काय अधिकार आहे मला ? - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 23, 2020

काय अधिकार आहे मला ?


काय अधिकार आहे मला ?

नोंद: या लेखामुळे अनेक लोकांची मनं दुखावली जाण्याची शक्यता आहे पण खूप प्रामाणिकपणे सत्य लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे आधीच माफी मागून घेतो.

अगदी आता आता मी फेसबुकवर एक विडिओ पाहिला, ज्यात एक माणूस एका गायीचे अनैसर्गिक प्रजनन घडवून आणत होता. त्याने गाय बांधून ठेवली होती आणि बाजूला ३ - ४ बैल सोडले होते. एका बाईने ते पाहिले आणि सगळा प्रकार वायरल करून टाकला. ती एनिमल लवर होती बहुतेक आणि (त्यामुळे कदाचित) वेगन असावी. त्या प्रकाराला तिने बलात्कारअसं नाव देऊन टाकलं. खूप हसमसून रडत होती ती. तो विडिओ पाहिला आणि हसावं की रडावं कळून आलं नाही. काही खास मित्रांना तो व्हाटसप्पला पाठवून त्यावर विनोदही केले. अजून मजा यावी म्हणून आमच्या (आमच्या आमच्यात असणार्‍या) ज्ञानी मित्रांच्या व्हाटसप्प ग्रुपवर ती लिंक टाकली. बरेच साधक / बाधक पडसाद वाचायला मिळाले. तेव्हा जाणवलं की ही वाटते तेवढी साधी गोष्ट नाहीय.

तिला त्या गायीविषयी जेवढं वाटंत होतं तेवढं मला वाटंत नव्हतं हा बेसिक फरक आहे त्या विडिओविषयीच्या भावनांमध्ये. पण तो फरक खूप मोठा आहे. आणि अश्या भावनिक गोष्टींचा फरक अश्या गोष्टींचे कारण होऊ लागला आहे. रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला घालताना, ते भरवणारे आणि त्यांना विरोध करणारे विडिओ, पोस्ट अगणित पाहिल्या आहेत. कोंबड्या, बकर्‍या खाण्यासाठी मारू नयेत म्हणून वाद घालणारे आणि त्यांना प्रत्युत्तर करणारे खूप विडिओ, पोस्ट पाहिल्या आहेत. आपल्याला दूध देतात म्हणून गायींना आईसमान मानलं पाहिजे असं म्हणत गोहत्येला विरोध करणारे आणि ते आमचं अन्न आहे / आमच्या उत्पन्नाचं साधन आहे म्हणून त्याला पाठिंबा देणारेही खूप विडिओ, पोस्ट पाहिल्या आहेत.

त्याआधी मेट्रो प्रकल्पामुळे आरे येथील वृक्षतोडीला विरोध करणारे आणि त्याविरुद्ध मेट्रो प्रकल्पाला पाठिंबा देणारे खूप विडिओ, पोस्ट पाहिल्यात. बांधकामासाठी लागणारी खडी मिळवण्यासाठी डोंगर फोडण्याविरुद्ध आणि रेती मिळवण्यासाठी नदीतील रेती उपशाविरुद्ध बोलणारे आणि बेरोजगारी वाढू नये किंवा विकासात अडथळा येऊ नये म्हणून त्याला पाठिंबा देणार्‍या खूप विडिओ, पोस्ट पाहिल्यात. व्याघ्रप्रकल्पात किंवा अभयारण्यात वाघांचे, इतर प्राण्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे म्हणून वाईल्डलाईफ सफरींना विरोध करणारे आणि वाईल्डलाईफ टुर किंवा फोटोग्राफी करणार्‍या लोकांचे पाठिंबा देणारे विडिओ / पोस्ट पाहिल्यात. गड-किल्ल्यांवर दारू पिणार्‍या, पाण्यांच्या टाक्यांत पोहणार्‍या, महापुरुषांच्या नावाची / इतिहासाची बदनामी करणार्‍या लोकांविरुद्ध आवाज उठवणारे आणि त्यावर स्वतःचे मत मांडण्याची आतुरता दाखवणारेही खूप विडिओ, पोस्ट पाहिल्या आहेत. सिनेमा, विज्ञान, संगीत, मानवी हक्क, शेतकरी, स्वदेशी, जागतिक समस्या आणि अश्या कितीतरी गोष्टींचे खूप विडिओ, पोस्ट पाहिल्या आहेत. राजकारणाचे तर विचारूच नका, अगदीच खालची पातळी गाठली आहे त्या पोस्टनी आणि ते करणार्‍यांनी..

या आणि अश्या अनेक पोस्ट मी आजवर पाहिल्या आहेत आणि या सगळ्यात मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवायला लागली ती म्हणजे खरंच आपण (जगभरात सगळेच) जवळपास सगळ्याच बाबतीत ‘Extreme’ व्हायला लागलो आहोत. जसं, एनिमल लवर्स असू तर प्राण्यांच्या बाबतीत, नेचरलवर्स असू पर्यावरणाच्या बाबतीत, शिवभक्त असू तर गड-किल्ले, महाराजांच्या बाबतीत, इतिहासप्रेमी (संशोधक म्हणताना हल्ली भीती वाटायला लागलीय) असू तर इतिहास आणि महापुरुषांच्या बाबतीत... म्हणजे कोणतीही गोष्ट घ्या; त्या बाबतीत अगदी टोकाची भूमिका घेणारे, मग ती कोणत्याही बाजूचे असो, अनेक लोक सापडायला लागले आहेत. त्यात मतप्रदर्शन, वादविवाद करताना अगदी कशाचेही भान न राखता ही मंडळी पोस्ट्स आणि कमेंट्स करत असतात.  अशाच पोस्ट्समधील एकाची बाजू घेऊन त्यावर मतप्रदर्शन, वादविवाद मी ही केले आहेत पण आता ते सगळं आठवलं की सगळं मूर्खपणाचं वाटू लागतं कारण आता जेव्हा अशी मतप्रदर्शन, वादविवाद करण्याची वेळ येते तेव्हा वाटतं की खरंच काय अधिकार आहे मला त्याचा?

प्राणीप्रेमाविषयी पोस्ट असली आणि कितीही कळवळा असला तरी मी स्वतः मांसाहारी आहे हे मला विसरता येईल का? गोहत्या सारखी भावनिक गोष्ट असली तरीही मी स्वतः रोज कोंबड्या आणि बकरे रिचवुन गोहत्या कशी पाप आहे हे ठामपणे सांगू शकेन का? गड-किल्ल्यांवर दारू प्राशन, धांगडधिंगा इत्यादि गोष्टी ध्यानात घेता मी स्वतः त्यांच्या संवर्धंनासाठी किती वेळ दिला आहे हे स्वतःला विचारणे गरजेचे नाही का? महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख किंवा त्यासारख्या संवेदनशील गोष्टींवर इतरांना ज्ञान देण्याआधी मी स्वतः महाराजांची शिकवण, त्यांची तत्वे किती आचरणात आणतो ते पहायला नको का? पर्यावरणाची हानी करणारे विकास थांबवताना त्या विकासातून घडलेली टेक्नॉलजी वापरणे मी थांबवतोय का? खडीसाठी, रेतीसाठी होणारी डोंगरांची, नद्यांची हानी थांबवण्यासाठी मी गुहेत जाऊन राहू शकणार आहे का? सिनेमामधील नेपोटीझम विषयी बोलताना मी स्वतः वशिल्याने किती गोष्टी करवून घेतल्या आहेत ते मोजायला नको का? स्वदेशी विषयी जागृती करताना मी स्वतः किती स्वदेशी वस्तु वापरतो किंवा वापरू शकतो ते पहायला नको का? विज्ञान, इतिहास, राजकारण इत्यादि अभ्यासपूर्ण गोष्टींमध्ये पडण्यापूर्वी स्वतःचे अवलोकन केले आहे का? हल्ली सोशल मीडियावरील जवळपास सर्वच विडिओ, पोस्ट पाहताना या आणि अश्या अनेक गोष्टी सतत डोक्यात येत असतात. वाटतं खरंच काय अधिकार आहे मला त्यावर मत मांडायचा?

जर मी मांसाहार सोडू शकणार नसेन तर प्राण्यांच्या बाबतीत बोलण्याचा काय अधिकार आहे मला? जर मी पर्यावरणाची हानी करणार्‍या विकासाच्या गोष्टींचा वापर बंद करणार नसेन तर पर्यावरणाच्या बाबतीत बोलण्याचा काय अधिकार आहे मला? जर मी स्वतः गड-किल्ले संवर्धन करू शकणार नसेन तर गड-किल्ले आणि त्यांच्या पावित्र्या बाबतीत बोलण्याचा काय अधिकार आहे मला? महाराजांची किंवा कोणत्याही महापुरुषांची खरी शिकवण ध्यानात न घेता फक्त माझ्या सोयीपुरता आचरण करून स्वार्थ साधत असेन तर महाराज किंवा ते महापुरुष यांविषयी बोलण्याचा काय अधिकार आहे मला? मी स्वतः विदेशी कंपन्यांच्या वस्तु वापरण्याची चैन सोडू शकणार नसेन तर स्वदेशीच्या बाबतीत बोलण्याचा काय अधिकार आहे मला? भ्रष्टाचार, वशिलेबाजी, रांग तोडून पुढे जाणे, बेशिस्त / स्वैर वर्तन सोडणे मला जमणार नसेल तर इतरांना त्याबाबतीत बोलण्याचा काय अधिकार आहे मला? स्वतःचा कचरा जर मी सांभाळू शकत नसेन तर इतरांना स्वच्छतेच्या बाबतीत बोलण्याचा काय अधिकार आहे मला? एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास नसेल तर त्या विषयाच्या बाबतीत ज्ञान पाजळण्याचा काय अधिकार आहे मला? एकूणच, मी स्वतः सर्वच बाबतीत अपूर्ण असेन तर त्या त्या बाबतीत कोणालाही काहीही बोलण्याचा काय अधिकार आहे मला? . . . 

आज तो विडिओ पाहिला आणि हे सगळं मनात येऊन गेलं. म्हंटलं शब्दांत उतरवून काढूया आणि लगोलग टाईप करून काढलं. बरंच काही मनात होतं, सगळं कागदावर उतरवणं जमलं नाहीय हे नक्की. या लेखामुळे कोणाला  काही साक्षात्कार होईल, न होईल ते माहीत नाही पण किमान तेवढा प्रयत्न करण्याचा अधिकार तरी नक्कीच आहे मला... बाकी आपण सुज्ञ आहात... कळावे, लोभ असावा...

उत्कर्ष एरंडकर

#असंच_टीपी #dimag_ka_kida #अतिरेकच_अतिरेक #सगळ्यात_अतिरेक #why_so_extreme #intolerance

 


1 comment:

  1. भारीच.
    अगदी परखडपणे सत्य मांडले आहेस. बऱ्याच गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो पण त्याच गोष्टींचा आपल्याशी संबंध असतो.
    👌👌👌👌👍👍👍

    ReplyDelete