चक्रावून टाकणारा घनचक्कर (१५ सप्टेंबर २०१२) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, September 15, 2012

चक्रावून टाकणारा घनचक्कर (१५ सप्टेंबर २०१२)



‘घनचक्कर’ नाव ऐकून बऱ्याच जणांना धक्का बसेल की हे असे काय नाव आहे या शिखराचे? पण जगात अनेक ठिकाणांना अशी ‘ऑड’ नावं ठेवलेली आढळतात. घनचक्कर ह्या शिखराचे नाव ‘घनचक्कर’ असे का ठेवले आहे हे तिथे गेल्याशिवाय कळून येत नाही.

विक्रम सिंग आणि प्रथमेश देशपांडे ह्यांच्यासोबत, १४ तो १६ सप्टेंबर २०१२ रोजी सुरु असलेल्या भैरवगड - घनचक्कर - पाबरगड ह्या ‘कॅम्पिंग’वर मी होतो. ‘प्लान’प्रमाणे ‘भैरवगड’ सर झाला होता. रात्री मस्त कोंबडी भाकरी चेपून आम्ही आमच्या उबदार स्लीपिंग बॅगांमधून झोपून सकाळी ठरल्यावेळेत सहा वाजता उठलो होतो. पण रात्रीपासून सुरु असलेला पाऊस अजूनही रिपरिपत होता. कालचा दिवस ओलेत्यानेच गेला होता, त्यामुळे सकाळी सकाळी पावसात ट्रेक सुरु करणं जरा जीवावर आलं होतं. अर्धा तास पाऊस थांबण्याची वाट पाहूनही पाऊस न थांबल्यामुळे आम्ही ट्रेकला सुरुवात करायचं ठरवलं. आदल्या दिवशी सुकत घातलेले कपडे अजूनही किंचित ओले होते. सुके कपडे पुन्हा बॅगांमध्ये घालून ओले कपडे चढवले. सकाळचे इतर ‘कार्यक्रम’ आटपून घेतले आणि माझ्या बॅगेत महत्वाच्या काही वस्तू घेवून आम्ही त्या पावसातच शिरपुंजेवाडीच्या पाटील काकांचं घर गाठलं. फक्त गावाचा प्रमुख हा एवढाच ह्या पाटलाचा दिमाख. एरव्ही माणूस आणि त्याची परिस्थिती दोन्ही गरीबच. फक्त मन मोठ्ठं. घरात शिरल्यावर आमच्यासमोर काळा चहा आला. प्रथमेशला गाईचं ताजं दुध प्यायची हुक्की आली. काकांनी तत्काळ त्यांच्या मुलाला ‘धाडून’ प्रथमेशसाठी चांगलं गडूभर ताजं दुध आणलं. आम्हीही एक एक ‘सिप’ ‘मारला’.

‘घनचक्करसाठी कोणी वाटाड्या मिळेल का?’ ह्या प्रश्नावर मात्र त्यांनी लगेच नकार दर्शविला आणि आम्हालाही जाऊ नका असा ‘सल्ला-कम-दम दिला. अरे पोरांनो, आमी इतकं वरीस हितं रहातो पन आमी पण न्हायी जात तिथं जादा.. नी आता पाऊस पन है त वर ढग पण असतील.. वाट न्हायी सापडायची मंग शाना मानुस पन घनचक्कर होतोय वर.. त्यांचं बोलणं खरं होतं. भैरवगडापेक्षा घनचक्कर शिखर कित्येक पट मोठ्ठं होतं. धुकं असणार ह्यात शंकाच नव्हती. पण महाराष्ट्राचं तिसरं शिखर सर करायचं तर हे धाडस आवश्यक होतं. काही वेळ ‘नाही-होय’ केल्यानंतर काका स्वतः आमच्यासोबत यायला तयार झाले. त्यांनी चुल्ह्यावर सुख्ण्यासाठी टांगून ठेवलेली घोंगडी घेतली. आणि आमचे ‘रेनकोट’ कुठेयत असं विचारलं. आम्ही रेनकोट आणलेच नाहीयत हे ऐकल्यावर त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. आम्ही गावकरी बी ह्या पावसात आजारी पडतो..असं सांगत ते आमच्याबरोबर बाहेर आले आणि रिमझिम पावसात आम्ही ‘घनचक्कर’ कडे कूच केलं.

भैरवगडाच्या ट्रेकमुळे आणि माझ्या वजनामुळे माझे पाय दुखत होते. विक्रम आणि प्रथमेश झपाझप पावलं टाकत होते. त्यामुळे विक्रम, काका, प्रथमेश, मोठ्ठा गॅप आणि त्यानंतर मी असे आम्ही चाललो होतो. गावातून समोर दिसणाऱ्या डोंगराची कातळकड्याच्या पोटातून आडवी जाणारी वाट खालची खोल दरी दाखवून आम्हाला केल्या साहसाची आठवण करून देत होती. कडा वरून आतल्या बाजूस तिरपा असल्याने आम्हाला पाऊस लागत नव्हता पण कड्यावरून खाली पडणारं पावसाचं खोल दरीत फेकलं जाणारं पाणी रौद्र रूप दाखवत होतं. कडा संपून आम्ही एक निसरडा कातळटप्पा पार केला आणि डोंगरावर धुक्यात शिरलो. इथे काकांचे काही गावकरी मित्र भेटले जे त्यांच्या वर आलेल्या गाई शोधण्यासाठी आले होते. त्यांच्याशी औपचारिक ओळख झाली. गाई शोधण्यासाठी शिखरा पर्यंत त्यांनाही सोबत हवी होती म्हणून ते आमच्यासोबत यायला तयार झाले.
इथे एका छोट्या पठारावर स्फटिकांचा ढीग दिसला. त्यात एक मूर्तीसारखा दिसणारा स्फटिकाचा दगड मध्ये उभा केला होता. काकांनी जवळच पडलेला एक छोटा स्फटिकाचा दगड जवळच्या ओढ्यावर धुऊन त्या ढिगामध्ये अर्पण केला. आम्हीही तसंच केलं. या जागेला ते गारजाई म्हणतात. गारजाईला पाया पडून आम्ही पुढे एका पठारावर आलो. ‘अबब!’ हा केवळ अभ्यासाच्या किंवा गोष्टींच्या पुस्तकात वाचलेला शब्द आमच्या तोंडून निघाला. एवढं मोठ्ठं पठार मी तरी पहिल्यांदा पाहत होतो. वारा सुस्साट सुटला होता. इथे मात्र आम्ही कुडकुडू लागलो. पठाराच्या मध्यभागी अंधुकसं शिखर दिसत होतं. काकांनी बोट दाखवून ‘ते शिखर म्हणजे घनचक्कर’ असा इशारा केला. आम्ही एकमेकांपासून जास्त लांब राहत नव्हतो कारण धुकं पुष्कळ होतं. त्यात एवढ्या प्रचंड पठारावर आत पोहोचून हरवल्यास, माणूस खाली येण्याचा मार्ग शोधत फक्त चक्कर मारत राहील पण मार्ग सापडणार नाही. ह्या पठाराला ‘घनचक्कर’ हे सार्थ नाव का पडलं ह्याचं कोडं मला उलगडलं. गुडघाभर झुडूपांतून मार्ग काढत मित्र गावकरी गाई शोधायला समोर तर आम्ही कसेबसे शिखरावर पोहोचलो. एका बाजूला तुटलेल्या कड्याची खोली त्या धुक्यातही ‘जाणवत’ होती. एखादा अथांग समुद्र दिसावा असा त्या दरीत पसरलेल्या धुक्याचा नजारा आमच्यासमोर होता. आम्ही काही त्या दृश्यात हरवून गेलो. पण शिखरावरील चाबकासारख्या पावसाने आमची समाधी भंग केली. काकांची घोंगडी पार भिजून गेली होती. तापाची भीती वाढू नये म्हणू त्यांनी घोंगडीच्या आडोश्यात एक विडी शिलगावून तिचा ‘डोस’ घेतला. प्रथमेश आणि विक्रम थरथरत होते. मात्र इथे मी मजेत होत्तो. ‘कमावलेले फॅट्स’ आज कामास येत होते.

१०-१२ मिनिटं तिथे काढून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. झपाझप पावलं टाकीत आम्ही पुढे निघालो. धुकं दाट जमलं होतं. त्यामुळे रस्ता शोधावा लागत होता. पण सोबत काका असल्यामुळे ‘वाट चुकण्याची भीती नाही’ असं मनात येतं न येतं तोच काका थबकले. इथे तिथे पाहू लागले. वाट बरोबर आहे का ते पाहू लागले. त्यांनी रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला. पण वाट काही मिळेना. दोनदा वाट चुकलो. आता थोडं टेन्शन आलं; कारण गावातला माणूस जर वाट चुकत असेल तर तिथे आपली काय कथा.. आमच्या ‘प्लान’ मध्ये हा वाट चुकण्याचा कार्यक्रम नव्हता. काही क्षण तिथे थांबून विक्रमने एक वाट पकडली आणि काही मिनिटात आम्ही पुन्हा ‘मार्गाला’ लागलो. त्याने एका मोठ्या झाडाच्या खुणेवरून वाट ओळखली होती. इतके वर्षं अनेक डोंगर पालथे घातल्याने विक्रमची नजर अश्या वाटांवर ‘बसली’ होती. त्यामुळे अश्या मात्तबर व्यक्तींसोबत ट्रेक करण्यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात याचा अनुभव आला. शिखरावर जाऊन माणूस वाट चुकतो आणि शोधाशोध करत बसतो म्हणून बहुदा या शिखराचे नाव ‘घनचक्कर’ पडले असावे असा ‘जावईशोध’ मनाला ‘चाटून’ गेला. पुन्हा गारजाईजवळ आल्यावर चुकलेल्या गाई सुखरूप ठिकाणी आणून मित्र गावकरी आम्हाला ‘जॉईन’ झाले. जवळच्या ओढ्याजवळ बॅगेतून आणलेला फराळ खाऊन घेतला. ब्राऊन ब्रेड, चीज स्लाईस, खारे शेंगदाणे, चिवडा, इंस्टंट भेळ असा काही ताळमेळ नसलेला तो फराळ खाताना खूप हसू येत होतं. पण हा आनंद खरा होता तो ‘घनचक्कर’ शिखर सर केल्याचा.. तो तसाच मनात साठवून आम्ही शिरपुंजेवाडी गाठली आणि अंघोळीसाठी गावातल्या ओढ्यावर गेलो.


थोडक्यात:
घनचक्कर शिखर (शिरपुंजे, अहमदनगर)
उंची: ५०२६ फुट । श्रेणी: मध्यम - १ । भ्रमंती: उत्तम । ऋतू: सर्व
राजूर ते शिरपुंजे - प्रवास - एक तास
शिरपुंजे ते घनचक्कर शिखर - ट्रेक - अडीच तास 
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला वेळ जास्त लागू शकतो.)

माझ्या 'घनचक्कर शिखर भ्रमंती'ची क्षणचित्रे पाहण्यासाठी पुढील लिंकवर टिचकी (क्लिक) मारा.

नोंद: वरील लेख, 'सामना' वृत्तपत्राच्या 'फुलोरा' या करमणूक विशेष पुरवणीमध्ये २७ एप्रिल २०१३ रोजी प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचनासाठी पुढील 'थम्बनेल' वर क्लिक करा.





No comments:

Post a Comment