खबरदारी गाडीने प्रवास करतानाची... - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, January 1, 2016

खबरदारी गाडीने प्रवास करतानाची...

आपण खबरदारी या विषयावर अनेक पैलू पाहत आहोत. पण त्यामध्ये गिर्यारोहणातील खबरदारीवर विशेष लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मात्र या लेखात आपण स्वतःच्या गाडीने प्रवास करताना घ्यावयाच्या खबरदारीविषयी माहिती घेऊया.


हल्ली आपल्यातील अनेक जणांची परिस्थिती चांगली असते. त्यामुळे पर्यटन करण्यासाठी आपण वेळ काढतो. कुटुंबाने प्रवास करण्यात जास्त मजा असते त्यामुळे एखादी गाडी भाड्याने घेऊन परिवारासोबत पर्यटनाचे प्लान्स आखले जातात. उत्तम कर्जवाटप उपलब्ध असल्याने स्वतःची गाडी देखील असते. गाडी घेऊन जाणे खूप सुखदायक असल्याने हा पर्याय अधिक निवडला जातो. मात्र यात खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

गाडी सोबत नेताना अनेक गोष्टी तपासून घ्याव्या लागतात. जसे प्रवासाच्या कालावधीनुसार कोणती गाडी न्यावी हे ठरवावे. कमी अंतराच्या प्रवासासाठी जरी एखादी गाडी चांगली वाटली तरी अधिक काळाच्या प्रवासासाठी टी कदाचित त्रासदायक ठरू शकते. गाड्यांच्या आसनांची पाठ टेकवण्याची सोय पुढे मागे करण्याजोगी (पुशबॅक) असल्यास उत्तम. अधिक काळाच्या प्रवासासाठी त्याचा फायदा होतो. गाडीमध्ये पाय पसरण्यासाठी असलेली जागा जेवढी जास्त असेल तेवढी चांगली. त्याने एकाच जागी बराच वेळ बसून राहिल्यामुळे पाठीवर आणि पायावर येणारा ताण कमी होतो. गाडीच्या टपाची उंची देखील अधिक असणे आवश्यक आहे. गाडी गतिरोधकावर आदळून उडाल्यावर टपावर डोके आपटण्याची शक्यता कमी असते. 

गाडीतून येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त जागा गाडीत असणे आवश्यक आहे. तशी होत नसल्यास एखादी गाडी जादा करणे हितावह आहे. कारण प्रवासादरम्यान प्रवाशांचे सामान गृहीत धरण्यास अनेकदा चुकी केली जाते आणि आयत्यावेळी सामानच जास्त जागा घेत आहे अशी परिस्थिती उद्भवते त्यामुळे दोन-तीन आसनांची जागा अधिक असणे केव्हाही उत्तम. त्यासोबत गाडीची डिक्की मोठी असल्यास जास्त चांगले. कारण प्रवासादरम्यान शॉपिंग इ. मुळे सामानात भर पडत जाते आणि शेवटी जागा कमी पडू लागते.

अधिक काळाच्या प्रवासासाठी एक दोन दिवस आधी गाडीची सर्व्हिसिंग करून घ्यावी. जेणेकरून आयत्यावेळी गाडी बंद पडणे इत्यादी आपत्ती ओढवणार नाही. मार्गावरील पेट्रोल पंपाच्या स्थानांची माहिती जमवून ठेवावी, किंवा मार्गात तशी विचारपूस करून ठेवावी. पुरेसे इंधन गाडीत ठेवावे. ते कमी वाटल्यास पुढील पेट्रोल पंपावर ते भरून घ्यावे, मात्र त्यात टाळाटाळ करू नये.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गाडीचा ड्रायव्हर उत्तम असावा. तो निर्व्यसनी असावा. किंवा शक्यतो प्रवासादरम्यान व्यसन करणारा नसावा. त्याला प्रवासाच्या मार्गाची पूर्ण कल्पना असावी. भाड्याने गाडी घेताना त्याबद्दल अगोदर बोलणी करून घ्यावी. तसेच मालकाला संपूर्ण प्रवास मार्ग सांगून ठेवावा, जेणेकरून त्यारीतीने ड्रायव्हर तयारीत राहू शकेल. पूर्ण प्लान नीट आखून बराच काळ आधी गाडीची बुकिंग केल्यास उत्तम ड्रायव्हर मिळण्याची शक्यता वाढते. पर्यटनाच्या मोसमात शेवटच्या क्षणी शिकाऊ किंवा बिना अनुभवाचे ड्रायव्हरच मिळतात. आणि त्यांना रस्ता शोधण्यात किंवा दाखवण्यात खूप वेळ वाया जातो आणि मनस्ताप होतो तो वेगळा.

प्रवासादरम्यान पुरेसा फराळ (स्नॅक्स) आणि पाणी सोबत ठेवावे. काही मार्गांवर चांगल्या पदार्थांची आणि पाण्याची कमतरता भासते, त्यावेळी त्यांचं उपयोग होतो. आपण पदार्थ खाताना, पेय पिताना, ड्रायव्हरला ते देण्यास विसरू नये. तो गाडी चालवत आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये.

मागून आणि समोरून येणाऱ्या गाड्यांचा योग्य अंदाज घ्यावा. कारण कोणत्याही अपघातास केवळ तुम्हीच जबाबदार असण्याची गरज नाही. दुसऱ्या चालकाची चुकी तुम्हालादेखील महाग पडू शकते. घाटांमधून गाडी चालवताना विषेश लक्ष राखावे. भूस्खलन होऊन कडा तुटण्याने अपघात होण्याची शक्यता असते.

पर्यटन करताना अनेकदा रात्रीचा प्रवास करावा लागतो. तेव्हा ड्रायव्हरने पुरेशी झोप घेतलेली असणे आवश्यक आहे. त्याला गाडी चालवताना लागलेली एखादी डुलकीसुद्धा जीवघेणी ठरू शकते. प्रवासादरम्यान ड्रायव्हरच्या बाजूच्या आसनावर आळीपाळीने बसून त्याच्याशी बोलत राहावे म्हणजे त्यास झोप लागणे आपोआप टाळता येईल. त्यावेळी इतरांनी झोपून घ्यावे. अधूनमधून गाडी एखाद्या उपहारगृहाजवळ थांबवून त्याच्यासोबत चहा घ्यावा.

रात्रीच्या प्रवासादरम्यान अनोळखी आडमार्गावर गाडी नेण्यापूर्वी आजूबाजूला रात्रीच्या वेळी सुरु असणाऱ्या दुकानात त्या मार्गावर काही धोके आहेत का? याची चौकशी करावी. सतर्क राहावे. अशा मार्गांवर रात्रीच्या वेळी लुटण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. शक्यतो प्रवासात किमती वस्तू कमीत कमी बाळगाव्यात. इंधन भरताना, हॉटेल मध्ये जेवताना, दुकानांवर पाकिटातील पैसे चटकन दिसून येतील असे वावरू नये. बडेजावपणा टाळावा. कारण लुटारूंचे खबरी आजूबाजूला असू शकतात. राहणी साधी राखावी.

हल्ली अनेक योजनाबद्ध पद्धतीने लुट होताना दिसतात. त्यातील काही ज्ञात योजनांची माहिती खालीलप्रमाणे:

१) गाडीच्या काचेवर अंडे फेकून मारली जातात. नकळत काच साफ करण्यासाठी ड्रायव्हर पाणी मारून वायपर सुरु करतो, तेव्हा त्यामुळे सगळा बलक काचेवर पसरून काच धूसर होते. मनात नसताना गाडी थांबवावी लागते आणि त्यावेळेस लुटारूंचे टोळके येऊन काचा फोडून हल्ला करू शकतात.

२) अरुंद रस्त्याच्या मध्यभागी झाडाचा ओंडका, मोठे दगड इत्यादी अडसर ठेऊन रस्ता अडवला जातो. तिथे गाडी थांबवल्यास, रिव्हर्स मारता न आल्याने लुट हमखास होण्याची शक्यता असते.

३) अशा अनोळखी मार्गांवर एखादे मुल, म्हातारी व्यक्ती, जखमी व्यक्ती दिसून आल्यास शक्यतो गाडी थांबवू नये. ‘मदत करण्यास नेहमी सज्ज असावे’ हे जरी आपल्याला शिकवले असले तरीही ‘सिर सलामत तो पगडी पचास’ हेसुद्धा आपल्याला शिकवलेले असते. अगदीच वाटल्यास गाडीचा वेग थोडा हळू करून परिस्थितीचा अंदाज घ्यावा आणि मगच निर्णय घ्यावा. कारण तो एक सापळा असू शकतो. चौकशीसाठी गाडी थांबवल्यास लुटारूंचे टोळके येऊन काचा फोडून हल्ला करू शकतात.

४) काही ठिकाणी कहर म्हणजे पोलिसांच्या वेशात हे लुटारू गाडी थांबवतात. आणि चौकशीसाठी गाडी थांबवल्यास लुटारूंचे टोळके येऊन काचा फोडून हल्ला करू शकतात. मात्र क्वचित ते खरे पोलीसदेखील असू शकतात. त्यामुळे शक्यतो गाडी न थांबवता पुढे नेल्यास लुट असल्यास वाचू शकतो. मात्र पोलीस खरे असल्यास त्यांनी पाठलाग करून पकडल्यास त्यांना सत्य परीस्थिती सांगून त्यांचे मन वळवता येऊ शकते. (बाकी ते खरे असो वा खोटे, इथे देवच वाचवू शकतो.)

सध्यातरी एवढंच.. सतर्क राहा.. सावध राहा.. नियम पाळा.. अपघात टाळा..

No comments:

Post a Comment