सी-वूड्स स्टेशन - एक फसलेला प्रयोग - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 2, 2019

सी-वूड्स स्टेशन - एक फसलेला प्रयोग



आज कोणालाही विचारलं की मुंबई - नवी मुंबई - ठाणे परिसरात सगळ्यात सुंदर स्टेशन कोणतं तर सी.एस.एम.टी. स्टेशननंतर कोणाच्याही तोंडी ‘सी-वूड्स’ स्टेशनचं नाव असेल. ज्यांनी ज्यांनी सी-वूड्स स्टेशन पाहिलं आहे ते तर हमखास हेच उत्तर देतील. पण सी-वूड्सचा एक रहिवासी असून देखील मला हे सांगताना खूप दुखः होत आहे की ह्या स्टेशन ची तऱ्हा ‘नाम बडे आणि लक्षण खोटे’ अशी झाली आहे. मुळात एल एंड टी सारख्या बड्या कंत्राटदाराकडून अश्या प्रकारची चूक (किंवा चुका) घडतात याचे आश्चर्य वाटते.
सगळ्यात आधी स्टेशन बांधताना त्याच्या बाजूला असलेल्या ‘ग्रांड सेन्ट्रल मॉल’ डोळ्यासमोर ठेवून त्याची रचना करण्यात आलीय हीच मोठी चूक ठरली आहे. स्टेशनची रचना करताना त्याचा आर्किटेक्ट किमान ट्रेनमधून फिरलेला असला पाहिजे अशी अट बंधनकारक केली पाहिजे असे हे स्टेशन पाहताना सतत जाणवते. ए.सी. ऑफिसमध्ये आरामदायक खुर्चीमध्ये बसून जनसामन्यांच्या विचार करतच येणार नाही असं माझं ठाम मत आहे. ह्या मॉल मुळे किंवा मॉलला प्राधान्य दिल्या गेल्यामुळे मॉलमध्ये येणाऱ्या गर्दीच्या येण्या-जाण्यासाठी सहजसोपे मार्ग ठेवण्यात आले आहेत, याउलट रोजचा प्रवास करणारे प्रवाशी मात्र बरीच नागमोडी वळणे घेत स्टेशनपर्यंत पोहोचतात. नवी मुंबईमधल्या जवळपास सर्वच स्टेशनची ही अवस्था असली तरीही या स्टेशनच्या बाबतीत हा त्रास जास्त जाणवतो. आम्ही जेव्हा येथे राहायला आलो होतो त्यावेळी म्हणजे २००९ साली एक सरळ रस्ता पार करून स्टेशनवर पोहोचता येत होते. आज त्या ठिकाणी अनेक वळणे टाकून त्या मार्गाची वाट लावून टाकली आहे. मुख्य रस्त्यापासून किमान तीन लांबलचक वळणे घेतल्याशिवाय सी-वूड्स स्टेशन गाठता येत नाही. बरं, जागेचा सुदुपयोग केला आहे असे अजिबात वाटत नाही. पूर्व-पश्चिम भागातील तिकीटखिडक्या जणू काही तिजोऱ्या आहेत अशा तऱ्हेने कुठेतरी लपवून ठेवल्यासारखे वाटते. म्हणजे ज्याला तिकीट काढून स्टेशनवर जायचे आहे, त्याच्या किमान १५ मिनिटांची वाट लागून जाते. बरीच जागा मोकळी आणि वाया घालवल्यासारखे वाटते. तिकीट खिडक्या जास्त ठेवल्या आहेत अशीही स्थिती नाही. आजही कोणत्याही वेळी तिकीट काढायला गेल्यास लाईन असतेच. यावर काही सुजाण नागरिक म्हणतील की हल्ली ए.टी.व्ही.एम. कुपन्सची सोय आहे. पण बऱ्याचवेळा नेटवर्क नसल्याचे कारण देऊन ह्या मशीन बंद असतात. म्हणजे मुद्दाम लाईन लावावीच लागते. याउपरही ‘टेक्नीसेव्ही’ मंडळी बोलतील की आम्ही तर ‘यु.टी.एस. एप’ वापरतो. पण सी-वूड्समध्ये राहणाऱ्या अनेक व्यक्तींचे हे दुखः असेलच की एकदा तुम्ही सी-वूड्स स्टेशन परिसरात शिरलात की तुमचा आणि इन्टरनेट जगाचा संबंध तुटला. त्यामुळे तिथे इंटरनेट इत्यादी अंधश्रद्धा ठरतात.
या सगळ्या त्रासाशी लढत झगडत एखाद्याने तिकीट काढण्यात यश मिळवलेच तर तो झपाझप चालू शकणार नाही याची पुरेपूर खबरदारी कंत्राटदाराने घेतलेली दिसते. स्टेशनसारख्या सार्वजनिक परिसरात घरी लावायच्या गुळगुळीत टाईल्स बसवण्याची कल्पना ज्याच्या सुपीक डोक्यात आली त्याचा ‘जाहीर सत्कार’ करण्याची गरज आहे. वरून अश्या लाद्या टाकल्यावर ‘कोणीतरी’ तक्रार दाखल केली म्हणून त्यावर ‘एक्स्ट्रा’ मेहनत करून दोन सोडून एक अश्या पद्धतीने या टाईल्स मशीन मारून ‘खरखरीत’ केल्या आहेत. या फारशीवरून चालताना लोकांची कसरत पाहून त्यांची गमंत पहावी की कीव करावी हेच कळत नाही. मॉलखालचा सबवे चालत पार करणे म्हणजे एखाद्या कॉम्प्युटर गेमचे शेवटची लेवल पार करण्यासारखा आहे. त्या टाईल्सवरून चालण्याकरिता आपल्या जनसामान्यांच्या ‘चपला’ बनलेल्याच नाहीयत ह्याची जाणीव येथील प्रशासन करून देते.
इथे यादी संपत नाही. रोजच्या प्रवाशांसाठी शेअर रिक्षाची सोय स्टेशनपर्यंत करून देण्याच्या नादात रिक्षाचालकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. सगळ्या गोष्टी अंडरग्राउंड करण्याच्या नादात सी-वूड्स स्टेशन खूप चुका करून बसलं आहे. सबवेमध्ये ये-जा करणाऱ्या रिक्षा आणि इतर गाड्यांचा धूर जमून तिथे चोवीस तास घुसमट सहन करावी लागते. रिक्षाथांब्यातून मेन रोडवर येई पर्यंत अनेक वर्षे मुंबईत राहिलेल्या माझ्यासारख्या माणसाला त्रास होतो तर लहान मुले आणि बायकांची काय हालत होत असेल? तिथे सतत उपस्थित असणाऱ्या रिक्षाचालकांच्या फुफ्फुसांची किती वाट लागत असेल?? याची चिंता लागते. स्टेशनवर रिक्षा आत आणताना आणि बाहेर नेतानाही सतत मृत्यूशी खेळ सुरु असतो. दोन्ही बाजूने सिग्नल नसलेल्या रस्त्यावरून गाडी आत शिरवताना रिक्षाचालकांची कसरत बघवत नाही. जिथे स्टेशनजवळ रिक्षा सोडतात, तिथेच बाजूला शौचालयाची सोय (?) आहे. आधीच सबवेमध्ये असल्याने तिथे अजिबात वायुवीजन (म्हणजे मराठीत वेंटीलेशन) नाही. त्यामुळे संध्याकाळपर्यंत (दुपारीपासूनच म्हणा हवं तर) तिथे बरीच दुर्गंध मारते. इथे रिक्षा थांबा असल्याने संध्याकाळी इथे रिक्षासाठी लाईन लावणाऱ्या लोकांना त्याचा त्रास नक्कीच होत आहे.
खरंतर मी पक्का पार्लेकर होतो (मनातून आजही आहे) पण नवी मुंबईमध्ये आल्यापासून सी-वूड्स खूप आवडतं, त्यामुळेच तिथे घर घेतलं असं म्हंटलं तरीही वावगं ठरणार नाही. पण सी-वूड्स आता ‘डेव्हलपिंग’ असल्याने तिथे दिवसेंदिवस अशी आणखी गर्दी वाढत जात राहिल त्यामुळे आपल्या आवडत्या गोष्टीपासून त्रास होत असेल तर जी मनस्थिती होते त्या मनस्थितीत हा लेख लिहिला गेलाय असं म्हणायलाही हरकत नाही. सी-वूड्स चांगले आहे आणि चांगले राहावे, म्हणून हा लेखन प्रपंच. संबंधित व्यक्तीच्या लक्ष्यात आल्यास त्वरित उपाययोजना राबवतील अशी आशा आहे. कळावे. लोभ असावा.
उत्कर्ष एरंडकर
🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment