प्रकार भटकेगिरीचे - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 25, 2017

प्रकार भटकेगिरीचे











‘भटकेगिरी’ हा छंद असलेले या जगात काही कमी नाही. या भटकेगिरीचे अनेक प्रकार आहेत, मात्र उद्देश एकच – ‘मनसोक्त भटकणे’. यामध्ये पायी भटकणारे ट्रेकर्स, सायकलने हिंडणारे बायकर्स, मोटरसायकलने पळणारे रायडर्स, मोटरगाडीने फिरणारे ‘मोटरीस्ट’ इत्यादी अनेकजण आहेत. यात काहीजण एका प्रकाराशी ‘लॉयल’ असतात तर काही ‘कुछभी चलेगा’ प्रकारातले असतात.



ट्रेकर्स किंवा ट्रॅव्हलर्स हे बरेच अंतर पायी कापून भ्रमंती करतात. हे लोक निसर्गाची जास्तीत जास्त जवळ जाणारे असतात. यातील अधिकांश लोक सुदृढ शरीरयष्टीचे असतात. नियमित व्यायाम आणि सराव हा यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असतो. कोणत्याही परिस्थितीत ‘टिकून’ राहण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे यांच्या पाठीवरच्या बॅकपॅक मध्ये त्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त संसार असतो. गरजेच्या अगदी लहान-सहान गोष्टी यांच्या पाठपिशवीमध्ये सापडतात. खाण्या-पिण्याच्या बाबतीत देखील यांचे जास्त ‘चोचले’ नसतात. मुक्कामाच्या ठिकाणी जे काही ‘सापडेल’ त्यात ही मंडळी खुश असतात. मुळात दुर्गम भागातील जेवणच यांना जास्त आवडतं. कांदा-भाकरी ‘लिटरली’ खाण्यापर्यंत यांची मानसिक (आणि शारीरिक) तयारी असते. साधी राहणी (कधी कधी उच्च विचारही) हे यांच्या जीवनाचे सूत्र असते. एक जोड कपड्यावर अनेक दिवस (अगदी अंघोळ न करता) राहण्यात हे कुशल असतात. ‘पायातील बूट आणि पाठीवरील बॅकपॅक’ हेच यांचे जीवन असते. आणि यांचा जीवनप्रवास यापुढे जात ही नाही, कारण ते या प्रवासातच समाधानी असतात. मुक्कामासाठी स्वताचे ‘छत’ स्वतः घेऊन फिरतात. त्यात टेंटचा प्रामुख्याने समावेश असतो. अन्यथा ‘खाली धरती आणि वर आकाश’ या स्थितीत देखील अनेक रात्री ‘घालवल्याचा’ अनुभव यांना असतो. पावसाळ्यात, रात्रीच्या वेळी देवळाच्या किंवा घराच्या ओसरीवर ही मंडळी दिसून येतात. थोडक्यात हे लोक ‘पर्यटना’ची ‘भिक्षुकी’ स्वीकारलेले फकीर असतात.

ट्रेकर्स किंवा ट्रॅव्हलर्स च्या पुढली ‘जात’ म्हणजे ‘बायकर्स’. आपल्याकडे बाईकचा सरसकट अर्थ मोटरसायकल असा घेतला जात असला तरी बायकर्स म्हणजे सायकलवरून प्रवास किंवा भटकंती करणारे असा आहे. ह्या लोकांच्या ‘चैनीची’ ग्रेड ट्रेकर्स किंवा ट्रॅव्हलर्सपेक्षा थोडी जास्त असते. बाकी दोघांमध्ये कमालीचे साधर्म्य आहे. फक्त ट्रेकर्स किंवा ट्रॅव्हलर्सच्या बूट आणि पाठपिशवीच्या जागी ‘सायकल’ ही यांचं जीव-प्राण असते. यांच्याकडे पाठपिशवी सापडलीच तरी त्यात अनेकदा फक्त पाणी सापडते. हे लोक अन्नपदार्थ ‘कॅरी’ करत नाहीत. कारण हे लोक ‘ऑन द वे’ खाणारे असतात. बराचसा प्रवास एनर्जी बार्स कापून झाल्यावर एखाद्या धाब्यावर यांचा ‘हॉल्ट’ असतो. तिथे नाश्ता-जेवण करून ही मंडळी पुन्हा पुढल्या प्रवासाला लागतात. मुक्काम शक्यतो देऊळ किंवा घराच्या ओसरीवर असतो. सायकलवर वजन कमीतकमी टेंट आदी अवजड वस्तू प्रकर्षाने टाळल्या जातात. सायकल शक्यतो उघड्यावर न राहता, नजरेच्या टप्प्यामध्ये राहिल अश्या तर्हेने यांचा रात्रीचा मुक्काम असतो. फिटनेससाठी यांना फारशी मेहनत घ्यावी लागत नाही कारण यांच्या रोजच्या सरावातच यांचा व्यायाम होत असतो. कोणत्याही भौगोलिक रचनेवर पेडलिंग करण्यासाठी फुफ्फुसांची आणि पायांची क्षमता वाढवणे हेच यांचे मुख्य उद्दिष्ट असते आणि मजल-दरमजल हे त्यात पारंगत होत जातात. कमीतकमी खर्चात प्रवास करण्याकडे यांचा कल असतो. फक्त सायकल मात्र ‘कडक ब्रँड’ची असते. 

बायकर्सच्या पुढली ‘जात’ म्हणजे ‘रायडर्स’. फक्त ‘चालवणे’ ही क्रिया सोडली तर बायकर्स आणि रायडर्समध्ये काही समानता नसते. ही मंडळी थोडी ‘हाय क्लास’ असतात. ट्रेकर्स किंवा ट्रॅव्हलर्सचा अधिकाधिक नैसर्गिक वागण्याकडे जास्त कल असतो. बायकर्सही सायकलचा वापर करून ‘प्रदूषण नियंत्रणा’चा संदेश देश असतात. मात्र रायडर्स या बाबतीत थोडे ‘चैनी’ असतात. धूर, मोटारसायक किंवा फटफटीचा आवाज यामुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे सहज दुर्लक्ष करण्यात येते.  सिगारेट पिणारे जसे ‘अपनेही धून मे’ असतात तसाच काहीसा प्रकार रायडर्सचा असतो. कारण ‘सुस्स्साट वेग’ हेच यांच्या जीवनाचे लक्ष्य असते. त्यासाठी त्या ‘ताकदीची’ मोटारसायकल असणे अनिवार्य असते. त्यामुळे रायडरचा खिसा जेवढा जड तेवढी त्यांच्या मोटरसायकलची ‘ताकद’ जास्त असते. भारतात सध्यातरी ‘हार्ली डेविडसन’ सारखे तगडे ब्रँड परवडण्यासारखे नसले तरी ‘रॉयल एनफिल्ड’ ही मोटरसायकल सर्रास वापरली जाते. त्यानंतर डूकाटी, के.टी.एम., अवेंजर इत्यादी मोटारसायकल दिसून येतात. हौशी लोक इतरही साध्या मोटारसायकलीही वापरतात. गाडीसोबत शरीरासाठी कवच म्हणून चांगल्या ब्रँडचे जॅकेट, पाठ, हात आणि पाय यांसाठी चांगल्या ब्रँडचे प्रोटेक्शन वापरतात. एकूणच खर्चिक असा मामला असल्याने या प्रकारातील हौशी लोक सुस्थितीत असतात हे सांगण्याची गरज नाही.  सुस्साट वेग आणि गाडी पळताना होणारा इंजिनचा आवाज यावर यांचा भर असतो. यांचा मुक्काम शक्यतो हॉटेलमध्ये असतो. कारण हे लोक कमीतकमी वेळात जास्तीत जास्त अंतर कापण्यात पटाईत असतात. त्यामुळे त्यांना झोप मिळणे अत्यावश्यक असते. खाण्या-पिण्याच्या बाबतीत हे लोक हलगर्जीपणा करत नाहीत. चांगले धाबे किंवा रेस्टॉरंट पाहूनच यांचे नाश्ता-जेवण होते. हे लोक फिटनेस वेडे नसतात. मात्र पापणी न लवता कित्येक किलोमीटर अंतर मोटारसायकलने पार करण्यात यांचा हातखंडा असतो. 

‘रायडर्स’ पुढली ‘जात’ म्हणजे ‘मोटरीस्ट’. वरील सगळ्यात रॉयल लोक म्हणजे ‘मोटरीस्ट’. ह्यांचा निसर्ग आदी गोष्टींशी काडीमात्र संबंध नसतो. हे लोक ‘सुपर चैनी’ असतात. फोर बाय फोर वाल्या तगड्या मोटरगाड्या घ्यायच्या आणि मस्तपैकी फिरत राहायचं हेच ह्याचं लक्ष्य. बक्कळ पैसा जमवून असलेली अशी ही मंडळी असतात. स्कोर्पिओ, बोलेरो, इनोवा किंवा तत्सम एस.यु.व्ही. मोटरगाड्या यांच्याजवळ दिसून येतात. गाड्यांमध्ये यांची पि.एच.डी. असते म्हणा ना. एकूणच ‘लक्झरी लाईफ’ जगत भटकेगिरी करण्याकडे यांचा कल असतो. नाश्त्याला आणि जेवणासाठीची रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स यांनी आधीच जी.पी.एस. वर नोंदवलेली असतात. प्लान अगदीच बदलला तर नाश्ता-जेवणासाठी खूप ‘चूझी’ असतात. राहण्यासाठी ए.सी. कमरे असलेले हॉटेल लागतं. यांची भटकंती एकदम ऐशोआरामात चालते. पण गाडीवर नियंत्रण ठेवण्यात हे कुशल असतात. कित्येक तास न झोपता किंवा डुलकी न काढता गाडी चालवणे यात ते माहीर असतात.

उपरोक्त प्रकारांची माहिती ढोबळ स्वरुपात दिली आहे. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. त्यामुळे वर दिलेल्या माहितीला देखील काही लोक अपवाद असू शकतात. मात्र वरील माहितीमुळे भटक्यांच्या कोणत्या प्रकारात आपण मोडतो हे ताडून पाहणे आपल्याला सोपे जाईल अशी आशा ठेऊन लेख आवरता घेतो.


No comments:

Post a Comment