गिर्यारोहणातील पाण्याचे नियोजन - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 7, 2014

गिर्यारोहणातील पाण्याचे नियोजन

मानवाच्या शरीरात ७०% भाग पाणी आहे. माणूस एकवेळ अन्नाशिवाय काही दिवस राहू शकेल पण पाण्याशिवाय एक दिवसही राहू शकणार नाही; यावरून पाण्याचे महत्व आपल्याला लक्षात येते. आपली हालचाल, क्रियाशीलता जेवढी जास्त, तेवढी पाण्याची आवश्यकता जास्त. आणि त्यामुळेच ट्रेकिंग दरम्यान आपल्याला पाण्याची आवश्यकता जास्त असते. ट्रेकिंग ही एक साहसी क्रिया असल्याने आपले संपूर्ण शरीर यात क्रियाशील असते. आपल्याला कळून येत नसलं तरी आपला मेंदूसुद्धा खूप कार्यरत असतो. म्हणून पाण्याची आवश्यकता खूप भासते. आणि ती वेळोवेळी पूर्ण करणे महत्वाचे आहे, नाहीतर शरीराचे निर्जलीकरण होऊन त्रास होण्याचा संभव असतो. तसेच खूप पाणी वापरणेही टाळावे कारण त्यामुळे जवळ असणारा पाण्याचा साठा लवकर संपण्याची शक्यता आहे. ट्रेकिंगदरम्यान पाणी जवळ बाळगण्याची आणि ते पिण्याची एक विशिष्ठ पद्धत आहे आणि ती प्रत्येक ट्रेकरने आत्मसात केली पाहिजे. त्याबद्दल माहिती इथे घेऊया.

निरनिराळ्या मोसमांत पाण्याची गरज वेग-वेगळी असते. जसे उन्हाळ्यात पाणी जास्त लागते तर हिवाळ्यात कमी. परंतु कित्येक वरिष्ठ ट्रेकर्सच्या अनुभवातून काढलेल्या नोंदींमध्ये अंदाजे २ ते ३ लिटर पाणी प्रत्येक ट्रेकला सोबत ठेवले पाहिजे. इथे एका ट्रेकचा कालावधी साधारण ८-१२ तासांचा धरला आहे. यामध्ये त्या ट्रेकदरम्यान उपलब्ध होणारे पाण्याचे स्त्रोत लक्षांत घेतले पाहिजेत. कार, ८-१२ तासांमध्ये ट्रेकर्सची तुकडी नियोजित मुक्कामी पोहोचणार आहे, असे गृहीत धरून हा अंदाज घेतला जातो. मुक्काम हा शक्यतो पाणी उपलब्ध होईल अश्याच ठिकाणी (जसे गाव, गुंफा, तलाव, टाके) केला जातो ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे ८-१२ तासांमध्ये जर पाणी उपलब्ध होणार असेल तर तेवढ्या कालावधीसाठी सोबत ठेवला जाणारा पाणीसाठा २-३ लिटर हा अंदाज बरोबर आहे. उगीच ५-६ लिटर पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवून अंगावर वजन घेण्यात काहीच अर्थ नाही. उलट एवढ्या वजनाने पाण्याची आवश्यकता जास्त भासण्याची शक्यता वाढते. म्हणजे हा प्रकार ‘संकट ओढवून घेणे’ असा होईल. मुक्कामाच्या ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेबाबत ट्रेकर्स साशंक असतील तर मात्र ४-६ लिटर पाणी सोबत ठेवणे अपरिहार्य आहे. यात आणीबाणी (इमर्जंसी) सुद्धा गणली गेली पाहिजे. म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी पाणी मिळालेच नाही तर परतीच्या प्रवासात आवश्यक असणाऱ्या पाण्याचा साठा सोबत ठेवला गेला पाहिजे, म्हणून पाण्याचे प्रमाण दुप्पट होईल.

सोबत ठेवलेल्या पाण्याची बचत करणे, हाही एका ट्रेकरला लागू असणारा एक सर्वमान्य नियम आहे. पाणी कमीत कमी वापरणे हा तोडगा नाही. त्यामुळे निर्जलीकरणाचा त्रास होऊ शकतो आणि मग उरलेले पाणी काही कामाचे ठरणार नाही. माझे एक मित्र श्री. कैवल्य वर्मा हे कसलेले ट्रेकर आणि उत्तम प्रस्तरारोही (क्लायंबर) आहेत. त्यांचं मत आहे की, ’शरीराला पाण्याची आवश्यकता असते तेव्हाच ते पुरविले पाहिजे. निर्जलीकरण झाल्यावर पाणी पीत बसण्यात काही अर्थ नाही’. एका दिवसाचा ट्रेक असेल तर ह्या बाबतीत थोडाफार आळशीपणा खपून जाऊ शकतो; पण त्यापेक्षा जास्त दिवसांच्या ट्रेकमध्ये हा आळशीपणा जीवघेणा ठरू शकतो.

पिण्याचे पाणी वाचवण्याची एक सर्वात सोपी पद्धत म्हणजे तास-दोन तासांत ३-४ घोट (अर्धा लिटर) पाणी पिणे. पाणी पितानाही घोट घेतल्यावर, ते लगेच न गिळता थोडावेळ (५-१० सेकंद) तोंडांत घोळवावे आणि मग हळू हळू घसा भिजवत प्यावे. अशा रीतीने पाणी प्यायल्यास, अगदी ३-४ घोटातही तहान भागते आणि पाणीही कमी लागते. हा झाला प्रत्यक्ष पर्याय. याऐवजी अप्रत्यक्ष पर्याय वापरूनही पाण्याची बचत करता येते. ट्रेकदरम्यान शरीरातील पाण्याचा खूप ऱ्हास होतो. त्याचप्रमाणे शरीराला आवश्यक खनिजे आणि क्षार देखील घामावाटे वाहून जातात आणि थकवा येतो. यावर उपाय म्हणून आणि पाण्याला पर्याय म्हणून संत्रे, कलिंगड, खरबूज, खजूर, काजू-बदाम, मनुका इत्यादी फळे आणि सुका मेवा वापरता येईल.दोन तासांमध्ये आलटून पालटून पाणी आणि फळे व सुका मेवा सेवन केल्यास शरीरातील पाणी आणि आवश्यक घटकांचा ऱ्हास भरून काढता येईल. परंतु फळ-फळावळे ही ग्रुपमध्ये ठेवावीत. म्हणजे एक कलिंगड ४-५ जणांना पुरेसा होतो.एका व्यक्तीला एक संत्रे एका वेळेस पुरते. एक खरबूज तिघां-चौघांमध्ये खाता येते. म्हणून एका तुकडीला आवश्यक फळे तुकडीत वाटून ठेवावीत. म्हणजे तुकडीला आवश्यक सामानाचे एकूण वजन तुकडीत विभागून ठेवता येते. यामुळे प्रत्येकाकडे थोडे थोडे वजन जाऊन सर्वांचा फायदा होतो. अवास्तव वजन घेऊन येणारा थकवा टाळता येतो. पाण्याची आवश्यकता कमी भासते.

बहुतेक ट्रेकदरम्यान अधेमध्ये मोठी झाडे असतात. त्यांच्या सावलीमध्ये अल्प विश्रांती घेत राहावी. या विश्रांतीमध्ये शरीराला थंडावा मिळतो आणि घामावाटे वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होते. यावर जलसंजीवनी (इलेक्ट्रोल) चा उपयोग होऊ शकतो. इलेक्ट्रोल पावडरमध्ये आवश्यक ती खनिजे, अर्क, क्षार आणि साखर यांचे प्रमाणित मिश्रण असते. इलेक्ट्रोल पाण्यात त्वरित मिसळले जाते आणि ते प्याल्याने शरीराला आवश्यक ते घटक त्वरित प्राप्त होतात आणि तरतरी आणण्यास मदत होते. परंतु इलेक्ट्रोल हे जीवनरक्षक वस्तूंमध्ये मोडते. त्यामुळे ते सोबत बाळगावे पण शक्यतो त्याची सवय लावून घेऊ नये.

अशा रीतीने पाण्याचे प्रमाण निश्चित झाल्यावर त्यापेक्षा थोडे जास्त पाणी सोबत ठेवता येईल अशी बाटली सोबत ठेवावी. उदाहरणार्थ आपल्याला आवश्यक पाण्याचे प्रमाण २ लिटर ठरल्यास अडीच ते तीन लिटर पाणी सोबत बाळगावे. बॅकपॅकमध्ये पाण्याच्या बाटल्यांमुळे वजन विभागण्यास त्रास होतो. म्हणून एकूण पाणी दोन समान भागांत ठेवावे. म्हणजे तीन लिटर पाणी सोबत ठेवण्यासाठी दीड लिटरच्या दोन बाटल्या बॅकपॅकमध्ये दोन्ही बाजूला ठेवाव्यात. यामुळे डाव्या उजव्या बाजूला समान वजन ठेवून बॅकपॅकचा आणि आपला तोल व्यवस्थित ठेवता येतो. शरीरावर येणारा अनावश्यक ताण कमी करून पाण्याची बचत करता येते.

ट्रेकसाठी पाण्याच्या बाटल्याही विशिष्ठ प्रकारच्या वापरल्या जातात. काचेच्या बाटल्या वापरणारे महाभागही आपल्याला दिसतात, पण हे प्रमाण आता कमी झाले आहे. काचेच्या बाटल्या ट्रेकला वापरणे सर्वथा त्याज्य आहे. एकतर त्यांचे वजन खूप असते. त्यात त्या फुटल्यास पाणी वाया जाण्याचे नुकसान होतेच पण शरीरला लागल्यास ईजा होण्याचा संभव आहे. बाजारात ट्रेकला उपयुक्त अशा प्लास्टिकच्या बाटल्या उपलब्ध आहेत. त्या थोड्या महाग असल्या तरीही त्या उपयोगी ठरतात. त्या उत्तम प्रतीच्या प्लास्टिकपासून तयार केलेल्या असतात. त्यांचे वजनही कमी असते. त्याचे झाकण मोठे असते, ज्यामुळे त्यात पाणी भरणे-पिणे सोपे होते. उत्तम प्लास्टिकमुळे बाटली पडल्यास, आपटल्यास फुटतही नाही. ब्रँडेड बाटल्यांचे प्लास्टिक बी.पी.ए. मुक्त असते. बी.पी.ए. हे एक घातक द्रव्य आहे. ज्यामुळे असाध्य आजार जडण्याची शक्यता असते. हे प्लास्टिक बी.पी.ए. मुक्त असल्याने पाण्याला वासही येत नाही. म्हणून नियमित ट्रेक करणाऱ्या व्यक्तींनी अशी बाटली विकत घेणे केव्हाही उत्तम.

पाण्याचा साठा सोबत ठेवण्यासाठी, दर्दी ट्रेकर्ससाठी बाजारात आणखी एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. त्याला ‘वॉटर ब्लॅडर’ म्हणतात. वॉटर ब्लॅडर ही टिकाऊ लवचिक प्लास्टिकची पिशवी असते. तिला वरील बाजूस मोठे झाकण असते आणि खालील बाजूस एक लांब पाईप असतो आणि त्याला लहान छिद्र असलेली तोटी असते. ह्या वॉटर ब्लॅडर एक, दोन आणि तीन लिटरमध्ये उपलब्ध आहेत. तिचे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती गुंडाळून ठेवता येते. पाणी भरून बॅकपॅकमध्ये ठेवली असता तिचा पाईप बॅकपॅकमधून बाहेर अगदी तोंडापर्यंत आणता येतो. त्यामुळे हवं तेव्हा घोट घोट पाणी पिता येते. त्यामुळे पाणी पिण्यासाठी ती आत-बाहेर काढण्याचे कष्ट वाचतात. पाईपाच्या तोटीचे छिद्र लहान असल्याने पाणी ओढल्यावर पाण्याचा फवारा तोंडांत येतो, ज्यामुळे तोंड आणि घशाला थंडावा मिळतो. तोटी तोंडाजवळ असल्याने १५ - १५ मिनिटांनी पाण्याचा एक एक घोट पिता येतो. शरीराची पाण्याची गरज भागते आणि पाण्याची बचतही होते. मात्र त्या खर्चिक असल्याने नियमित ट्रेकर्ससाठीच उपयोगाच्या आहेत. त्यांची नियमित आणि आवश्यक निगादेखील राखावी लागते.

एवढे सगळे नियम पाळूनही मुक्कामाच्या ठिकाणी आपल्याला पुरेसे पाणी आवश्यक असते. किंबहुना पाणी असलेल्या ठिकाणच मुक्काम करावा. सच्चे ट्रेकर्स केव्हाही स्वार्थी नसतात. त्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी असलेले पाण्याचे साठेदेखील ते खूप कसोशीने वापरले गेले पाहिजेत. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करणारे पदार्थ, वस्तू अशा ठिकाणी आणू नयेत. आणणे अत्यावश्यक असल्यास, वापर झाल्यावर ते परत घरी नेऊन त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे. तेथील पाण्यात माती-दगड टाकणे, कचरा करणे, प्लास्टिक टाकणे, अंघोळ करणे, इत्यादी, प्रदूषण करणाऱ्या गोष्टी करू नये. अगदी अत्यावश्यक असल्याशिवाय गावकऱ्यांकडे पाणी मागू नये. अनेकदा गावात पाण्याचे स्त्रोत खूप लांब असतात व कित्येक मैल चालून पिण्याचे पाणी आणले जाते. म्हणून आणीबाणीशिवाय त्यांना त्रास देऊ नये. गावात किंवा मुक्कामी, पिण्याचे पाणी आणि इतर गोष्टींसाठी लागणारे पाणी वेगवेगळ्या स्त्रोतातून आणले जाते. त्यामुळे त्यांची नीट ओळख करून घ्यावी आणि पिण्याचे पाणी योग्य रीतीने वापरावे. इतर पाणीही काटकसरीने वापरावे. कोणत्याही ठिकाणी जाताना पाणी शुद्ध करणाऱ्या गोळ्या किंवा द्रव्य सोबत ठेवावे. पाणी गढूळ असल्यास किवा आणीबाणीच्या प्रसंगी त्यांचा उपयोग होतो. एक-दोन दिवसांच्या ट्रेकमध्ये, उन्हाळ्याच्या मोसमांत अंघोळ केली नाही तरी काही फरक पडत नाही. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता असते. अशा वेळेला तेथील पाण्यावर भार टाकणे चांगले नाही. ओल्या कपड्याने अंग पुसून घेणे, डोळ्यांवर पाणी मारणे किंवा घाम जास्त येणारी ठिकाणी धुवून घेणे यांमुळेही तरतरी येते. पाणी मुबलक असले तरीही साबण लावून तलावांत, नद्यांमध्ये, विहिरींत अंघोळ करणे एका ट्रेकरला शोभा देत नाही. जास्तीत जास्त नैसर्गिक राहण्याचा प्रयत्न जो करतो तो खरा ट्रेकर, हा नियम कायम लक्षांत ठेवला पाहिजे.

चला तर मग.. साधे सोपे नियम पाळूया.. ट्रेकिंगचा खरा आनंद लुटुया

2 comments:

  1. Apratim aani kharach upyukt mahiti ... Dhanyawad Utkarsh for these efforts

    ReplyDelete
  2. वाह … छान उपयुक्त माहिती… अगदी गरजेची आहे सध्याच्या काळात… मस्त…

    ReplyDelete