दर्जेदार ‘ब्रँडेड' - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 18, 2016

दर्जेदार ‘ब्रँडेड'


आपण अनेकदा ‘ब्रँडेड’ हा शब्द सर्रास ऐकतो. वरकरणी हा शब्द खूप साधा वाटत असला तरी तो तेवढा साधा नाहीय. कारण ‘ब्रँड’ ही संकल्पना खुप मोठी आहे.  ब्रँड म्हणजे एखादी वस्तू एका ठराविक नावाने प्रसिद्ध होणे. असे ब्रँड खूप पाहायला मिळतात. उदा. ग्लुकोज बिस्कीट म्हणजे पार्ले जी, टूथपेस्ट म्हणजे कोलगेट, चूर्ण म्हणजे कायम चूर्ण इत्यादी. हा विषय आज काढायचे प्रयोजन म्हणजे आपल्या पर्यटन आणि गिर्यारोहण जगतात सुद्धा या ‘ब्रँडेड’ वस्तूंच्या वापराविषयी जागरुकता निर्माण करणे होय.

आज गिर्यारोहण आणि पर्यटन उद्योग जगतात अनेक दुय्यम दर्जाच्या वस्तू सर्रास विकल्या जात आहेत. मी इथे ‘चिनी’ हा शब्द वापरणार नाही कारण प्रत्येक ‘मेड इन चायना’ वस्तू दुय्यम दर्जाची नसते. अनेक कंपन्यांच्या ‘ब्रँडेड’ वस्तू यासुद्धा बऱ्याचदा ‘मेड इन चायना’ असतात. पण त्यांच्या दर्ज्यावर विशेष लक्ष्य दिले जाते. चिनमधील इतर कंपन्या अशा वस्तू ह्या दिसायला ब्रँडेड वस्तुंसारख्या बनवून विकतात मात्र त्यांचा दर्जा दुय्यम राखला जातो. 

ब्रँडेड वस्तूंची किंमत खूप जास्त असते ही सबब पुढे करून आपण दुय्यम दर्ज्याच्या किंवा ‘अनब्रँडेड’ वस्तू खरेदी करतो. अशा दुय्यम दर्ज्याच्या वस्तूच खरंतर नंतर खूप ‘महाग’ पडतात. सांगतो कसे ते.. ब्रँडेड वस्तू बनवणाऱ्या कंपन्या त्या वस्तू बनवताना त्याच्या दर्ज्यावर विशेष लक्ष देतातच पण त्या आणखी दर्जेदार कशा होतील यावर त्यांचे संशोधन होत असते. या संशोधनाचा खर्च मूळ वस्तूवर लादला गेल्याने त्या वस्तूंची किंमत वाढते. पण अशा संशोधनाने त्या वस्तूची उपयोगिता वाढते मात्र त्याचे आयुष्यही वाढते. दुय्यम दर्ज्याच्या किंवा नक्कल केलेल्या वस्तू दिसायला जरी सारख्या असल्या तरी त्या तकलादू असतात. अनेकदा त्यांचे ‘दिसणे’च समान असते पण नकली वस्तूंची उपयोगिता शून्य असते. ब्रँडेड वस्तू काही विशिष्ट आकारात किंवा रचनेत बनवलेल्या असतात. त्या आकाराला किंवा रचनेला अर्थ असतो. पण नकली वस्तू निव्वळ समानता दिसावी म्हणून असे आकार किंवा रचना तयार करतात. अनेकदा त्यांना त्या विशिष्ट आकाराच्या किंवा रचनेच्या अर्थाचे ज्ञानही नसते.

उदा. एखादा ब्रँडेड हेडलँप तीन सेल्सवर किमान ७०-८० तास जळू शकतो. त्याची सुरु-बंद करण्याची बटणे चाचणी केली गेली असल्याने ती आयत्यावेळी दगा देत नाहीत. याउलट त्याची नक्कल कमी पैशात उपलब्ध असली तरीही तो आयत्यावेळी सुरु होईल की नाही याचीही शास्वती नसते. तीच गत एखाद्या जीवनरक्षक (सर्व्हायवल) चाकूच्या बाबतीत आहे. ब्रँडेड चाकू एका विशिष्ट पोलादापासून तयार केलेला असतो. त्याचे मूळ कामच जीवन रक्षण करणे असल्याने तो दर्जेदार असणे अनिवार्य ठरते. मात्र अनेकदा नकली चाकू झाडाचे खोड सोडा पण साधी भाजी चिरायच्या पण लायकीचे नसतात. आणि अशी वस्तू जर प्रसंगी उपयोगी ठरत नसेल तर तिचे मूल्य माझ्या लेखी तरी शून्य आहे. मी स्वतः अशा नकली वस्तू मुद्दाम नेऊन वापरून पाहिलेल्या आहेत आणि त्यांची ‘लायकी’ उघडकीस आली आहे.

पर्यटन, गिर्यारोहण यांसारख्या गोष्टींमध्ये लागणाऱ्या वस्तू ह्या दर्जेदार असणे आवश्यक आहे. कारण ही एक-दोन दिवसांची गोष्ट नसते. अनेकदा आठवड्या आठवड्याचे प्रवास किंवा मोहिमा असतात. अशा वेळेस नकली किंवा दुय्यम दर्ज्याच्या वस्तू खरेदी करणे आणि त्या सोबत बाळगणे म्हणे ‘आ बैल, मुझे मार’ हा प्रकार ठरतो. हे म्हणजे ‘विकतचे दुखणे’ झाले. गिर्यारोहणात तर अशा वस्तूंना थारा नाहीच पण पर्यटन प्रवासातदेखील अशा वस्तू नेणे म्हणजे त्रासदायक ठरते. प्रवासासाठी एखादी दुय्यम दर्जाची किंवा ज्याला आपण ‘कामचलाऊ’ म्हणतो अशी बॅग नेल्याने आणि आयत्यावेळी तिचे बक्कल किंवा पट्टे तुटले तर काय हालत होईल ह्याचा केवळ अंदाज बांधा, मग तुम्हाला दर्जेदार वस्तूंची खरी ‘किंमत’ कळेल. प्रवासादरम्यान आवश्यक असलेली टॉर्च जर एकदम कमी प्रकाश देणारी निघाली तर काय फायदा?

गिर्यारोहणात देखील नवखे तर नवखे पण जुने जाणते ट्रेकर्सदेखील थोड्याफार पैशांच्या बचतीकडे पाहुन दर्जाहीन वस्तू विकत घेत आहेत. ट्रेकिंगमध्ये दुय्यम दर्ज्याच्या सर्रास विकत घेतल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये हेडलँप, टेंट, टोपी, बूट, पाठीच्या बॅगा, स्वीस नाईफ या वस्तूंचा अग्रक्रम आहे.

रॉक क्लायम्बिंगमध्ये तर आणखीनच भयंकर प्रकार घडत आहेत. चढाईसाठी ‘डायनॅमिक दोर’ आणि रॅपेल्लिंगसाठी ‘स्टॅटिक दोर’ वापरायचे असतात. त्याऐवजी दोन्ही गोष्टींसाठी स्टॅटिक दोर वापरले जात आहेत. बांधकाम उद्योगात वापरले जाणारे साधे हेल्मेट्स, सेफ्टी बेल्ट्स वापरले जात आहेत. आणि हे नुसते धर्मादाय संस्थाच नव्हे तर इतर नफेखोर व्यावसायिकांकडूनही होत आहे. यात ते केवळ स्वतःच्याच नाही तर त्यांच्या ग्राहकांच्या जीवाशी खेळ करत आहेत.

‘सर सलामत तो पगडी पचास’ हे घोषवाक्य लक्ष्यात ठेवा. दर्जेदार वस्तू वापरा. सरळ आणि सुरक्षित आयुष्य जगा.

No comments:

Post a Comment