गिर्यारोहणादरम्यान प्रातःविधी उरकण्याची पद्धत - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 29, 2016

गिर्यारोहणादरम्यान प्रातःविधी उरकण्याची पद्धत

गेले काही दिवस फेसबुकवर ओळखी-पालखीच्या काही भटक्यांच्या पोस्टमधून एक उत्तम चर्चेचा विषय पाहायला मिळाला. गड-दुर्ग भ्रमंती किंवा गिर्यारोहणादरम्यान प्रातःविधी उरकण्याची पद्धत कशी असावी यावर ही मंडळी बोलताना दिसली. ज्या लोकांना गिर्यारोहण कलेची (मी त्याला क्रीडा कधीही म्हणणार नाही) काडीमात्र माहिती नाही त्यांना ‘प्रातःविधी उरकण्याची पद्धत’ हे वाचूनच हसू येईल. तर त्यांच्यासाठी येथे सांगू इच्छितो कि यात नैसर्गिक पद्धतीत तीच असणार आहे; मात्र आम्ही सगळे भटके ज्याविषयी बोलत आहोत ते म्हणजे ती नैसर्गिक पद्धत उरकताना गड-दुर्ग भ्रमंती किंवा गिर्यारोहणादरम्यान इतर लोकांना किंवा निसर्गाला जास्त धक्का लागणार नाही याची काळजी घेणे.

गिर्यारोहण ही संकल्पनाच खूप मोठी आहे. त्यातील उपरोक्त गोष्ट ही केवळ तिळमात्र बाब आहे. गिर्यारोहणादरम्यान कोणते नियम पाळले पाहिजेत याविषयी मी गेली कित्येक वर्षे अविरत लेख लिहित आलो आहे आणि ‘प्रातःविधी उरकण्याची पद्धत’ ही देखील या नियमातीलच एक बाब आहे. खरंतर ही एक कॉमन सेन्स (सदसदविवेकबुद्धी)ची गोष्ट आहे. अगदी शाळेतून आपण या गोष्टी शिकत आलो आहोत मग आज अचानक यावर एवढी चर्चा होण्याचे कारण काय? असा विचार माझ्या मनाला चाटून गेला; आणि तो तुमच्याही मनाला पडला असेल यात शंका नाहीच. पण हल्ली सर्रास आढळणारे स्वयंसिद्ध गिर्यारोहक या नियमांना धाब्यावर बसवून ज्या दिशेने निघाले आहेत त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांपैकी ही एक महत्वाची समस्या आहे. यावर लवकरात लवकर ठोस पावले उचलली जाणे खूप आवश्यक आहे.

बाहेरगावात गिर्यारोहणाच्या नियमांना खूप महत्व आहे. ज्यांना आपण मराठीत ‘आऊटडोर एथिक्स’ असं म्हणतो. (ही एक कोटी होती हे वेगळं सांगायला नको.) ते लोक हे नियम खूप काटेकोर पाळतात आणि चुकी करणाऱ्या मंडळींना सरकारद्वारे चांगलाच ‘फटका’ सहन करावा लागतो. मुळात आपल्याकडे सरकारला ह्या विषयाकडेच लक्ष द्यायला वेळ नाही त्यामुळे ही जबाबदारी आपल्यासारख्या गिरीप्रेमी-निसर्गप्रेमींवर येऊन पडली आहे.

या समस्येच्या समाधानासाठी पुढील उपाय योजता येतील:

१. सर्वप्रथम गटाची संख्या नियमित असावी. एका गटात ६-७ सदस्य नसावेत. अधिक असल्यास त्यांचे ६-७ जणांचे छोटे गट करावेत. मुक्कामाच्या जागेवर आणि तेथील निसर्गावर जास्त दबाव आणू नये.

२. प्रातःविधीची जागा ठरलेली असावी. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर नेत्याने विधीसाठी चांगली (सुरक्षित) जागा हेरून, सूर्याचा उजेड असतानाच, इतर सर्व मंडळींना ती जागा दाखवून ठेवावी. म्हणजे पहाटे उठल्यावर शोधाशोध करण्यात वेळ वाया जाणार नाही आणि त्रासही होणार नाही.

३. मुक्कामाची आणि विधीची जागा पाणवठ्यापासून किमान २०० फुट लांब असावी. जेणेकरून मुक्कामाच्या ठिकाणी केलेली घाण (जी खरेतर होताच कामा नये) पाण्यात मिसळणार नाही. तसेच पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांना आपला त्रास होणार नाही; किंवा त्यांचा त्रास आपल्याला होणार नाही.

४. स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळ्या जागा निवडाव्यात. एकामागून एक पद्धतीने विधी उरकून घ्यावा. तोवर इतर मंडळींनी निघण्याची तयारी करून ठेवावी. आवराआवर करून तयार राहावे.

५. माणूस हा सवयींचा गुलाम आहे. थोडे मनावर नियंत्रण ठेवले तर आपले शरीर आपल्या मनाप्रमाणे वागते. प्रातःविधी एका ठराविक वेळेत करण्याची सवय लागून घ्या. त्यासाठी थोडे ट्रेक्स वाट पहावी लागेल पण होता होता सवय होईल. यासाठी जेवणाच्या पदार्थांमध्ये बदल करून घ्यावा. पचनास जड अन्न घेऊ नये.

६. सकाळची वेळ चुकल्यास (वेळेत विधी पूर्ण न झाल्यास) थेट पुढल्या मुक्कामी तो आटोपता येईल असे पाहावे. भ्रमंतीदरम्यान इतर मंडळीना ताटकळत ठेऊन विधीस जाण्याची सवय मोडावी. यामुळे ती पायवाट आणि तिच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल आणि वेळ वाया जाणार नाही.

मुख्य विधी आटोपण्याची पद्धत:

आऊटडोर एथिक्समध्ये मुख्यकरून ही विधी उरकण्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक आणि पर्यावरणस्नेही (एको-फ्रेंडली) पद्धत सांगितली आहे. यात मांजर या प्राण्याच्या विधी उरकण्याच्या पद्धतीची नक्कल जास्त उपयोगी असल्याचे त्यांच्या संशोधनाच्या अंती निष्पन्न झाले आहे. ती पद्धत पुढीलप्रमाणे आहे:

१. प्रातःविधीला गेल्यावर माती भुसभुशीत असणारी एखादी जागा पहावी. (किंवा नेत्याने ती आधीच तशी निवडून ठेवावी.) त्या ठिकाणी ६ ते ८ इंचाचा एक लहानसा खड्डा (शौचकुपाचा असतो तेवढा) खणावा. याला इंग्रजीमध्ये 'Cathole' असे म्हणतात. यासाठी एक लहानसा फावडा सोबत ठेवावा.

२. त्यात विधी आटोपून, विधीसाठी वापलेली झाडाची पाने, पाणी इत्यादी त्यात टाकून, खणलेली माती त्यावर टाकावी आणि खड्डा बुजवून टाकावा. टिश्यू पेपर टाळावेत; ते नियमाच्या विरुद्ध आहे. आजूबाजूला पाण्याचे छोटे प्रवाह नाहीत याची खात्री करून घ्यावी. म्हणजे विधीकरिता वापरलेलं पाणी त्या प्रवाहातून मुख्य पाणवठ्यामध्ये जाणार नाही.

३. विधी आटोपून झाल्यावर माती टाकलेल्या ठिकाणी झाडाची खाली पडलेली एखादी काठी तिथे खोचून ठेवावी; म्हणजे नंतर येणाऱ्या मंडळीना ती खुण कळून येईल आणि ते ती जागा वापरणार नाहीत.

प्रातःविधी उरकण्यासाठी एवढी पद्धत जरी अवलंबली तरी किमान ह्या कार्यात आपण यशस्वी झालो असे समजण्यास हरकत नाही.

No comments:

Post a Comment