स्वदेशी दिवाळी - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, November 1, 2015

स्वदेशी दिवाळी


या महिन्यात आपला सगळ्यात मोठा सण आहे. दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव. दिव्यांच्या प्रकाशात अंधाराला गुडूप करण्याचा हा सण. हा सण अनेक पौराणिक कथा, प्रसंगांवर आधारीत प्रथांमुळे साजरा करण्याची पद्धत आहे. लाखो दिव्यांची आरास लावून घर, परिसर प्रकाशाने उजळून टाकला जातो. एकूणच आनंदी वातावरण असते.

मात्र आज बाजाराची परिस्थिती वेगळी आहे. महागाई खूप वाढली आहे आणि आपली मिळकत कमी होत आहे. त्यामुळे आपण सण साजरे करण्यासाठी ‘स्वस्त आणि मस्त’ पर्याय शोधत आहोत. आणि हेच ‘स्वस्त आणि मस्त’ पर्याय उपलब्ध करून देण्यात ‘चीन’ आघाडीवर आहे. ‘लार्ज स्केल प्रोडक्शन’ म्हणजेच ‘मोठ्या प्रमाणावर उत्पादन’ करून त्या स्वस्तात स्वत उपलब्ध करून अनेक देशांची उत्पादन क्षमता मोडण्याचा ‘चीन’चा ‘डाव’ अजूनही अनेक देशांना कळून आला नाहीय. आपणही त्यातले एक आहोत. दिवाळीच्या तसेच बाजारातील इतर वस्तू विक्रीतून आपण ‘चीन’ला जे उत्पन्न मिळवून देतो, त्यातूनच चीन नवनवीन प्रगत तंत्रज्ञानाची हत्यारे वापरून आपल्याला आपल्याच सीमेवरून आत ढकलून आपला देश गिळंकृत करू पाहत आहे, हे कटू सत्य आपण दुर्लक्षित करत आहोत.

याउलट आपल्या देशातील अनेक मजूर वर्गाचे लोक खूप काबाड कष्ट करून मातीच्या पणत्या, दिवे, तुळशी वृंदावन, कंदील आदी वस्तू तयार करून बाजारात उपलब्ध करून देतात. मात्र त्यात प्रचंड मेहनत असल्याने त्यांची किंमत वाढते आणि आपण त्या महाग मिळतात म्हणून आपण त्या घेत नाही व आपण आपलाच तोटा करून घेत आहोत. आपण त्या वस्तू विकत घेऊन आपल्याच भाऊबंधाना सुखाचा घास उपलब्ध करून देऊ शकतो. त्यांची परिस्थिती सुधारून त्यांना या उद्योगजगतात टिकून राहण्यासाठी आणि शक्य झाल्यास पुढे त्यांच्या वस्तूंच्या किमंती कमी करण्यास मदत करू शकतो. त्यानेच ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ हा अभंग प्रत्यक्षात उतरवू शकू.

मित्रांनो, लक्षात घ्या की एकवेळ दिवाळी साधेपणाने साजरी करूया. पण ह्या पुढे पुन्हा ‘स्वदेशीचा नारा’ सुरु करूया. किमान आपल्या देशात पिकणाऱ्या, तयार होणाऱ्या वस्तू आपण विकत घेऊया. आपल्यातील काहीजण पुढे येऊन, ज्या वस्तू आपल्या देशात तयार होत नाहीत, त्या तयार करण्यासाठी प्रयत्न करूया. पण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू वापरायचा प्रयत्न करूया. यामुळे चीन सारखे देश जे आपल्याला ‘गृहीत’ धरून आहेत त्यांच्या नाकावर टिचून उभे राहण्याचा आपला प्रयत्न त्यांना माघार घेण्यास प्रवृत्त करेल. तरच खऱ्या अर्थाने आपण आपला देश प्रकाशमान होईल.

No comments:

Post a Comment