पिट्टू उर्फ बॅकपॅक - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 15, 2017

पिट्टू उर्फ बॅकपॅक


ट्रेकिंग म्हंटलं की त्यात ‘पिट्टू’ म्हणजेच ‘बॅकपॅक’चे महत्व अनन्य साधारण असते. या बॅकपॅकमध्येच ट्रेकचे जवळपास सर्व सामान भरलेले असल्याने ती खूप महत्वाची असते. अनेकदा काही नवखी ट्रेकर मंडळी ऑफिसच्या बॅगाच ट्रेकिंगसाठी घेऊन येताना दिसतात. “काय फरक पडतो? सामान पाठीवर घेऊन जाता आलं म्हणजे झालं..” या मतामध्ये फारसा फरक आढळून येत नाही. मात्र हे विधान चुकीचे आहे. संपूर्ण ट्रेक हा अनेकदा बॅकपॅकवर अवलंबून असतो.

आपल्या पाठीच्या कण्याचा आकार विशिष्ठ असतो. आपल्या शरीराचे दैनंदिन कार्यात कण्याची महत्वाची भूमिका असते. कण्याची स्थिती योग्य राखण्यास आपण चुकलो तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो हे आपणा सर्वांनाच माहित आहे. म्हणूनच झोपण्याची किंवा बसण्याची स्थिती चुकली की आपल्याला पाठदुखीला सामोरे जावे लागते. बॅकपॅकचे सुद्धा असेच आहे. साध्या बॅगांमध्ये आणि बॅकपॅक खूप फरक असतो. पर्यटनासाठी, अर्ध्या-पाऊण दिवसांच्या, जवळपासच्या ट्रेकसाठी साधी बॅग वापरल्यास एकवेळ चालून जाईल पण एका किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाच्या ट्रेकसाठी बॅकपॅक आवश्यक आहे. ट्रेकसाठी विशिष्ठ प्रकारे बॅकपॅक बनवण्यात येतात. नियमित ट्रेकर्सनी, ट्रेकसाठी किमान ४० लिटर तर लीडर्सनी किमान ६० लिटर क्षमतेची बॅकपॅक विकत घेणे आवश्यक आहे. या बॅकपॅक्समध्ये सगळ्यात महत्वाची असणारी गोष्ट म्हणजे त्यांची ‘फ्रेम’. साध्या बॅगांमध्ये तिचा अभाव असतो. आपल्या पाठीच्या कण्याच्या आकाराला साजेशी अशी ही फ्रेम असते. ती, वजनाने हलक्या पण मजबूत अशा अल्युमिनियम संमिश्र धातूंपासून तयार केलेली असते. म्हणजे या धातूच्या, विशिष्ठ आकारात वाकवलेल्या दोन जाड सळयांनी ही फ्रेम बनते. यामुळे बॅकपॅकमध्ये अगदी १२-१५ किलो साहित्य असलं तरीही पाठीच्या कण्यावर जास्त वजन येत नाही. आपले खांदे आणि नितंबाची हाडे वजन पेलण्यासाठी सक्षम असतात आणि याचाच फायदा घेऊन या फ्रेमची रचना केलेली आढळते. या फ्रेमची रचनाच अशी असते की बॅकपॅकमधील सगळे वजन पाठीवर येत नाही. फक्त बॅकपॅक पाठीला असते आणि वजनाचा जास्त भार खांद्यांवर आणि नितंबावर जातो. कण्याला आराम राहतो आणि आपला ट्रेक आरामशीर होतो.

ट्रेकिंग बॅकपॅकचा आकारही विशिष्ठ असतो. एखाद्या उभ्या गोणीसारखा तिचा आकार असतो. आपल्या शरीरासारखा तिचा आकार खालच्या बाजूस निमुळता होत गेलेला असतो. जेणेकरून सामानाचा भार अधिकाधिक खांद्यांवर येतो. या बॅकपॅकला वरच्या बाजूस एक झडप (लीड / फ्लॅप)  असते. या झडपेमध्येही एक कप्पा असतो आणि त्याला चैन असते; जेणेकरून ट्रेकदरम्यान अनेकदा लागणारे साहित्य या कप्प्यात ठेवता येतात आणि वरचेवर त्या काढता / घालता येतात. बॅकपॅकचे पट्टे लांब असतात आणि त्यांना कमी जास्त करण्यासाठी क्लिप्स असतात. कित्येक ब्रँडेड बॅकपॅकमध्ये फ्रेमसुद्धा कमी जास्त करता येते आणि आपल्या (पाठीच्या) उंचीनुसार सेट करता येते. या सर्व सोयी आपल्या सोयीसाठी असतात; जेणेकरून शरीराला जास्तीत जास्त आराम देता येईल. या पट्ट्यांना जाड अस्तर (पॅडिंग) असते. त्यामुळे हे पट्टे खांद्यांत रुतत नाहीत व बॅकपॅक पाठीवर वाहताना त्रास होत नाही. तसेच बॅकपॅकच्या खालच्या बाजूस आणखी एक पट्टा असतो, जो कंबरेला बांधता येतो. जेणेकरून बॅकपॅक  खांदे आणि कंबर यामध्ये घट्ट बांधून ठेवता येते आणि चढ उतार करताना ती हलून तोल जाण्याचा धोका टळतो.

ह्या बॅकपॅक विशिष्ठ कापडापासून तयार केल्या जातात. त्याला ‘रिपस्टॉप’ असे म्हणतात. ह्या कापडाचे वैशिष्ट्य म्हणजे ते ट्रेकिंग आणि पर्यटन इत्यादी मध्ये होणाऱ्या ओढाताणीसाठीच तयार केलेले आहे. त्याची झीज कमी असते आणि ते फाटल्यास चीर लवकर वाढत नाही व आपले सामान काही काळ सुरक्षित राखता येते. ते कापडासारखे नरम असल्याने त्याला सुरकुत्या पडल्यातरी त्या ठिकाणी ते फाटत नाही. अनेक ब्रँडेड बॅकपॅक वॉटर रेझिस्टन्ट सुद्धा असतात त्यामुळे त्यातून पाणी झिरपत नाही. या बॅकपॅकमध्ये शिवण आणि चैनसुद्धा वॉटर रेझिस्टन्ट असतात. त्यामुळे साध्या पावसात किंवा उथळ पाण्यात बॅकपॅक राहिल्यास किंवा पडल्यास, बॅकपॅकमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पाण्यापासून अधिक सुरक्षित करण्यासाठी बॅकपॅकला ‘रेन कवर’ची सोय करता येते. 


ही झाली सर्वसामान्य रचना. या ऐवजी ब्रँडनुसार कमी जास्त सोयी-सुविधा उपलब्ध होतात. काही बॅकपॅकमध्ये दोन्ही बाजूला कप्पे असतात. ज्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि इतर वरचेवर लागणारे साहित्य ठेवता येते. काही बॅकपॅकमध्ये ते नसतात; त्याऐवजी आतमध्ये वॉटर ब्लॅडरसाठी कप्पा केलेला असतो. स्लीपिंग बॅग आणि मॅटसाठी बॅकपॅकच्या वरच्या बाजूस पट्टे असतात; ज्यामध्ये त्या बांधून ठेवता येतात. काही बॅकपॅकमध्ये स्लीपिंग बॅग / ट्रेकिंग बुटांसाठी खालच्या बाजूस वेगळा कप्पा असतो. वॉकिंग स्टिक, जी.पी.एस., वॉकी टॉकी, टांगण्यासाठी हूक्स आणि क्लिप्स असतात. कंबरेच्या पट्ट्याला लहान कप्पा असतो, ज्यामध्ये स्विस नाईफ, टॉर्च, गोळ्या इत्यादी जास्त वापरातल्या किंवा तातडीच्या वस्तू ठेवता येतात. काही बॅकपॅकमध्ये छातीकडेही एक लहान पट्टा असतो; ज्याच्या क्लिपमध्ये शिट्टीची सोय असते. हल्ली बॅकपॅकमध्ये दोन्ही बाजूंना 'कम्प्रेशन स्ट्रॅप्स' असतात; ज्यामुळे बॅकपॅकमधील सामानानुसार हे पट्टे ताणून ती जाडीला कमी-जास्त करता येते. म्हणजे आतील सामान हलत नाही आणि बॅकपॅक ताठ राहते.


म्हणजे एकूणच ट्रेकिंग बॅकपॅक ही फक्त ट्रेकिंग नजरेसमोर ठेवून तयार केलेली असते. त्यामुळे ती इतर बॅगांपेक्षा नक्कीच वेगळी असते. म्हणून ट्रेकिंगसाठी नियमित ट्रेकर्सनी केवळ ट्रेक बॅकपॅकचाच वापर करणे सल्लादायक आहे. 

(नोंद: वरील लेख 'सह्याद्री - कणा महाराष्ट्राचा' या ई-मासिकात ऑगस्ट-२०१४ च्या अंकात प्रसिध्द करण्यात आला होता.)

2 comments: