अन्न हे पूर्ण ब्रह्म - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 15, 2015

अन्न हे पूर्ण ब्रह्म

आपल्यातील अनेक मंडळी आता बऱ्यापैकी (काहीजण खूपच) ‘सावरून’ आहेत. त्यामुळे उंच्या हॉटेलात (सॉरी रेस्तरां) वगैरे मध्ये जाऊन आठवड्यातून एकदा (किंवा अनेकदा / रोजच) जेवणे हे आलेच. पण या सवयीमुळे आपण ‘खवय्ये’ बनत चालले आहोत, हे नकळत आपण विसरत आहोत. उदा. (अनेकांना उदा. शिवाय मुद्दा कळतच नाही, त्यामुळे) बाहेरच्या पदार्थांची सवय लागल्यामुळे बरेचदा घरी (कोणाच्याही) समोर आलेले जेवण (किंवा कोणताही तयार केलेला अन्नपदार्थ) चाखल्यानंतर शक्यतो एखादी वाईट ‘कमेंट’ चुकून(?) टाकली जाते. कारण आपण त्या पदार्थाची, आधी खाल्लेल्या आणि चांगल्या झालेल्या त्याच पदार्थाशी ‘तुलना’ करतो. एका हॉटेलच्या पदार्थाची दुसऱ्या हॉटेलमधल्या त्याच पदार्थाशी केलेली तुलनाही एकवेळ ‘पचून’ जाईल. पण.. पण.. आपण आपल्या किंवा दुसऱ्या कोणाच्या(ही) घरी त्या घरातल्या व्यक्तीने बनवलेला तो पदार्थ खाताना अशी वाईट कमेंट करणे टाळावे. खरंतर अन्नाला कोणत्याही प्रकारे ‘नाव’ ठेवण्याची सवय मुळातच सोडून द्यावी.
कारण आजमितीस आपल्यातील अनेकजण ‘कम्फर्ट लाईफ’ जगत आहोत. जी कदाचित आपल्या आई-वडिलांनी त्यांच्या काळात पाहिली देखील नसेल. त्यामुळे अन्नाचे महत्व आपल्याला [तुम्ही दुर्दैवाने एक ट्रेकर (म्हणजे खरे ट्रेकर, आजकाल हे सुद्धा नमूद करावं लागतं) नसाल तर] असावे तेवढे नाहीय. एक भोग वस्तू म्हणून आपण आज अन्नाकडे पाहत आहोत. चैन करावी, ऐपत असेल तर नक्कीच करावी, पण सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवून.


क्वचित तो पदार्थ नसेल नीट तयार झाला किंवा त्याला हवा तो स्वाद नसेल आला तर निमूटपणे तो खाऊन संपवावा. त्यातल्या त्यात बरा असेल तर ‘खूप छान झालंय’ असे सुद्धा बोलून दाखवावे. कारण तो पदार्थ बनवण्यासाठी त्या व्यक्तीने केलेला आटापिटा आपल्या नजरेआड असतो. त्यात सुद्धा आपली आई, बहिण किंवा बायको असेल तर नक्कीच फक्त ‘स्तुती’च करावी कारण तो पदार्थ त्यांनी केलेला असतो तो केवळ आपल्यासाठी. वेळात वेळ काढून. विचार करा; त्या पदार्थाचे प्लानिंग करण्यापासून ते सामान आणण्यापासून ते तयारी करून बनवेपर्यंत त्या आपल्या किमान अर्धा ते दोन तास खर्ची लावतात. ज्यात त्या त्यांच्या स्वतःसाठी खूप काही करू शकतात. पण तो वेळ त्या आपल्यासाठी वापरतात. आणि आपण येऊन काय करतो?? झटकन बोलून जातो; की ‘मीठ कमी / जास्त आहे, तिखट कमी / जास्त आहे, चवच नाही / अमुक ठिकाणी खाल्लं तशी चव नाही. इ. काय होत असेल त्याचं. खर्ची घातलेला सगळा वेळ ‘वाया’ गेला असं वाटत असेल त्यांना आपल्या त्या कमेंटमुळे. आणि बायका कोणत्या थरावर विचारचक्र नेऊन ठेवतील हे मी तुम्हाला वेगळं सांगायलाच नको. आणि मुळात आपण कितीही ‘खवय्ये’ झालो तरी ‘उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म’ या उक्तीने वागलो तर सगळंच शक्य आहे. ज्या अन्नासाठी आपण धडपडतो, अनेकांच्या नशिबात ते कित्येक दिवस नसते, अनेकांचे ज्याच्याविना जीव जातात, त्या परब्रह्म अन्नाला ‘नाव’ ठेऊ नका. मग ते कसेही असो.  ते टाकू नका. आवश्यक असेल तेवढेच घ्या, खा.

त्यामुळे ‘चांगली’ शक्य नसेल तर किमान ‘वाईट’ कमेंट करू नका. त्यांचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहत तो पदार्थ खा.. पहा तो चांगला लागतो की नाही..

No comments:

Post a Comment