मी ट्रेकर आहे... - सह्य-भ्रमंती

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 11, 2018

मी ट्रेकर आहे...


pabargad

हल्लीच बदलापूरला माझ्या मैत्रिणीच्या काकीकडे गेलो होतो. तिथे दुपारी जेवायला वाढले तेव्हा मी मांडी घालून थेट जमिनीवरच बसलो. तर त्या काकींनी पाट घ्यायचा आग्रह केला आणि तोंडून निघुन गेलं, “अहो काकी असू देत, मी ट्रेकर आहे.. सवय आहे मला..”. मला खात्री आहे की हे वाक्य आपल्यापैकी प्रत्येक ट्रेकरच्या परिचयाचं आहे. ह्या ना त्या कारणाने हे ‘ब्रीदवाक्य’ आपल्या तोंडी येतंच. ‘ट्रेकरेतर’ मंडळीना ह्या वाक्याचा खूप राग येतो. हे वाक्य ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर ‘तो मै क्या नाचू??’ हे दर्शवणारे भाव दिसून येतात. पण या वाक्यामागची भावना फक्त एका ट्रेकरलाच समजू शकते.

मुळात एक ट्रेकर हा अतिशय ‘मिळाऊ’ इसम असतो. आपण मराठीमध्ये त्याला ‘फ्लेक्झिबल’ म्हणतो. कोणत्याही परिस्थितीशी ‘मिळवून’ घेण्याची त्याची जी सवय असते तीच ‘चालतं हो.. मी ट्रेकर आहे..’ या वाक्यातून ओसंडून वाहते. किंबहुना ते बोलणं हे एका ट्रेकरसाठी अभिमानाची गोष्ट असते. अनेकदा हे वाक्य उच्चारायची गरज देखील नसते. ट्रेकर स्मितहास्य करत ते बऱ्याचदा स्वतःशी बोलून जातो.. हे वाक्य कुठेही ऐकायला मिळू शकते. कधी एखाद्या गावी गेलात आणि तिकडच्या म्हातारीने हातात पाण्याचा तांब्या देत म्हटलं की ‘हे घे बाबा, विहिरीचं आहे.. चालेल का तुला??’ तर तो तांब्या हातात घेत घेत तिला उत्तर देताना हे वाक्य ठरलेलं असतं. एखाद्या लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या वेळी आयत्यावेळी एस.टी.चा आणि ते सुद्धा शेवटच्या सीटवर बसून प्रवास करावा लागला तर स्वतःशी बोललं जातं. एखाद्या गावी भल्या पहाटे पाण्याची बाटली हातात घेऊन गावकऱ्याला टॉयलेट कुठेय असं विचारलं आणि त्यांनी ‘जा वावरात..’ असा इशारा केला असता ताबडतोब वावराकडे पडणाऱ्या प्रत्येक पावलात हे वाक्य असतं. एखाद्या ठिकाणी ‘अमुक अमुक कुठे आहे?’ असं विचारल्यावर समोरच्याने ‘इथून सरळ २-३ किलोमीटर लांब आहे.. रिक्षा करून जा..’ असं म्हंटल्यावर ‘धन्यवाद..’ बोलून ते अंतर पायीच तुडवण्यासाठी सुरुवात करताना ते बोललं जातं. मुंबईसारख्या शहरात ट्रेनमध्ये तासनतास उभं राहून प्रवास करताना तसंच नशिबाने मिळालेल्या चौथ्या सीटवर बराच वेळ बसताना हे वाक्य बोललं जातं. प्रवासात खूप काम असताना आणि जेवणासाठीही वेळ नसताना गाडीवरून घेतलेल्या वडापावचा पहिला ‘बाईट’ मारताना हे वाक्य बोललं जातं. एखाद्या ट्रीपदरम्यान जास्त झालेलं सामान स्वतःच्या पाठीवर किंवा हातात घेताना हे वाक्य बोललं जातं. स्लीपर कोच ट्रेन किंवा बसमध्ये त्या हेलाकाव्यांमध्ये झोपण्याचा प्रयत्न करूनही झोप न येणाऱ्या ‘ट्रेकरेतर’ मंडळीची मजा बघत हळू हळू डोळे मिटताना हे वाक्य बोललं जातं. घरून एखाद्या प्रवासाला किंवा ट्रेकला निघताना ‘सांभाळून जा रे.. नीट प्रवास करा..’ या वाक्याला प्रत्युत्तर देताना हे वाक्य बोललं जातं.

असे कितीतरी प्रसंग आहेत, ज्यावेळी हे वाक्य किमान मनात बोललं जातं. पण या वाक्याचं रहस्य हे एका ट्रेकरलाच माहित असतं. या वाक्यातून त्याच्यातील आत्मविश्वास झळकत असतो. या वाक्यातून त्याला सांगायचं असतं, की कोणताही प्रसंग असू दे. कोणतीही समस्या असू दे.. मी त्यासाठी तयार आहे. पण हा आत्मविश्वास येण्यासाठी त्याने कित्येक वर्षांची तपश्चर्या केलेली असते. कित्येक वर्षे त्याने डोंगर-दऱ्यांमध्ये घालवलेली असतात. आसपासच्या गावांमध्ये तो फिरलेला असतो, तेथील लहानुल्या घरांमध्ये, उघड्या देवळांमध्ये त्याने रात्री घालवलेल्या असतात. अनेक उन्हाळे, पावसाळे त्याने भटकंती केलेली असते. जंगलातील मच्छर कीटकांना न जुमानता, गुडघा-गुडघाभर चिखलामध्ये त्याने पाय माखवून माथे गाठलेले असतात. गावातील कच्च्या रस्तावर आतले प्रवासी टणाटणा उडवत भरधाव धावणाऱ्या रिक्षा, जीप आणि बसमधून त्याने प्रवास केलेला असतो. जवळपासचे ट्रेक्स करण्यासाठी ट्रेनच्या ‘जनरल’ डब्यांतून दाटीवाटीने प्रवास केलेला असतो. एवढा त्रासदायक प्रवास करून पुन्हा पहाटे लवकर लांब पल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी तत्पर असतो. ट्रेक करताना शरीर आणि पायांचं मेंदूशी असलेलं ‘टायमिंग’ सेट करून घेतलेलं असतं. दुर्गम गावांतून, खेड्यांतून भटकताना समोर येईल ते अन्न गोड मानून, त्याला ‘परब्रह्म’ मानून चवीने खाण्याची तपश्चर्या केलेली असते. अनेकदा कितीही थकलेला असला तरीही चूल लावून स्वतःचे जेवण आणि अंथरूण स्वतः तयार केलेले असते. कोणताही हाडाचा ट्रेकर मला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असली ‘चिंधीगिरी’ करताना कधीच आढळणार नाही याचे कारण त्याने केलेली ही तपश्चर्याच असते. घरून ‘फिल्टर’चं पाणी भरलेली बाटली संपली नसली तरी गडावरील शेवाळलेल्या टाक्याचे पाणी तो आवडीने प्यायलेला असतो. उन्हा-पावसांत ट्रेक करताना अनेक रात्री त्याने मिळेल त्या जागी पथारी पसरलेली असते. गडाखालील गावांतील किंवा गडावरील देवळे, गुहा किंवा मोकळी मैदाने ही ट्रेकर्सची आवडती मुक्कामाची ठिकाणे असतात. पण प्रसंगी कोणत्याही ठिकाणी मोकळ्यावर स्लीपिंग बॅग टाकून त्यात झोपायलाही तो तयार असतो. एखाद्या गावकऱ्याने आग्रहाने घरात झोपायला सांगितले तर तो त्याच्यासाठी ‘पंचतारांकित’ अनुभव असतो. गावातल्या, डोंगरातल्या माणसांशी त्याची नाळ जोडली गेलेली असते; त्यामुळे ‘अहो, जाहो’ हे शहरी ‘औपचारिक’ शब्द त्याच्या तोंडी कधीच येत नाहीत. काका, मामा, काकू, आत्या, ताई, दीदी, भाऊ, दादा, आजोबा, आजी आणि अशी कित्येक नाती तो प्रत्येक ठिकाणी निर्माण करतो आणि त्यात जिव्हाळा असतो.. ‘देखल्या देवा दंडवत’ असा प्रकार ट्रेकरला जमत नाही.

अगदी मोजक्या शब्दांत सांगायचं तर ‘प्रत्येक परिस्थितीसमोर ठाम उभं राहण्याची ताकत’ त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते. आणि त्यामुळेच तो प्रत्येक प्रसंगात समोरच्याला किंवा स्वतःला सांगत असतो की, ‘येऊ द्या.. मी ट्रेकर आहे.. (मी तयार आहे..)...!!!’

15 comments:

  1. blogger_logo_round_35
  2. CSC_0201_2+-+Copy

    लाजवाब. दिल की बात लिख डाली दोस्त तुने!

    ReplyDelete
  3. blogger_logo_round_35

    भारी लिहिले आहेस

    ReplyDelete
  4. blogger_logo_round_35

    मस्त उत्कर्ष भाऊ..!! मनातलं लिहीलंस..!!
    - योगेश पाचंगे.

    ReplyDelete
  5. blogger_logo_round_35
  6. blogger_logo_round_35

    वाह!!! खरी मन की बात��

    ReplyDelete
  7. blogger_logo_round_35
  8. blogger_logo_round_35

    छान, वाचताना स्वतःच बाबतच वाचल्या सारख वाटलं मला, आणि हे ट्रेकर लाच कळेल 😊, ट्रेकर ला ट्रेकर सारखा मित्र भेटला तर आणखीनच उत्तम😊

    ReplyDelete
  9. 000
  10. blogger_logo_round_35
  11. blogger_logo_round_35

    खूपच भारी उत्कर्ष भाऊ भेटू एखाद्या ट्रेकला...

    ReplyDelete
  12. blogger_logo_round_35

    Khup Sundar, prtyek trekkerchya manatla

    ReplyDelete
  13. blogger_logo_round_35

    वा छान लिहिलय तुम्ही!!!

    ReplyDelete
  14. blogger_logo_round_35

    अप्रतिम ।।।

    ReplyDelete
  15. blogger_logo_round_35