विकास - नक्की कोणत्या दिशेने? - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, November 19, 2017

विकास - नक्की कोणत्या दिशेने?


शिरपुंज्याच्या भैरवगडाच्या ट्रेकच्या वेळी आम्ही तिथल्या पाटलाच्या घरी मुक्काम केला होता. खरंतर मुक्काम (बाय डिफॉल्ट) हनुमानाच्या देवळात होता. पण पाऊस पडत असल्याने आम्ही जेवणासाठी आणि अंग सुकवण्यासाठी तात्पुरता निवारा पाटलाच्या घरी घेतला होता. शेणाने सारवलेल्या कुडाच्या भिंती, मधल्या मोठ्या वाश्यावर उभे असणारे उतरते छत, शेणाने सारवलेला कोबा, मुळात लहान असणाऱ्या घरात उभारलेली तांदळाची भलीमोठी कणगी, मातीची चूल, त्यावर काळाकुट्ट झालेला तवा आणि त्यावर गोडस खमंग सुवास करत भाजली जाणारी तांदळाची भाकरी असा ‘टिपिकल’ हवाहवासा वाटणारा ‘माहौल’ होता. आधीच तयार करून ठेवलेल्या गरम चिकनसोबत बोटं आणि तोंड भाजणारी भाकरी रगडत असताना, ‘काय मस्त मजा येत्येत ना?’ असं नुसतं डोळे आणि मान हलवून आम्ही बोलत होतो. ‘लवकरच पक्कं घर बांधतोय आम्ही..’ पाटलाची बायको मध्येच चीरपली. तोंडातला घास तोंडातच थांबला आणि तो तिथेच ठेऊन आम्ही म्हणालो, “अहो काय गरज आहे, हेच छान वाटतंय की..”. “दादा, उंदीर-घुशी ज्याम तरास देत्यात वो..” काकु तत्काळ बोलल्या, “कोबा उकरून घरात येत्यात.. अन् पावसात ह्यो कोबा बी लय थंड देतोय बगा..” आम्ही एकदा काकुकडे आणि मग एकमेकांकडे बघितलं. ‘बात मे दम तो था..’. विषय न वाढवता जेवणावर आणि ‘चेंज द टॉपिक’ करून दुसऱ्या दिवशीच्या ‘घनचक्कर’ शिखराच्या माहितीवर ‘फोकस’ केलं.

आपण ट्रेकिंगसाठी अनेकदा प्रसिद्ध स्थानांची  निवड टाळतो याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील गर्दी.  गर्दी टाळण्यासाठी एखादे नवीन किंवा अप्रसिद्ध ठिकाण निवडून तेथे जायची जय्यत तयारी सुरु होते. मस्त प्लान करून तिथे पोहोचल्यावर कळून येते की तिथे कच्चा रस्ता बांधायला घेतला आहे किंवा पायथ्याच्या गावात पूर्वी जे लोक घरगुती जेवणाची मस्त सोय करून देत, त्यांनी ‘अमुक अमुक हॉटेल’ सुरु केले आहे. झुणका-भाकरीच्या फक्कड जेवणाच्या जागा आता टुरीस्ट मेनूने घेतल्या आहेत. शेणाने सारवलेल्या कुडाच्या टुमदार घरांच्या जागा आता सिमेंट-मातीच्या घरांनी घेतल्या आहेत. गावात मोटरसायकली आणि जीप गाड्या दिसून येत आहेत. असं चित्र दिसताच एक ट्रेकर म्हणून मला अतोनात दुखः होतं. त्यात तिथे सिगारेट-दारूची ‘सोय’ करून देण्यासाठी लगबगीने पुढे सरसावणारे गावकरी पाहिले की ‘जगबुडी’ आल्यासारखेच भासू लागते. कारण ज्या दुर्गम किल्ल्यांसाठी किंवा ट्रेकसाठी आम्ही तंगडतोड करण्यासाठी येतो, तिथली निरव शांतता आणि आल्हाददायक निसर्ग नष्ट होण्याची तयारी मला या असल्या विकासातून दिसून येते. ‘आता या किल्ल्याचं / ट्रेकिंग स्पॉटचं काही खरं नाही’ असंही झटकन मनात येऊन जातं. मुंबईला जाऊन सगळ्या मित्रांना ‘हा ट्रेक लवकरात लवकर करून घ्या, आता जास्त दिवस हातात नाहीत..’ हा निरोप देण्याची इच्छा प्रबळ होते. दरम्यान गावातील लोकांना आम्ही ‘समजावण्याचा’ प्रयत्न करतो किंवा ‘समज’ देण्याचाही प्रयत्न केला जातो.

पण अनेकदा आपण ‘बेसिक’ विसरतो. आपण ट्रेकिंग किंवा पर्यटन करणारी जी मंडळी असतो, ती ह्या गोष्टी छंद म्हणून, मराठीत बोलायचं झाल्यास ‘हॉबी’ म्हणून, करत असतो. आपला मूळ व्यवसाय बरेचदा दुसराच काहीतरी असतो. आपल्याला आपला छंद जोपासता येतोय म्हणजे आपण ‘बऱ्यापैकी’ कमवत देखील असतो; आपले खाय-प्यायचे हाल नसतात. त्यामुळे छंद, हॉटेलिंग, कॅमेरा इत्यादी गोष्टी आपल्याला ‘परवडेबल’ असतात. आपण ‘कम्फर्ट मोड’मध्ये असतो, आपल्या ‘बेसिक’ गरजा म्हणजे ‘अन्न, वस्त्र आणि निवारा’ यांची चांगली सोय असते. त्यामुळेच आपल्यातील ‘विचारवंत’ जागा झालेला असतो, जो आपल्या डोक्यात विचारांचे हे सगळे थैमान घालत असतो. पण ह्या ‘कम्फर्ट झोन’मधून स्वतःला थोडं बाहेर आणलं (फक्त ट्रेकिंग आणि पर्यटनापुरतं नाही.. तर ओव्हरऑल..) तर आपल्याला कळून येतं की गावाकडील परिस्थिती अजूनही म्हणावी तशी चांगली नाहीय. अनेक गावे तर दुर्गम भागात आहेत. आपण अनेकदा अश्या गावांत जाऊन आलेलो असतो आणि त्यांचं तेच ‘अनटच्डनेस’ आपल्याला भावलेलं असतं. पण त्या ‘अनटच्डनेस’पणामुळे त्यांना किती सुखसोयींना मुकावं लागतं त्याचा विचार आपण करत नाही. किंबहुना त्या विचाराचाच विचार आपण करत नाही. फक्त आम्ही शहरांतून आलोय म्हणजे आम्हाला ‘गाव’ हे ‘गावासारखंच’ हवं असतं, मग ‘गावकरी गेले तेल लावत’ असा आपला ‘अॅटीट्युड’ असतो. ह्या गावांतून, पक्के सोडा पण कच्चे रस्ते सुद्धा दिसून येत नाहीत. शौचालयाची सोय नसते, पिण्याच्या पाण्याची सोय नसते. त्यासाठी मैलभर दूर कुठेतरी विहिरीवरून पाणी आणावं लागतं. ते पितानासुद्धा ‘पचायला थोडं जड दिसतंय हे पाणी’ ही कमेंट मारायला आपण उतावीळ असतो. मुख्य व्यवसाय शेती. ती सुद्धा अगदी काही गुंठे किंवा एकरांमध्ये. शेतात जायला किंवा काम करायला कठीण परिस्थिती असते. तो एक लहान ट्रेकच असतो. रोजचा किराणा खरेदी करण्यासाठी सुद्धा आठवडा बाजार त्यांना गाठावा लागतो. तो सुद्धा जवळच्या विकसित गावातून आणावा लागतो. ते जवळ म्हणजे अनेकदा कित्येक किलोमीटर लांब असतं. त्यासाठी गावात कोणाची तरी रिक्षा किंवा जीप असेल तर त्याला दमड्या मोजून आणावं लागतं. जेवणातील पदार्थही मोजकेच. पिठलं, भाकरी, रस्सा भाजी आणि भात. मुलांसाठी शाळा म्हणावं तर ती फक्त ‘नावालाच’ असते. चौथीनंतर शिकायचं असेल तर म्हणजे ‘उच्च शिक्षणासाठी’ तालुक्याची शाळा गाठावी लागते. अनेक गावांतील मुलंतर फक्त शाळेसाठी ‘वन वे’ १०-१० किलोमीटर चालत जातात हे पाहिलंय आपण सगळ्याच ट्रेकर्सनी. जिथे शाळेची ही अवस्था तिथे बाकीची काय अपेक्षा करणार हे लोक. त्यामुळे अनेक पिढ्या गरिबीत काढलेले हे लोक शिक्षणाअभावी अजूनच गरीब होत जातात.


अशा वेळी आपल्या सारखी ट्रेकर मंडळी त्यांच्या गावात जाऊन त्यांच्या गावात किंवा गावाजवळ असणाऱ्या एखाद्या दुर्गशिल्पाची किंवा पर्यटनस्थळाची त्यांना नव्याने ओळख करून देतो. आपल्यातीलच काही मंडळी ट्रेकर्सच्या ‘झुंडीच्या झुंडी’ नेऊन त्यांना त्या स्थळाचे महत्व पटवून देते. सुरुवात होते ती, ‘काका / काकू जेवणाची काही सोय होईल का हो?’ या वाक्याने. मुळात हे लोक ‘आदरातिथ्य’ करण्यात पटाईत असतात. स्वतःच्या तोंडातला घास काढून देणारे  गावकरी लगेच तयारी दर्शवतात आणि फक्कड जेवण बनवून देतात. आपण गुळचट चवीला कंटाळलेलो शहरी लोक असं तर्रीदार जेऊन खुश होतो आणि ‘तारीफोंके पूल’ बांधत जेवतो. निघताना ‘एखाद्या गवयाच्या गाण्यावर खुश झालेला बादशहा जसा त्याची सोन्याची कंठी काढून देतो त्याच ऐटीत’ आपण त्या काका काकूंना पैसे देतो आणि निघून येतो. मुळात जास्त पैसे कधीही न बघितलेले ते काका काकू त्या कमाईला भुलतात आणि अश्या सोयी पुरवण्यासाठी तत्पर राहतात. आपण इथे येऊन सोशल मेडियाच्या माध्यमातून त्या परीसाराची आणि सोयी-सुविधांची माहिती देतो आणि मग ट्रेकर्स आणि पर्यटक सोडून ‘इतर’ही मंडळी ‘जीवाची मुंबई’ करण्यासाठी तिथे पोहोचतात. सिगारेट-दारूची डिमांड’ होते. अधिक पैश्यांच्या मोहाने आणि गावातून ही व्यसने ‘कॉमन’ असल्याने त्याचीही सोय करण्यात येते. शेवटी गावकऱ्यांना सुद्धा चांगली कमाई व्हावी, चांगले घर असावे, राहणीमानाचा दर्जा सुधारावा, मुलांनी चांगल्या शाळेतून जावं असं वाटतंच की. ते गावकरी झाले म्हणजे ह्या असल्या इच्छा त्यांनी करू नये ही विचारसरणीच आपल्याला त्यांच्यापासून वेगळं करते. सोयी-सुविधांमुळे गर्दी वाढत जाते. गर्दीमुळे सोयी-सुविधांमध्ये वाढ होते. या सगळ्यामुळे देवाणघेवाण वाढते आणि पैश्यांची उत्तम आवक सुरु होते. दर्जा सुधारला, बेसिकवरून कम्फर्टला आले की ‘आपण कोणाला भिक घालत नाही..’ हा माज येतो. मग गावकरी देखील अडल्या वेळेला अव्वाच्या सव्वा भाव सांगणे सुरु करतात. आणि अडल्या वेळी खिसा खाली करून द्यावाच लागतो. याशिवाय बाटल्या, प्लास्टिक कचरा, बेभान पर्यटक इत्यादी कळीचे मुद्दे तर पुढचे पुढेच..  या गोष्टी सुरु झाल्या की आपण म्हणतो ‘वाट लागली’. पण आपल्याला पवित्र असणाऱ्या अशा अनेक ठिकाणाची अशी ‘सो कॉल्ड’ वाट लावायला आपण किंवा आपल्या सारखीच ट्रेकर किंवा पर्यटक मंडळी निमित्त होतात हे आपण मान्य करत नाही.

मुळात सगळ्या गावात हे असंच घडतं असं माझं म्हणणं नाहीय. पण कमी-अधिक प्रमाणात हे असंच सुरु आहे यावर तुम्हीही दुमत घेणार नाही. ‘यावर उपाय काय?’ असं विचाराल तर ‘काहीच नाही’ हेच उत्तर आहे. कारण आपण सगळी मानवजात स्वार्थी आहोत आणी चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. कोणी चांगलं सांगितलं तर त्याला आपण टांगायला उठतो.


यावर एकमेव मार्ग म्हणजे गावातील लोकांशी संवाद साधून ते गाव ‘प्रसिध्द’ होण्याआधीच त्यांना ‘सजग’ करणे. त्यांना गावात किंवा गावाजवळ असणाऱ्या पर्यटनस्थळाविषयी, त्याच्या पावित्र्याविषयी जागरूक करणे. गावाचे आणि त्या स्थळाचे पावित्र्य जपण्यासाठी कोणते उपाय राबवता येतील याविषयी माहिती देणे आणि त्याशी निगडीत सुविधा पुरवणे. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. त्यांच्याकडून जेवण, वस्तू घेतल्यास ‘सुयोग्य’ मोबदला देणे, मुलांसाठी शालेय वस्तू, गावकऱ्यांच्या उपयोगाच्या वस्तूंचे वाटप करणे इत्यादी गोष्टी कराव्यात. स्थानाचे पावित्र्य राखूनही उत्तम कमाई करता येते हे त्यांना पटवून द्यायचे. गावकऱ्यांना आपला आधार वाटला तर ते आपलं नक्कीच ऐकतात हे सिद्ध झालेलं आहे. अवचितगड, मानगड, सुरगड, सामानगड इत्यादी किल्ल्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या गावात ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ ह्या संस्थेने  असा उपक्रम सिद्ध करून दाखवला आहे. आपण शहरात निसर्ग आणि माणुसकीची वाट लावायची आणि गावांकडून तीच अपेक्षा ठेवायची हा मूर्खपणा नाही का?  मुळात सगळीकडे विकास हा व्हायलाच हवा. फक्त तो सगळीकडेच चांगल्या मार्गाने, चांगल्या दिशेने व्हावा हीच इच्छा प्रत्येक ट्रेकर (खरा ट्रेकर, फेसबुकी ट्रेकर नव्हे बरं का..) करतो. गडकोट ऐतिहासिक स्मृतिस्थळे व्हावेत पण संवर्धित व्हावेत, ट्रेक्स दुर्गम राहावेत पण अधिक सुरक्षित व्हावेत, नद्या-तळी-समुद्रकिनारे-गिरिस्थाने प्रसिध्द व्हावेत पण स्वच्छ राहावेत हे प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न असतं. विकास झालाच पाहिजे मात्र नव्या-जुन्याची योग्य सांगड घालून, निसर्गाची जपणूक करून, समस्त लोकांच्या भल्यासाठी आणि ऐतिहासिक वारसे जपून.. तुम्हाला काय वाटतं?

No comments:

Post a Comment