जीवनगाणे गातच गेलो.. क्षण जे आले, वेचत गेलो.. - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 30, 2018

जीवनगाणे गातच गेलो.. क्षण जे आले, वेचत गेलो..

   
जीवनगाणे गातच गेलो..
क्षण जे आले, वेचत गेलो..

बालपणीचा काळ सुखाचा,
मुंगी होऊन खातच गेलो,
कुमारपणीचे जीवन सारे,
सवंगड्यांना हसवत गेलो..

तरुणाईच्या जोशाने मग,
बेड्या सगळ्या तोडत गेलो,
प्रेमामधल्या आठवणींना,
नाजूक धाग्यांत गुंतत गेलो..

संसाराच्या अवघड गणितांचे,
अवजड जोखड पेलत गेलो,
बोजड भेसूर नात्यांचे ओझे,
खिन्न मनाने झेलत गेलो..

व्यर्थ सुखांच्या हिंदोळ्यांवर,
जीवन सारे रमवत गेलो,
मनातल्या आशा-आकांक्षा
मनसागरातच शमवत गेलो..

समोर आले काम-काज ते,
कर्तव्य मानुनी करतच गेलो,
संसाराच्या गरजांसाठी,
पैसा-अडका कमवत गेलो..

मित्र - शत्रू जे आले गेलें,
साऱ्यांशी मिळवत जुळवत गेलो,
कित्येक नाती अनोळखी जरी,
मन त्यांच्याशी रमवत गेलो..

पोट भरुनी घेत सुखाने,
दुखांचे प्याले रीजवत गेलो,
भोगूनी सारे सारे अनुभव,
शोधत शांती हिंडत गेलो,

कडे - कपारी - डोंगर सारे,
गावोगावी भटकत गेलो..
प्रवासात या जीवनचक्राच्या,
नकळत प्रेमाने अडकत गेलो,

आत्मा परमात्म्याची सांगड,
प्रवासात या घालत गेलो,
सापडता भांडार सुखाचे,
आनंदाने हरखून गेलो..

जीवनगाणे गातच गेलो..
क्षण जे आले, वेचत गेलो..

शब्द: उत्कर्ष एरंडकर




1 comment: