अमृतातेहि पैजासी जिंके... - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 26, 2020

अमृतातेहि पैजासी जिंके...


आज मी फेसबुक, व्हॉट्सअपवर पाहतो आहे की 'मराठी भाषा दिना'चे औचित्य साधून काही लोक इंग्रजी वापरणाऱ्या इतर मराठी लोकांची 'शिकवणी' घेत आहेत. मला कळत नाहीय की आपण एखाद्या गोष्टीचा अतिरेक का करतो?? जीवन साधेसोपे का करत नाही? इंग्रजी जगमान्य भाषा आहे हे तर आपण अमान्य करू शकत नाही. ती वापरता येणं आवश्यक आहे हे की तितकेच खरे. हिंदी जरी राष्ट्रभाषा नसली तरी अमराठी बांधवांशी संवाद साधण्यासाठी तीही यायला हवी. केवळ राग काढायचा म्हणून मराठी मराठी करत बसायचं याला अर्थ नाहीय. हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषा वाढण्याचे कारण आपण स्वतः आहोत हे मराठी लोकांना पचवता येत नाहीय. जर योग्य वेळी तुम्ही 'व्यवसाय' करण्याचे धाडस करून त्यात यशस्वी झाला असता तर तुमची भाषा वापरायला लोकांना तुम्ही भाग पाडले असेतच. किंबहुना तुमची भाषा वापरायला लोक उद्युक्त झाले असते. चायनीज हॉटेल मध्ये गेल्यावर तोंडातून 'ए कांचा', उडिपी हॉटेलमध्ये जाऊन 'ए थंबी' 'ए अन्ना', भाजीवाले आणि इतर लोकांशी बोलताना 'भैया ये कैसे दिया' हे शब्द निघतातच ना? त्याचं कारण म्हणजे त्यांनी कोणतीही जबरदस्ती न करता त्या भाषेचा दबदबा निर्माण केला आहे. इतर भाषीय लोक एकमेकांशी फक्त त्यांच्याच भाषेत बोलतात. फक्त आपणच मराठीची लाज बाळगतो. फोन वरती 'हॅलो' बोलल्यावर किंवा रिक्षा किंवा टॅक्सी वाल्याशी मराठीत बोलल्यावर आपल्याला का हिंदीमध्ये घुसावे लागते? याचे कारण म्हणजे आपण इतर भाषिकांमध्ये मराठीची चीड निर्माण केली आहे. लोक मराठीला जबरदस्ती लादलेली गोष्ट मानु लागले आहेत. माझे अनेक इतर भाषिक मित्र आहेत जे शुद्ध मराठी बोलतात. हो.. अगदी शुद्ध.. जेवढे आपण मराठी लोकही बोलत नसू एवढे शुद्ध.. पण आपल्यातीलच काही अतिरेकी लोक 'हे त्यांचे कर्तव्यच आहे' असं बोलून त्यांना दुखावतात. आणि मग तेही मुद्दाम त्यांची भाषा वापरू लागतात. भाषा टिकली पाहिजे म्हणजे नक्की काय?? तर त्या भाषेविषयी जनमानसात आपुलकी निर्माण झाली पाहिजे. इतर भाषीय लोकांशी त्यांच्या भाषेतील किमान एक-दोन शब्द बोलून दाखवा. ते मराठीतील कित्येक शब्द बोलून दाखवतील. भाषा जबरदस्तीने नाही तर प्रेमाने वाढते. आपल्या राजकारणी लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी मराठी भाषेला 'धारे'वर धरले आहे. आणि आपल्यातील कित्येक लोक त्यांनीच मराठी भाषा जागवली आहे अश्या अविर्भावात त्यांचे गोडवे गातात. तसं नाहीय. मुंबईत मराठी लोप पावत चालली आहे ती या राजकारण्यांनी अमराठी लोकांच्या मनात रुजवलेल्या मराठीच्या चीडेमुळे. मुंबईत मराठी टिकली आहे ती आपल्यामुळे.. आपल्या पूर्वजांमुळे.. मुंबईत इतर भाषीय लोकांविषयी त्याकाळी आपल्या मराठी लोकांनी दाखवलेल्या मोठ्या मनामुळे कित्येक अमराठी लोक मराठी बोलतात. ते स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवतात. एक लक्ष्यात घ्या.. मराठी टिकवायची असेल तर तिची जबरदस्ती करू नका. ती कोणावर लादू नका. तुम्ही मराठी बोलत रहा आणि त्यातून संभाषणाची सुरुवात करा. आपण सगळ्यांनी असं केलं तर तिची व्याप्ती पाहून समोरचे लोकही ती वापरण्यास उद्युक्त होतील. 'चला हवा येऊ द्या' सारख्या सिरीयल मध्ये आमीर खान, शाहरूख खान सारख्या बड्या मंडळींना मराठी वापरावी लागली याचे कारण हेच आहे. तिची ताकद दाखवून द्या.. व्यवसाय करून मोठे व्हा.. लोकांना मान द्या.. त्यांच्याशी मित्रता करा.. ते नक्कीच मराठी आपलीशी करतील.

उत्कर्ष एरंडकर
#असंच_टीपी #dimag_ka_kida #माय_मराठी #मातृभाषा #मराठी_भाषा_दिवस #२७_फेबुवारी

No comments:

Post a Comment