भ्रमंती पावसाळी - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 7, 2013

भ्रमंती पावसाळी

जून महिन्याला आपल्या भारतीयांच्या आयुष्यात खूप महत्व आहे. अनेक गोष्टीची सुरुवात या महिन्यात होते त्यामुळे कदाचित याला मराठीत ‘ज्येष्ठ’ म्हणत असावेत. भारतातील पर्जन्य सुरु होण्याचा हा काळ. शाळा, कॉलेजेसही याच महिन्यात सुरु होतात. वातावरणातील महत्वाचा बदल हे या महिन्याचे वैशिष्ट्य. उन्हामुळे जीवाची काहिली होणारी सर्व सजीवसृष्टी ज्याची वाट पहात असते तो हा महिना. उन्हाने तापलेली धरणी, खडक पावसात न्हाऊन निघण्यासाठी वाट पहात असतात तो हा महिना. पण पावसाळा सुरु झाला म्हणजे जास्त धांदल होते ती आपल्या गिरीप्रेमी आणि निसर्गमित्रांची. ऐन पावसाळ्यात भटकायला जाणे, हिरवाई पांघरलेल्या डोंगरांवर हिंडणे, धबधब्याखाली मनसोक्त भिजणे, भिजून झाल्यावर जवळच्या टपरीवर गरमागरम भजी आणि चहा यांवर ताव मारणे, दाट धुक्यात स्वतःला हरवून देणे आणि असे अनेक अनुभव घेण्यासाठी, अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत, ही मंडळी आसुसलेली असतात. आधी भेट दिलेले एखादे स्थळ निवडून त्यावर पावसाळी ‘पिकनिक’ किंवा ‘ट्रेक’ आखला जातो. एखाद्या धबधब्याजवळचे स्थळ यासाठी मुद्दाम निवडले जाते. पावसाळ्यात ट्रेकला, गिरीभ्रमंतीला जाण्याचे आजकाल ‘फॅड’ वाढते आहे. पावसाळ्यात एकतर वातावरण वातावरण थंड असते, घाम कमी येतो, पाण्याची कमतरता नसते, इत्यादी कारणांमुळे अनेकजण पावसाळी भ्रमंती पसंत करतात. परंतु त्यात ‘प्रॉब्लेम्स’ही असतात. पावसाळ्यात चहुबाजूला पाणी जमते. अधिक वेळ पाण्यात भिजल्यास आजार होतात. गावाकडील रस्ते कच्चे असल्यामुळे अनेकदा धुऊन जातात; सार्वजनिक वाहनाची वेळापत्रके बदलत राहतात; पाणी जमल्यामुळे वाहतूक खोळंबते; नियोजित वेळापत्रकामध्ये २-३ तासांचा फरक पडू शकतो; चिखल, शेवाळे, दलदल यांमुळे अपघात घडतात; पोहण्याच्या ठिकाणी खोलीचा अंदाज न आल्यामुळे डुंबण्याचे प्रकार वाढतात; दरडी कोसळतात; बिळांमध्ये पाणी शिरल्याने सरपटणारे प्राणी, किडे, कीटक बाहेर पडतात व त्यांच्या दंशाने धोका संभवतो; आणि अश्या अनेक अडचणी सामोऱ्या येतात. योग्य रीतीने आयोजन व नियोजन केल्यास या सर्व अडचणींवर मात करून आपण आपली पावसाळी भ्रमंती यशस्वी करू शकतो, तिचा आनंद घेऊ शकतो.

तर असा आनंद मिळविण्यासाठी काय कराल?
  • पावसाळी भ्रमंती/सहल आपल्या तब्येतीला मानवते का याचा अंदाज घ्या. कारण पावसा-पाण्यात भिजल्यानंतर सर्दी, खोकला, ताप इत्यादी आजार संभवतात.
  • पावसाळी भ्रमंती/सहलीसाठी जे ठिकाण निवडले आहे त्याची इत्यंभूत माहिती आयोजकाला असणे आवश्यक आहे. तुम्ही स्वतः अशी भ्रमंती/सहल ‘ऑर्गनाईज’ करत असाल तर आधी भेट दिलेल्या स्थळालाच प्राधान्य द्या; कारण अश्या स्थळाची तुम्हाला जुजबी माहिती असते व नियोजनाचा त्रास वाचतो. पावसाळ्यात रस्ते, वाटा, धुक्यामुळे कळून येत नाहीत. उपहारगृहे, विश्रांतीगृहे इत्यादींची, आयत्यावेळी शोधाशोध पावसात कंटाळवाणी ठरते. पावसाळ्यात रिक्षा, टॅक्सीवाल्यांचा ‘सीजन’ असतो त्यामुळे त्यांची गरज लागल्यास ते अव्वाच्या-सव्वा पैसे उकळतात. इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास आधी भेट दिलेले स्थळ पावसाळी भ्रमंती/सहलीसाठी केव्हाही उत्तम.
  • पावसाळी भ्रमंती/सहलीसाठी एक उत्तम वॉटरप्रुफ सॅक / बॅग, कपडे सुके ठेवण्यासाठी निर्वात पिशव्या (कम्प्रेशन/ड्राय बॅग्ज), हवाबंद खाद्यपदार्थ, तात्पुरता आडोसा म्हणून ६ वर्गफुट प्लास्टिकचा तुकडा, पाण्यापासून बचाव करणारे अथवा पाणी बाहेर काढणारे, उत्तम पकड घेणारे पावसाळी बूट, रेनकोट (रेन पोंचो), मोबाईल, कॅमेरा, पुरेशी रोकड, भिजलेले कपडे वेगळे ठेवण्यासाठी पॉलीथीन पिशव्या सोबत ठेवाव्यात.
  • पावसाळ्यात गमबूट वापरू नयेत, ते त्रासदायक ठरतात. ‘ऑल सीजन’ शूज वापरावेत. त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. कारण जास्तवेळ त्वचा पाण्याच्या संपर्कात राहिल्यास त्रास होतो. छत्री अजिबात उपयोगी होत नाही. तीच तऱ्हा रेनकोटची होते. पावसाळी भ्रमंती/सहली या पावसाची मजा लुटण्यासाठीच असल्याने त्याचा जास्त वापरही होत नाही. अगदीच वाटल्यास बिनबाह्यांचा घट्ट विंडचीटर वापरावा. हो! पावसाच्या पाण्यापासून डोके वाचविण्यासाठी मात्र पावसाळी टोपी वापरलीच पाहिजे.
  • पावसाळ्यात लवकर सुकणारे, हलके कपडे वापरावेत. जीन्स पँट इत्यादी जाड कपडे टाळावेत. कारण ते भिजले की लवकर सुकत नाहीतच पण भिजून जड झाल्याने आणखी त्रासदायक ठरतात. स्त्रियांनीही अंगाला चिकटतील, पारदर्शक होतील असे कपडे वापरू नयेत. टी=शर्ट आणि सुती पँट हे कपडे अतिउत्तम. भिजायचे कपडे आणि त्यानंतर वापरावयाचे कपडे आधीच ठरवून वेगळे ठेवावेत. कपडे सुके ठेवण्यासाठी बाजारात कम्प्रेशन/ड्राय बॅग्ज उपलब्ध आहेत.
  • पावसाळी भ्रमंती / सहल शक्यतो एकदिवसीय ठेवावी. त्यासाठी स्वतःचे किंवा भाड्याने वाहन घ्यावे. यामुळे रिक्षा-टॅक्सीवाल्यांची मनमानी व लुटालूट टाळता येते. तसेच हवे त्या वेळेस निघणे, हवे त्या ठिकाणी थांबणे, इत्यादी गोष्टी आपल्या मर्जीनुसार करता येतात. वेळ पडल्यास कपडे बदल्यासाठीही वाहनाचा वापर होतो. सार्वजनिक वाहनांमध्ये ही सोय होत नाही.
  • पावसाळ्यात गरम पदार्थांचे सेवन करावे. चहा, कॉफी, सूप केव्हाही उत्तम. सर्व पदार्थ एकाचवेळी न खाता ३-४ वेळेला खावेत, त्यामुळे अंगात ऊब राखता येते. हवाबंद खाद्यपदार्थ घाईच्या वेळी वापरता येतात. पाण्याचा पुरेसा साठ सोबत बाळगावा. ‘पावसाळा आहे’ म्हणून पाण्याकडे दुर्लक्ष करू नये. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाणी गढूळ येणे, किडे-मुंग्या मेल्याने पाणी दुषित होणे, इत्यादी प्रकार घडतात, त्यामुळे पाणी स्वच्छ दिसले तरीही उकळून किंवा निर्जंतुक केलेलेच पाणी प्यावे.
  • ताप, सर्दी खोकला, खरचटणे, इत्यादींसाठी लहानशी प्रथमोपचार पेटी, आवश्यक औषधे आणि वस्तूंसह सोबत बाळगण्यात कुचराई करू नये. ती वेळप्रसंगी अत्यंत उपयुक्त होते.

ह्या साध्या-सोप्या गोष्टींची काळजी घ्या आणि आपली पावसाळी भ्रमंती / सहल मजेशीर करा..

नोंद: वरील लेख, 'रॉक क्लाइम्बर्स क्लब' तर्फे विनामुल्य वितरीत केल्या जाणाऱ्या 'सह्याद्री - कणा महाराष्ट्राचा' ह्या गिर्यारोहण आणि पर्यटन विषयक ई-मासिकाच्या, जून २०१२ अंकामध्ये प्रसिद्ध झाला आहे.


No comments:

Post a Comment