गिर्यारोहण, एक क्रीडा?? - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 3, 2017

गिर्यारोहण, एक क्रीडा??


हल्लीच कुठेतरी मी वाचलं की गिर्यारोहण क्रीडेच्या विकासासाठी अमुक अमुक संस्था कटीबद्ध. नाही.. विकास होतोय तर चांगली गोष्टय. पण गिर्यारोहणाचा क्रीडा म्हणून केलेला उच्चार मला थोडा खटकला. आणि तुम्हाला माझं हे वाक्य खटकलं असण्याची शक्यता वाढलीय. हो की नाही?

त्यासाठी क्रीडा म्हणजे काय? या प्रश्नाने आपल्याला सुरुवात करावी लागेल. क्रीडा म्हणजे ‘एक अशी व्यक्तिगत किंवा सांघिक क्रिया ज्यामध्ये मनोरंजनासाठी शारीरिक श्रम आणि कौशल्याच्या जोरावर दुसऱ्या व्यक्ती किंवा संघाशी स्पर्धा केली जाते.’

ही व्याख्या जर नीट वाचली तर अनेकांची गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गिर्यारोहण ही एक व्यक्तिगत क्रिया आहेच पण त्यासोबत ती सांघिक क्रियासुद्धा आहे. गिर्यारोहणातसुद्धा मनोरंजन हा हेतू असू शकतो. शारीरिक श्रम आणि कौशल्य याची गरज तर गिर्यारोहणामध्ये नितांत भासते. आता तुम्ही म्हणाल की जर ह्या व्याख्येतील क्रिया गिर्यारोहणाशी मिळती-जुळती आहे तर मग ती क्रीडा नाही असे मी का म्हणतोय? इथेच गोम आहे. व्याख्येतील शेवटचे आठ शब्द आपल्यासाठी म्हत्वाचे आहेत. क्रीडेमध्ये ‘... जोरावर दुसऱ्या व्यक्ती किंवा संघाशी स्पर्धा केली जाते’. आणि इथेच गिर्यारोहण ही क्रिया क्रीडेपासून वेगळी ठरते. गिर्यारोहणात स्पर्धा कधीही होत नाही. किंबहुना तो या क्रियेचा एक अविभाज्य घटक आहे. कोणत्याही प्रकारचे गिर्यारोहण हे स्पर्धेसाठी केले जात नाही. गिर्यारोहणात तुलनात्मक असे काहीच नसते. किंबहुना या साहसी क्रियेत स्पर्धा केली असता ती जीवावर बेतण्याचीच शक्यता नाकारता येत नाही. यात कौशल्याच्या जोरावर केलेले शारीरिक श्रम हे केवळ व्यक्तिगत आनंद मिळवण्यासाठी केले जातात. कोणताही गिर्यारोहक त्याच्या किंवा इतर संघातील व्यक्तीसोबत स्पर्धा करीत नाही. उलटपक्षी दोन संघ एकत्र आलेच तर स्पर्धेऐवजी एकमेकाला गिर्यारोहणातील निखळ आनंद मिळवून देण्यासाठी मदतच केली जाते.

गिर्यारोहणाला क्रीडा समजण्यात भर घालणाऱ्या काही गोष्टी हल्ली अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. यात व्यावसायिक किंवा धर्मादायी संस्थाचा तेवढाच वाटा आहे. यातील काही संस्था रॉक क्लायंबींगच्या स्पर्धा भरवतात. ज्यामध्ये कमी वेळामध्ये उत्तम रितीने चढाई करणाऱ्या व्यक्तीला पारितोषिक दिले जाते. त्याचप्रमाणे काही संस्था टेकडी किंवा डोंगर चढण्याच्या शारीरिक क्षमता पाहणाऱ्या शर्यती लावतात. यामध्ये सुद्धा कमी वेळात टेकडी अथवा डोंगर चढणाऱ्या व्यक्ती / संघास परितोषिक दिले जाते. त्यामुळे एकूणच या क्रियेला क्रीडेचे स्वरूप आले आहे आणि नवीन लोक त्याकडे एक क्रीडा म्हणूनच पाहू लागले आहेत. पण या संस्था ह्या स्पर्धा गिर्यारोहणाच्या प्रचारासाठी आणि विकासासाठी या स्पर्धांचे आयोजन करतात. यातून त्या गिर्यारोहणाला अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यातून चुकीचा संदेश जातोय ही गोष्ट त्यांच्या ध्यानीमनीच नाही.

आता मुळात प्रश्न उरतो की मग गिर्यारोहण क्रियेस नक्की काय म्हणावे. क्रीडेच्या व्याख्येमधून जर आपण ‘स्पर्धा’ काढून टाकली की जी गोष्ट उरते तिला नाव देणे खूप सोपे होऊन जाते. स्पर्धा काढली की उरते ते केवळ निखळ मनोरंजन. इथे मनोरंजन शब्दाचा शब्दशः अर्थ लागू पडत नाही. तर मनोरंजन म्हणजे जीवाला आल्हाददायक वाटणारी गोष्ट किंवा त्यातून होणारा आनंद. आपण त्याला ‘छंद’ म्हणू शकतो. जसे छायाचित्रकारिता, पक्षीनिरीक्षण इ. तसंच गिर्यारोहण एक ‘छंद’ आहे. अनेकजण त्याला ‘कला’ असेही म्हणू शकतात. यामध्ये कोणी कोणाशी स्पर्धा करीत नाही. त्यात जास्तीत जास्त आनंद मिळवण्यासाठी एकमेकाला अधिकाधिक मदत केली जाते. सांघिक असूनही गिर्यारोहणातून मिळणारा आनंद हा अनेकदा व्यक्तिगत असतो. त्याची तुलना कशाशीही केली जाऊ शकत नाही. प्रत्येकाची त्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असू शकते. तो दृष्टीकोन बाळगून त्यातून मिळणारा आनंद देखील वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो. त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी घेतले जाणारे शारीरिक श्रमसुद्धा व्यक्तीगत असतात. संघातील प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे एक स्थान असू शकते, किंवा नसूही शकते.

त्यामुळेच गिर्यारोहण ही क्रिया क्रीडा न राहता एक ‘छंद’ किंवा ‘कला’ ठरते. किमान माझ्या दृष्टीकोनातून तरी. आपलं काय मत आहे?


No comments:

Post a Comment