुटी कडा अलंगपेक्षाही सोपा आहे. मात्र मागे खोल दरी आहे आणि ती दुर्लक्षित करून चालत नाही. पण इथेही पंकज अगदी लीलया चढला. त्याचीही ही पहिलीच चढाई होती. हा टप्पाही थोडा कठीण आहे, पण नीट सराव, सहकार्य आणि रोप मॅनेजमेंट केलं तर कठीण मात्र नाही. तिसरा पेपरही पास झालो होतो. या टप्प्यापुढील चढाई मात्र जपून करायला हवी कारण इथे घसाऱ्याची पायवाट आणि उभ्या पायऱ्या आहेत. त्यात पुन्हा आपण उन्हात आलेलो असतो. मागे अलंगगडाचा रौद्र नजारा नजरेत सामावत नाही. अगदी पुढल्या २० मिनिटांत आम्ही मदन गडावर होतो. अनादी आनंद झाला होता. अलंग-मदनगड दोन्ही सर झाले होते. मदन गड फिरून घेतला. दुपारचे तीन वाजून गेले होते आणि किल्ला उतरून गाव गाठायचे होते म्हणून घाई (सुरक्षापूर्वक) केली. मदनगडाचा टप्पा रॅपलिंग करून उतरलो. रिस्की ट्रॅवर्सही पार केली. आणि गुहा गाठली. तिथली धोपटी उचलली आणि गड उतरायला सुरुवात केली. इथे चार वाजून गेले होते. या भागात सहा वाजताच रात्र होते आणि बिबळे, रानडुकरे, विषारी साप इत्यादी असल्याने आम्हाला रात्र पडायच्या आधी आंबेवाडी गाव गाठायचे होते. एवढा (सो कॉल्ड) मोठा ट्रेक करूनही आम्ही गुहेपासून दीड तासांत आंबेवाडीत पोहोचलो होतो. खूप खूप आनंद झाला होता. आता कोणी ‘अलंग - मदन केलाय्स का?’ विचारल्यास उत्तर तयार असेल ‘की उगाच हाईप केलेला ट्रेक आहे तो, झालाय माझा..’

विशेष आभार: कैवल्य वर्मा, नंदू चव्हाण, प्रथमेश देशपांडे, पंकज दातखीळे, निखील मोडक, मानस मोडक

No comments:

Post a Comment