छोटेखानी अवचितगड (०२ सप्टेंबर २०१२) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, September 12, 2012

छोटेखानी अवचितगड (०२ सप्टेंबर २०१२)

श्री प्रसाद पोतदार सर हे सामनाचे चीफ एडिटर. मला मार्गदर्शक असणारी माझी मैत्रीण सुवर्णरेहा जाधव हिच्यातर्फे सरांची आणि माझी ओळख झाली. सामनाच्या फुलोरा पुरवणीत लिहिणाऱ्या आम्हा लेखकांची टीम बदलापूरला चिखलोली धरणाच्या सहलीला गेलो होतो तिथे आम्ही प्रथम भेटलो होतो.

आम्ही ‘रॉक क्लाईम्बर्स क्लब’तर्फे नियमित ट्रेक्स आखत असतो हे सरांना माहित होतं आणि त्यांनाही आमच्यासोबत एका ट्रेकला यायचं आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. या आधी त्यांनी पेब गडाचा ट्रेक एका संस्थेतर्फे केला होता मात्र थेट मध्यम श्रेणीचा किल्ला पहिल्याच ट्रेकसाठी निवडल्याने त्यांना तो पूर्ण करता आला नाही. सोपी श्रेणीच्या, अवचितगड ट्रेकबद्दल सरांना सांगितलं. त्यांनी तत्काळ संमती दर्शविली. आमची आखणी कशी असते त्याचा अनुभव सरांना घ्यायचा होता.

ठरल्याप्रमाणे रविवार, ०२ सप्टेंबर २०१२ रोजी दादरहून इतर ट्रेकर्सना घेऊन, सकाळी ७ वाजता निघालेली आमची गाडी सरांनी सायनहून तर मी नेरुळून पकडली. सरांसोबत प्रफुल्ल गावडे नावाचा, फोटोग्राफर असणारा त्यांचा सहकारीही होता. मी लीडर असल्याने ट्रेकदरम्यान मला सरांशी जास्त बोलता येणार नव्हतं, हे आम्हा दोघांनाही माहित होतं. वडखळ नाक्याला मस्त वडापाव आणि चहाची न्याहारी करून आम्ही रोह्याजवळच्या मेढा गावी पोहोचलो. मेढा हे अवचितगडाच्या पायथ्याचं गाव. गावातल्या सरपंचांशी भेटून गावातच दुपारच्या जेवणाची सोय करून घेतली. सरांच्या सामाजिक वजनाचा ‘उपयोग’ येथे झाल्याने ते जेवण आम्हाला अल्प दरात उपलब्ध झालं. ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ ह्या दुर्ग संवर्धक संस्थेचे कार्य इथे सुरु होते. त्या संस्थेचे प्रमुख ‘संतोष हासुरकर’ ह्यांच्याशी बोलून त्यांचे दोन कार्यकर्ते आमच्या ट्रेकला पाठवण्यास सांगितलं. ते दोघे गावात भेटून आमच्यासोबत गडावर येणार होते आणि त्यांच्या कार्याची माहिती देणार होते. इंट्रोडक्शन, रुल्स एंड रेगुलेशन राउंड झाल्यावर ट्रेकला सुरुवात झाली. सप्टेंबर असल्याने पाऊस रिपरिपत होता. शिवाय ह्या भागात खूप जंगल असल्याने सगळीकडे हिरवंगार होतं. गावातल्या विठ्ठल मंदिराजवळून विहिरी ‘क्रॉस’ केल्यावर आम्ही अवचितगडाखालच्या दाट जंगलात शिरलो.

जंगलातून ट्रेकिंग करताना एक विचित्र अनुभव येतो. झाडाच्या श्वासोच्छ्वासमुळे जंगलातील वातावरण नेहमी दमट असतं. त्यात झाडांमुळे वाहती हवाही नसते. वाटेवरच्या चढाईमुळे येणारा घाम हवा नसल्यामुळे सुकत नाही आणि हैराण व्हायला होतं. आमच्या ह्या ट्रेकमध्ये सर्वचजण हा अनुभव घेत होते. पोतदार सरांना त्याचा त्रास जास्त होत होता हे त्याच्या चालण्यावरून कळत होतं. कारण प्रत्येक ‘हॉल्ट’ला ते गवतावर आडवे होत होते. जोरजोरात हाफत होते. अधूनमधून बराच वेळ वाकून गुढघ्यावर हात ठेवत होते. बहुतेक त्यांची तब्येत बरी नव्हती.

“सर, बराच त्रास होतोय का?” मी विचारलं.
“होतोय थोडा.. माझ्या छातीत आणि बरगड्यांमध्ये दुखतंय.. दम पण लागतोय” सर म्हणाले. “पण तुम्ही व्हा पुढे.. मी येतो हळू हळू मागून..”

दिलीप आणि योगेशला त्यांच्यासोबत यायला सांगून आम्ही इतर पुढे निघालो. तासाभराच्या ह्या ट्रेकसाठी आम्हाला अर्धा तास जास्त लागला होता. अवचितगडाचे प्रवेशद्वार पाहिल्यावर सर्वांना हायसं वाटलं. गडावर एखाद्या उत्तम ठिकाणी त्या ट्रेकिंगचा ग्रुपफोटो काढण्याचा आमचा नियम आहे. तो इथेही पार पाडला. आमची ही आयडिया सरांना खूप आवडली. द्वारातून आत शिरण्यापूर्वी दुर्गविरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना खणखणीत आवाजात केलेला घोषणेचा मुजरा श्रवणीय होता. हा एक नवा अनुभव घेऊन आम्ही आत शिरलो.

इथून पुढे सपाटीवरच चालायचं होतं. आम्ही पुढे निघालो. येथे उजव्या बाजूला झाडीत लपलेला गडावरचा अप्रतिम मोठा तलाव दिसून आला. एवढ्या लहान गडावर एवढा मोठा तलाव अपेक्षित नव्हता. अगदी अष्टकोनी पुष्करणी बांधून काढावी तसा तो दिसत होता. मात्र त्याचा आकार मोठा असल्याने तो कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये सामावण्याची शक्यता कमी होती त्यामुळे शक्य तेवढा तलाव कॅमेऱ्यामध्ये टिपून पुढे निघालो. थोडंच पुढे गेल्यावर डागडुजी केलेलं महादेव मंदिर दिसून आलं. पुढे या गडाची ‘आयडेंटीटी’ असणारी सातटाकी आणि गडदेवता पिंगळसईदेवीची घुमटी दिसली. पाण्याने काठोकाठ भरलेली ती टाकी पाहून मन प्रसन्न झाले. एवढ्यात पाऊस सुरु झाला आणि आमची धावाधाव झाली. पण सगळ्यांना नंतर तो एक ‘रेन ट्रेक’ असल्याचे आठवले आणि सगळ्यांनीच पावसाच्या रिमझिम सरींमध्ये न्हाऊन घेतलं.

येथून डाव्या बाजूला एका बुजलेल्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. खरंतर सगळा गड आता फक्त भग्नावस्थेत आहे. त्यामुळ दरवाज्यांच्या उरलेल्या कमानी कशासाठी असाव्यात त्यांचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. येथे तटबंदीच्या आतल्याबाजूस एक शिलालेख आहे असे ‘दुर्गवीरांनी’ सांगितले आणि आम्ही तेथे निघालो. नवख्या भटक्याला सहज सापडणार नाही अश्या अवस्थेत तो शिलालेख आम्हाला दिसून आला. महत्वाची स्थळं पाहून आम्ही गडावर अलीकडेच बांधलेला लाकडी पूल पाहण्यासाठी निघालो. हिरव्यागार टेकड्यांमध्ये बांधलेला तो पांढऱ्या लाकडांचा पूल (साकव) लक्ष वेधून घेत होता. इथेही फोटो काढून आम्ही किल्ल्याच्या उत्तर भागात निघालो. मात्र आता सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. त्यामुळे खाली जाऊन जेवेपर्यंत कोणालाही धीर नव्हता. म्हणून आम्ही सर्वांनी तिथेच रेडीमेड ‘लॉन’वर बसून थोडी पोटपूजा करून घेतली.

पोटोबा शांत झाल्यावर उत्तर टोकावरील काही अवशेष पाहण्यासाठी सज्ज झालो. येथे मेढा गाव आणि आजूबाजूला असणाऱ्या परिसराचे उत्तम दर्शन घडते. टोकाचा बुरुज आणि दुर्गवीरांनी दरीतून शोधून वर आणलेली तोफ पाहून आम्ही गड उतरून गावात आलो. गावात पोहोचताच कळले की सरपंचांच्या सांगण्यावरून एका गावकऱ्याने त्याच्या घरामध्ये जेवण तयार ठेवले होते. गाडीत बॅगा ठेवून आम्ही घराजवळ गेलो आणि हातपाय धुण्यासाठी पाणी मागितलं. त्यांनी ‘मागे विहिरीवर जा’ असं सांगितलं. त्यांची स्वतःची विहीर होती, ती सुद्धा तुडुंब भरलेली. मग आम्ही सगळ्यांनीच थेट अंघोळीच आटपल्या तिथे. मस्त ‘फ्रेश’ होऊन गरमागरम जेवण जेऊन घेतलं. फ्लावर-बटाटा भाजी, चपाती, कोशिंबीर, लोणचं, गावात पिकवलेला भात आणि आमटी.. वाह! थोड्या झणझणीतच असलेल्या त्या जेवणाने आमची थंडीच पळवली. सरपंच आणि काकांचे आभार मानून आमची गाडी मुंबईकडे रवाना झाली. इतिहास, मनोरंजक प्रसंग, करंट अफेअर्स इत्यादी अनेक विषयांवर चर्चा, वादावादी करत आम्ही मुंबईला केव्हा पोहोचलो ते कळलंच नाही.

थोडक्यात:
किल्ले अवचितगड (मेढा / रोहा , अलिबाग - रायगड)
उंची: ९५० फुट । श्रेणी: सोपी - २ । भ्रमंती: उत्तम । ऋतू: सर्व
मेढा किंवा रोह्या पर्यंत प्रवास
मेढा ते अवचितगड - ट्रेक - दीड तास 
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ जास्त लागू शकतो.)

माझ्या 'अवचितगड किल्ले भ्रमंती'ची क्षणचित्रे पाहण्यासाठी पुढील लिंकवर टिचकी (क्लिक) मारा.

No comments:

Post a Comment