भ्रमंती किल्ले सोंडाईची - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 18, 2015

भ्रमंती किल्ले सोंडाईची

नोव्हेंबर २०१३ मध्ये केलेल्या मुल्हेर मोरा ट्रेकनंतर निरंजनला कामानिमित्त मुंबईसोडून तळेगाव दाभाडेला शिफ्ट व्हावं लागलं. त्याला नुकतीच मुलगी झाल्याने जबाबदारीही वाढली होती; त्यामुळे नाईलाजाने त्याने मुंबई सोडायचा निर्णय घेतला होता. शेवटी ‘आधी पोटोबा मग विठोबा’ म्हणतात तसंच काहीसं झालं होतं त्याचं. मात्र ‘ना धड पुणे ना धड मुंबई’ अश्या लोकेशनमुळे त्याचं ट्रेकिंग बरंच कमी झालं. त्याउलट मी आणि प्रथमेश इतर मित्रांसोबत बरेच ट्रेक करत सुटलो होतो. ट्रेक झाल्यानंतर निरंजनचा फोन यायचा आणि मी ट्रेकच्या गमतीजमती त्याला सांगत असे. ट्रेकपासून दुरावणं त्याला खूप असह्य झालं होतं हे त्याच्या बोलण्यावरून कळून येत असे पण आमचे ट्रेक्स असे निवडले जात होते की त्याला त्या ट्रेक्सना येणं कठीण असायचं. त्यात कसाबसा जून २०१४ ला इर्शाळगडाच्या ट्रेकला त्याची हजेरी होती. होता होता वर्षं उलटलं आणि २०१५ च्या मार्च मध्ये एक दिवस मला निरंजनचा फोन आला.

“हा.. बोल निरंजन... कसा आहेस...??”

“मी बरा आहे... मला सांग १९च्या रविवारी तू काय करतोयस..??”

“काही नाही... बहुदा घरीच आहे.. का रे?”

“वन डे ट्रेक करूया कोणता तरी?”

“ट्रेक? कोण कोण??”

“तू आणि मी.. दोघेच...”

“दोघेच?? कसं शक्य  आहे.. बरं समजा जायचं ठरतंय तर जायचं कुठे? तेही दोघांनाच जमेल असा कोणता ट्रेक आहे?”

“सोंडाई... सोंडाई झालाय का तुझा?”

“सोंडाई? म्म.. नाही रे.. नाही झालाय..”

“तो करूया मग?? काय बोलतो?”

“ठीक आहे.. मी जरा माहिती काढतो मग तुला सांगतो...”

माझा मित्र संभाजी चोपडेकरच्या फेसबुक वॉलवर सोंडाईची माहिती वाचली होती. तो नुकताच तो ट्रेक करून आला होता. मग इंटरनेटवरुन आणखी काही माहिती जमा केली तेव्हा कळलं की एखाद दोन रॉक पॅचेस वगळता ट्रेक तसा सोपा आहे. फक्त खूप आतल्या बाजूला असल्याने तिथपर्यंत जाणं त्रासदायक आहे. लगेच निरंजनला कॉल केला आणि त्याला तिथपर्यंत पोहोचणं ‘कसं करायचं’ ते विचारलं. “तू पनवेलवरून चौकला ये.. मी इथून बाईक घेऊन येतो.. तुला चौकवरून पीकअप करून पुढे जाऊ... काय बोलतो?” मी राहायला सिवूड्सला असल्याने आयडिया झक्कास वाटली. मी तत्काळ होकार दर्शवला आणि २०१५ च्या एप्रिलच्या १९ तारखेला सोंडाईला जायचं ठरलं.

१९ च्या पहाटे तयारी करून मी ‘ईन-टाईम’ पनवेलला पोहोचलो आणि तिथून चौकसाठी टमटम पकडून रवाना झालो. मला एकट्याला प्रवास करायला खूप आवडतं. एकट्याला म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टनी फिरणं खूप आवडतं. गाडीचा चालक, तो जो कोणी असेल तो, गाडी चालवत असतो.. आपण मस्तपैकी खिडकीतून बाहेर डोकाऊन डोंगर-दर्‍या, वृक्षवल्ली आणि आसमंताचा आस्वाद घेत प्रवास करत असतो. बाजूच्या सीटवर कोणी असला तरी अनोळखी असल्याने तो आपल्या डिस्टर्ब करत नाही त्यामुळे सर्वकाळ खिडकीतून बाहेर ती मजा घेता येते. सोबत एक जरी मित्र असला तरी मग गप्पा होतात आणि या आनंदाला मुकावं लागतं. जवळपास तासाभराच्या त्या प्रवासात, आजूबाजूला दिसून आलेल्या, चंदेरी-म्हैसमाळ, कलावंतिण-प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड या गडांवर नुसत्या नजरेनेच फिरून आलो.

मला हा रस्ता खूप आवडतो कारण ह्या रस्त्यावर अनेक किल्ल्यांचे दर्शन होते आणि आठवणी ताज्या होतात. सोबत जो-कोणी असेल त्याला सगळे किल्ले दाखवून आणि त्यांचे किस्से ऐकवून मी हैराण करून टाकतो. त्याच रूटवर अनेकदा प्रवास केलेल्या माझ्या मित्रांना ते किल्ले आणि माझे तेथील किस्से तोंडपाठ झाले आहेत एवढ्यांदा मी ते त्यांना ऐकवले आहेत. “चला.... चौक चौक...” असं त्या टमटमच्या सारथ्याने सांगताच तपश्चर्या भंग झाल्यासारखा मी ‘जागा’ झालो आणि उतरता झालो. समोरच्या रस्त्यावर पलीकडे निरंजन स्कूटी घेऊन उभा होता. त्याला जवळपास वर्षभरानंतर भेटत होतो. त्याची आणि माझी पहिली भेट झाली होती ऑगस्ट २०१२ च्या गोरखगड ट्रेकला. तो त्या ट्रेकला पार्टीसिपंट म्हणून आला होता पण त्या ट्रेकला इतर मंडळींना गडावर पोहोचण्यात त्याने खूप मदत केली होती. तेव्हापासून तो चांगला मित्र झाला. या माणसाचं एक वैशिष्ठ्य म्हणजे पहिल्या ट्रेकला मी त्याला जसा पाहिला होता तो गेली कित्येक वर्षे तसाच्या तसाच राहिला आहे. इतर मित्रांमध्ये फोटोमध्ये नीट दाखवता येतील असे बदल झालेयत पण हा अजूनही तसाच राहिला आहे, एकदम फ्रेश आणि हॅंडसम. त्याच्या जवळ जाऊन गळाभेट घेतली आणि त्यातून बरेच संदेश एकमेकांना ‘पास’ झाले. बर्‍याच दिवसांनी भेट झाल्याचा आणि ‘फायनली’ ट्रेकला भेटल्याचा आनंद दोघांच्याही चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता. निरंजनने गाडी स्टार्ट केली. खर्लंग खर्लंग करीत उभ्या असलेल्या त्या गाडीवर मी बसलो आणि आम्ही सोंडेवाडीच्या दिशेने कूच केले.

एनडी स्टुडियोच्या प्रशस्त गेटला चिकून जाणार्‍या रोडने आम्ही पुढे निघालो. चौकपासून एक ७ - ८ किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा श्रीमंती झळकत होती; कारण ह्या रस्त्यावर खूप सारी रिझोटर्स दिसत होती. त्यानंतर बोरगाव लागलं. पुढे ४-५ किलोमीटर अगदी छोटा घाट-वजा रस्ता गाडी चढवून सोंडेवाडीत पोहोचलो. गावात प्रवेश केला तेव्हा मन जड झालं. मुंबईपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर असूनही सोंडेवाडी सारखं गाव आजही एका आदिवासीपाड्यासारखंच आहे. गावामध्ये अगदी मूलभूत गोष्टींचीही वानवाच दिसत होती. पण वेळ जास्त नसल्यामुळे गावात चक्कर मारता आली नाही. गावातून सोंडाई किल्ल्याचा पश्चिम कडा खुणावत होता. जिथे गाडीरस्ता संपतो तिथूनच उजवीकडे एक पायवाट जाताना दिसते तीच वाट सोंडाई किल्ल्यावर जाते. ती पकडून आम्ही सोंडाईच्या दिशेने मार्गस्थ झालो.

ट्रेक सुरू करायला ११ वाजत आले होते आणि फेब्रुवारी असल्याने नाही म्हंटलं तरी ऊन जाणवायला लागलं होतं. त्यात माथेरान डोंगररांगेत, खरंतर संपूर्ण कर्जत - पनवेल भागात डोंगरांवर हवा जास्त वाहत नाही. डोंगर पदरात थोडी हिरवळ दिसून येते. पण तिचा गारव्यासाठी उपयोग होत नाही. बर्‍याच दिवसांनी भेटल्यामुळे आम्ही मस्त गप्पा मारत हळू हळू वर चढत होतो. ट्रेक खूपच लहान आहे ते माहीत असल्यामुळेच थोडी चाल-ढकल चालली होती. शिफ्टिंगनंतरचं आयुष्य, त्यातील नाविन्य, पुणे-मुंबई जीवनपद्धतीतिल फरक, अलिकडे केलेले ट्रेक्स, त्यातल्या गमतीजमती, असे विविध विषय धागा मिळत जाईल तसे ओढले जात होते. संपूर्ण डोंगरावर आम्ही दोघेच असल्याचे जाणवून येत होते, त्यामुळे अंदाधुंद गप्पा सुरू होत्या. अगदी थोड्याच वेळात आम्ही ट्रेकचा पहिला टप्पा पार करून किल्ल्याच्या कड्याशी भिडलो.

इथे शेवटच्या टप्प्यात एक जोड-टाके दिसून आले. त्यात तळाशी पाणी होते. पण पिता येण्यायोग्य मात्र ते नव्हते. कड्याच्या लहानुल्या सपाटीवर गावातील एक कुटुंब, दरीलगत उभ्या असलेल्या झाडाखाली बसलेलं दिसलं. बहुदा ते गडावरुन जाऊन खाली आले होते. त्यांनी हातात चपला घेतल्या होत्या त्यामुळे आम्ही जवळच थांबलो. ‘कोन-कुठचं’ सवालांची देवाणघेवाण झाली. थोडीफार विचारपूस झाली. त्यांना गड-वगैरे मध्ये जास्त इंटरेस्ट वाटला नाही पण आम्ही वर जातोय म्हणजे आम्ही देवीचे भक्त वगैरे आहोत अशी त्यांची समजूत झाली. पण शहरातून आलोय हे त्यांनी ताडलं होतं म्हणून ‘चपला हिथंच काढून जावा... सग्ले चपला हिथंच काढून जात्यात..’ हा सल्ला दिला. चपला काढून एवढ्या उन्हात वर चढणार्‍यांपैकी आम्ही दोघेही नव्हतो; त्यामुळे होकारार्थी मान हलवून तिथेच बसून राहिलो आणि ते लोक जाण्याची वाट बघू लागलो. पण ते काही हलेनात. ते सुद्धा, आम्ही चपला काढून वर जातोय का ते पाहायला थांबलेत असं आम्हाला वाटायला लागलं. ‘आता वर जायचे कसे?’ हा यक्षप्रश्नच होता. पण क्षणात तो प्रश्न सुटला. ती मंडळी उठली आणि आम्हाला ‘रामराम’ करून धारेवरूनच खालच्या कोणत्यातरी गावाच्या दिशेने निघाली. ती दिसेनाशी झाल्यावर आम्ही कड्याला भिडलो. पहिलाच रॉक पॅच पाहून आम्ही चपला काढून वर निघालो नाही या निश्चयाचा आम्हाला अभिमान वाटू लागला. कडा दणदणीत तापला होता आणि अनवाणी निघालो असतो तर तापलेल्या तव्यावर पाय ठेवावा अशी स्थिति झाली असती. तो कडा चढायला अगदी कठीण नव्हता पण नवखा माणूस तिथून खाली नक्कीच फेकला गेला असता. तो कडा पार करून आम्ही पुढे गेलो. पुढे खडकात खोदलेल्या पायर्‍या किंवा खोबणीवरून आम्ही वरच्या टप्प्यात आलो. इथेही दोन उत्तम खणलेली पण आता सुकी असणारी दोन टाकी दिसून आली आणि समोर एका खणखणीत लोखंडी शिडीने आमचे स्वागत केले. ती शिडी नुकतीच बसवण्यात आलेली वाटत होती. जवळपास ६० फुटांच्या कड्यावर ती बसवलेली होती. तिच्या मागे जुन्या खोबण्या दिसून येत होत्या आणि जर शिडी नसती तर आम्हाला इथूनच परत जावं लागलं असतं याची जाणीव त्या करून देत होत्या. मोठ्या दिमाखात आम्ही शिडी चढून वर आलो.

या शेवटच्या टप्प्यात दोन मोठी टाकी दिसून आली ज्यात एका टाक्यामध्ये दोन दगडी खांब दिसून आले. त्या खांबटाक्यात अगदी तळाला थोडेसे पाणी होते पण तेही पिण्यायोग्य नव्हते. पुढे नागमोडी वाटेने आम्ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. इथे सपाटीच्या मध्ये असणार्‍या एकाच झाडाच्या बुंध्याशी देवतांच्या काही मूर्ति स्थापल्या होत्या आणि त्यांना शेंदूर लावला होता. तिथे असणार्‍या झाडांवर लावलेले भगवे झेंडे आणि मधल्या झाडाला टेकवून उभे ठेवलेले बांबू पाहून तिथे नुकतीच एखादी जत्रा वगैरे होऊन गेल्याचे कळत होते. त्या मूर्ति पाहण्यासाठी आम्ही चपला बाजूला काढून ठेवल्या कारण मूर्ति जवळ जवळ अगदी जमिनीवरच ठेवण्यात आल्या होत्या. आम्ही जवळ जाऊन दर्शन घेतलं. निसर्गाच्या मार्‍याने मुर्त्यांची इतकी झीज झाली होती की मुर्त्या ओळखू येत नव्हत्या. त्यामुळे मध्यभागी असणारीच सोंडाईदेवी असे मानून आमचा ट्रेक सफल केल्याबद्दल तिला नमन केले. इथेही थोडावेळ झाडाखाली बसण्याचा प्रयत्न केला पण झाड फारसे मोठे नसल्याने सावली अशी नव्हती म्हणून शिडीच्या वरच्या भागाजवळ असणार्‍या एका कोनाड्यात आम्ही बसलो. इथे कातळात अगदी गुहेसारखे थंड वातावरण होते. तिथे बसूनही थोड्या गप्पा मारल्या. इथून आजूबाजूच्या प्रदेशात इर्शाळगड, माथेरान इत्यादि प्रदेश दिसून येतो. पण किल्ल्याच्या ईशान्य-पूर्व भागात असणार्‍या डोंगरावर, ज्याला गोवारीदेव डोंगर म्हणतात, त्यावर जाणारी वाट आणि त्याच डोंगराच्या पूर्व दिशेला मुख्य डोंगरपासून सुटावून बाजूला झालेला एक मोठा गोल खडक ह्या गोष्टी हमखास लक्ष वेधून घेतात. मन भरून त्या डोंगरावर वेळ घालवल्यावर आम्ही एक एक टप्पा उतरत गावात आलो आणि निरंजनच्या स्कूटीवर बसून परतीच्या प्रवासाला लागलो. 


No comments:

Post a Comment