भाई : व्यक्ति की वल्ली - चित्रपटाबद्दलचे मत - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, September 22, 2020

भाई : व्यक्ति की वल्ली - चित्रपटाबद्दलचे मत

भाई : व्यक्ति की वल्ली - चित्रपटाबद्दलचे मत

पुलंह्या नावांतच इतकं आकर्षण आहे की संगीत, अभिनय, साहित्य आणि विनोद यातील किंवा यांच्याशी निगडीत रसिक तिथे आपसूकच ओढला जातो. त्यामुळेच शेवटी न राहवून गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले भाई : व्यक्ति की वल्लीआणि भाई : उत्तरार्धहे पुलंच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहिले. चित्रपट खूप छान आहे पण आज मी पुलंविषयी नाही तर चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांविषयी थोडं बोलू इच्छितो. महेश मांजरेकर खूप ताकदीचे दिग्दर्शक आहेत, त्यांनी वास्तव, अस्तित्व, काकस्पर्श सारखे खूप ज्वलंत चित्रपट खूप उत्तम तयार केले आहेत. पण मला वाटतं की त्यांनी लोकांच्या हृदयाजवळ असलेल्या व्यक्ति किंवा गोष्टींवर चित्रपट बनवू नयेत. नक्कीच हे माझं वैयक्तिक मत आहे मांजरेकर त्याला भीकही घालणार नाहीत, किंबहुना ते त्यांच्यापर्यंत पोहोचणारही नाही. पण पुलंचा एक निस्सीम चाहता, किंवा भक्तच असल्याने मी हा लेखनप्रपंच करत आहे. भाई चित्रपटामध्ये त्यांनी जे फ्रिडम ऑफ एक्सप्रेशनघेतलं आहे त्यावरच माझा आक्षेप आहे. संपूर्ण चित्रपटात त्यांनी पुलंना एक विदूषक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्या विदूषकपणामध्येही एक बेजबाबदारपणा दिसून येतो आहे. कसलीच काळजी नसलेला आणि फक्त स्वतःमध्ये रमणारा माणूस अशी पुलंची जी इमेजया चित्रपटातून लोकांसमोर उभी राहते ती साफ चुकीची भासते. याऊपर भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, हिराबाई बडोदेकर (चित्रपटात चंपूताई असं नाव दाखवलं आहे) आणि इतरही अनेक दिग्गज लोकांना फक्त मैफिली झोडताना दाखवलं आहे. आणि त्या मैफिलीसुद्धा त्यादरम्यान ठरलेल्या दारूपार्टीसाठी जमलेल्या दाखवल्या आहेत. वसंतराव देशपांडेना तर अगदी दारूसाठी हपापलेला माणूस दाखवलं आहे. एवढे नामवंत गायक आपला गळा सांभाळतील की दारू पित बसतील, हा माझ्यासारख्या अज्ञात रसिकाला पडलेला एक महाप्रश्नच आहे. स्नानसंध्या बुडू नये यांची काळजी करणार्‍या आणि विश्वेश्वराला भजणार्‍या अंतु बर्व्याला (चित्रपटात अण्णा कर्वे असं नाव दाखवलं आहे) रात्री पुलं आणि वसंतराव देशपांडेंसोबत दारू पितानाचा सीन पाहून तर डोक्यात तीव्र सणक जातेवाला मीम आठवला मला.

सुनीताबाईंनी मूल नको असल्याचा घेतलेला निर्णय दाखवतानाही त्यांची जी पार्श्वभूमी तयार केली आहे ती डोकं उठवणारी आहे. पुलं एक स्वछंदी माणूस होते. ते खुशालचेंडू असतील, त्यांनी घरात अगदी दुर्लक्षही केलं असेल पण अश्या नाजुक प्रसंगी ते असं काही वागलं असतील असं वाटत नाही. त्यामुळे असे खाजगी प्रसंग दाखवताना एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वाला आणि त्या प्रसंगाशी संबंधित लोकांना आपण लोकांसमोर कसे नेतोय याचा अभ्यास दांडगा हवा. पुलं, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे आणि गदिमा हे सखाराम गटणे (चित्रपटात दत्तराम रहाटे असं नाव दाखवलं आहे) यांची टिंगल करतायत हा सीन सुद्धा अगदी लोवाटला. इतर अनेक सीन खटकले परंतु सगळेच लिहू शकत नाही.

मी सुरुवातीलाच जे लिहिलं आहे की शेवटी न राहवूनया वाक्यातला अर्थ तुम्हाला आता कळला असेल. पुलंच्या जीवनावरील चित्रपट आहे म्हणून पाहावसा वाटला पण तो मांजरेकरांनी बनवला आहे म्हंटल्यावर धैर्यच होईना. कारण मांजरेकरांनी या आधीही नटसम्राटचित्रपटात अप्पासाहेब बेलवलकर नटसम्राटया व्यक्तिरेखेची अशीच वाटलावली आहे. मांजरेकर बहुदा कोणतीही व्यक्तिरेखा विझ्युअलाईज करताना सर्वप्रथम स्वतःला त्या व्यक्तिरेखेत पाहत असतील त्यामुळे असे घडत असेल की त्यांच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी ते त्या व्यक्तिरेखेत समाविष्ट करत असतील. असो; पण माझी मनापासून इच्छा आहे की त्यांनी यापुढे अश्या प्रसिद्ध व्यक्तींवर किंवा गोष्टींवर चित्रपट बनवू नयेत, नाहीतर उद्या देवांवर (म्हणजे देवतांवर) चित्रपट बनवला तर देवांनाही दारूच्या पार्ट्या करताना दाखवतील. (इथे देवही सोमरस पीत होते असे कमेंटमध्ये सांगून काहीजण आपल्या बुद्धीची कुवत दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात.) ते काम त्यांनी सुबोध भावेंवर सोपवावे; त्यांना ते काम उत्तम जमते. थोडक्यात पुलंच्याच भाषेत सांगायचं तर त्यांचा रावसाहेब या वल्लीच्या व्यक्तिरेखेवर लिहीलेल्या भागात ते म्हणतात; काही माणसांची वागण्याची तऱ्हाच अशी असते कि त्यांच्या हाती मद्याचा प्याला देखील खुलतो.. आणि काही माणसं दूधदेखील ताडी प्यायल्यासारखी पितात..

कळावे; लोभ असावा.

2 comments:

  1. योग्य मत मांडले आहे. सिने अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही खपवलै तरी चालते असे मांजरेकरांना वाटते. मलाही चित्रपट पाहताना बरेचसे प्रसंग खटकले होते.

    ReplyDelete
  2. i little bit agree with you but bhai part 2 is so touchy,
    especially scene when PL meet to baba amte and vijay tendulkar's

    ReplyDelete