हायकिंग पोल / वॉकिंग स्टिक - एक आधार - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 17, 2017

हायकिंग पोल / वॉकिंग स्टिक - एक आधार


आजच एका बुजुर्ग ट्रेकरच्या टाईमलाईनवर ‘वॉकिंग स्टिक’ची पोस्ट वाचली. त्यांनी हा ब्लॉग वाचताना मी त्यांना ‘बुजुर्ग’ बोललेलं पाहिलं तर त्याच काठीनं मला धुतील हा भाग वेगळा. पण त्यांना मी वयानं नाही तर अनुभवाने बुजुर्ग म्हंटलेलं आहे हेही ते मनातून जाणतात. असो! तर त्यांच्या पोस्टने मला ह्या विषयावर लिहिण्यास ‘उद्युक्त’ केलंय असं आपण म्हणू शकतो.

वॉकिंग स्टिक, आपल्या ट्रेकर्सच्या भाषेत बोलायचं झालं तर ‘हायकिंग पोल / स्टिक’ ही डोंगरात वापरली जाणारी एक महत्वाची गोष्ट आहे.  हायकिंग पोल ही काही नवीन गोष्ट नाहीय. ती अनादी काळापासून वापरात आहे. कदाचित अश्मयुगीन मानवसुद्धा ती वापरत असावा. काळानुसार तिचं रूप बदललं आहे एवढंच. आजही अनेक डोंगर-दऱ्यातील गावांतून स्थानिक लोक छातीभर उंचीच्या काठ्या घेऊन डोंगर-दऱ्या पार करतात. याचे मुख्य कारण वैज्ञानिक आहे. (आजकाल ‘वैज्ञानिक’ हा शब्द वापरला नाही तर काही गोष्टी ह्या अंधश्रद्धा मानल्या जातात, त्यामुळे भीती वाटते.)

डोंगर चढताना आपला सगळा भर पायावर येतो. जितकी उंची अधिक तितका भार जास्त. कारण वाढत्या उंचीमुळे गुरुत्वाकर्षण आपल्या वजनात भर घालत जाते. पायामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपले गुडघे. काहीही जास्त काम न करणाऱ्या लोकांचे गुडघेही वाढत्या वयात दुखू लागतात; तिथे डोंगर-दऱ्यात राहणाऱ्या लोकांची व्यथा काय सांगावी. तीच तऱ्हा आपल्या ट्रेकर्सची. आपण तर डोंगरांत ‘पडीक’च असतो. आणि त्यामुळे पहाडी लोकांना किंवा ट्रेकर्सना गुडघा ‘डोक्या’एवढाच महत्वाचा असतो. किंबहुना त्यांच्या जीवनात गुडघ्याला खूप महत्व असतं. आमच्या एका प्रख्यात सरांनी नॉर्वे सारख्या ठिकाणी काही हजार किलोमीटर चालत पार करण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी यशस्वी गिर्यारोहण केले. मात्र आज त्यांना त्यांच्या घासल्या गेलेल्या गुडघ्यांमुळे ट्रेकिंग करू नका असे डॉक्टरने सांगितले आहे. पण ते ट्रेकिंग आताही करतात हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे गुडघ्यांचं महत्व एका ट्रेकरसाठी खूप असतं. तर हेच गुडघे शाबूत राहावेत आणि काही काळ जास्त ट्रेकिंग करता यावं यासाठी हायकिंग पोल वापरणे आवश्यक आहे. दोन टोकांवर उभ्या असलेल्या वस्तूपेक्षा तीन किंवा चार टोकांवर उभी असलेली वस्तू जास्त चांगला तोल सांभाळू शकते हेच ‘लॉजिक’ इथे लागू पडतं. काही ट्रेकर्स, हायकिंग पोल वापरण्याला अपमान समजतात. त्यात त्यांचा स्वाभिमान ठेचाळतो असे ते मानतात. आमच्या पायात बळ आहे हे ते बळंच दर्शविण्याचा प्रयत्न करतात.

हायकिंग पोल म्हणून पूर्वी काठी वापरत. आजही अनेक ट्रेकर्स वाटेत मिळालेली काठी हायकिंग पोल म्हणून वापरतात. पण अशी काठी प्रत्येक ट्रेकला मिळेलच असं नसतं. त्यामुळे फिरंग्यांनी त्यावर  तोडगा म्हणून मजबूत अशी धातूची सळी वापरायला सुरुवात केली. पुढे पुढे काठी किंवा सळी तिच्या उंचीमुळे उभ्या खडकांजवळ त्रासदायक ठरू लागली; म्हणून तिला ‘फोल्डिंग’ करण्यात आले. यामुळे ती, उपयोगात नसताना ‘लहान’ करून बॅकपॅकला लावून ठेवता येते. ट्रेकिंगमध्ये आधीच आपण बरेचसे सामान पाठीवर वागवत असल्याने त्यात हायकिंग पोलचे वजन नको म्हणून हल्ली ती अल्युमिनियम अलॉयपासून बनवली जाते. हे अलॉय विमाने बनवण्यासाठी वापरले जाते त्यामुळे ती वजनास हलकी पण उपयोगीतेत मजबूत बनते. तिला वेगवेगळ्या ठिकाणच्या गरजेनुसार ‘मुठ’ म्हणजेच ‘हँडल’ किंवा ‘ग्रीप’ असते. सर्वसाधारणपणे ती रबराची असते; ज्यामुळे ट्रेकरला तीवर मजबूत पकड मिळते. ट्रेकदरम्यात ती हातातून सटकू नये म्हणून तिला एक नायलॉनची पट्टीदेखील असते. ही पट्टी मनगटाभोवती गुंडाळून ठेवली की झाले. हायकिंग पोलच्या शेवटला टंगस्टन धातूचे एक टोक असते. हा धातू अतिकठीण असल्याने ते कोणत्याही ठिकाणी वापरता येते. या टोकावरसुद्धा एक रबरी टोपी असते, जिचा वापर बुटाच्या ग्रीप सारखा केला जातो. या रबराने दगड-माती सारख्या पृष्ठभागावर पकड घेता येते. बर्फातील गिर्यारोहणासाठी ‘स्नो डिस्क’ वापरली जाते. हायकिंग पोलच्या नळ्यांवर सेंटीमीटरच्या खुणा केलेल्या असतात; ज्यामुळे ती आपल्या उंचीनुसार बदलता येते. हायकिंग पोल ३ किंवा ४ नळ्यांमध्ये विभागलेला असतो. पूर्वी टी.व्ही.चा एंटेना जसा कमी जास्त केला जात असे, तश्याच प्रकारे हायकिंग पोल करता येतो. शेवटली वगळता इतर नळ्यांच्या टोकाला एक स्क्रूसारखे मेकॅनिझम असते; ज्यामुळे हायकिंग पोल आपल्या उंचीनुसार कमी जास्त करून ‘सेट’ केला जातो. काही हायकिंग पोलमध्ये ‘क्लिप लॉक्स’ असतात. काही हायकिंग पोल ‘शॉकप्रुफ’ किंवा ‘अँटीशॉक’ असतात. म्हणजेच त्यातील स्क्रूमध्ये स्प्रिंग बसवलेल्या असतात ज्यामुळे चढता-उतरताना त्यावर दाब आला की ह्या स्प्रिंगवर दाब येऊन तो ‘झटका’ कमी केला जातो. खासकरून डोंगर उतरताना या वैशिष्ट्याची उपयोगिता खूप असते.

हायकिंग पोल योग्य रितीने ‘सेट’ करणे सुद्धा खूप महत्वाचे असते. अन्यथा तिच्या वापराऐवजी तिचा त्रासच व्हायचा. सरळ ताठ उभे राहून दोन्ही हात सरळ खाली करावेत. त्यानंतर हात कोपरातून काटकोनात वाकवून समोर (काठी धरतो तसा) धरावा. आता ही झाली पठारावर चालण्याकरिता पोलची योग्य उंची. याच उंचीला पोल ‘सेट’ करावा. चढताना त्याची उंची थोडी कमी करावी, तर उतारावर जास्त करावी. कारण चढावर आपण पोल आधी वर टेकवतो आणि मग स्वतःला वर ओढतो. त्यामुळे त्याची उंची कमी केल्याने हात काटकोनात राहतो. याउलट उतारावर आपण पोल आधी खाली टेकवतो आणि मग स्वतःला खाली आणतो. त्यामुळे त्याची उंची जास्त केल्याने हात काटकोनात राहतो. पण ही ‘सेटिंग’ शेवटी प्रत्येकाच्या गरजेवर अवलंबून असते हेही तेवढेच खरे.

हायकिंग पोलवर ग्रीप घेण्याची एक विशिष्ट पद्धत असते. त्यामुळे मनगटावर जोर येत नाही.


हायकिंग पोल सुरक्षितेच्या दृष्टीनेसुद्धा खूप उपयोगी ठरतो. ट्रेकिंग दरम्यात आपण झाडावळीतून जातो. क्वचित आपला सामना साप-विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्याशी होतो. अशावेळी त्यांना पायवाटेपासून दूर करण्यासाठी आपण तिचा वापर करू शकतो. ट्रेकिंगदरम्यान माकडे कुत्रे इत्यादी प्राणीसुद्धा भेट देतात. क्वचित आक्रमक होतात. त्यावेळी त्यांना पळवण्यासाठी पोलचा वापर करू शकतो. प्रसंगी काही उपद्रवी लोकांना दूर ठेवण्यासही पोल वापरू शकतो.

सरतेशेवटी हायकिंग पोल वापरायचा की नाही ही बाब वैयक्तिक आहे तसेच ती वापरायची असते यावर अनेकांची अनेक मते आहेत पण जर तुम्हाला अधिक काळ गिर्यारोहण करायचे असेल तर ती वापरायची असते हे मात्र नक्की. 

(टीप: व्याकरणात हायकिंग पोल हे पुल्लिंगी आणि वॉकिंग स्टिक हे स्त्रीलिंग उच्चारले जाते. मात्र सदर लेखामध्ये काही ठिकाणी त्यात स्वतंत्रता घेतली आहे. चूकभूल द्यावी-घ्यावी.)



No comments:

Post a Comment