कचरा हा कचरा असतो... - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 29, 2020

कचरा हा कचरा असतो...


काल ठाण्याला काही कारणासाठी गेलो होतो; तिथून परतताना कॉलेजच्या मित्रांचा एक ग्रुप (दोन मुलं आणि एक मुलगी) माझ्या बाजूला बसला होता. मी (नेहमीप्रमाणे) खिडकीजवळची जागा पटकावली होती आणि मोबाईलवर युट्यूब बघण्यात गुंग होतो. ट्रेनचा प्रवास सुरू असताना समोर बसलेल्या मित्राने भेळेचा कागद खिडकीतून बाहेर सरकवला. मी लगेच हात पुढे करून त्याला अडवायला गेलो पण उशीर झाला होता. कागद बाहेर गेला होता. मी त्याच्यावर एक त्रासिक नजर टाकली आणि इशार्‍याने 'काय फालतूगिरी लावलिय??' असे भाव त्याला पोहोचवले. बाजूला असलेल्या मुलीने आणि मुलाने माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा समोरच्या मित्राकडे पाहिलं. मी पुन्हा मोबाईलमध्ये लक्ष्य घातलं तसं माझ्या कानात हेडफोन आहेत पाहून बाजूचा मित्र समोरच्याला म्हणाला, "अरे तो कागद होता... इट्स डिग्रेडेबल.. प्लॅस्टिक वगैरे टाकायचं नसतं.. कागद ओके आहे.. चिल्ल मार..." माझ्या डोक्याची कडी वाजली पण म्हंटलं आता वाद नको, माझा मेसेज त्यांना आधीच पोहोचला आहे त्यामुळे पुढल्या वेळी खिडकीतून कचरा टाकताना किमान एकदा विचार करतील...

ट्रेन पुन्हा सुरू झाली आणि 'माझ्या लकिली' ते शेवटपर्यंत माझ्यासोबत होते. नेरूळ आलं तसं मी मोबाईलवरील युट्यूब बंद करून तो खिशात घातला आणि हेडफोन वेस्टपाऊच मध्ये... गाडीतून उतरताना त्या 'समजूतदार' मित्राला हात लावून त्याचं लक्ष्य वेधून घेतलं आणि त्या तिघांना आणि आजूबाजूच्या इतर काही लोकांना ऐकू जाईल अश्यारीतीने बोललो. "भाई, कागद असो की प्लॅस्टिक... कचरा हा कचरा असतो... तुम्ही लोक कॉलेजमधले दिसता म्हणून गैरसमज दूर केला..." ते तिघे थबकले... मी पुढे निघून त्या गर्दीत सामील झालो...


No comments:

Post a Comment