जीवधन नाणेघाटचा अविस्मरणीय ट्रेक (०५ ऑक्टोबर २०१२) - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 5, 2012

जीवधन नाणेघाटचा अविस्मरणीय ट्रेक (०५ ऑक्टोबर २०१२)


महाराष्ट्रामध्ये ट्रेकिंग करणाऱ्या व्यक्तीला ‘जीवधन’ हे नाव माहित नाही असे फार क्वचित आढळते. नाणेघाटाच्या दुर्ग-चौकडी मधला हा किल्ला अनेक ट्रेकर त्यांच्या सुरुवातीच्या काळात ‘करून’ घेतात. पण मला हा ट्रेक करण्याचा मुहूर्त येण्यासाठी १० वर्षे गेली. प्रथमेश आणि काशिनाथच्या संमतीने बरेच दिवस रखडलेला हा ‘जीवधन’ किल्ल्याचा ट्रेक ‘कन्फर्म’ झाला. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी हा किल्ला उभारला गेला असल्याने नाणेघाटाला अगदी चिटकूनच त्यांची बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे घाटघरला एक रात्र काढून दुसऱ्या दिवशी ‘नाणेघाट’ उतरायचा प्लानही पक्का झाला.

०५ ऑक्टोबर २०१२ रोजी रात्री ११ वाजता, जुन्नरसाठी ‘डायरेक्ट’ एस.टी. पकडण्यासाठी आम्ही दादरला पोहोचलो. (नेहमीप्रमाणे) ट्रेकिंगच्या गप्पा सुरु झाल्या आणि आमच्या त्या गप्पागोष्टींमध्ये ती डायरेक्ट बस निघून गेली. त्यामुळे नाईलाजाने पुढची ‘नारायणगाव’ची बस पकडून आम्ही आत शिरलो. शेवटच्या ४-५ जागा सोडून बाकी बस ‘फुल’ होती म्हणून मी पटकन शेवटची ‘विंडो सीट’ पकडली. प्रथमेश आणि काशी पुढल्या सीटवर बसले. बरीच रात्र झाल्याने आम्ही पेंगू लागलो. पण कुर्ल्याजवळ एक दारुडा माणूस बसमध्ये माझ्या बाजूला येऊन बसला. मी झोपेत असूनही तो दारू प्यायला असल्याचे मला जाणवले. त्याच्या अंगा-तोंडाला घाण वास येत होता. पण अजून बराच प्रवास बाकी असल्याने माझ्याजवळ ‘ऑप्शन’ नव्हता. मी नाकावर रुमाल बांधून झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. तो दारुड्या डुलक्या काढताना माझ्या बाजूला वाकू लागला. मी त्याच्या डुलक्या झोपेतल्या झोपेत परतवत होतो. अधून मधून तो जागा होऊन कोणतं बसस्थानक आलं हे विचारत होता. मी झोपेत आहे असं दाखवून उत्तर देण्याचं टाळत होतो. मला मळमळू लागलं होतं. जाम वैताग आला होता पण नाईलाजास्तव सहन करावं लागत होतं. शेवटी मंचर आल्यावर मला आणि इतर प्रवाश्यांना शक्य तेवढा त्रास देऊन तो दारुडा खाली उतरला. आम्ही पुढे नारायणगावला पोहोचलो आणि तिथून जुन्नर गाठलं. खडखडणाऱ्या बसमध्ये झोप पूर्ण न झाल्याने आम्ही बसमधून उतरल्यावर बसस्थानकावरील सिमेंटच्या बाकांवर पथारी पसरली.
जीवधन किल्ल्याच्या पायथ्याचं गाव असणाऱ्या ‘घाटघर’साठी सकाळी ८ वाजताची पहिली बस होती. उजाडलं असल्याने, डोळ्यावर झोप असूनही, आम्ही सकाळचे विधी उरकून नाश्ता करून घेतला. रात्रीच्या प्रकारचा माझ्या तब्येतीवर परिणाम झाल्याचं जाणवत होतं. बसने घाटघर गाठलं तेव्हा नऊ वाजले होते. गावातला एक मुलगा आमच्यासोबत किल्ल्यावर येण्यास तयार झाला. तो मध्ये मध्ये अडकत अडकत बोलत होता, पण त्याच्या ‘भावना’ आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. किल्ला चढायला सुरुवात केल्यावर माझा त्रास दुणावला. मला दुचमळल्यासारखं वाटत होतं. बराच वेळ सहन करूनही शेवटी मला उलटी झालीच. आता जरा बरं वाटू लागलं.


आतापर्यंत आम्ही किल्ल्याच्या दगडी पायऱ्यांपर्यंत पोहोचलो होतो. जीवधन किल्ल्याच्या दोन्ही वाटा ब्रिटिशांनी सुरुंग लावून उडवलेल्या आहेत. त्यात पावसाळा असल्याने आणि नुकताच पाऊस पडून गेल्याने हा पायऱ्यांचा टप्पा कठीण झाला होता. प्रत्येक ट्रेकला आमच्यासोबत रोप आणि काही कॅरॅबीनर असतातच. आम्ही रोप बाहेर काढला. काशीने शिताफीने पहीला टप्पा पार केला. रोपच्या टोकाची कॉईल करून वर फेकली, काशीने ती झेलली. एस.सी.आय. या संस्थेने अश्या बेवासाऊ किल्ल्याच्या दगडी टप्प्यांवर आवश्यक तिथे स्टीलचे मजबूत ‘बोल्ट’ मारले आहेत. त्यात कॅरॅबीनर अडकवून त्याला रोप लावला. मग आम्हीसुद्धा तो टप्पा चढून वर गेलो.


गावातून सोबत आलेला भाऊ टणाटण उड्या मारत ते कातळटप्पे पार करून अगदी वरपर्यंत पोहोचला होता. जीवधनचे ह्या बाजूचे कातळटप्पे बऱ्यापैकी सोपे असल्याने आणि आम्हाला सवय असल्याने आम्ही रोपशिवाय चढत होतो. रोप फक्त सुरक्षा म्हणून लावला होता. शेवटी मी चढत होतो. मला आत्मविश्वासाने चढताना बघून वर पोहोचलेल्या तिघांनीही तेवढ्याच आत्मविश्वासाने मी वर पोहोचायच्या आधीच रोप गुंडाळून घ्यायला सुरुवात केली. मी मनात म्हंटलं की ‘अर्रे किमान मला वर तर येऊद्या..’ आणि त्रासिक चेहऱ्याने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. पण ते आपल्या गप्पांमध्ये मग्न होते. प्रस्तरारोहणाचा हा टप्पा पार करून आम्ही किल्ल्यात प्रवेश केला.

ऑक्टोबर असल्याने इथे धुकं होतं. किल्ल्याच्या या टोकावरून जीवधनच्या दक्षिणभागाला असलेल्या कोकणकड्यातून वर येणारे ढग दिसले आणि मन प्रसन्न झालं. कड्यातून वर येणारे ढगांचे ते पांढरेशुभ्र कापसासारखे ते लोंढे खूप सुंदर दिसत होते. बराच वेळ तिथेच उभं राहून ते दृश्य नजरेत साठवून घेतलं आणि पुढे निघालो. पण मला पुन्हा त्रास वाटू लागला. उलटी झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी झालं होतं आणि थकवा जाणवत होता.


इथे प्रवेश केल्या केल्याच एक कातळात खोडलेली गुहा आपले स्वागत करते. हे के खांबटाके आहे पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. तिथे जवळच कातळावर वाहणाऱ्या एका झऱ्याचे पाणी पिऊन घेतले. या भागात काही ठिकाणी मजबूत तटबंदी दिसून येते. अचानक जोराच्या वाऱ्याने किल्ल्यावरील धुके वाहून नेले आहे संपूर्ण डोंगर डोळ्यांसमोर उभा झाला. 


किल्ल्यावर कंबरएवढ्या गवत आणि झुडुपांची झाडी दाटली होती. त्यातून सोनकीची पिवळी आणि कारवीची गुलाबी जांभळी बारकी फुले लाखोंच्या संख्येने आमच्याकडे पाहत होती. वाऱ्याच्य झुळूकेवर ती फुले एका तालावर डोलताना खूप सुरेख दृश्य निर्माण करत होती. त्या क्षणाचा आनंद घेत गडाची लहानुली टेकडी आम्ही चढत होतो.


पाऊलभर मातकट वाटेने भाऊ आम्हाला ‘धान्यकोठी’पाशी घेऊन आला. पुन्हा पाऊस सुरु झाला होता. कोठारामध्ये पाणी आणि चिखल जमा झाला होता त्यामुळे आत जाऊन पाहता आले नाही. परंतु बाहेरून त्याच्या प्रशस्तपणाची कल्पना येत होती. संपूर्ण किल्ल्यावर ही एकमेव ‘टिकलेली’ वास्तू आहे. आम्ही पुढे निघालो.

दुपारचे १२ वाजून गेले असल्याने आम्ही किल्ल्याच्या पश्चिम भागात असलेल्या पाण्याच्या टाक्यांजवळ आलो. प्रथमेश आणि काशीला भूक लागली होती. माझ्या तोंडाची चव गेली होती आणि अशक्तपणा जाणवत होता. लागलीच प्रथमेशने सॅकमधून लिंबे काढली आणि बाटलीत पिळून मला लिंबूपाणी प्यायला दिलं. तोवर त्यांनी खाकरे, पराठे, चकल्या वगैरे पदार्थ हादडले. मीही थोडं खाऊन घेतलं.


आता मला जरा बरं वाटू लागलं. पण रिपरिपत्या पावसाने आता बराच जोर धरला होता, म्हणून आम्ही कल्याण दरवाज्याच्या दिशेने निघालो. दरवाज्यात पोहोचेपर्यंत पावसाने झोडपायला सुरुवात केली होती, त्यामुळे आम्ही किल्ला उतरण्याचा जो निर्णय घेतला तो बरोबर होता हे कळून आले.


कल्याण दरवाज्याची वाट प्रचंड मोठ्या घळीच्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांची वाट होती. पण ह्या पायऱ्या सुद्धा सुरुंग लावून उडवून दिलेल्या असल्याने आता हा कातळ टप्पा कठीण झाला होता. त्यात धोधो पावसामुळे वाटेतले हे रॉकपॅच आणखीनच कठीण झाले होते. म्हणून मग इथेही एस.सी.आय. ने स्टीलचे ‘बोल्ट’ ठोकले आहेत. त्यात ‘यु’ आकारात रोप टाकून त्याच्या साह्याने रॅपल्लिंग करून आम्ही खाली उतरू लागलो.


अनेक ठिकाणी कातळ शेवाळलेला आणि निसरडा झाला होता. त्यात पाऊस पडत असल्याने दोरावरूनही हात सरकत होते. सगळे बसून बसून खाली उतरत होतो. कातळटप्पे पार केल्यावर पायऱ्या सुरु झाल्या; त्याही एक-एक करून उतराव्या लागत होत्या.


सावकाश, खबरदारी घेऊन उतरत असूनही काशीचा पाय सरकला आणि तो ८-१० पायऱ्या खाली फेकला. पाठीला बॅग होती म्हणून त्याला जास्त काही इजा झाली नाही. नाहीतर त्याची पाठ चांगलीच सोलवटून निघाली असती. ते पाहून अजूनच भीती वाटू लागली. पण देवदयेने कठीण वाट नीट उतरलो आणि डोंगरात आडव्या जाणाऱ्या वाटेने ‘वांदरलिंगी’ सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचलो. इथे डोंगराच्या पदरात चांगले जंगल आहे; त्यात शिरलो.


आमचा वाटाड्या - भाऊ पुढे पुढे जात आम्हाला जंगलातून वाट दाखवत होता आणि आम्ही त्याला ‘फॉलो’ करत होतो. शेवटी जंगल संपलं आणि नाणेघाटाचे प्रचंड पठार नजरेसमोर पसरलं होतं. पठाराचे टोक गाठण्यासाठीही किमान १५-२० मिनिटं चालावं लागणार होतं आणि आमच्या पायात त्राण उरलं नव्हतं. प्रथमेश म्हणाला, ‘इथे मस्त चहा मिळाला तर काय मजा येईल.’ वाटाड्या म्हणाला, ‘त्या समोरच्या घरात माझा चुलत भाऊ राहतो, त्याच्याकडे मिळेल चहा.’ आम्हाला पुन्हा स्फुरण चढलं आणि आम्ही भराभर त्या घराजवळ पोहोचलो. त्या घरी मस्त गरमागरम कोरा चहा घेतला आणि थोडावेळ पाय मोकळे केले. भाऊच्या भावाचे आभार मानून आम्ही निघालो आणि नाणेघाटात पोहोचलो.

संध्याकाळचे ४ वाजले होते; आता घाटघर गावात जाऊन एखाद्या गावकऱ्याच्या घरात जाऊन पायांना आराम द्यायचा, मस्त गरमागरम जेवण जेवायचं आणि गाढ पथारी पसरून द्यायची, असे चैनी विचार माझ्या मनात येऊन गुदगुल्या होऊ लागल्या. खरंतर ही गोष्टी कितीतरी सुखावह होती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं म्हणून त्यांनी या ट्रेकला प्रथमेश आणि काशिनाथला सोबत पाठवलं होतं. दोघेही पठ्ठे फक्त एका दिवसाच्या तयारीने आले होते. कपड्याचे जोड, स्लीपिंग बॅग इत्यादी मुक्कामाच्या गोष्टी ते घेऊन आले नव्हते, हे त्यांनी मला नाणेघाटाच्या घळीच्या सुरुवातीला सांगितलं. मी ह्या सगळ्या वस्तू घेऊन बॅग जड करून किल्ला चढलो उतरलो होतो. दोघांनीही माझ्या प्लानच्या चिंध्या केल्या होत्या आणि आयत्या वेळी प्लान बदलतोय म्हणून चिडलो होतो. दोघांनीही नाणेघाट आता उतरून जाऊया असा ठराव मांडला. तिघांमध्ये दोघांची ‘मेजॉरीटी’ झाली. त्यात नेहमीप्रमाणे ‘मला उद्या कंपल्सरी क्लास आहे..’ हे वाक्य चिटकवून टाकलं. माझे पाय गळ्यात आले होते. उलट्या केल्यामुळे होत असणारा त्रास वेगळाच. मी खूप चिडलो होतो. ‘आता खाली उतरेपर्यंत अंधार होईल, जंगलात बिबटे आहेत, एस.टी. मिळणार नाही..’ इत्यादी अनेक गोष्टी समजावून देण्याचा मी केलेला प्रयत्न दोघांनी हाणून पाडला. ‘आता ह्याला चांगलाच पिदडवतो..’ हे सांगणारे भाव दोघांच्या डोळ्यात दिसून येत होते. शेवटी होय-नाय करता करता मी नाणेघाट उतरण्याच्या त्यांच्या ‘कटा’त सामील झालो (खरंतर ऑप्शनच नव्हता). रागाच्या भरात मी भराभर नाणेघाट उतरू लागलो. धाड-धाड-धाड करत पावले टाकत मी पायथा जवळ करत होतो. प्रथमेश आणि काशी मागाहून येत होते. कधी नव्हे ते मी पुढे होतो आणि ते दोघे मागे होते. माझ्या पायांची आणि मांड्याची हालत खूप बेक्कार झाली होती. पण रागामुळे मला ते कळून येत नव्हते. कारण मला उजेड असेपर्यंत रोडच्या बाजूला असणाऱ्या कमानीपर्यंत पोहोचायचं होतं. शेवटी अगदी अडीच तासांत आम्ही नाणेघाट उतरून कमान गाठली होती.
दैवदयेने पाऊस थांबला होता. मी रस्त्याच्या जवळ थोडी सुकी जागा पाहून बॅग डोक्याखाली घेऊन पार आडवा झालो होतो. ‘आता एस.टी. मिळेल काय?’ प्रथमेशने सहज प्रश्न केला. मी बार भरून ठेवला होता; म्हंटलं ‘नाणेघाट उतरून खाली यायचं ठरलं होतं तसं खाली आलोय आपण.. आता पुढे काय करायचं, कसं करायचं ते तुम्ही बघा.. गाडी मिळाली तर पुढे जाऊ.. नाहीतर मी सगळं सामान घेऊन आलोय, मी इथेच मुक्काम ठोकीन..’ माझ्या रागाचा त्यांच्यावर काडीमात्र फरक पडला नाही.. उलट दोघे एकमेकांकडे पाहून हसत होते. मी आडवाच होतो. अगदी १० मिनिटांत एक एस.टी. तिथे आली, दोघांनी हात दाखवून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती भुर्रदिशी निघून गेली. त्यांचा पोपट झाला म्हणून मला थोडं बरं वाटलं. त्यापुढे अर्ध्या तासाच्या वेळात आणखी एक-दोन बस येऊन गेल्या पण त्याही थांबल्या नाहीत. ‘xxxxx.. बस थांबत का नाहीयत??’ आता प्रथमेश भडकला होता. पण आता खुश होऊ की टेन्शन घेऊ या द्विधा मनस्थितीत मी होतो. ‘मी इथेच मुक्काम ठोकीन..’ या वाक्यात तेवढा खरेपणा नव्हता कारण इतर ठिकाणी पकडून आणलेले बिबटे फॉरेस्टवाले त्या जंगलामध्ये सोडतात हे माहित होते. मग गाडीला ‘लिफ्ट’चा हात मी सुद्धा उभा राहिलो. ‘एक काम करूया.. इथे गाड्या थांबवून लुट-पाटीचे प्रसंग सुद्धा झालेले आहेत.. पाठीला बॅग नाहीय म्हणून कदाचित गाड्या थांबत नसतील.. बॅग लावून उभे राहूया आणि हात दाखवूया..’ मी त्या दोघांना (आणि स्वतःलाही) एक धीराचा सल्ला दिला. तत्काळ बॅगा पाठीला लावल्या गेल्या आणि हात हलवायला सगळे उभे राहिलो. थोड्या वेळात एक ‘बोलेरो’ तिथे आली. हात पाहून ते लोक थांबले.
“काय नाणेघाटात आले होते काय??..” ड्रायव्हरच्या बाजूला असणाऱ्या एकाने प्रश्न केला..
“हो.. ट्रेकला आलो होतो.. उतरायला उशीर झाला..” सगळे म्हणालो..
“हो.. ते बॅगांवरून कळतंय तुमच्या..” इथे तो हसला का ते कळलं नाही.. “बरर्र.. कुठे जायचंय?” त्याने विचारलं..
“मुरबाडला जायचंय पण तुम्ही टोकावड्याला सोडलं तरी चालेल..” आम्ही उत्तरलो..
“आम्ही शहापूरला जातोय.. हवंतर आटगावला सोडतो..” त्याने आत ड्रायव्हरकडे पाहून विचारलं.. “काय बोलता??”
आता सगळेच ‘एक्झॉस्ट’ झालो होतो आणि दोघांनी ते मान्यही केलं होतं. माझी विकेटतर वर नाणेघाटाच्या सुरुवातीलाच गेली होती, त्यामुळे मी एका पायावर तयार झालो. खरंतर टोकावडे-मुरबाड आणि आटगाव या सगळ्याचा काही संबंधच नव्हता; पण आम्हा तिघांच्याही मनात, ‘गाडी भेटलीय ना.. बसा एकदाचे नी प्रवास सुरु करा..’ असा विचार सुरु होता. आम्ही होकार दर्शवला आणि गाडीत जाऊन बसलो. गाडीत चौघेजण होते आणि बोलेरो मोठी गाडी असल्याने आम्ही आणखी तिघे आरामात मावलो. गाडी सुरु झाल्यावर हायसं वाटलं. “पाणी वगैरे हवय का?” एकाने विचारलं आणि बाटली पुढे केली. गटागटा पाणी प्यायलो. गुंगीचं औषध, लुट-पाट असे शुल्लक प्रश्न मनात त्यावेळी येण्याची शक्यताच नव्हती कारण तिघांचीही बोंब लागली होती. म्हणतात ना, ‘मरता क्या ना करता..’ त्यातलीच गत.  ‘कुठून आलात, रोज ट्रेकिंग करता का, कुठे कुठे केलंय ट्रेकिंग, पुढे कोणते कोणते गड करणार आहात, व्वा काय मजा आहे बुवा तुमची, तुम्ही खरे महाराजांचे मावळे...’ इत्यादी गप्पा मारता मारता मी कधी गप्पगार झालो ते कळलंच नाही. अधूनमधून खड्यांचे रस्ते झोपमोड करत होते पण ती झोप नव्हती, गुंगी होती.. म्हणजे थकलेल्या शरीराची गुंगी होती..
पावणे दोन - दोन तासांमध्ये “भाऊ.. तुमचं आटगाव आलं..” ही हाक आली आणि झोपमोड झाली. “जा, लवकर पळा.. पावणे नऊची ट्रेन मिळेल तुम्हाला..” असा एक ‘अॅडीशनल’ सल्ला देखील मिळाला. ‘अर्ध्या’ झोपेतून उठत मी कशीबशी बॅग पाठीला लावली. प्रथमेश आणि काशी आधीच उतरले होते. गाडीवाल्या भाऊंना धन्यवाद देत.. निरोप घेत आणि स्टेशनकडे पळत निघालो, तोच समोर ट्रेन येऊन उभी राहिली. स्टेशनवर पोहोचायला किमान ५ मिनिटं हवी होती आणि मनात आलं तेच झालं. स्टेशनवर पोहोचेपर्यंत ट्रेन आमच्या डोळ्यासमोरून निघून गेली. कपाळावर हात मारले गेले. ‘श्या.. च्यायला थोडा आधी आलो असतो तर आता ट्रेनमध्ये बसलेलो असतो आपण..’ हा विचार सगळ्यांच्या मनात येऊन गेला होता हे नक्की.. स्टेशनवर पोहोचलो आणि तिथल्या बाकांवर आडवे झालो. ‘मी सगळं सामान घेऊन आलोय, मी इथेच मुक्काम ठोकीन..’ ही माझी टिमकी तिथेही सुरु केली. आणि आता मात्र दोघांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. कारण पुढली ट्रेन तासभर उशिराने येणार होती; म्हणजे जवळपास दहा वाजणार होते. त्यानंतर दीड तासाने दादर आणि चाळीस मिनिटांनी बोरीवली येणार होतं. म्हणजे दोघांना घरी पोहोचायला एक वाजणार होता. पुढला सगळा प्रवास त्रासदायक होणार आहे आणि आपला त्रिशंकू झालाय हे लक्ष्यात आल्यामुळे दोघे विचारात होते. “मी तर बाबा माझ्या आज्जीकडे दादरला जाईन..’ असं बोलून प्रथमेशने आपला निर्धार दर्शवला. त्यानी काशीचं टेन्शन आणखी वाढलं, कारण दादरहून पुढे तो एकटाच असणार होता. मी बिनधास्त होतो कारण ‘मी सगळं सामान घेऊन आलो होतो..’; खरंतर आधी अनेकवेळा ट्रेकदरम्यान स्टेशनवर रात्र काढली असली तरी त्यावेळी त्याक्षणी आख्खी रात्र स्टेशनवर काढायला मलाही शक्य नव्हतं पण मी हे दाखवून देत नव्हतो. सगळ्यांच्या थोड्या-थोड्या झोपा झाल्या होत्या त्यामुळे वेळ घालवण्यासाठी स्टेशनवर गप्पा सुरु झाल्या. गाडीत असताना ‘मी घोरत होतो का रे??’ ह्या प्रश्नाला उत्तर देऊ शकणारे दोघेही त्यावेळी कदाचित स्वतःही घोरत पडले होते. म्हणून तो प्रश्न मी आवरता घेतला.
“भाईलोक, मला भूक लागलीय..” प्रथमेशनी नवीन अध्याय सुरु केला. “आयला, प्रसंग काय सुरुय नी तुला काय नको त्या गोष्टी सुचतायत रे??” मी म्हणालो.. काशीनीसुद्धा मला दुजोरा दिला. “अर्रे सिरीयसली खूप भूक लागलीय.. तासभर गाडी नाही येणार आहे.. काहीतरी खाऊन येऊया ना तोवर..” तो म्हणाला. मला तर आडवा झालेलो ते उभं व्हायला कंटाळा आला होता आणि त्यात हा हॉटेल शोधण्यासाठी चालवणार ह्या विचाराने मी त्याला मनातच शिव्यांची लाखोली वाहिली. होय-नाय करत शेवटी सगळ्यांनाच भूक लागल्याने स्टेशनबाहेर जाऊन जवळचं एखादं हॉटेल शोधण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. बाहेर फक्त एक भलामोठा हायवे आणि त्यावर भरधाव धावणाऱ्या गाड्या दिसून आल्या. आजूबाजूला चीटपाखरू सुद्धा नव्हतं. मन थोडं खिन्न झालं. दूरवर प्रथमेशला ‘हरलेल्या माणसाला आशेचा किरण दिसावा’ तसा एका धाब्याच्या बल्बचा ‘किरण’ दिसून आला. “अर्रे ते बघा.. तिथे एक धाबा आहे वाटतं..” तो म्हणाला. लागलीच आमचे पाय किरणाच्या दिशेने वळले. पण तो किरण हायवे पलीकडे होता आणि हायवेवर सुस्साट धावणाऱ्या गाड्या होत्या. हायवे ओलांडायचा ‘टायमिंग’ चुकला तर थेट ‘स्वर्ग’ दिसणार होता. पण आता आम्हाला ‘भुकेने’ घेरले होते. ‘टायमिंग’ लावून आम्ही तो हायवे पार केला आणि त्या धाब्यावर पोहोचलो.
त्यासंपूर्ण भागात हा एकमेव धाबा होता. पावसामुळे मातीच्या चिखलातून प्रवेश, फिनिशिंग न दिलेल्या विटांच्या कळकट्ट भिंती, जुनाट खाटा आणि त्यावर मध्ये टाकलेली जुनाट फळी, जुनाट कळकट्ट तंदूर आणि त्यावर रोट्या शेकणारे आणि जेवण बनवणारे तेवढेच जुनाट आणि कळकट्ट स्वयंपाकी, गल्ल्यावर बसलेला म्हातारा मालक.. असा सगळा थाट पाहून थोडी नाखुशीनेच आमची एन्ट्री झाली. पण एका जुनाट रेडियोवर लागलेली जुनी गाणी ऐकून मात्र मन प्रसन्न झालं. त्या गाण्यांनी त्या ढाब्याचा ‘मूड’च बदलून टाकला. जुनाट असला तरी तो ढाबा घाणेरडा नव्हता.. अस्वच्छ नव्हता.. आम्ही खाटांच्या टोकाला मांडगट मांडी घालून बसलो. खाटेच्या टोकाला दोघे आणि मध्ये फळी अशी ती ‘अरेंजमेट’ होती. त्याने तोंडी ‘मेनू’ सांगितला. त्यातील ‘रोटी आणि चिकन मसाल्या’ची ऑर्डर गेली. गप्पा सुरु झाल्या. बॅकग्राउंडला मुकेश, रफी, लता यांची ‘ब्लॅक अँड व्हाईट’ जमान्यातली जुनी गाणी ऐकू येत होती. बाहेर पाऊस सुरु झाला होता. मस्त माहोल होता.

आमची ऑर्डर आली. गरमागरम रोटी-चिकनचे घास पोटात गेले आणि पुढली ऑर्डर पास झाली. रोट्या - चिकन - बिर्याणी ह्या सगळ्या सगळ्याची चव खूपच सुंदर होती. त्याला कोळश्याचा सुरेख ‘फ्लेवर’ आणि ‘फ्रागरन्स’ येत होता. अश्या ठिकाणी इतक्या छान चवीचं जेवण अपेक्षितच नव्हतं. दाबून जेवलो आणि वरून ‘थंडगार छास’ची ऑर्डरही गेली.  बोलता बोलता घड्याळात लक्ष्य गेलं आणि कळलं की जेवणात पाऊण तास गेला होता आणि ट्रेनची वेळ झाली होती. धस्स झालं. मालकाला फटाफट बिलाचे पैसे देऊन छासचे प्लास्टिकचे ग्लास हातात घेऊन ते पीत पीत स्टेशनकडे धावलो. आणि पुन्हा ‘जैसे थे’च चा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पावणे दहाची ट्रेनसुद्धा डोळ्यांसमोरून निघून गेली होती. खरंतर खूप खूप निराशेचा तो क्षण होता, पण आम्ही जे काही जेवलो होतो त्याच्या चवीसमोर ती निराशा काहीच नव्हती. त्या जेवणाने हा धक्का झेलायचं सामर्थ्य दिलं होतं. ‘ठीक आहे.. पुढली ट्रेन पकडूया.. त्यात काय एवढं..’ हा विचार मनात येतो न येतो तोच स्टेशनवर अनाऊंसमेंट झाली की पावणे अकराची ट्रेन अर्धा तास उशिरा येणार आहे. म्हणजे पुढली ट्रेन आता थेट साडे अकरा वाजता येणार होती. म्हणजे मला आजची रात्र स्टेशनवर काढायची आहे हे कन्फर्म झालं. बाकी दोघे काय विचार करतायत ह्याचा ‘लोड’ मी त्यावेळेला घेतला नाही. जेवणाची तारीफ करत आणि ट्रेक कसा भारी झाला आणि कश्या ‘अनफरगेटेबल मेमरीज’ तयार होतायत अश्या गप्पा मारत आम्ही आमचं मन रमवत होतो.
शेवटी साडे अकरा वाजता एकदाची ती ट्रेन आली आणि आम्ही आत शिरलो. ट्रेन रिकामी होती हे सांगायची गरजच नाही. मोकळ्या बाकांवर आडवे झालो. तीन बाक तिघांनी ‘रिजर्व’ केले. मी घोरू लागलो (हो.. ते कळतं मला..) एक अर्ध्या तासाने मला जाग आली तेव्हा ट्रेननी ‘दिवा’ पार केलं होतं. प्रथमेश आणि काशी उठून ‘इज्जतमध्ये’ बसले होते आणि गाडी बऱ्यापैकी भरलेली होती. मी येड्यासारखा त्या बाकावर झोपून होतो. कसंसच वाटून मी सुद्धा उठून नीट बसलो. गाडीतले लोक ‘विचित्र’ नजरेने बघत होते. मी दुर्लक्ष्य केलं. ‘ठाणे’ आलं तसं दोघांचा निरोप (आणि मनात शिव्या) देऊन मी ट्रेनमधून उतरलो. पुढला प्रवास आणि घरची कथा न सांगितलेलीच बरी...

थोडक्यात:
किल्ले जीवधन (घाटघर, पुणे)
उंची: ३७५४ फुट । श्रेणी: सोपी - ३ । भ्रमंती: उत्तम । ऋतू: सर्व
जुन्नर ते घाटघर  - एस.टी. / स्वतःचे वाहन - एक तास
घाटघर (पायथा) ते किल्ला - ट्रेक - दोन तास 
नाणेघाट (कल्याण दरवाजा) ते किल्ला - ट्रेक - दोन तास 
(वरील वेळा ह्या, नियमित ट्रेकर्सचा आरामात उतरण्याचा वेग दर्शवितात. चढाईला कमी-जास्त वेळ लागू शकतो.)
नोंद: वरील लेख, 'सामना' वृत्तपत्राच्या 'फुलोरा' या करमणूक विशेष पुरवणीमध्ये ०४ मे २०१३ रोजी प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचनासाठी पुढील 'थम्बनेल' वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment