गिर्यारोहणासाठी काही ढोबळ नियम - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 2, 2015

गिर्यारोहणासाठी काही ढोबळ नियम

आज गिर्यारोहण हे क्षेत्र खूप मोठे झाले आहे. अनेक मंडळी गिर्यारोहण कलेत (क्रीडेत नव्हे) रस दाखवत आहेत. त्यांना सेवा पुरविण्यासाठी अनेक संस्था, धर्मादाय किंवा व्यावसायिक, निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा देखील वाढली आहे. इंटरनेट आणि सोशल मेडियामुळे उपलब्ध झालेल्या सहज माहितीमुळे अनेक मंडळी स्वतः ‘प्लान’ करून देखील गिर्यारोहणाला जात आहेत. एकूणच ‘आनंदी आनंद’ ‘सिचुएशन’ आहे. पण.. पण..

ही मंडळी नवखी असतात. अनेकांना एकाही ट्रेकचा अनुभव नसतो. केवळ ‘बाकीचे करु शकतात, तर आपल्यालाही जमेल’ म्हणून ते प्लान आखले जातात. या मंडळींवर आपला (म्हणजे गिर्यारोहण संस्थांचा) वचक (कंट्रोल) नसला तरी आपल्याकडे जे लोक गिर्यारोहण मोहिमांसाठी येतात किमान त्यांच्यावर आपण वचक ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील सोपे नियम आपण सर्व, व्यावसायिक-बिगरव्यायसायिक संस्थांनी एकत्र मिळून पाळावे लागतील.

गिर्यारोहण क्षेत्रासाठी एक महासंघ निर्माण करून त्यामध्ये सर्व व्यावसायिक-बिगरव्यायसायिक संस्थांनी नोंदणी करावी. महासंघाद्वारे प्रत्येक संस्थेला एक ओळख क्रमांक (नोंदणी क्रमांक) देण्यात येईल. संघाच्या कामकाजासाठी आणि व्यवस्थापन खर्चासाठी प्रत्येक संस्थेकडून अल्पशी रक्कम नोंदणी शुल्क म्हणून आकारण्यात यावे. 

गिर्यारोहणास आवश्यक साधनसामग्री आणि सक्षम प्रशिक्षित मनुष्यबळ असणाऱ्या संस्थांनाच नोंदणीकृत करून घेण्यात यावे. संस्थेचा एकूण अनुभव आणि उद्देश लक्षात घेऊन थोडेफार नियम शिथिल करण्याचा अधिकार संघाला देण्यात यावा. संस्थांना, गिर्यारोहण क्षेत्रातील नवनवीन माहिती आणि साहित्याविषयी अद्ययावत (अपडेट) राहणे बंधनकारक असावे.

महासंघाद्वारे एक वेबसाईट सुरु करण्यात यावी ज्यावर सर्व नोंदणीकृत संस्थांची माहिती मिळू शकेल. त्याद्वारे ग्राहकांना एखादी संस्था खरंच नोंदणीकृत आहे की नाही हेही पाहता येईल.

संस्थांनी त्यांच्या प्रत्येक मोहिमेची तपशीलवार माहिती संघास ठराविक कालावधी अगोदर देणे बंधनकारक करावे. संघाने अशा मोहिमांची तपशिलासह यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करावी. संघाच्या वेबसाईटद्वारे ग्राहकांना विविध मोहिमा पाहता येतील व इच्छा असल्यास त्यात सहभागी होता येईल. या शिवाय संस्थांना त्यांच्या मार्केटिंगद्वारे मिळणाऱ्या ग्राहकांनाही मोहिमेत सहभागी करून घेता येईल. मात्र सर्व संस्थांनी त्या मोहिमेस येणाऱ्या सर्व सदस्यांची आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या संस्थेच्या कार्यकर्त्यांची यादी आणि संपर्क क्रमांक (घरच्या संपर्क क्रमांकासह) संघास द्यावी लागेल. जेणेकरून कोणत्या संस्था, कोणत्या मोहिमा, कोणत्या दिवशी, कोणत्या परिसरात नेत आहेत यावर संघाचे लक्ष राहील.  
प्रत्येक सहभागी होणाऱ्या व्यक्तीला, संस्थेचे (संघाची मान्यता असलेले) विशिष्ट नोंदणी क्रमांक असलेले एक ‘प्रगतीपत्रक’ (प्रोग्रेस कार्ड) देण्यात येईल. त्याची इलेक्ट्रॉनिक प्रत संघाच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. या व्यक्तीने केलेल्या सर्व मोहिमांची नोंदणी त्यांच्या श्रेणीनुसार या पत्रकात असेल. त्या व्यक्तीने ज्या संस्थेच्या मोहिमेत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे, फक्त त्या संस्थेला, त्या व्यक्तीचे ‘प्रगतीपत्रक’ पाहून, ती व्यक्ती त्या मोहिमेस पात्र आहे की नाही याची निश्चिती करण्यास मदत होईल. श्रेणी ठरविण्यात याव्यात. उदा. सोपी-१, २, ३, मध्यम-१, २, ३, कठीण-१, २, ३, अतिकठीण-१, २, ३. संघाच्या वरिष्ठ तसेच सक्रीय अनुभवी गिर्यारोहींच्या एकमताने (किंवा बहुमताने) या नियमाची शिथिलता ठरविण्यात यावी. म्हणजे एखाद्या व्यक्तीने सोपी-१ श्रेणी पूर्ण केली असेल आणि तिला मध्यम १ श्रेणीच्या मोहिमेस जावयाचे असेल तर तिला मान्यता देण्यात यावी की नाही याबाबत नियम घालून द्यावेत.

सदस्याने मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्यावर ती मोहीम आखणाऱ्या संस्थेने त्या सदस्याच्या ‘प्रगतीपत्रका’वर त्या श्रेणीची नोंद करावी. अशा रीतीने ती व्यक्ती पुढील श्रेणीच्या मोहिमांमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरत जाईल आणि गिर्यारोहणाचा पुरेपूर आनंद घेऊ शकेल. तसेच तिने पूर्ण केलेल्या मोहिमांचा तपशीलही तिच्याकडे राहील.

मोहिमेच्या वेळीही संस्थांनी, मोहिमेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची तत्कालीन स्थिती लक्षात घ्यावी. सदस्यांनी संस्थांनी मोहिमेसाठी आवश्यक ते साहित्य आणले आहे की नाही याची लीडर्सनी पाहणी करावी. अत्यावश्यक साहित्य सोडल्यास त्यातही थोडीफार नियम शिथिल करण्यास हरकत नाही. मात्र अत्यावश्यक साहित्य उदा. ट्रेकिंग बूट, टोपी, पाण्याची बाटली, पाठपिशवी ई. आणले नसल्यास त्यांना घरचा मार्ग धरायला लावावे.

संघाद्वारे प्रांतवार ‘बचावदले’ तयार करण्यात यावीत. बचावदलात गिर्यारोहणासाठी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केलेले आणि त्यात सक्रीय असलेल्या उमेदवारांना मुख्य स्थान देण्यात यावे तर शोधकार्यासाठी ग्रामस्थांमधील सक्रीय आणि योग्य उमेदवार निवडावेत. या दलांना त्यांच्या प्रांतातील मोहिमांची माहिती संघाच्या वेबसाईटवरून मिळविण्यासाठी त्यांना विशेष लॉगइन देण्यात यावे. त्या प्रांतात मोहिमेसाठी जाणाऱ्या संस्थांच्या नेत्यांनीही बचाव दलाला त्यांच्या मोहिमेची खबर आणि तपशीलवार माहिती द्यावी. जेणेकरून बचावदलाला तयारीत राहणे आणि प्रसंगी तत्काळ मदत उभी करणे शक्य होईल. संस्थांद्वारे जास्तीत जास्त काळजी घेऊनही अपघात प्रसंग ओढवल्यास बचाव दलाद्वारे त्यांची सुटका करण्यात येईल. बचाव दलासाठी किमान शुल्क (त्यांचा आणि साधनांचा खर्च काढण्याइतपत) आकारण्यात येईल.

या उपक्रमामुळे गिर्यारोहण क्षेत्राशी प्रामाणिक संस्था आणि सहभागी व्यक्ती नोंदणीकरूनच मोहिमेस जातील आणि जे या क्षेत्राची पर्वा करीत नाहीत, नियम धाब्यावर बसवून गिर्यारोहण करण्यास जातील अशा व्यक्ती आणि संस्था वेगळ्या दिसून येतील. अशा संस्था किंवा व्यक्तींच्या मोहिमेतील व्यक्ती अपघातांमुळे फसल्यास ही त्यांची चुकी असेल. त्यामुळे आपण मोठ्या मनाने जरी त्यांच्या मदतीसाठी बचाव दलाला पाठविले तरी त्या मदतीसाठी जबर शुल्क वसूल करून त्यांना एक प्रकारे धडा शिकवण्यात येईल. शुल्क आकारताना त्या व्यक्तीची मानसिकता, त्याने असे का केले असावे इ. भावनिक मुद्दे गोंजारत बसु नये. कड्यावरून उडी मारल्यावर केवळ मरणच येते हा नियम लक्षात ठेवावा. कोणत्याही कारणाने कड्यावरून उडी मारली तरी (त्या व्यक्तीची मानसिकता लक्षांत न घेता) निसर्ग त्याची प्रतिक्रिया करतो हे येथे लक्षात घ्यावे. किमान आपल्या क्षेत्रातील ही एकी पाहून ही अप्रामाणिक मंडळी अशा (बुद्धिहीन) मोहिमा आखून धोका पत्करण्याचे आणि क्षेत्राला काळिमा लावण्याचे त्यांचे काम बंद करतील.

अनेक गिर्यारोहींना ‘सोलो’ म्हणजे एकट्याने भटकंती करण्यास (जरी ते चुकीचे असले तरीही) आवडते. यात अन-अनुभवी मंडळी खूप आहेत. त्यांना संघाद्वारे मोहिमा आखावयाच्या झाल्यास ‘सोलो’ ऑप्शनमध्ये नोंदणीकृत करून घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी त्यांचे ‘प्रगतीपत्रक’ कामाला येऊ शकेल. त्यांना ‘सोलो’ करू द्यावे की नाही याचा निर्णय सर्वस्वी संघाकडे असेल. संघाने परवानगी दिली तरी त्यांच्या मोहिमेत अपघात घडल्यास किमान शुल्काच्या दुप्पट शुल्क आकारण्यात यावे कारण सर्व समजून उमजून ही मंडळी धोका पत्करण्यास तयार झालेली असतात आणि त्यात बचाव दलाला अवास्तव कामाला लावतात. संघाने परवानगी नाकारली असल्यास त्यांच्या मोहिमा वर नमूद केल्याप्रमाणे ‘वेगळ्या’ ठरविण्यात याव्यात आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी.

संघाद्वारे वेळोवेळी अल्प शुल्क आकारून आवश्यक ती शिबिरे आयोजित करून संस्थांना आणि त्यांच्या लीडर्सना अद्ययावत माहिती पुरवावी. नवनवीन साधनांची माहिती, त्यांचे उपयोग आणि वापरण्याच्या योग्य पद्धती याची माहिती शिबिरामध्ये द्यावी. प्रथमोपचार, तातडीची मदत उभी करणे, प्रसंगाचा सामना करणे इ. आवश्यक विषयांवर विशेष शिबिरांचे आयोजन करून सर्व संस्थांना ‘तयार’ करावे.

संस्थांनी संघाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले सगळे नियम पाळून त्यांची अमलबजावणी होत आहे की नाही यावर लक्ष द्यावे. संघाने संस्थाच्या ग्राहकांच्या माहितीची गुप्तता पाळावी जेणेकरून संस्थांनी मेहनतीने जमा केलेले ग्राहक तुटणार नाहीत. ग्राहकांनी संस्थेच्या आणि संघाच्या नियमांचे पालन करून स्वतःचे जीवित सुरक्षित ठेवावे आणि योग्य संस्थेच्या मोहिमेत सहभागी झाल्याची हमी राखावी.

तर वरील मुद्द्यांमध्ये सुयोग्य बदल करून तसेच आणखी अनेक सुपीक डोक्यांतून आलेले स्वागतार्ह मुद्दे चौकटीत बसवून घेता येतील आणि एक सुयोग्य प्रणाली सुरु करण्यास वाव मिळेल. उद्देश एकच, की आपल्या गिर्यारोहण क्षेत्रांत वाढते अपघात टाळून त्यात नव्याने येणाऱ्या सुयोग्य मंडळीच्या सुरक्षेची काळजी घेणे.

एवढे तर आपण करू शकूच. हो की नाही??

No comments:

Post a Comment