पुलं : आवाजाचा जादूगार - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, July 26, 2020

पुलं : आवाजाचा जादूगार


पुलं : आवाजाचा जादूगार

पुलं म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर एक प्रसन्न आणि विनोदी व्यक्तिमत्व उभं राहतं. मराठी लोकांमध्ये पुलं माहीत नाही असा व्यक्ति सापडणारच नाही. सापडला तर हे त्या व्यक्तिचं दुर्दैव असेल. पुलंविषयी बोलू तेवढं कमीच आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काय ते दाखवायचं असेल तर पुलंचंच नाव घेतलं पाहिजे. जगाला लाभलेलं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. पुलंच्या चाहत्यांना ते वेगवेगळ्या रूपात दिसतात. जसं काहींना ते उत्तम विनोदी लेखक वाटतात, काहींना उत्तम नट, काहींना उत्तम हार्मोनियम वादक, काहींना उत्तम संगीतकार.. पण मला वैयक्तिक पातळीवर ते उत्तम ‘Voice Artist’ वाटतात. Voice Artist म्हणजे सामान्य भाषेत जे स्वतःचा आवाज वेगवेगळ्या रीतीने बदलून वेगवेगळ्या पात्रांना साजेसा आवाज काढू शकतात. Mimicry ही माझा आवडत्या गोष्टींपैकी एक गोष्ट. लहानपणी आणि कॉलेजात असताना मिमिक्री करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला, पण कोणत्याही कार्यक्रमात मिमिक्रीच्या कार्यक्रमाला माझं प्राधान्य असतं. कदाचित त्यामुळेही असेल पण मला ते या रूपात दिसतात.

पुलंची पुस्तकं वाचण्यापेक्षा मी त्यांचे कथाकथन पाहण्यावर किंवा ऐकण्यावर जास्त भर देतो. याबाबतीत मला काहींनी ‘श्या, पुस्तक वाचण्यात जी मजा आहे...’ या वाक्यांनी सुरुवात करत अनेक सल्लेही दिले. पण आजही पुलंचे विडिओ आणि ऑडिओ पाहण्यात मला जी मजा येते ती इतर कशात नाही. सुरुवात झाली ती पुलंच्या अगदी इरसाल पात्राने.. कोणातरी मित्राकडून मला त्यांचा ‘अंतु बर्वा’ या कथाकथनाचा ऑडिओ मिळाला. पुलं स्वतः उत्तम अभिनेता असल्याने आणि त्यात विनोदाची अंगभूत जोड असल्याने त्या ऑडिओने सुरुवातीपासूनच मला खिळवून ठेवलं. पण ‘पोहर्‍याचा अण्णू झाला कांय रे..’ या अंतु बर्व्याच्या वाक्याने माझं मन जिंकून घेतलं आणि पुढे तो संपूर्ण २५-३० मिनिटांचा ऑडिओ संपेपर्यंत मी हेडफोन कांनातून काढले नाहीत. पुलंच्या लेखणीने त्यांच्या वल्ली कागदावर उतरवल्या, पण त्या ‘वाचता’ आणि ‘अनुभवता’ येण्यासाठी तुम्हाला ब्रह्मदेवाचं वरदानच हवं. त्यामुळेचं बहुतेक आम्हा पामरांनाही तो अनुभव घेता यावा म्हणून कोणी भल्या माणसाने पुलंना प्रत्यक्ष कथाकथन करण्याची गळ घालती असेल किंवा पुलंना ते स्वतः सुचलं असेल. फक्त ‘अंतु बर्वा’ या एका सादरीकरणात पुलंनी अंतु बर्वा, बापू हेगिष्टे, थिएटरचा मॅनेजर, अण्णा साने एवढ्या पात्रांचे आवाज काढले आहेत. आणि एक आवाज दुसर्‍या सारखा नाही. आवाजाची लय, हेल, चढउतार यामध्येही खूप फरक राखला आहे. त्यात एकाही पात्राच्या आवाजाची ‘बेअरिंग’ सोडली नाहीय त्यांनी पूर्ण भाग होईपर्यंत. संपूर्ण ऑडिओ ऐकताना कुठेही असं वाटत नाही की फक्त एकाच माणसाला आपण ऐकत आहोत. सगळी पात्र अगदी जिवंत वाटतात.

हे झालं केवळ अंतु बर्वा या सादरीकरणाविषयी. व्यक्ति आणि वल्लीमध्ये एकूण २० व्यक्तिचित्रे आहेत त्यात एकूण ८ व्यक्तिचित्रांवरील ऑडिओ मी ऐकले आहेत. प्रत्येक व्यक्तिचित्रावरील सादरीकरणामध्ये किमान ३-४ इतर पात्रेही आहेत ज्यांचे आवाज पुलंनी काढले आहेत. चितळे मास्तर व्यक्तिचित्राच्या सादरीकरणामध्ये चितळे मास्तर, बाळू परांजपे, राम्या गोगटे, काकू, मुकुंदा पाटणकर इ., पेस्तनकाका व्यक्तिचित्राच्या सादरीकरणामध्ये पेस्तनकाका, पेस्तनकाकी, यस्स रेल्वेचा कंडक्टर, रेल्वेचा वेटर इ., हरितात्या या व्यक्तिचित्राच्या सादरीकरणात हरितात्या, आजोबा, आज्जी इ., सखाराम गटणे या व्यक्तिचित्राच्या सादरीकरणात सखाराम गटणे, संस्थेचे चिटणीस, सखारामचे वडील इ., नामू परीट या व्यक्तिचित्राच्या सादरीकरणात नामू परीट, दिग्दर्शक, असिस्टंट इ., नारायण या व्यक्तिचित्राच्या सादरीकरणामध्ये नारायण, मुलीचा बाप, बायका, काकू, मामी, नरहर शेठजी सोनार, गुजा मावशी, पळसुले, प्रभा, लग्नातली मंडळी, थोरली आज्जीबाई इ. तर रावसाहेब या व्यक्तिचित्राच्या सादरीकरणात रावसाहेब, तबलजी, व्यंकटराव मुधोळकर, पुरषोत्तम वालावलकर, धैर्यधर इ. व्यक्तिरेखांचे आवाज काढले आहेत.

व्यक्ति आणि वल्ली ऐवजीही त्यांची अनेक कथाकथनं आहेत, विडिओ आहेत ज्या मध्ये असामी असामी, वार्‍यावरची वरात, रविवार सकाळ इत्यादि, बटाट्याची चाळ मधील गच्चीसह झालीच पाहिजे आणि हसवणूक या पुस्तकावर आधारित बिगरी ते मॅट्रिक, मी आणि माझा शत्रूपक्ष, माझे पौष्टिक जीवन, काही नवीन ग्रहयोग, पाळीव प्राणी इत्यादींवर ऑडियो आणि विडिओ मी पाहिले, ऐकले आहेत. या सगळ्यामध्ये विशेष आणि मुद्दाम शेवटी उल्लेख करता येण्यासारखे त्यांचे सादरीकरण म्हणजे गहिरे रंग या पुस्तकील ‘म्हैस’.

उपरोक्त सर्व सादरीकरणात त्यांनी कित्येक आवाज काढले आहेत ज्यांनी त्यांच्या चाहत्यांच्या मनात ती पात्रं आणि त्यांचे आवाज अजरामर करून टाकले आहेत. विशेष म्हणजे एवढे सर्व आवाज काढताना एका व्यक्तिचित्राचा आवाज दुसर्‍या व्यक्तिरेखेसाठी किंवा त्यातील इतर व्यक्तिरेखांसाठी अजिबात वापरला नाहीय. सगळे आज अगदी अद्वितीय म्हणजेच ‘Unique’ आहेत. त्यांच्या सादरीकरणामधून त्यांनी अंतु बर्वा नावाचा एक तिरकस वृद्ध रंगवला आहे तर चितळे मास्तर नावाचे शिक्षणप्रसाराचा विडा घेतेलले मास्तर साकारले आहेत. १०० पर्सेंट पेस्तनकाका मधून ते मिस्किल पारशी बावजी आपल्यासमोर उभे करतात तर सखाराम गटणे मधून केवळ पुस्तकांना विश्व मानणारा एक मुलगा चितारतात. नारायण मधून केवळ लग्नसराईत कामाला येणारा चपखल नातेवाईक रंगवतात तर हरितात्याच्या नावाने इतिहासात रमणारा एक समर्थभक्त घेऊन येतात. रावसाहेब रंगवताना ते आपल्यासमोर एक दिलखुलास दर्दी संगीतप्रेमी उभा करतात तर नामू परीट ऐकवताना एक चिवट कोटगा धोबी रंगवतात. म्हैस ऐकताना तर प्रत्येक पात्राच्या स्वभावाचे दर्शन घडवतात. अडाणी परंतु कोर्ट कचेर्‍यांच्या चकरा मारल्यामुळे ‘तयार’ झालेला आणि म्हशीच्या अपघातातून फायदा करून घेऊ बघणारा ‘धर्मा मांडवकर’, त्याला विरोध करत अडून राहिलेला ‘एसटीचा ड्रायव्हर शिवराम गोविंद’, फुकटचा सल्ला देऊन निघून जाणारा ‘सरदारजी’, ज्युनिअर बीएचे शिक्षण घेत असलेला ‘मधु मलूष्टे’, सगळीकडे तिरकस बोलणारे नाना फडणवीस सही करणारे मुत्सद्दी बगुनाना, सोकरीच्या फॅमिलीसोबत मुंबईला निघलेला ‘उस्मानशेट’, रात्रीची जास्त झालेले टर्रेबाज ‘आर्डरली’, आत्मविश्वासाने चुकीची माहिती देणारे ‘मास्तर’, जांभळं खात होमियोपथीचे महत्व सांगणारे ‘डॉक्टर’, मुंबईला मंत्रालयात मिटिंगला निघलेले पुढारी ‘बाबासाहेब मोरे’, विडीकाडीची सवय नसणारे ‘फौजदार साहेब’, जगल्या मासलेकराकडे पान खाणारा ‘म्हातारा गावकरी’, हरचंद पालवाकडे जाऊन आलेला ‘सुपडू सुतार’, प्रत्यक्ष धक्का न पाहणारा ‘हरचंद’ इत्यादि पात्रे अक्षरश: आपल्यासमोर बोलत आहेत असे वाटते.

हीच गोष्ट ‘बटाट्याची चाळ’ ऐकताना होते. वेदकालीन जंगलात फिरवून आणणारे ‘आचार्य बाबा बर्वे’, गोवेकर टेलर ‘आगस्टीन फर्टाडो’, सत्यवान मटण प्लेट हाऊस चालवणारा ‘आत्मू माईनकर’, गच्चीला खुला विरोध असणारा ‘जगन्नाथ प्लंबर’, संगीतकार ‘एच्च मंगेशराव’, उचलूया झेंडे गायक ‘वरदाबाई’, पहिल्या मजल्यावरचे ‘दाजी नेरूरकर’, दोन महिन्याची अर्ण्ड लिव चाळीसाठी खर्च करण्याची इच्छा दर्शवणारे ‘द्वारकानाथ गुप्ते’, चाळीकडून युनिटीची अपेक्षा करणारे ‘सोकाजीनाना त्रिलोकेकर’, गच्चीसाठी प्राण देऊ इच्छिणारे परखड ‘नाट्यभैरव कुशाभाऊ आक्षिकर’, कुशाभाऊंना लुच्चा बोलणारे ‘अण्णा पावशे’, बाबा बर्वेंच्या भाषणाला कांटाळलेले ‘जनोबा रेगे’ आणि त्यांना समज देणारे ‘नाडकर्णी’, चाळीतल्या बाकांना म्यानरलेस मानणार्‍या विदुषी ‘सरलाबाई सामंत‘, धीट नर्सबाई ‘अंबुताई चवाथे’, चाळीचे मालक कोथिंबीरचे व्होलसेल मर्चट ‘मेंढेपाटील’, मेंढेपाटलांचा वॉचमन ‘जानू’, चापशीला चोर म्हणणारा ‘डॉ हातवळणे’, चाळीच्या सभेवर मतं मांडणारे प्राध्यापक नागूतात्या अड्ढे, इतिहाससंशोधक बाबुकाका खरे, लॉ पॉइंटवले जोगदंड, सरोज गुप्तेला बोलवणारा मधु चौबळ, राघूनानांची कन्या, भाईसाहेब चौबळ, देवरुखकर मास्तर, भीमाबाई जोगदंड, काशीनाथ नाडकर्णीची बायको इत्यादि व्यक्तिरेखांना पुलं आवाजातून आपल्यासमोर उभं करतात.

याऐवजीही असामी असामी मध्ये त्यांनी धोंडोपंत जोशी, ब्रिटिशकाळात पोष्टांत नोकरीला असणारे त्यांचे दिवंगत वडील, सदैव मॉडर्न राहण्याची इच्छा असणारी त्यांची बायको ‘अन्नपूर्णा जोशी, मुलं ‘शंकर’, ‘शरयू’, ‘गिरीश’, ‘नूतन’, नाव घेण्यासाठी आग्रह धरणारी गुजामावशी, कीर्तनकेसरी ‘दिगंबरकाका’, धोंडोपंतच्या सासूबाई ‘चंद्रभागा’, पापणीचे केसही पांढरे झालेला म्हातारा, धोंडोपंतांना वेडंविद्र म्हणणारी ‘मावशी’, बेनसन जॉनसन कंपनीतला चपराशी ‘दत्तोबा कदम’, कंपनीतला सहकारी साहित्यिक ‘नानू सरंजामे’, टायपिस्ट ‘केशर मडगावकर’, कायस्थाचं रक्त असलेला टायपिस्ट ‘अप्पा प्रधान’, कापड व्यापारी ‘आठवले शहाडे आणि मंडळी’ मधले कुलकर्णी, टेलरींग कॉलेजचे ‘प्रोफेसर ठिगळे’, पारल्यातले वृद्ध शिक्षक गृहस्थ, सायकलवाला मारवाडी माणूस, माहरेची ‘तायडी’, चिमण्या रामाजवळील पानवाला, मावशीच्या शेजारची म्हातारी, निस्सीम भक्त ‘कायकिणी गोपाळराव’, घरी उजव्या सोंडेचा गणपती घरी असेलेल ‘अप्पा भिंगार्डे’, शेअर बाजारातील व्यापारी सेठ आणि गोरधनभाई, ‘इन ट्यून विथ द ट्यून’चे लेखक, भावी गुरुदेव मद्रासी ‘प्रोफेसर कुंभकोणम’, बंगाली भक्त ‘सुकुमार बॅनर्जी’, गुरुदेव, पांढरा सदरा देणारे गोठसकर दादा, रिसेप्शनिस्ट ‘मेरी डिसोझा’, ‘सेठ मंगळदास’, ऑफिसचा साहेब ‘मी. फेदरव्हेट’, नवीन रिसेप्शनिस्ट ‘अलू गोगा’, गिरीशची मुख्याध्यापिका ‘आपली सरोज खरे’, शाळेचा शिपाई, शिर्‍याची मैत्रीण ‘निमा गुप्ते’ इत्यादि व्यक्तिरेखा आपल्या आवाजाने साकारल्या.

उपरोक्त यादी पाहता तुम्हाला अंदाज आला असेल की या यादीमध्येच त्यांनी किमान शंभर एक व्यक्तिरेखा आपल्या समोर उभ्या केल्या आहेत. तरी वरील यादीही अपूर्ण आहे. आता तुम्हाला अंदाज आला असेल की माझ्यासाठी ते एक उत्कृष्ठ ‘Voice Artist’ का आहेत ते.. मला ते या रूपात आवडण्याचं कारण म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा ‘अंतु बर्वा’ हे व्यक्तिचित्र धडा म्हणून वाचलं होतं तेव्हा त्या पात्राने माझं मन जिंकून घेतलं होतंच, पण ज्यावेळी मी ते व्यक्तिचित्र खुद्द पुलंच्या तोंडून ऐकलं तेव्हा त्या व्यक्तिचित्राला असलेले विविध पैलूही ऐकता आले, पाहता आले. म्हणतात ना, ‘जो न देखे रवी, वह देखे कवि..’ तसंच काहीसं आहे हे.. पुलंना त्या व्यक्तिरेखा कश्या ‘दिसत’ होत्या हे त्यांनी प्रत्यक्ष अभिनय करून किंवा आवाज काढून दाखवल्या. हो, माझ्या हे नक्कीच लक्षात आहे की पुलंना सुद्धा त्यांच्या स्वतःच्या डोक्यात ती व्यक्तिचित्रे होती ती तशीच्या तशी साकारता आलीही नसतील कारण मेंदूला, बुद्धीला मर्यादा नसतात पण शरीराला, अवयवांना मर्यादा असतात, त्यामुळे त्यांनी ती व्यक्तिचित्रे हुबेहूब केलीही नसतील पण त्यांच्या स्वतःच्या सादरीकरणामुळे आपण त्या व्यक्तिचित्रांच्या बरेच जवळ पोहोचलो आहोत, त्या व्यक्तिचित्रांचे चित्रण बर्‍याचअंशी आपल्याला जाणवले आहे. हे शक्य झालं ते केवळ आणि केवळ पुलंच्या आवाजातील बदल करण्याच्या कौशल्यामुळे. पुलंना खरोखर दैवी आशीर्वाद होता, त्यामुळेच ते एवढं सगळं साम्राज्य उभारू शकले आणि आपल्याला सुपूर्त करून गेले. ‘आवाजाच्या या जादूगाराला’ त्रिवार वंदन करून ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखात ठेवण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो... 

1 comment:

  1. अप्रतिम..
    खरेच पुलंचा हा एक सगळ्यात मोठ्ठा पैलू आहे, जो बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही, किंबहुना इतर गोष्टींमध्ये झाकोळला जातो.
    एका माणसाने किती ग्रेट असावे, याचे अख्ख्या जगात पुलं सारखे उदाहरण शोधून सापडणार नाही.
    हाही एक पैलू, मुद्दा छान शब्दात अगदी बरोब्बर दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभार 😊🙏🏼

    असेच लिहित रहा आणि वाचकांना नवनवीन उत्तम साहित्त्याची पर्वणी द्या. 😊🙏🏼

    ReplyDelete