धोकादायक सोलो ट्रेकिंग - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 18, 2015

धोकादायक सोलो ट्रेकिंग


आपण या आधी गिर्यारोहणातील धोक्यांची आणि त्यापासून सुरक्षित राहण्याविषयी माहिती घेतली आहे. सोलो ट्रेक्स (एकट्याने केलेले ट्रेक्स), नाईट ट्रेक्स (रात्री केलेली भटकंती) इत्यादी गिर्यारोहणाच्या कल्पना जरी साहसी वाटत असल्या तरीही त्या चुकीच्या आहेत, असे बहुतांश अनुभवी आणि ज्येष्ठ गिर्यारोहींचेही मत आहे. या लेखातून सोलो ट्रेकिंगमधील धोक्यांवर प्रकाश टाकूया..

मुळात गिर्यारोहणाच्या अलिखित नियमावलीत एकट्याने गिरीभ्रमंतीला मान्यता नाही. गिर्यारोहणात चमू किंवा तुकडी किंवा गट संकल्पना लागू होते. चमू (गट) हा किमान ५ सदस्यांनी पूर्ण होतो. त्याला कारणेही तशीच आहेत. एक व्यक्ती अडचणीत सापडल्यास दगावू शकते. तीच गत दोन गिर्यारोहिंच्या बाबतीत होते. एकाला अपघात झाल्यास दुसरा त्याला सोडून मदत आणायला जाऊ शकत नाही, तसेच त्याला उचलूनही नेऊ शकत नाही. तीन व्यक्तींमध्ये अशा अपघातात एक व्यक्ती अपघातग्रस्त व्यक्तीजवळ थांबून तिसरी मदत आणायला जाऊ शकते. मात्र येण्या-जाण्यामध्ये उशीर झाल्यास अपघातग्रस्तव व्यक्ती दगावू शकते. किमान ५ जण असतील तर एक पुढे जाऊन मदत उभारू शकते तर इतर चौघे अपघातग्रस्त व्यक्तीस लवकरात लवकर गावाजवळ आणण्याचा प्रयत्न करू शकतात.

आजही सह्याद्रीमध्ये अनेक ठिकाणी, विशेषतः दुर्गम किल्ल्यांजवळच्या परिसरात जंगली जनावरांचा वावर आहे. अगदी बिबळे नसले तरीही रानडुक्करे, माकडे यांसारख्या उपद्रवी प्राण्याचा वावर आढळून येतो. तसेच नाग, फुरसे, घोणस आणि मण्यार सारखे विषारी सापही सह्याद्रीत मुबलक प्रमाणात आहेत. विंचू, मधमाश्या इत्यादीही खूप प्रमाणत आढळतात. यांपैकी कोणाच्याही हल्ल्यात एकटी-दुकटी व्यक्ती जखमी होऊ शकते. खरंतर अचानक झालेल्या हल्ल्याने गोंधळून जाऊन केलेल्या चुकीमुळेही ती जबर जखमी होऊ शकते. प्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो. ५-६ जणांच्या तुकडीमध्ये थोडाफार गडबड-गोंधळ असल्याने हे प्राणी आवाजाने दूर राहण्याची शक्यता वाढते आणी धोका टळतो.

गिर्यारोहणात अनेक ठिकाणी कठीण टप्पे पार करावे लागतात. अशा वेळेला गटाची आवश्यकता जास्त असते. एक सदस्य टप्पा पार करत असताना दुसरा त्याला सुरक्षा दोराची मदत देऊ शकतो. लहान-मोठे टप्पे गटामुळे विनासायास पार पाडले जातात. एकटा गिर्यारोही अशा वेळेस पडून, घसरून दगावू शकतो. लांब पल्ल्याच्या ट्रेकनंतर दमलेल्या अवस्थेत जेवणाची तयारी करणे कर्मकठीण आहे. गटामध्ये ते सहजशक्य होते. मुक्कामाच्या वेळीही गटामध्ये झोपल्याने वेळेस तातडीची मदत उभारता येते.

एकट्याने फिरण्यात आणखी एक मोठा धोका म्हणजे चोर-दरोडेखोरांचा हल्ला. दुर्गम भागातील गावांत काही समाजकंटक असले धंदे करतात. मुळात काम-चुकार असलेले हे लोक सहज भक्ष्य हाती लागले की त्यावर घाला घालतात. त्यांच्यासाठी ५००-१००० रुपये खूप असतात. त्यात हल्ल्यात सापडलेल्या कॅमेरा, बॅग, गॉगल इ. शहरी वस्तू ते नजीकच्या शहरात नेऊन कमी किमतीत विकतात आकण त्यातून पैसे कमावतात. त्यामुळे अशा किकाणी चोरा-चीलाटांचे भय खूप असते. एकवेळ वन्य प्राणी चालू शकतील पण हे मनुष्य-प्राणीखूप धोकादायक आहेत. भीमाशिंकर, लोणावळा इत्यादी ठिकाणी मोठ्या गटांत हे दरोडेखोर आढळतात आणी त्यांना प्रतीकार केल्यास जीवावरही बेतू शकते. एकट्या व्यक्तीने कितीही हत्यारे बचावासाठी सोबत ठेवली तरी गटाने केलेल्या हल्ल्यांत एकटे-दुकटे काहीही करू शकणार नाही. गटामध्ये असल्यास किमान प्रतीकार करण्याची हिम्मत आपण दाखवू शकू.

गटामध्ये आपल्यातील प्रत्येकावर एक अंकुश स्थापित होतो. हा अंकुश अवास्तव शूरत्व दाखवण्यापासून आपल्याला लांब ठेवतो आणि अपघात आपसूकच टाळले जातात. एकट्याने केलेल्या भ्रमंतीत ट्राय तर करून बघूया घोषवाक्याने अनेक नकोश्या गोष्टी करण्यात येतात. यामध्ये अपरिचित, अनगड पायवाट धरणे, आधी केव्हाही न पाहिलेले, चव घेतलेले फळ चाखणे, तलावात पोहोण्यासाठी उतरणे, जीवघेणे शॉर्टकटवापरणे इत्यादी गोष्टी कळत-नकळत केल्या जातात. गटात हे शक्य नसते, कारण एकावर दुसऱ्याचा ‘कंट्रोल’ असतो.
आठवणी हा एक जिव्हाळ्याचा विषय इथे उपस्थित होतो. एक-दुसऱ्याशी सोबत घालवलेल्या आठवणी अधीक काळ स्मृतीत राहतात हे सर्वज्ञात आहे. ह्माबाबत दुमत होण्याची शक्यताही आहे. मात्र काही गोष्टी शेअरकेल्याने वाढतात, तसेच आठवणींच्या बाबतीत आहे. त्या जास्त काळ ताज्या टिकवायच्या असतील तर गटामध्ये हिंडणे केव्हाही उत्तम.

सोलो ट्रेकिंग घातक असल्याचे हे केवळ काही ळक मुद्दे आहेत. इतर अनेक धोकादायक गोष्टी सोलो ट्रेकिंगमध्ये जीवावर बेतू शकतात. आणि आजच्या युगात आपण स्वार्थीहोऊन चालणार नाही कारण आज गिर्यारोहणहा कोण्या एकाचा छंद राहिला नाहीय तर तो एक जागतिक स्तरावरील समूह झाला आहे. आपण सगळेच या क्षेत्राचे, समूहाचे भाग बनलो आहोत. आपल्या एकट्याच्या वागण्याने या समूहाला दोष लागतील असे काही कारणे म्हणजे ते बंडहोईल. आधीच अनेक अपघातांमुळे, नियमांचे पालन न केल्यामुळे झालेल्या चुकांमुळे, आपल्या ह्मा समूहाच्या इभ्रतीला धक्का पोहोचत आहे. अशा नकारात्मक गोष्टींमुळे नवीन मंडळी ह्मा क्षेत्राकडे वळणार नाही हा तोटाही लक्षात घेतला पाहीजे.


अशा अपघातांमुळे आपल्या कुटुंबीयांना, मित्रपरिवारालाही किती दुःख होत असेल याचा विचार करा. अपघातग्रस्त व्यक्ती ही तरुण मुलगा-मुलगी असेल तर आई-वडीलांच्या हृदयावर किती घाव होत असतील? कर्ता कमावता माणूस असेल तर त्याच्या बायको-मुलांवर काय संकट कोसळत असेल? प्रौढ व्यक्ती असेल तर त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचे किती सावट पसरत असेल? याचा विचार करा.. म्हणून मी सदैव सांगत असतो की, ‘चला, साधे सोपे नियम पाळूया.. धोके-अपघात टाळूया..


वरील लेखाशी संबंधित काही सोलो ट्रेकिंग अपघातांच्या बातम्यांची यादी पुढे दिली आहे. या पुढेही माझ्या वाचनात येणाऱ्या संबंधित अपघातांची नोंद मी येथे जनजागृतीसाठी करणार आहे.

१. नारायण चौधरी - ६०+ वर्षे - गोतारा / गुमतारा (वसई - ठाणे)

http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44899045.cms?prtpage=1


२. बी. श्रीनिवास चंदशेखर - २९ वर्षे - ढाक किल्ला (सांडशी - कर्जत)

http://thegoldensparrow.com/news/iit-students-decomposed-body-found-near-dhak-fort/

1 comment: